नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.
नेपाळच्या राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांचा नुकताच झालेला यशस्वी भारत दौरा यासह भारत-नेपाळ संबंधातल्या ताज्या घडामोडींवर उभय पंतप्रधानांनी चर्चा केली.
नेपाळमध्ये सुमारे वीस वर्षात प्रथमच स्थानिक निवडणूका घेण्यात येत असल्याबद्दल पंतप्रधान प्रचंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली आणि यासंदर्भात भारताला मदतीची विनंती केली.
शांतता, स्थैर्य, सामाजिक-आर्थिक परिवर्तनासाठी नेपाळमधली जनता करत असलेल्या प्रयत्नांप्रती भारत सरकार आणि जनता शुभेच्छा देत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. स्थानिक निवडणुकांसाठी भारत सर्व ती मदत देईल, असे आश्वासन त्यांनी पंतप्रधान प्रचंड यांना दिले.
दोन्ही देशातल्या जनतेच्या हितासाठी भारत-नेपाळ सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही पंतप्रधानांनी कटिबद्धता दर्शवली.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane