पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त राष्ट्र आमसभेच्या 70 व्या अधिवेशनाचे निर्वाचित अध्यक्ष मॉगेन्स लिकिटॉफ्ट यांची भेट घेतली.
संयुक्त राष्ट्र आमसभेच्या 70 व्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल लिकिटॉफ्ट यांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. शाश्वत विकासाठी 2030 कार्यक्रम स्वीकारण्यासाठी होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या शिखर परिषदेने अधिवेशनाला प्रारंभ होईल. 25 सप्टेंबर 2015 रोजी होणाऱ्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. शाश्वत विकास 2030 कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असलेल्या शाश्वत विकासाच्या अनेक उद्दिष्टांची अंमलबजावणी भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, स्मार्ट सिटीज आणि जनधन योजना यासारख्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांच्या माध्यमातून सुरु केली आहे असे पंतप्रधानांनी नमूद केले.
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे 70 वे अधिवेशन संयुक्त राष्ट्रांसाठी महत्त्वपूर्ण क्षण असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. जनतेच्या उंचावलेल्या अपेक्षा संयुक्त राष्ट्र पूर्ण करेल हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. यांसदर्भात, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणांच्या प्रलंबित मुद्दयांवर ठोस निर्णय घेण्याचे तसेच आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक परिषदेला वेगाने अंतिम स्वरुप देऊन दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी कायदेशीर व्यवस्था मजबूत करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
यावेळी लिकिटॉफ्ट यांनी संयुक्त राष्ट्र आमसभेच्या 70 व्या अधिवेशनासाठीच्या आपल्या प्रााधान्यक्रमाबाबत पंतप्रधानांना संक्षिप्त माहिती दिली. शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी जागतिक भागीदारीचे पुनर्नवीकरण, हवामान बदल समस्या, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेप्रती संयुक्त राष्ट्रांच्या योगदानात सुधारणा आणि मानवतावादी परिस्थितीला प्रतिसाद आदी प्राधान्यक्रमांचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
जगातील सर्वात मोठया लोकशाहीपैकी एक असलेल्या आणि संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेत सर्वात मोठे योगदान देणाऱ्या भारताची संयुक्त राष्ट्रांमध्ये निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असायला हवी असे लिकिटॉफ्ट यांनी मान्य केले.
उभय नेत्यांनी हवामान बदलाशी संबंधित मुद्दयांवर परस्परांची मते जाणून घेतली आणि यासंदर्भात पॅरिस येथे होणाऱ्या कॉप-21 परिषदेत विकसनशील देशांचे समाधान होईल असा सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा व्यक्त केली.
S.Kane/S. Tupe
President-elect of @UN General Assembly Mr. Mogens Lykketoft & I had a meeting today. @lykketoft pic.twitter.com/hBM7RGcIqr
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2015