पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने आरेखित केलेल्या करारावर स्वाक्षरी करण्याच्या नूतन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. पॅरिस परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅरिसला गेले असताना त्यांनी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी 30 नोव्हेंबर 2015ला संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना केली.
सौर ऊर्जेचा समृद्ध स्रोत असलेल्या 121 पेक्षा जास्त देशांना संयुक्त संशोधन, कमी खर्चात सौरऊर्जा आणि जलद अंमलबजावणी यासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय सौर आघाडी करणार आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या मुख्यालयाची पायाभरणी हरियाणातील गुडगावइथल्या ग्वाल पहारी इथे करण्यात आली आहे. आघाडी कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य देण्याची प्रतिबद्धता भारताने यापूर्वीच दर्शवली आहे. पर्यावरण आणि नवीकरणीय ऊर्जेच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जागतिक स्तरावर भारताला नेतृत्वाची भूमिका मिळवून देईल. आपले सौर उपक्रम प्रदर्शित करण्यासाठीचा मंचही आघाडी पुरवेल.
पार्श्वभूमी :
यासाठीचा करार मारकेश परिषदेदरम्यान स्वाक्षरीसाठी खुला करण्यात आला. यूएनडीपी आणि जागतिक बँकेने यापूर्वीच सौर आघाडीसोबत भागीदारी घोषित केली आहे. आतापर्यंत 25 देशांनी आरेखित करारावर स्वाक्षरी केली आहे.
B.Gokhale/S.Kakde/D.Rane