Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रिपब्लिक प्लेनरी समिट 2025 मधील भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रिपब्लिक प्लेनरी समिट 2025 मधील भाषण


 

नमस्कार !

तुम्ही सर्वजण थकले असाल , अर्णबच्या भारदस्त आवाजाने तुमचे कान नक्कीच थकले असतील, बसा अर्णब , सध्या निवडणुकीचे वातावरण नाही. सर्वप्रथम, मी रिपब्लिक टीव्हीचे या अभिनव प्रयोगाबद्दल खूप अभिनंदन करतो. तुम्ही सर्वानी युवकांना तळागाळाच्या स्तरावर सहभागी करून , एवढी मोठी स्पर्धा आयोजित करून इथे आणले आहे. देशातील युवक जेव्हा राष्ट्रीय व्याख्यानात सहभागी होतात, तेव्हा विचारांमध्ये नावीन्य येते, ते संपूर्ण वातावरणात एक नवी ऊर्जा भरून टाकतात आणि तीच ऊर्जा यावेळी आपल्याला इथे जाणवत आहे.

एक प्रकारे युवकांच्या सहभागाने आपण सर्व बंधने तोडू शकतो, सीमा ओलांडून जाऊ  शकतो, आणि मग असे कोणतेही लक्ष्य शिल्लक राहत नाही जे साध्य करता येणार नाही . असे कोणतेही ध्येय उरत नाही ज्यापर्यंत पोहोचता येणार नाही. रिपब्लिक टीव्हीने या शिखर परिषदेसाठी एका नवीन संकल्पनेवर काम केले आहे. या शिखर परिषदेच्या यशासाठी मी तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा देतो, तुमचे अभिनंदन करतो. बरं, यात माझाही थोडासा स्वार्थ आहे, एक तर गेल्या काही दिवसांपासून माझा प्रयत्न आहे की मला एक लाख तरुणांना राजकारणात आणायचं आहे आणि ते एक लाख असे असतील ज्यांच्या कुटुंबातील कुणीही आजवर राजकारणात आलेले नसतील, ते युवकच प्रथम येणारे असतील, त्यामुळे एक प्रकारे हा कार्यक्रम  माझ्या या उद्दिष्टाला अनुरूप पार्श्वभूमी तयार करत आहे. दुसरे म्हणजे, माझा वैयक्तिक फायदा असा आहे की जे 2029 मध्ये मतदान करण्यासाठी जातील त्यांना माहित नाही की 2014 पूर्वी वर्तमानपत्रातील मथळे काय असायचे , हे त्यांना माहीत नाही . 10-10, 12-12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे व्हायचे हे त्यांना माहीत नाही आणि जेव्हा ते  2029 मध्ये मतदान करायला जातील तेव्हा त्यांच्यासमोर तुलना करण्यासाठी काहीही नसेल आणि म्हणूनच मला ती कसोटी पार करायची आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की हे जे वातावरण तयार होत आहे , ही जी पार्श्वभूमी तयार होत आहे ती हे काम नक्की करेल.

मित्रांनो,

आज संपूर्ण जग म्हणत आहे की हे भारताचे शतक आहे, तुम्ही हे ऐकलेले  नाही. भारताच्या कामगिरीने , भारताच्या यशाने संपूर्ण जगात एक नवी आशा जागवली आहे. ज्या भारताबद्दल म्हटले जायचे , हा स्वतःही बुडेल आणि आपल्यालाही घेऊन बुडेल , तोच भारत आज जगाच्या विकासाला चालना देत आहे. भारताच्या भविष्याची दिशा काय आहे, हे आपल्या आजच्या कार्यातून आणि उपलब्धीवरून समजते. स्वातंत्र्य मिळून 65 वर्षे लोटल्यानंतरही भारत ही जगातील अकरावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. गेल्या दशकात आपण जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आणि आता त्याच गतीने आपण जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत.

मित्रांनो,

मी तुम्हाला 18 वर्षांपूर्वीच्या गोष्टीचीही आठवण करून देतो. या 18 वर्षांचे एक खास कारण आहे, कारण जे लोक 18 वर्षांचे झाले आहेत, जे पहिल्यांदाच मतदार होत आहेत, त्यांना 18 वर्षांपूर्वीचे काहीही माहिती नाही , म्हणून मी हा आकडा घेतला आहे. 18 वर्षांपूर्वी म्हणजे 2007 मध्ये भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पादन  एक लाख कोटी डॉलर्सपर्यंत पोहचले होते. म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचे तर हा तो काळ होता, जेव्हा भारतात एका वर्षात एक लाख कोटी डॉलर्सच्या आर्थिक घडामोडी होत होत्या. आता आज बघा काय होत आहे ? आता अवघ्या एका तिमाहीतच  सुमारे एक लाख कोटी डॉलर्सचे आर्थिक व्यवहार होत आहेत. याचा काय अर्थ झाला ?  18 वर्षांपूर्वी भारतात एका वर्षात जेवढ्या आर्थिक घडामोडी  होत होत्या, तेवढ्या आता केवळ तीन महिन्यांमध्ये होत आहेत. यावरून हे दिसून येते की आजचा भारत किती वेगाने प्रगती करत आहे. मी तुम्हाला काही उदाहरणे देईन, ज्यावरून लक्षात येईल की गेल्या दशकात किती मोठे बदल  आणि परिणाम घडून आले आहेत. मागील 10 वर्षांमध्ये आपण  25  कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. ही संख्या अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा देखील अधिक आहे. तुम्ही तो काळही आठवून पहा, जेव्हा सरकार स्वतः मान्य करायचे , पंतप्रधान स्वतः म्हणायचे, की एक रुपया पाठवला तर 15 पैसे गरिबांपर्यंत पोहोचायचे, ते 85 पैसे कोण खात होते आणि एक आजचा काळ आहे.  मागील दशकात गरीबांच्या खात्यात डीबीटीच्या- थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून 42 लाख कोटी रुपयांहून अधिक हस्तांतरित करण्यात आले आहेत, 42 लाख कोटी रुपये. जर तुम्ही हिशोब केला तर एका रुपयातले 15 पैसे, तर 42  लाख कोटी रुपयांचे किती होतील ? मित्रांनो, आज जर  दिल्लीतून एक रुपया दिला गेला तर 100 पैसे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतात.

मित्रांनो,

10 वर्षांपूर्वी सौरऊर्जेच्या बाबतीत भारताची जगात कुठेही गणना होत नव्हती. मात्र आज भारत सौरऊर्जेच्या क्षमतेच्या बाबतीत जगातील अव्वल 5 देशांपैकी एक आहे. आम्ही सौरऊर्जा क्षमता 30 पटीने वाढवली आहे. सोलर मॉड्युल निर्मितीतही 30 पट वाढ झाली आहे. 10 वर्षांपूर्वी तर आपण होळीची पिचकारी लहान मुलांची खेळणी देखील परदेशातून मागवत होतो. आज आपली खेळण्यांची निर्यात तिप्पट झाली आहे. 10 वर्षांपूर्वीपर्यंत, आपण आपल्या सैन्यासाठी रायफल्स देखील परदेशातून आयात करत होतो आणि गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्या संरक्षण सामग्री निर्यातीत 20 पट वाढ झाली आहे.

मित्रांनो,

या 10 वर्षांमध्ये, आपण जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे पोलाद उत्पादक, जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मोबाइल फोन उत्पादक आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप परिसंस्था बनलो आहोत. या 10 वर्षांमध्ये आम्ही पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्चात पाचपट वाढ केली आहे. देशातील विमानतळांची संख्या दुपटीने वाढली आहे. या दहा वर्षांमध्ये देशातील कार्यरत एम्सची संख्या तीन पटीने वाढली आहे. आणि या 10 वर्षांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय जागांची संख्याही जवळपास दुप्पट झाली आहे.

मित्रांनो,

आजच्या भारताचा स्वभावच काहीसा वेगळा आहे. आजचा भारत मोठा विचार करतो, मोठी लक्ष्ये निर्धारित करतो आणि आजचा भारत मोठे यश मिळवून दाखवतो. आणि हे घडत आहे कारण देशाचा दृष्टिकोन बदलला आहे, भारत मोठ्या आकांक्षांसह पुढे मार्गक्रमण करत आहे. पूर्वी आपली विचारसरणी , चालतंय , होतं असं , चालू दे असंच  , ज्याला करायचे आहे तो करेल, आपले आपले चालू द्या  अशी होती.

पूर्वी आपली मानसिकता किती संकुचित झाली होती याचे मी एक उदाहरण देतो. त्या काळी जर कुठे कोरडा दुष्काळ पडला, प्रदेश वैराण झाला, तेव्हा काँग्रेस सरकारची सत्ता होती, तर अशावेळी त्या गावांमधील लोक सरकारला विनंतीपत्र देत असत आणि त्यात मागणी काय करत असत तर, साहेब दुष्काळ पडतच असतो, तर या दुष्काळात मदत कार्य सुरु व्हावे. खड्डे खोदू, तेथील माती काढू, दुसऱ्या खड्ड्यांमध्ये टाकून देऊ, अशीच मागणी करत असत लोक. आणखी कोणी काय सांगत असे, साहेब, माझ्या भागात एक हँडपंप लावून द्या ना.. पाण्यासाठी लोक हँडपंपाची मागणी करत असत. कधीकधी खासदार मागणी करत असत की अरे याला गॅस सिलेंडर जरा लवकर द्या, तर खासदार अशी कामे करत असत. त्यांना 25 कुपन्स मिळत असत आणि ती कुपन्स हे संसद सदस्य स्वतःच्या क्षेत्रातील लोकांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी वापरुन त्यांच्यावर उपकार करत असत. एका वर्षात एका खासदाराकडून 25 गॅस सिलेंडर्स,. आणि 2014 पर्यंत हे असेच सुरु होते. खासदार आणखी काय मागत असत, तर म्हणत, की साहेब ही जी रेल्वेगाडी सुरु झाली आहे ना तिला माझ्या भागात एक थांबा द्या ना..तर थांब्याची मागणी होत असे. आणि हे सगळे मी 2014 च्या आधीचे सांगत आहे, फार जुनी गोष्ट नाही ही. काँग्रेसने देशवासीयांच्या सगळ्या आशा-अपेक्षा पायदळी तुडवल्या होत्या. त्यामुळे लोकांनी अपेक्षा ठेवणेच सोडून दिले होते, यांच्याकडून काही चांगले होऊ शकणार नाही ही गोष्ट लोकांनी स्वीकारली होती. मग लोक म्हणत ठीक आहे, तुम्ही एवढं करू शकता तर ते तरी करा. आणि आज तुम्ही बघा, परिस्थिती आणि मानसिकता किती वेगाने बदलत आहे. आता कोण काम करून दाखवू शकतो, कोण परिणाम साध्य करू शकतो हे लोकांना माहित आहे. आणि केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर संसदेतील भाषणे ऐकलीत तर तुम्हाला समजेल, विरोधी पक्ष देखील हेच म्हणतात, मोदीजी अमुक अमुक का नाही करत? म्हणजे याचा अर्थ असा की त्यांनाही वाटते आहे की हे मोदीच करू शकेल.

मित्रांनो,

आज लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्यांचे प्रतिबिंब बोलण्यातून दिसते, फक्त सांगण्याची पद्धत बदलली आहे. आता लोकांच्या मागण्या काय असतात? पूर्वी लोक गाडीला थांबा मागायचे, आता येऊन म्हणतात, की माझ्या भागात पण एक वंदे भारत गाडी सुरु करा.काही काळापूर्वी मी कुवेतला गेलो होतो. मी जेव्हा कधी परदेशात जातो तेव्हा आपले देशवासीय जेथे कार्यरत असतात तेथे जाण्याचा प्रयत्न करतो. तर मी कुवेतच्या कामगार वसाहतीत गेलो होतो, आपले जे कामगार बंधू-भगिनी आहेत जे तिथे कुवेतमध्ये रोजगार मिळवतात, त्यांच्यापैकी काही जण 10 वर्षे तेथे आहेत तर काही 15 वर्षांपासून तेथे वसलेले आहेत. तर त्यांच्याशी मी संवाद साधला. त्यापैकी एक कामगार बिहारमधील एका गावातून कामासाठी तेथे गेला आहे, अधूनमधून तो गावी येतो. त्याच्याशी बोलत असताना तो मला म्हणाला, की साहेब मला एक प्रश्न विचारायचा आहे. मी म्हटले विचारा. तर तो म्हणे की साहेब माझ्या गावाच्या जवळ, जिल्हा मुख्यालयाच्या परिसरात एक आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारा ना. मला इतके प्रसन्न वाटले. मी विचार केला की माझ्या देशातील बिहारच्या गावातून तिथे गेलेला कामगार, जो 9 वर्षांपासून तेथे काबाडकष्ट करत आहे, त्यालाही असे वाटते की आता माझ्या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जाईल. ही आहे आजच्या भारतातील एका सामान्य नागरिकाची आकांक्षा, जी विकसित भारताच्या उद्दिष्टाच्या दिशेने जाण्यासाठी संपूर्ण देशाला प्रेरित करत आहे.

मित्रांनो,

कोणत्याही समाजातील, देशातील नागरिकांच्या समोर असलेली बंधने गळून पडतात, समस्या सोडवल्या जातात, अडथळ्यांच्या भिंती कोसळतात तेव्हाच त्या समाजाची, त्या देशाची ताकद वाढते आणि त्या देशाच्या नागरिकांचे सामर्थ्य वाढते, आभाळाची उंची देखील त्यांच्यासाठी थिटी पडते. म्हणूनच, पूर्वीच्या सरकारांनी नागरिकांसमोर उभे केलेले अडथळे दूर करण्याचा आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. आता मी अंतराळ क्षेत्राचे उदाहरण देतो. अंतराळ क्षेत्रात पूर्वी सर्वकाही इस्रोच्या भरवशावर होते. इस्रोने नक्कीच भरीव कार्य केले आहे, पण अंतराळ विज्ञान आणि उद्योजकतेसंबंधी देशात जे इतर सामर्थ्य होते त्याचा उपयोगच करून घेतला जात नव्हता, सर्वकाही केवळ इस्रोपुरतेच मर्यादित ठेवण्यात आले होते. आम्ही हिम्मत करून अंतराळ क्षेत्र तरुण नवसंशोधकांसाठी खुले करून दिले. आणि जेव्हा मी हा निर्णय घेतला होता तेव्हा कोणत्याही वर्तमानपत्राची ठळक बातमी बनलो नव्हतो, कारण तितकी समज देखील नाही आपल्याकडे. रिपब्लिक टीव्हीच्या दर्शकांना हे जाणून घेऊन नक्कीच आनंद होईल की, आज आपल्या देशात अंतराळ क्षेत्रातील अडीचशेपेक्षा जास्त स्टार्ट अप उद्योग कार्यरत आहेत, ही माझ्या देशातील युवकांची कमाल आहे. हेच स्टार्ट अप्स आज विक्रम-एस आणि अग्निबाणासारखी क्षेपणास्त्रे तयार करत आहेत. मॅपिंगच्या क्षेत्रात देखील असेच झाले. इतके निर्बंध घातलेले होते, तुम्ही एखादा अॅटलास सुद्धा तयार करू शकत नव्हतात. मात्र आता तंत्रज्ञान बदलले आहे. पूर्वी भारतात जर एखादा नकाशा बनवायचा असेल तर त्यासाठी सरकार-दरबारी वर्षानुवर्षे खेटे घालावे लागत असत.आम्ही हा अडथळा सुद्धा दूर केला. आज भू-अवकाशीय मॅपिंगशी संबंधित डाटा, नव्या स्टार्ट अप उद्योगांसाठी मार्ग तयार करून देत आहे.

मित्रांनो,

अणुउर्जेशी संबंधित क्षेत्र देखील पूर्वी सरकारच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले होते. या क्षेत्रात निर्बंध होते, बंधने होती, अडथळ्यांच्या भिंती उभ्या करण्यात आल्या होत्या. आता यावर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने हे क्षेत्र देखील खासगी क्षेत्रासाठी खुले करण्याची घोषणा केली आहे. आणि याद्वारे 2047 पर्यंत 100 गिगावॉट अणुउर्जा क्षमता उभारण्याचा मार्ग बळकट झाला आहे.

मित्रांनो,

तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की आपल्या गावांमध्ये 100 लाख कोटी रुपयांचे, किंबहुना त्याहीपेक्षा कितीतरी अधिक आर्थिक सामर्थ्य दडलेले आहे. मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा ही रक्कम सांगतो, 100 लाख कोटी रुपये…ही साधीसुधी रक्कम नाहीये, गावांमध्ये जी घरे आहेत त्यांच्या रुपात हे आर्थिक सामर्थ्य उभे आहे. मी तुम्हाला आणखी सोप्या पद्धतीने समजावून सांगतो. बघा, आता दिल्ली शहरात तुमची घरे 50 लाख, एक कोटी, दोन कोटी अशा किंमतीची असतात. तुमच्या मालमत्तेच्या मूल्यावर तुम्हांला बँकेकडून कर्ज देखील मिळते. तुमचे दिल्लीत घर असेल तर तुम्हाला कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळू शकते. आता प्रश्न असा आहे की, घरे काय फक्त दिल्लीत आहेत?.. गावांमध्ये देखील घरे आहेतच, तेथील घरांचे देखील मालक आहेत, मग तेथे असे का घडत नाही? गावातील घरांवर कर्ज मिळत नाही कारण भारतातील गावांच्या घरांचे कायदेशीर कागदपत्र उपलब्ध नाहीत, योग्य मोजणी देखील झालेली नाही .म्हणूनच देशाला, देशवासियांना गावांमधील या ताकदीचा योग्य लाभ मिळू शकलेला नाही. आणि ही केवळ भारतातील समस्या आहे असे नव्हे, जगभरातील मोठमोठ्या देशांमध्ये लोकांकडे मालमत्तेचे हक्क नाहीत. नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे असे म्हणणे आहे की जो देश आपल्या लोकांना मालमत्तेचे हक्क देतो, तेथील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात मोठी उसळी दिसून येते.

सहकाऱ्यांनो,

भारतामध्ये गावांतील घरांचे मालमत्ता हक्क प्रदान करण्यासाठी आम्ही स्वामित्व योजना सुरू केली. यासाठी आम्ही गावोगावी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करत आहोत, प्रत्येक घराचे मॅपिंग करत आहोत. आज देशभरातील गावांमध्ये नागरिकांना मालमत्तेची प्रमाणपत्रे दिली जात आहेत. आतापर्यंत सरकारने दोन कोटींपेक्षा जास्त मालमत्ता प्रमाणपत्रे वितरीत केली असून हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. यापूर्वी गावांमध्ये मालमत्ता प्रमाणपत्रांच्या अभावामुळे खूप सारे वाद होत होत, नागरिकांना न्यायालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता हे सर्व थांबले आहे. या मालमत्ता प्रमाणपत्रांच्या आधारे आता ग्रामस्थांना बँकांकडून कर्ज मिळू लागले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आपले व्यवसाय सुरू करू लागले आहेत, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करत आहेत. अलिकडेच मी एक दिवस, या स्वामित्व योजनेच्या अंतर्गत, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधत होतो, माझी राजस्थानमधील एका भगिनीसोबत भेट झाली. त्यांनी सांगितले की, मी माझे मालमत्ता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, मी 9 लाख रुपयांचे कर्ज घेतले गावी, आणि सांगितले की मी गावात व्यवसाय सुरू केला आणि मी अर्धे कर्ज फेडले आहे आणि आता जेव्हा मला संपूर्ण कर्जाची परतफेड करण्यास वेळ लागणार नाही, आणि मला आणखी कर्ज मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. किती आत्मविश्वास आहे.

सहकाऱ्यांनो,

ही जितकी उदाहरणे मी मांडली आहेत, या सगळ्याचा सर्वात मोठा लाभार्थी माझ्या देशाचा युवा वर्ग आहे. तो युवा, जो विकसित भारताचा सर्वात मोठा भागधारक आहे. तो युवा, जो आजच्या भारताचा X-फॅक्टर आहे. या X चा अर्थ आहे, Experimentation Excellence आणि Expansion, Experimentation याचा अर्थ आपल्या युवा वर्गाने जुन्या रुढी परंपरांच्या पलिकडे जात नवे मार्ग शोधले आहेत. Excellence म्हणजे युवा वर्गाने जागतिक मापदंड रचले आहेत आणि Expansion म्हणजे नवोन्मेषाला आपल्या युवा वर्गाने, 140 कोटी देशवासींसाठी त्याचा स्तर आणि व्याप्ती वाढवली आहे. आपला युवा, देशाच्या मोठ्या समस्यांवर उपाययोजना सूचवू शकतो, परंतु या सामर्थ्याचा योग्य वापरही पूर्वी केला गेला नव्हता. हॅकेथॉनद्वारे युवा वर्ग, देशाच्या समस्यांवर उपाय योजना देखील सूचवू शकतात, याबद्दल पूर्वीच्या सरकारांनी विचारही केला नव्हता. आज आम्ही दरवर्षी स्मार्ट इंडिया हॅकाथॉन आयोजित करतो. आतापर्यंत 10 लाख युवा याचा भाग बनले आहेत, सरकारच्या अनेक मंत्रालयांनी आणि विभागांनी शासनाशी संबंधित अनेक समस्या त्यांच्यासमोर ठेवल्या आहेत, अडचणी सांगितल्याकी बरं सांगा, तुम्ही शोध घ्या, काय उपाय असू शकतो. हॅकेथॉनमध्ये आपल्या युवांनी सुमारे अडीच हजार उपाय योजना विकसित करून देशाला दिल्या आहेत. मला आनंद आहे की तुम्हीही हॅकेथॉनची ही संस्कृती पुढे नेली आहे. आणि ज्या युवांनी विजय मिळवला आहे, मी त्या युवांचे अभिनंदन करतो आणि मला आनंद आहे की मला त्या युवांना  भेटण्याची संधी मिळाली.

सहकाऱ्यांनो,

गेल्या 10 वर्षांत देशाने एक new age governance चा अनुभव घेतला आहे. गेल्या दशकात आम्ही, impact less administration ला Impactful Governance मध्ये बदलले आहे. तुम्ही जेव्हा जमिनीवर जातातेव्हा अनेकदा लोक म्हणतात, की आम्हाला अमुक सरकारी योजनेचा लाभ प्रथमच मिळाला. असे नाही की त्या सरकारी योजना पूर्वी नव्हत्या. योजना पूर्वीही होत्या, परंतु या पातळीवरील last mile delivery प्रथमच सुनिश्चित होत आहे. तुम्ही अनेकदा प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या मुलाखती घेता. पूर्वी कागदावर गरीबांच्या घराला मान्यता मिळायची, आज आम्ही प्रत्यक्ष जमिनीवर गरीबांचे घर उभारतो. पूर्वी घर बनवण्याची संपूर्ण प्रक्रिया, govt driven होती. कसे घर बनेल, कोणती सामग्री वापरली जाईल, हे सरकारच ठरवत असे. आम्ही हे owner driven बनवले. सरकार, लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा करते, बाकी घर कसे बनेल, हे लाभार्थी स्वतः ठरवतो. आणि घराच्या डिझाइनसाठीही आम्ही देशभरात स्पर्धा घेतली, घरांचे मॉडेल सादर केले, डिझाइनसाठीही लोकांना जोडले, लोकसहभागातून गोष्टी ठरवल्या. यामुळे घरांची गुणवत्ता सुधारली आहे आणि घरे वेगाने उभारली जात आहेत. पूर्वी विटा-दगड जोडून अर्धवट घरे बनवून दिली जात होती, आम्ही गरीबाला त्याच्या स्वप्नांचे घर बनवून दिले आहे. या घरांमध्ये नळातून पाणी येते, उज्ज्वला योजनेची स्वयंपाकाची गॅस जोडणी आहे, सौभाग्य योजनेची वीज जोडणी आहे, आम्ही फक्त चार भिंती उभ्या केल्या नाहीत, आम्ही त्या घरांमध्ये जीवन उभे केले आहे.

सहकाऱ्यांनो,

कोणत्याही देशाच्या विकासासाठी सर्वात महत्वाचा पैलू आहे तो त्याची सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा. गेल्या दशकभरात आम्ही सुरक्षेवरही खूप जास्त काम केले आहे. तुम्हाला आठवत असेल, पूर्वी टीव्हीवर अनेकदा, बॉम्बस्फोटांच्या मालिकेची ब्रेकिंग न्यूज दाखवली जात असे, स्लीपर सेल्सच्या जाळ्यांवर विशेष कार्यक्रम होत असत. आज हे सर्व, टीव्हीचा पडदा आणि भारताच्या भूमीवरून दोन्ही ठिकाणांहून नाहीसे झाले आहे. नाहीतर पूर्वी तुम्ही ट्रेनमध्ये जात होता, विमानतळावर जात होता, बेवारस कोणतीही बॅग दिसली तर तो हात लावू नका अशी सूचना दिली जात असे, आज ते जे 18-20 वर्षांचे युवा आहेत, त्यांनी ही सूचनाच ऐकलेली नसेल. आज देशात नक्षलवादही अखेरच्या घटका मोजत आहे. पूर्वी जिथे शंभरापेक्षा जास्त जिल्हे, नक्षलवादाच्या प्रभावाखाली होते, आज नक्षलवादाचा प्रभाव दोन डझनापेक्षा कमी जिल्ह्यांपुरता मर्यादित झाला आहे. हे तेव्हाच शक्य झाले, जेव्हा आम्ही nation first च्या भावनेने काम केले. आम्ही या प्रदेशांत Governance ला Grassroot Level पर्यंत पोहोचवले. पाहता पाहता या जिल्ह्यांमध्ये हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते बनले, शाळा-दवाखाने बनले, 4G मोबाइल नेटवर्क पोहोचले आणि परिणाम आज देश पाहतो आहे.

सहकाऱ्यांनो,

सरकारच्या निर्णायक निर्णयांमुळे नक्षलवादाची जंगलातून सफाई झाली आहे, मात्र तो आता शहरी भागांमध्ये पाय रोवू लागला आहे. अर्बन नक्षलींनी आपले जाळे इतक्या वेगाने विस्तारले आहे की, जे राजकीय पक्ष अर्बन नक्षलींचे विरोधक होते, ज्यांची विचारधारा कधीकाळी गांधीजींपासून प्रेरित होती, जी भारताच्या मूळाशी जोडलेली होती, अशा राजकीय पक्षांत आज अर्बन नक्षल पाय रोवून बसले आहेत. आज तिथे अर्बन नक्षलांचा आवाज, त्यांचीच भाषा एकू येते. यातूनच आपल्या लक्षात येऊ शकते की, यांची मूळे किती खोलवर रुजली आहेत. आपण लक्षात ठेवले पाहिजे की, अर्बन नक्षली भारताचा विकास आणि आपला वारसा, या दोन्हींचे कट्टर विरोधक आहेत. तसे तर अर्णबने देखील अर्बन नक्षीलींची पोलखोल करण्याची जबाबदारी घेतलेलीच आहे. विकसित भारतासाठी विकासही गरजेचा आहे, आणि वारसाही सक्षम करणे गरजेचे आहे. आणि यासाठीच आपल्याला अर्बन नक्षलींपासून सावध राहायचे आहे.

सहकाऱ्यांनो,

आजचा भारत प्रत्येक आव्हानाचा सामना करत, नवी शिखरे गाठतो आहे. मला विश्वास आहे की, ‘रिपब्लिक टीव्ही नेटवर्कमधील तुम्ही सर्व लोक कायमच राष्ट्र प्रथम या भावनेनेच पत्रकारितेला नवा आयाम मिळवून देत राहाल. तुम्ही विकसित भारताच्या आकांक्षांना तुमच्या पत्रकारितेद्वारे आणखी पुढे नेत आहातयाच विश्वासाने, तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, खूप खूप शुभेच्छा! धन्यवाद!

***

S.Tupe/S.Kane/S.Chitnis/T.Pawar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com