नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 7 लोक कल्याण मार्गावर आयुष क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक पार पडली. पारंपारिक ज्ञानाचे जतन करून देशाच्या आरोग्य परिसंस्थेसाठी योगदान देण्यासह, सर्वांगीण कल्याण आणि आरोग्यसेवेतील आयुष क्षेत्राची महत्वाची भूमिका यावेळी अधोरेखित करण्यात आली.
2014 मध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना झाल्यापासून, त्याची अफाट क्षमता लक्षात घेऊन, पंतप्रधानांनी या क्षेत्राच्या विकासाकरता स्पष्ट पथदर्शक आराखडा तयार केला आहे. या क्षेत्राच्या प्रगतीचा सर्वंकष आढावा घेताना, पंतप्रधानांनी या क्षेत्राच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी धोरणात्मक हस्तक्षेपाच्या गरजेवर भर दिला.यामध्ये उपक्रमांचे सुसूत्रीकरण करणे, साधन संपत्तीचा अधिकाधिक वापर करणे आणि आयुषची जागतिक उपस्थिती वाढवण्यासाठी दूरदर्शी मार्ग आखणे, यावर भर देण्यात आला.
या आढावा बैठकीत पंतप्रधानांनी या क्षेत्राच्या महत्वाच्या योगदानावर भर दिला. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना देण्यामधील त्याची भूमिका, औषधी वनस्पतीच्या लागवडीद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, आणि पारंपरिक औषधांमध्ये अग्रेसर म्हणून भारताचे जागतिक स्थान बळकट करणे, याचा यात समावेश होता.या क्षेत्राची जगभरातील वाढती स्वीकृती आणि शाश्वत विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याची क्षमता लक्षात घेता, त्यांनी या क्षेत्राची लवचिकता आणि विकासावर प्रकाश टाकला.
धोरणात्मक समर्थन, संशोधन आणि नवोन्मेशाच्या माध्यमातून आयुष क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. योग, निसर्गोपचार आणि फार्मसी क्षेत्राबाबत नियमावली आणि सर्वसमावेशक आणि एकात्मिक आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. प्रशासनाच्या विविध क्षेत्रांच्या कामकाजात पारदर्शकता हा पाया असायला हवा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. सर्व भागधारकांनी आपले काम केवळ कायद्याचे राज्य आणि सार्वजनिक हितासाठी राहील, हे सुनिश्चित करावे, आणि सचोटीचे सर्वोच्च मानदंड अंगीकारावेत, अशी सूचना त्यांनी केली.
शिक्षण, संशोधन, सार्वजनिक आरोग्य, आंतरराष्ट्रीय सहकार्य, व्यापार, डिजिटलायझेशन आणि जागतिक विस्तारात महत्वाचे टप्पे गाठत, आयुष क्षेत्र वेगाने भारताच्या आरोग्य सेवा परिप्रेक्ष्यात एक प्रेरक शक्ती म्हणून विकसित झाले आहे. सरकारच्या प्रयत्नांतून या क्षेत्राने यशाचे अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले असून, त्याविषयी पंतप्रधानांना या बैठकीत माहिती देण्यात आली.
केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के.मिश्रा, पंतप्रधानांचे द्वितीय प्रधान सचिव शक्तीकांत दास, पंतप्रधानांचे सल्लागार अमित खरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
N.Chitale/R.Agashe/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com