Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (119 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद


नवी दिल्‍ली, 23 फेब्रुवारी 2025

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. ‘मन की बात’ मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे आणि सगळीकडे क्रिकेटमय वातावरण आहे. क्रिकेटमध्ये शतकाचे मोल काय असते हे तर आपल्या सगळ्यांना चांगलेच माहीत आहे, मात्र आज मी तुम्हा सर्वांबरोबर क्रिकेट बद्दल नव्हे तर अंतराळ क्षेत्रात भारताने जे शानदार शतक केलं आहे, त्याबद्दल बोलणार आहे. गेल्या महिन्यात इस्रोच्या 100 व्या रॉकेट प्रक्षेपणाचे आपण साक्षीदार बनलो. हा केवळ एक आकडा नाही तर अंतराळ विज्ञानात नित्य नवे शिखर गाठण्याचा आपला संकल्प देखील यातून दिसून येतो. आपल्या अंतराळ प्रवासाची सुरुवात अतिशय साध्या पद्धतीनं झाली होती. यामध्ये प्रत्येक पावलागणिक आव्हानं होती, मात्र आपले वैज्ञानिक विजय प्राप्त करत पुढे पुढे जात राहिले. काळाच्या ओघात अंतराळातील या उड्डाणांमध्ये  आपल्या यशाची यादी वाढतच गेली. प्रक्षेपण वाहनाची निर्मिती असो, चंद्रयानचे यश असो, मंगळयान असो, आदित्य L-1 असो किंवा एकाच रॉकेटमधून एकाच वेळी 104 उपग्रह अवकाशात पाठवण्याची अभूतपूर्व मोहीम असो, इस्रोच्या यशाचा परीघ खूपच मोठा आहे. गेल्या 10 वर्षांमध्येच सुमारे 460 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत आणि यामध्ये इतर देशांच्या अनेक उपग्रहांचाही समावेश आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये आणखी एक विशेष गोष्ट ही देखील आहे की आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांच्या टीममध्ये नारी – शक्तीचा सहभाग सातत्याने वाढत आहे. आणि मला हे पाहून खूप आनंद देखील होत आहे की आज अंतराळ क्षेत्र हे आपल्या युवकांसाठी  पसंतीचे क्षेत्र बनले आहे. 

काही वर्षांपूर्वी कुणी विचार केला असेल की या क्षेत्रात स्टार्ट-अप आणि खासगी क्षेत्रातील अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोच्या घरात जाईल ? जीवनात काहीतरी रोमांचक आणि थरारक गोष्टी  करू इच्छिणाऱ्या आपल्या युवकांसाठी अंतराळ क्षेत्र हा एक उत्तम पर्याय बनत आहे.

मित्रांनो, येत्या काही दिवसांमध्ये आपण ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा करणार आहोत. आपल्या मुलांना, युवकांना विज्ञानात रुची  आणि आवड असणे अतिशय महत्वाचे आहे.  याबाबत माझ्याकडे एक कल्पना आहे, जिला तुम्ही ‘ वैज्ञानिक म्हणून एक दिवस’ असे म्हणू शकता, म्हणजेच तुम्ही तुमचा एक दिवस एक शास्त्रज्ञ म्हणून, एक वैज्ञानिक म्हणून व्यतीत करून बघा. तुम्ही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या इच्छेनुसार, कोणताही दिवस निवडू शकता. त्या दिवशी, तुम्ही संशोधन प्रयोगशाळा, तारांगण किंवा अंतराळ केंद्र यांसारख्या ठिकाणी अवश्य भेट द्या. यामुळे विज्ञानाप्रति तुमचं कुतूहल आणखी वाढेल. अंतराळ आणि विज्ञानाप्रमाणेच आणखी एक क्षेत्र आहे ज्यामध्ये भारत वेगाने आपली मजबूत ओळख निर्माण करत आहे – हे क्षेत्र आहे एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. अलीकडेच, मी एआयशी संबंधित एका मोठ्या परिषदेत सहभागी होण्यासाठी पॅरिसला गेलो होतो. तिथं  या क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचे जगाने भरभरून कौतुक केले. आपल्या देशाचे लोक आज एआयचा कशा प्रकारे वापर करत आहेत याची उदाहरणे देखील आपल्याला पहायला मिळत आहेत. आता, जसं , तेलंगणातील आदिलाबाद येथील सरकारी शाळेचे एक शिक्षक थोडासम कैलाश जी आहेत. डिजिटल गीते आणि संगीतातील त्यांची आवड आपल्या अनेक आदिवासी भाषांना वाचवण्याचे अतिशय महत्त्वाचे काम करत आहे. त्यांनी एआय टूल्स च्या मदतीनं कोलामी भाषेत गाण्याची रचना करून कमाल केली आहे.  ते एआयचा वापर कोलामी व्यतिरिक्त अन्य अनेक भाषांमध्ये गीत तयार करण्यासाठी करत आहेत. 

सोशल मीडियावर त्यांची गाणी आपल्या आदिवासी बंधू-भगिनींच्या पसंतीस उतरत आहेत. अंतराळ क्षेत्र असो किंवा मग एआय, आपल्या युवकांचा वाढता सहभाग एका नव्या क्रांतीला जन्म देत आहे. नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यात आणि त्याचा अवलंब करण्यात भारतातील लोक कोणापेक्षाही मागे नाहीत.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, पुढल्या  महिन्यात 8 मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ आहे. आपल्या नारी शक्तीला वंदन करण्याची ही एक विशेष संधी असते. देवी माहात्म्य मध्ये  म्हटले आहे –

विद्या: समस्ता: तव देवि भेदा:

स्त्रीय: समस्ता: सकला जगत्सु |

म्हणजेच सर्व विद्या या देवीच्या विविध रूपांची अभिव्यक्ती आहे आणि जगातील समस्त नारी – शक्तीमध्ये देखील तिचेच प्रतिरूप आहे. आपल्या संस्कृतीत मुलींचा सन्मान  सर्वोपरि राहिला  आहे. देशाच्या मातृशक्तीने आपल्या स्वातंत्र्यलढ्यात आणि संविधान निर्मितीतही मोठी भूमिका बजावली आहे. संविधान सभेत आपला राष्ट्रध्वज सादर करताना हंसा मेहताजी जे म्हणाल्या होत्या ते मी त्यांच्याच आवाजात तुम्हा सर्वांसोबत सामायिक  करत आहे.

# AUDIO :-

मित्रांनो, हंसा मेहताजी यांनी आपल्या राष्ट्रध्वजाच्या निर्माणापासून ते त्यासाठी बलिदान देणाऱ्या देशभरातील महिलांचे योगदान यामध्ये मांडलं आहे. त्यांचा असा विश्वास होता की आपल्या तिरंग्यातील केशरी रंगामधून देखील हीच भावना अधोरेखित होते. त्यांना विश्वास होता कि आपली  नारी-शक्ति भारताला सशक्त आणि समृद्ध बनवण्यात आपले बहुमोल योगदान देईल-आज त्यांचे म्हणणे खरं ठरत आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रावर नजर टाकली तर तुम्हाला आढळून येईल की महिलांचे योगदान किती व्यापक आहे. मित्रांनो, यावेळी महिला दिनानिमित्त मी एक असा उपक्रम  हाती घेणार आहे जो आपल्या नारी -शक्ति प्रति समर्पित असेल.  या विशेष प्रसंगी मी माझे सोशल मीडिया अकाउंट  उदा. X, Instagram ची अकाउंट्स देशातील काही प्रेरणादायी महिलांकडे एका दिवसासाठी सोपवणार आहे. अशा महिला ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलं आहे, अभिनव संशोधन केलं आहे , निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  8 मार्च रोजी त्या आपले  कार्य आणि अनुभव देशवासियांबरोबर सामायिक करतील. प्लॅटफॉर्म भलेही माझा असेल , मात्र त्यावर त्यांचे अनुभव, त्यांची आव्हानं आणि त्यांच्या यशाबद्दल बोलले जाईल. जर तुम्हाला ही संधी मिळावी असे वाटत असेल, तर नमोॲपवर तयार करण्यात आलेल्या विशेष मंचाच्या माध्यमातून या प्रयोगाचा भाग बना आणि माझ्या X आणि Instagram account वरून संपूर्ण जगापर्यंत आपले म्हणणे पोहोचवा, तर चला, यावेळी महिला दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून अदम्य नारी – शक्ती साजरी करूया, त्यांचा सन्मान करूया, वंदन करूया.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, तुमच्यापैकी अनेकजण असे असतील ज्यांनी उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा रोमांचक आनंद नक्कीच घेतला असेल. देशभरातील 11,000 हून अधिक खेळाडूंनी  या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. या आयोजनाने देवभूमीच्या नव्या रूपाची ओळख करून दिली. आता उत्तराखंड  देशातील एक मजबूत क्रीडा शक्ती म्हणूनही उदयास येत आहे. उत्तराखंडच्या खेळाडूंनीही उत्तम कामगिरी केली.  यावर्षी उत्तराखंड 7 व्या स्थानावर राहिले आणि हीच तर  खेळाची ताकद आहे, जी व्यक्ती आणि समाजाबरोबरच  संपूर्ण राज्याचा कायापालट घडवून आणते. यातून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळते त्याचबरोबर  उत्कृष्टतेच्या संस्कृतीलाही प्रोत्साहन मिळते. 

मित्रांनो, आज देशभरात या स्पर्धेतील काही संस्मरणीय कामगिरीची खूप चर्चा होत आहे. या स्पर्धेत सर्वाधिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या सेनादलाच्या  संघाचे  खूप खूप अभिनंदन करतो. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे देखील  मी अभिनंदन करतो. आपले बहुतांश खेळाडू  ‘खेलो-इंडिया’ अभियानातूनच पुढे आले आहेत.  हिमाचल प्रदेशचे सावन बरवाल, महाराष्ट्रातील  किरण म्हात्रे , तेजस शिरसे ,  आंध्र प्रदेशची ज्योती  याराजी, या सर्वांनी देशाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.  उत्तर प्रदेशचा  भालाफेकपटू  सचिन यादव आणि हरियाणाची उंच उडी मारणारी पूजा आणि कर्नाटकची जलतरणपटू  धिनिधि देसिन्धु यांनी देशवासीयांची मनं  जिंकली. त्यांनी तीन नवे राष्ट्रीय विक्रम रचून सर्वांना थक्क केलं.  यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत किशोरवयीन चॅम्पियन्स , त्यांची संख्या अचंबित करणारी आहे. 15 वर्षांचा नेमबाज गेविन एंटनी, उत्तर प्रदेशची हॅमर थ्रो खेळाडू  16 वर्षांची अनुष्का यादव, मध्य प्रदेशचा 19 वर्षीय पोलवाल्टर देव कुमार मीणा यांनी सिद्ध करून दाखवलं की भारताचे क्रीडा क्षेत्रातील भवितव्य अतिशय प्रतिभावान पिढीच्या हातात आहे.

उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेने हे देखील दाखवून दिले आहे की कधीही हार न मानणारे नक्कीच जिंकतात .  अगदी सहजपणे कोणीही  चॅम्पियन बनत नाही. मला आनंद आहे , आपल्या युवा खेळाडूंची जिद्द आणि शिस्त यासह  भारत आज जागतिक क्रीडा महाशक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. 

माझ्या प्रिय देशबांधवांनो , डेहराडून मध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात मी एक अतिशय महत्वाचा विषय मांडला होता , ज्यामुळे देशात एका नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे  -हा विषय आहे  ‘ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा ’. एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी आपल्याला लठ्ठपणाच्या समस्येवर मात करावीच लागेल. एका अभ्यासानुसार आज प्रत्येक आठपैकी एक व्यक्ती लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लठ्ठपणाची प्रकरणे दुपटीने वाढली आहेत, परंतु त्याहूनही चिंताजनक बाब म्हणजे मुलांमधील लठ्ठपणाची समस्या चार पटीनं वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते की  2022 मध्ये जगभरातील सुमारे अडीचशे कोटी लोकांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त होते, म्हणजेच त्यांचे वजन आवश्यकतेपेक्षा खूप अधिक होते. हे आकडे अतिशय गंभीर आहेत आणि आपल्या सर्वांना विचार करायला भाग पाडतात की, असं का होतंय? अधिक वजन किंवा लठ्ठपणा यामुळे अनेक प्रकारच्या समस्या आणि आजार देखील उद्भवतात.  आपण सर्वजण एकत्रितपणे छोट्या -छोट्या प्रयत्नांद्वारे या आव्हानाचा सामना करू शकतो. जसे मी  एक मार्ग सुचवला होता, “खाद्यतेलाचा वापर  दहा टक्क्यांनी कमी करणे”.  तुम्ही ठरवा की तुम्ही दर महिन्याला 10% कमी तेल वापराल.  तुम्ही ठरवू शकता की जे  तेल स्वयंपाक बनवण्यासाठी खरेदी केलं जातं, ते खरेदी करताना आता 10% कमीच  खरेदी करायची.  लठ्ठपणा कमी करण्याच्या दिशेने हे एक महत्वाचं पाऊल ठरेल. आज, मी ‘मन की बात’ च्या माध्यमातून या विषयावरील काही विशेष संदेश आपल्यापर्यंत पोचवू इच्छितो. चला, आपण ऑलिंपिक पदक विजेता नीरज चोप्रा ह्यांच्या संदेशापासून सुरुवात करू या. त्यांनी लठ्ठपणावर यशस्वीरित्या मात करून दाखवली आहे. 

सर्वांना नमस्कार, मी नीरज चोप्रा, आज आपणां सर्वांना सांगू इच्छितो की आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी हे ह्यावेळी ‘मन की बात’ मध्ये स्थूलपणाबद्दल बोलत आहेत, जो आपल्या देशात खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मी स्वतः देखील थोडाफार या गोष्टीशी संबंधित आहे, कारण जेव्हा मी मैदानावर खेळायला जायला सुरुवात केली तेव्हा मी जरा जास्तच जाड होतो. आणि जेव्हा मी प्रशिक्षण घेणे सुरू केले आणि चांगले आरोग्यदायी अन्न खाण्यास सुरुवात केली तेव्हा माझे आरोग्य खूपच सुधारले. आणि त्यानंतर जेव्हा मी एक व्यावसायिक खेळाडू झालो तेव्हा त्यामध्येही मला खूप मदत मिळाली आणि त्यासोबतच मी हे देखील सांगू इच्छितो की पालकांनी स्वतःसुद्धा एखादा तरी मैदानी खेळ खेळला पाहिजे, तिथे जाताना मुलांना सोबत नेले पाहिजे. एक चांगली निरोगी जीवनशैली जपली पाहिजे. तुम्ही आरोग्यदायी अन्न खा आणि दिवसातून एक तास किंवा जितका वेळ तुम्हाला देता येईल तितका वेळ, स्वतःच्या  शरीरासाठी, व्यायामासाठी द्या. 

आणि मी ह्यात आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो, अलिकडेच आपल्या पंतप्रधानांनी सांगितले होते की स्वंयपाक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाचे प्रमाण 10% नी  तरी कमी करावे, कारण अनेकदा आपण बरेच असे तळलेले पदार्थ खातो, ज्यांचा आपल्या प्रकृतीवर, लठ्ठपणावर खूप परिणाम होतो. म्हणून मला सगळ्यांना सांगावेसे वाटते की या गोष्टी टाळा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. मी तुम्हाला हीच विनंती करतो आणि आपण सगळे एकत्र येऊन आपला आणि आपल्या देशाचा विकास करू या, धन्यवाद.

नीरज जी, आपल्याला खूप खूप धन्यवाद. प्रसिद्ध क्रीडापटू निखत जरीन जी यांनीही या विषयावरील आपले विचार व्यक्त केले आहेत. 

नमस्कार, माझे नाव निखत जरीन आहे आणि मी दोन वेळा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन झालेले आहे.  जसे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ह्यांनी ‘मन की बात’ मध्ये लठ्ठपणाबद्दल सांगितले आहे आणि मला तर वाटते की ती एक राष्ट्रीय समस्या आहे, आपण आपल्या आरोग्याबद्दल दक्ष असले पाहिजे. कारण आपल्या भारतात इतक्या वेगाने लठ्ठपणा वाढतो आहे, आपण ते थांबवले पाहिजे आणि आपला प्रयत्न तर असाच हवा की आपण शक्य तितके, निरोगी जीवनशैलीचे पालन केले पाहिजे. मी स्वतः एक खेळाडू असल्याने, मी आरोग्यदायी आहार घेण्याचा प्रयत्न करते.  कारण जर का मी चुकूनदेखील दुसरे काही अन्न खाल्ले किंवा तेलकट पदार्थ खाल्ले तर त्याचा माझ्या खेळातल्या कामगिरीवर लगेच परिणाम होतो आणि मी रिंगमध्ये नेहमीपेक्षा लवकर दमते. आणि मी शक्य तितके असेही प्रयत्न करते की खाद्यतेल आणि त्या प्रकारच्या इतर गोष्टी कमी वापरेन आणि त्याऐवजी मी आरोग्यदायी आहार घेते आणि दररोज शारीरिक व्यायाम करते, त्या मुळे मी कायम तंदुरुस्त राहते आणि मला तर वाटते की आपल्यासारखे सामान्य लोक, जे दररोज कामावर जातात, त्यांनी आणि एकूणच सगळ्यांनी मला वाटते की आपल्या आरोग्याची काळजी घेतली  पाहिजे आणि प्रत्येक दिवशी काही ना काही शारीरिक हालचाली, व्यायाम केला  पाहिजे. त्याच्या मुळे आपण हृदयविकाराचा झटका आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून दूर राहू आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवू. ‘कारण जर आपण तंदुरुस्त असलो तर भारत तंदुरुस्त राहील ‘.

निखतजींनी खरोखर काही चांगले मुद्दे सांगितले आहेत.

आता आपण डॉ. देवी शेट्टी काय सांगतात ते ऐकूया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच की, ते  एक अतिशय सुविख्यात  डॉक्टर आहेत, ते या विषयावर सतत काम करत आहेत. 

मी आपल्या माननीय पंतप्रधानांचे आभार मानू इच्छितो, की त्यांनी त्यांच्या सर्वात लोकप्रिय ‘मन की बात’ ह्या कार्यक्रमात लठ्ठपणाबद्दल जागरूकता निर्माण केली आहे.

आजकाल लठ्ठपणा ही केवळ वरवरची किंवा सौंदर्यविषयक समस्या राहिलेली नाही; तर ती एक अतिशय गंभीर वैद्यकीय समस्या बनली आहे. आज भारतातील बहुतेक सर्व तरुण लठ्ठ आहेत. आजकालचे लठ्ठपणाचे प्रमुख कारण म्हणजे अन्नसेवनाचा निकृष्ट दर्जा, विशेषतः भात, पोळी आणि साखर यासारख्या कार्बोहायड्रेट्सचे जास्त प्रमाणात सेवन आणि अर्थातच तेलाचा अतिरिक्त वापर. लठ्ठपणामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर आणि इतर अनेक गुंतागुंतीच्या गंभीर वैद्यकीय समस्या उद्भवतात. म्हणून सर्व तरुणांना माझा सल्ला आहे की ; व्यायाम करायला सुरुवात करा, तुमचा आहार नियंत्रित ठेवा आणि नेहमीच खूप सक्रिय रहा. तुमचे वजन मर्यादेत ठेवा. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना खूप खूप आनंदी, निरोगी भविष्यासाठी शुभेच्छा देतो. उदंड शुभेच्छा आणि देवाचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी असो. 

मित्रांनो, जेवणात तेल कमी वापरणे आणि लठ्ठपणाचा सामना करणे ही काही केवळ आपली वैयक्तिक निवड नाही तर कुटुंबाच्या विषयी असलेली आपली जबाबदारी देखील आहे. स्वंयपाकात तेलाचा जास्त वापर केल्याने हृदयरोग, मधुमेह आणि हायपरटेन्शनसारखे अनेक आजार होऊ शकतात. आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये लहान लहान बदल करून आपण आपले भविष्य अधिक मजबूत, तंदुरुस्त आणि निरोगी बनवू शकतो, म्हणून, आपल्याला अगदी त्वरित, या दिशेने आपले प्रयत्न वाढवले पाहिजेत आणि ते बदल आपल्या जीवनात आणले पाहिजेत. आपण सर्वजण मिळून हे अगदी हसत खेळत आणि खूप प्रभावीपणे करू शकतो. उदाहरणार्थ, आजच्या ह्या ‘मन की बात’ च्या भागानंतर, मी 10 लोकांना विनंती करेन आणि आव्हान देईन की ते त्यांच्या जेवणात 10% नी तेल कमी करू शकतील का? आणि मी त्या दहाजणांना अशीही विनंती करेन की त्यांनी इतर 10 जणांना असेच आव्हान द्यावे. मला विश्वास वाटतो आहे की हे स्थूलतेशी लढण्यात खूप उपयोगी ठरेल. 

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का आशियाई सिंह, हंगुल, पिग्मी हॉग्स आणि लायन टेल्ड मकाक( वांडरू)ह्या सर्वांमध्ये काय साम्य आहे? याचे उत्तर असे आहे की हे सर्व प्राणी जगात इतरत्र कुठेही सापडत नाहीत, ते फक्त आपल्या देशातच दिसतात. खरोखरच, आपल्याकडे वनस्पती आणि प्राण्यांची एक अतिशय जोमदार परिसंस्था आहे आणि हे वन्यजीव आपल्या इतिहासात आणि संस्कृतीत अगदी खोलवर रुजलेले आहेत. आपण अनेक प्राण्यांकडे आपल्या देवी-देवतांची वाहने म्हणून पाहतो. मध्य भारतातील अनेक लोक जमाती बागेश्वरची पूजा करतात. महाराष्ट्रात वाघोबाची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान अय्यप्पा यांच्याशी देखील वाघाचे खूप जवळचे नाते आहे. सुंदरबनमध्ये बोनबीबीची पूजा केली जाते. बोनबीबीचे वाहन वाघ आहे. 

आपल्याकडे निसर्ग आणि वन्यजीवनाशी संबंधित अशी अनेक सांस्कृतिक नृत्ये आहेत, जसे की कर्नाटकातील हुली वेशा, तामिळनाडूतील पूली आणि केरळातील पुलिकाली. 

मी माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींचे आभार मानू इच्छितो कारण ते वन्यजीवन संवर्धनाशी संबंधित असलेल्या उपक्रमांमध्ये अगदी हिरीरीने आणि उत्साहाने सहभागी होतात. कर्नाटकातील बीआरटी व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. याचे पुष्कळसे श्रेय वाघाची पूजा करणाऱ्या सोलिगा जमातींना जाते. यामुळे, या भागात मानव आणि प्राण्यांमधला संघर्ष जवळपास नाहीच. गुजरातमधील लोकांनी देखील गीरमधील आशियाई सिंहांच्या संरक्षण आणि संवर्धनात महत्वाचे योगदान दिले आहे. निसर्गासोबत सहअस्तित्व म्हणजे काय त्याचा खरा अर्थ त्यांनी जगाला दाखवून दिला आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रयत्नांमुळेच गेल्या काही वर्षांत वाघ, बिबटे, आशियाई सिंह, गेंडे आणि बारासिंघा यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आणि भारतातील वन्यजीवन किती वैविध्यपूर्ण आणि सुंदर आहे ही देखील लक्षात घेण्याजोगी बाब आहे. 

आशियाई सिंह देशाच्या पश्चिम भागात आढळतात, तर पूर्व, मध्य आणि दक्षिण भारत हा वाघांचा परिसर आहे, तर गेंडे ईशान्य भागात आढळतात. भारताचा प्रत्येक भाग निसर्गाप्रती संवेदनशील तर आहेच शिवाय वन्यजीव संरक्षणासाठी देखील वचनबद्ध आहे. 

मला अनुराधा रावजींबद्दल सांगण्यात आले आहे. त्यांच्या अनेक पिढ्या अंदमान निकोबार बेटांशी जोडल्या गेल्या आहेत. अनुराधाजींनी अगदी लहानपणापासूनच स्वतःला प्राण्यांच्या (संरक्षण संगोपन संवर्धनासाठी) कल्याणासाठी वाहून घेतले आहे. त्यांनी गेल्या तीन दशकांपासून हरीण आणि मोरांचे संरक्षण हेच आपले ध्येय बनवले आहे. तेथील लोक त्यांना ‘हरीण स्त्री/ (बाई)’ या नावाने ओळखतात. 

पुढील महिन्याच्या सुरुवातीला आपण जागतिक वन्यजीव दिन साजरा करीत आहोत. माझी तुम्हाला विनंती आहे की वन्यजीव संरक्षणात कार्यरत असलेल्या लोकांना अवश्य प्रोत्साहन द्या. मला खूप आनंद वाटतो आहे की ह्या क्षेत्रात आता अनेक स्टार्ट-अप्स उदयास आले आहेत. 

मित्रांनो, हे बोर्डाच्या परीक्षेचे दिवस आहेत. मी आपल्या तरुण मित्रांना म्हणजेच परीक्षा योद्ध्यांना त्यांच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. कोणताही ताण न घेता, अगदी सकारात्मक वृत्तीने पेपर द्या. 

दरवर्षी ‘परीक्षा पे चर्चा’ मध्ये आपण आपल्या परीक्षा योद्ध्यांशी परीक्षेशी संबंधित विविध विषयांवर बोलतो. मला आनंद वाटतो आहे की आता हा कार्यक्रम संस्थेचे स्वरूप धारण करतो आहे, संस्थात्मक होतो आहे. अनेक नवनवीन तज्ञ देखील ह्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. 

या वर्षी एका नव्या स्वरूपात ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न केला. ह्यात तज्ञांसोबतच्या आठ वेगवेगळ्या भागांचा समावेश केला गेला.
आम्ही एकूणच परीक्षांशी संबंधित अश्या आरोग्याची (प्रकृतीची) काळजी, मानसिक आरोग्य तसेच आहार विहार या विषयांवर चर्चा केली. मागील वर्षीच्या पहिल्या दुसऱ्या आलेल्या (गुणवान) विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार आणि अनुभव सर्वांसमोर मांडले.

या कार्यक्रमाविषयी अनेक तरुणांनी, त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी मला पत्रे लिहिली आहेत. त्यांनी म्हटले आहे की त्यांना हे नवे स्वरूप खूप आवडले, कारण त्यात प्रत्येक विषयावर विस्ताराने चर्चा करण्यात आली आहे. 

आमच्या तरुण मित्रांनी इंस्टाग्रामवर देखील, हे कार्यक्रम मोठ्या संख्येने पाहिले आहेत. ह्या कार्यक्रमाचे आयोजन दिल्लीतील एका सुंदर नर्सरीमध्ये केले होते ते तुमच्यापैकी अनेकांना आवडले. 

आमच्या ज्या तरुण मित्रांना आत्तापर्यंत ‘परीक्षा पे चर्चा’ चे हे भाग पाहता आले नसतील , त्यांनी आता ते जरूर पहावे. हे सर्व भाग NaMoApp वर उपलब्ध आहेत. पुन्हा एकदा परीक्षा योद्ध्यांना माझा संदेश आहे “आनंदी आणि तणावमुक्त रहा”.

माझ्या प्रिय मित्रांनो, या वेळी या ‘मन की बातमध्ये’ इतकेच. पुढच्या महिन्यात आपण, पुन्हा नवीन विषयांसह ‘मन की बात’ करू. तुम्ही मला तुमची पत्रे, संदेश पाठवत राहा. निरोगी राहा, आनंदी राहा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार!

 

* * *

NM/AIR Mumbai/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai