नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज थायलंडमध्ये आयोजित संवाद कार्यक्रमात व्हिडिओ संदेशाद्वारे भाषण केले. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी थायलंडमधील संवादच्या कार्यक्रमाच्या आवृत्तीत सहभागी होण्याबाबतचा सन्मान व्यक्त केला आणि हा कार्यक्रम साध्य केल्याबद्दल भारत, जपान आणि थायलंडमधील प्रतिष्ठित संस्था आणि व्यक्तींचे कौतुक केले. त्यांनी सर्व सहभागींना शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी त्यांचे मित्र शिंजो ॲबे यांचे स्मरण करण्याची संधी साधली आणि 2015 साली त्यांच्यासोबतच्या संभाषणातून या संवाद कार्यक्रमाची कल्पना उदयास आली, हे अधोरेखित केले. तेव्हापासून ‘संवाद’ने विविध देशांमध्ये प्रवास करून वादविवाद, संवाद आणि सखोल समजुतीला चालना दिली आहे.
समृद्ध संस्कृती, इतिहास आणि वारसा लाभलेल्या थायलंडमध्ये’ संवाद’ कार्यक्रमाची ही आवृत्ती होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना मोदी यांनी थायलंड हे आशियातील सामायिक तात्विक आणि आध्यात्मिक परंपरांचे एक सुंदर उदाहरण असल्याचे अधोरेखित केले.
भारत आणि थायलंडमधील दोन हजार वर्षांहून अधिक काळातील सखोल सांस्कृतिक संबंध अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की रामायण आणि रामकिन दोन्ही राष्ट्रांना जोडतात आणि भगवान बुद्धांबद्दलचा त्यांचा सामायिक आदर त्यांना एकत्र आणतो. गेल्या वर्षी भारताने भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष थायलंडला पाठवले तेव्हा लाखो भाविकांनी त्यांप्रती आदरांजली वाहिली, असे त्यांनी नमूद केले. भारत आणि थायलंडमधील अनेक क्षेत्रांमधील उत्साहवर्धक भागीदारीवर भर देत भारताचे ‘अॅक्ट ईस्ट’ धोरण आणि थायलंडचे ‘अॅक्ट वेस्ट’ धोरण ही एकमेकांना पूरक असून परस्पर प्रगती आणि समृद्धीला चालना देतात, असे मोदी यांनी नमूद केले. ही परिषद दोन्ही देशांमधील मैत्रीचा आणखी एक यशस्वी अध्याय असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
आशियाई शतकाचे भाष्य करणाऱ्या ‘संवाद’ कार्यक्रमाच्या संकल्पनेवर प्रकाश टाकताना मोदी यांनी नमूद केले की लोक अनेकदा आशियाच्या आर्थिक उदयाचा उल्लेख करतात, परंतु आशियाई शतक केवळ आर्थिक मूल्यांबद्दल नाही तर सामाजिक मूल्यांबद्दल देखील आहे हे ही परिषद अधोरेखित करते. भगवान बुद्धांची शिकवण शांततापूर्ण आणि प्रगतीशील युग निर्माण करण्यासाठी जगाला मार्गदर्शन करू शकते तसेच या ज्ञानात मानव-केंद्रित भविष्याकडे नेण्याची शक्ती आहे, यावर त्यांनी भर दिला.
‘संवाद’ कार्यक्रमाच्या मुख्य संकल्पनांपैकी एक म्हणजे संघर्ष टाळणे याबद्दल बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की अनेकदा फक्त एकच मार्ग बरोबर आहे व इतर मार्ग चुकीचे आहेत, या समजुतीतून संघर्ष उद्भवतो. त्यांनी या मुद्द्यावर भगवान बुद्धांच्या अंतर्दृष्टीचा दाखला दिला. काही लोक स्वतःच्या मतांवर चिकटून राहतात आणि वाद घालतात, फक्त एकच बाजू खरी मानतात. मात्र एकाच मुद्द्याला अनेक दृष्टिकोन असू शकतात हे लक्षात घेण्यावर त्यांनी भर दिला. ऋग्वेदाचा संदर्भ देत ते म्हणाले की जेव्हा आपण हे मान्य करतो की सत्य वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते, तेव्हा आपण संघर्ष टाळू शकतो.
पंतप्रधान मोदी यांनी संघर्षाचे आणखी एक कारण अधोरेखित केले – इतरांना आपल्यापेक्षा मूलभूतपणे वेगळे समजणे. त्यांनी असे म्हटले की मतभेदांमुळे अंतर निर्माण होते आणि अंतराचे रूपांतर मतभेदात होऊ शकते.याचे विवेचन करण्यासाठी त्यांनी धम्मपदातील एक श्लोक उद्धृत केला, ज्यामध्ये म्हटले आहे की प्रत्येकजण वेदना आणि मृत्यूला घाबरतो. इतरांना आपल्यासारखेच समजून उमजून आपण कोणतीही हानी किंवा हिंसाचार होणार नाही याची खात्री करू शकतो यावर त्यांनी भर दिला.त्यांनी पुढे म्हटले की जर या शब्दांचे पालन केले तर संघर्ष टाळता येईल.
“संतुलित दृष्टिकोनाऐवजी टोकाची भूमिका घेतल्यामुळे जगातील अनेक समस्या उद्भवतात”,असे मोदी म्हणाले. त्यांनी अधोरेखित केले की अतिरेकी विचारांमुळे संघर्ष, पर्यावरणीय संकटे आणि तणावाशी संबंधित आरोग्य समस्या देखील निर्माण होतात.या आव्हानांवरील उपाय भगवान बुद्धांच्या शिकवणीत आहे , त्यांनी आपल्याला मध्यम मार्गाचे अनुसरण करण्याचे आणि अतिरेकी गोष्टी टाळण्याचे आवाहन केले आहे,असे नमूद करत ते म्हणाले की संयमाचे तत्व आजही समयोचित असून जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी मार्गदर्शक ठरते.
पंतप्रधानांनी असे निरीक्षण नोंदवले की आज संघर्ष हे व्यक्ती आणि राष्ट्रांच्या पलीकडे पसरलेले आहेत आणि मानवतेचा निसर्गाबरोबरचा संघर्ष वाढत चालला आहे. त्यांनी टिप्पणी केली की यामुळे आपल्या ग्रहाला धोका निर्माण करणारे पर्यावरणीय संकट निर्माण झाले आहे. या आव्हानाचे उत्तर धम्माच्या तत्वांमध्ये रुजलेल्या आशियातील सामायिक परंपरांमध्ये आहे असे ते म्हणाले .
हिंदू धर्म, बौद्ध धर्म, शिंटोइझम आणि इतर आशियाई परंपरा आपल्याला निसर्गासह सुसंगतपणे जीवन जगायला शिकवतात,असे त्यांनी अधोरेखित केले.आपण स्वतःला निसर्गापासून निराळे आहोत,असे समजत नाही तर त्याचा एक भाग म्हणून पाहतो, असे त्यांनी नमूद केले.महात्मा गांधींनी सांगितलेल्या विश्वासाच्या संकल्पनेवर मोदींनी प्रकाश टाकला आणि प्रगतीसाठी नैसर्गिक संसाधनांचा वापर करताना आज आपण भावी पिढ्यांप्रती असलेली आपली जबाबदारी देखील विचारात घेतली पाहिजे असे सांगितले .संसाधनांचा वापर विकासासाठी केला जावा, लोभासाठी नाही,हा दृष्टिकोन यामुळे सुनिश्चित होतो,अशी टिपणी त्यांनी केली
एकेकाळी बौद्ध शिक्षणाचे मोठे केंद्र असलेल्या पश्चिम भारतातील वडनगर या छोट्याशा शहरातून ते आले आहेत,असे मोदींनी नमूद केले.जिथे भगवान बुद्धांनी आपले पहिले प्रवचन दिले होते,ते सारनाथ हे पवित्र ठिकाण असलेल्या वाराणसी या शहराचे ते भारतीय संसदेत प्रतिनिधित्व करतात, आणि भगवान बुद्धांशी संबंधित असलेल्या या ठिकाणांनी त्यांच्या प्रवासाला आकार दिला हा एक सुंदर योगायोग असल्याचे त्यांनी नमूद केले.
“भगवान बुद्धांबद्दलचा आमचा आदर भारत सरकारच्या धोरणांमधून दिसून येतो”,असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले.बौद्ध धार्मिक पर्यटनाचा भाग म्हणून महत्त्वाच्या सर्व बौद्ध धर्मस्थळांना जोडण्यासाठी पर्यटन पायाभूत सुविधा विकसित केल्या आहेत,असे त्यांनी नमूद केले.या स्थळांवरील प्रवास सुलभ करण्यासाठी ‘बुद्ध पौर्णिमा एक्स्प्रेस’ विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन हे आंतरराष्ट्रीय बौद्ध यात्रेकरूंना लाभदायक ठरणारे ऐतिहासिक पाऊल आहे,असे ते म्हणाले .त्यांनी बोधगया येथील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी विविध विकास उपक्रमांची घोषणा केली आणि जगभरातील यात्रेकरू,विद्वान आणि भिक्षूंना भगवान बुद्धांच्या भूमीला भेट देण्यासाठी निमंत्रित केले.
नालंदा महाविहार हे इतिहासातील सर्वात महान विद्यापीठांपैकी एक होते,जे अनेक वर्षांच्या संघर्षमय शक्तींद्वारे नष्ट झाले होते,असे सांगत भारताने शिक्षणाचे केंद्र म्हणून त्याचे पुनरुज्जीवन करून आपली योग्यता सिद्ध केली आहे,असे त्यांनी सांगितले . भगवान बुद्धांच्या आशीर्वादाने नालंदा विद्यापीठ पुन्हा आपले पूर्वीचे वैभव प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला.
भगवान बुद्धांनी ज्या भाषेत आपले उपदेश दिले होते, त्या पाली भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी उचललेल्या महत्त्वपूर्ण पावलावर त्यांनी प्रकाश टाकला. पाली भाषेतील साहित्याचे जतन करण्यासाठी तिला अभिजात भाषा म्हणून घोषित केले गेले आहे. बौद्ध धर्माच्या विद्वानांच्या लभासाठी दस्तऐवजीकरण आणि डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देऊन, प्राचीन हस्तलिखिते ओळखून त्यांची यादी करण्यासाठी ‘ज्ञान भारतम’ मिशन सुरू केल्याचाही त्यांनी उल्लेख केला.भगवान बुद्धांच्या शिकवणींना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या दशकात अनेक राष्ट्रांसोबत झालेल्या सहकार्यावर मोदी यांनीआठवण करून दिली.’आशियाच्या बळकटीकरणात बुद्ध धम्माची भूमिका’ या संकल्पनेवर आधारित भारतात अलीकडेच पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती आणि त्यापूर्वी भारताने पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद आयोजित केली होती असे त्यांनी नमूद केले.नेपाळमधील लुंबिनी येथे इंडिया इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेजची पायाभरणी करण्याचा मान मिळाल्याचा आणि लुंबिनी संग्रहालयाच्या बांधकामात भारताच्या योगदानाचा त्यांनी उल्लेख केला. याव्यतिरिक्त, त्यांनी भगवान बुद्धांच्या ‘संक्षिप्त आदेश ‘Concise Orders’, मंगोलियन कांजूर, 108 खंडांचे मंगोलियातील मठांमध्ये पुनर्मुद्रण आणि वितरणाकडे लक्ष वेधले. अनेक देशांमधील स्मारकांच्या संवर्धनासाठी भारताचे प्रयत्न भगवान बुद्धांच्या वारशाप्रती असलेल्या वचनबद्धतेला बळकटी देतात असे त्यांनी नमूद केले.पंतप्रधानांनी सांगितले की, संवादच्या या आवृत्तीत विविध धार्मिक नेत्यांना एकत्र आणून धार्मिक गोलमेज बैठकीचे आयोजन केले जात आहे ही उत्साहवर्धक बाब आहे. या व्यासपीठावरून मौल्यवान अंतर्दृष्टी समोर येईल आणि अधिक सुसंवादी जग घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल मोदी यांनी थायलंडच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. या उदात्त कार्याला पुढे नेण्यासाठी जमलेल्या सर्व सहभागींना त्यांनी शुभेच्छा दिल्या. धम्माचा प्रकाश आपल्याला शांती, प्रगती आणि समृद्धीच्या युगाकडे नेत राहील अशी आशा व्यक्त करून त्यांनी भाषणाचा समारोप केला.
Sharing my remarks during SAMVAD programme being organised in Thailand. https://t.co/ysOtGlslbI
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2025
Jaydevi PS/Nandini/Sampada/Hemangi/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Sharing my remarks during SAMVAD programme being organised in Thailand. https://t.co/ysOtGlslbI
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2025