Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयएनएस सुरत,आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर यांचा नौदलात समावेश करण्याप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

आयएनएस सुरत,आयएनएस निलगिरी आणि आयएनएस वाघशीर यांचा नौदलात समावेश करण्याप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन


नवी दिल्ली , 15 जानेवारी 2025

महाराष्ट्राचे  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन जी,  महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, मंत्रिमंडळातले माझे वरिष्ठ सहकारी  राजनाथ सिंह जी, संजय सेठ जी, महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री, त्यांच्यासमवेत आज दोन्ही उपमुख्यमंत्रीही आहेत,उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे जी, अजीत पवार जी, सीडीएस,सीएनएस, नौदलाचे सर्व सहकारी, माझगाव गोदी मध्ये काम करणारे सर्व सहकारी, इतर अतिथी वर्ग,महिला आणि पुरुष वर्ग,

15 जानेवारी हा दिवस लष्कर दिन म्हणूनही साजरा केला जातो.देश रक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या प्रत्येक शूरवीराला मी नमन करतो,भारत मातेच्या रक्षणासाठी झटणाऱ्या वीर – वीरांगनांना  मी आज शुभेच्छा देतो.

मित्रहो,

भारताचा सागरी वारसा,नौदलाचा गौरवास्पद इतिहास आणि आत्मनिर्भर भारत अभियानासाठीही  आज अतिशय मोठा दिवस आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात नौदलाला नवे सामर्थ्य दिले, नवा दृष्टिकोन दिला.आज त्यांच्या या पवित्र भूमीवर,21 व्या शतकातल्या नौदलाला अधिक सबल करण्याच्या दिशेने आम्ही एक मोठे पाऊल उचलत आहोत. एक विनाशिका, एक युद्धनौका  आणि एक पाणबुडी अशा  तिन्हींचा एकाच वेळी  नौदलात समावेश प्रथमच करण्यात येत आहे आणि सर्वात अभिमानाची बाब म्हणजे या तिन्ही मेड इन इंडिया आहेत. मी भारतीय नौदललाचे ,या निर्मिती कार्यात योगदान देणारे सर्व  सहकारी,अभियंते, श्रमिक आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो.

मित्रहो,

आजचा हा कार्यक्रम,आपला गौरवास्पद वारसा आपल्या भविष्यातल्या आकांक्षाशी जोडतो आहे. दीर्घ समुद्री प्रवास,वाणिज्य,नौदल संरक्षण, जहाज उद्योग यामधे आपला एक समृद्ध इतिहास राहिला आहे.इतिहासापासून प्रेरणा घेत आजचा भारत,जगातली एक महत्वाची सागरी शक्ती बनत आहे.आजच्या  प्लॅटफॉर्ममध्येही याची झलक आहे.जसे आपले निलगिरी, चोल वंशाच्या सागरी सामर्थ्याप्रती  समर्पित आहे. गुजरातमधल्या बंदराच्या माध्यमातून भारत पश्चिम आशियाशी  जोडला गेला होता त्या  कालखंडाची आठवण  सुरत युद्ध नौका करून देते. या दोन्ही युद्ध नौकांच्या बरोबरच आज वाघशीर पाणबुडीचाही समावेश होत आहे. काही वर्षांपूर्वी, P75 श्रेणीतली पहिली पाणबुडी कलवरीचा नौदलात समावेश करण्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मला प्राप्त झाली होती.याच श्रेणीतली सहावी पाणबुडी वाघशीर नौदलात समाविष्ट करण्याचे भाग्य मला लाभले आहे. हे नवे आघाडीचे प्लॅटफॉर्म भारताची सुरक्षितता आणि प्रगती या दोन्हींना नवे बळ देतील.

मित्रहो,

संपूर्ण जगात आणि प्रामुख्याने ग्लोबल साउथमध्ये एक विश्वासार्ह आणि जबाबदार मित्र म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. भारत विस्तारवादाच्या नव्हे तर विकासवादाच्या भावनेने काम करतो. भारताने नेहमीच खुल्या,सुरक्षित, समावेशक आणि समृद्ध हिंद- प्रशांत क्षेत्राचे समर्थन केले आहे. म्हणूनच समुद्र लाभलेल्या देशांच्या विकासाची बाब आली तेव्हा भारताने मंत्र दिला सागर. सागर म्हणजे  क्षेत्रातल्या सर्वांची सुरक्षितता आणि समृद्धी, आम्ही सागर हा दृष्टीकोन घेऊन वाटचाल करत आहोत,जी-20 परिषदेचे अध्यक्षपद जेव्हा भारताकडे आले तेव्हा जगाला आम्ही ‘एक वसुंधरा,एक कुटुंब एक भविष्य’ हा मंत्र दिला.जेव्हा जग कोरोनाशी लढताना त्रस्त झाले होते तेव्हा भारताने एक वसुंधरा एक आरोग्य हा मंत्र जगाला दिला. आम्ही संपूर्ण जग हे आपले कुटुंब आहे असे मानतो.सबका साथ,सबका विकास या तत्वावर विश्वास ठेवणारे लोक आहोत आणि म्हणूनच या संपूर्ण क्षेत्राची सुरक्षितता हे आपले दायित्व असल्याचे भारत मानतो.

मित्रहो,

जागतिक सुरक्षा,अर्थव्यवस्था आणि भू-राजकीय  परिस्थितीला दिशा देण्यात भारतासारख्या सागरी राष्ट्राची मोठी भूमिका राहणार आहे. आर्थिक प्रगती आणि उर्जा सुरक्षेसाठी प्रादेशिक जल सुरक्षा,नेव्हिगेशन स्वातंत्र्य सुनिश्चित करणे आणि व्यापार पुरवठा साखळी आणि सागरी मार्ग सुरक्षित राखणे आवश्यक आहे. दहशतवाद,शस्त्रे आणि अंमली पदार्थांची तस्करी यापासून हे  संपूर्ण क्षेत्र आपल्याला सुरक्षित राखायचे आहे. म्हणूनच आज सागर सुरक्षित आणि समृद्ध करण्यासाठी आपण जागतिक भागीदार बनणे, लॉजीस्टीक क्षमता वाढवणे आणि जहाज क्षेत्र उद्योगासाठी काम करणे आवश्यक आहे, दुर्मिळ खनिजे, मासे  यासारख्या सागरी संसाधनांचा दुरुपयोग रोखण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठीची क्षमता आपण विकसित करायला हवी. नवे सागरी मार्ग आणि दूरसंवादासाठी सागरी मार्ग शोधण्यासाठी आपण गुंतवणूक करायला हवी. भारत या दिशेने सातत्याने पाऊले उचलत आहे याचा मला आनंद आहे. संपूर्ण हिंद सागरी क्षेत्रात प्रथम प्रतिसाद देणारा या रूपाने भारत पुढे आला आहे. गेल्या काही महिन्यातच आपल्या नौदलाने शेकडो लोकांचे प्राण वाचवले आहेत, हजारो कोटी रुपयांच्या राष्ट्रीय  आणि आंतरराष्ट्रीय मालाची सुरक्षा केली आहे.यातून भारतावरचा विश्वास वाढला आहे, आपणा सर्वांमुळे वाढला आहे आणि म्हणूनच मी आज आपणा सर्वांचे अभिनंदन करतो.भारतीय नौदल, तटरक्षक  दलांवरचा विश्वासही सातत्याने वाढत आहे.आज आपणही पहात आहात,  आसियान असो, ऑस्ट्रेलिया असो, आखाती देश असोत,आफ्रीकेमधले  देश असोत सर्वांसमवेत आज भारताचे आर्थिक सहकार्य सातत्याने मजबूत होत आहेत. या बळकट संबंधांमध्ये हिंद महासागर क्षेत्रात भारताची उपस्थिती, भारताचे सामर्थ्य मोठा आधार आहे. म्हणूनच आजचे हे आयोजन लष्करी दृष्टीकोनाबरोबरच आर्थिक दृष्ट्यासुद्धा तितकेच महत्वाचे आहे.

मित्रहो,

21 व्या शतकातल्या भारताचे लष्करी सामर्थ्य अधिक सक्षम व्हावे, लष्कर आधुनिक असावे हे देशाच्या प्राधान्यांपैकी आहे. जल, स्थल, आकाश, खोल समुद्र असो किंवा अंतराळ प्रत्येक ठिकाणी भारत आपले हित सुरक्षित करत आहे. यासाठी सातत्याने सुधारणा केल्या जात आहेत.चीफ ऑफ डिफेन्स पदाची निर्मिती ही अशीच एक सुधारणा आहे. आपली सैन्यदले अधिक प्रभावी असावीत यासाठी थिएटर कमांडच्या दिशेने  भारत पुढे जात आहे.

मित्रहो,

गेल्या दहा वर्षात भारताच्या तीनही सैन्य दलांनी ज्या प्रकारे निर्भरतेचा   मंत्र अंमलात आणला आहे ते अतिशय प्रशंसनीय आहे. संकट काळात भारताचे इतर देशांवरचे अवलंबित्व कमीत कमी राहावे, याचे गांभीर्य जाणत आपण सर्वजण  हे काम तडीला नेत आहात, नेतृत्व करत आहात.आपल्या सैन्य दलाने 5 हजारपेक्षा जास्त उपकरण आणि वस्तूंची सूची केली आहे ज्या आता परदेशातून मागवल्या जाणार नाहीत.जेव्हा भारताचा सैनिक, भारतातच बनवलेल्या साधनसामुग्रीसह पुढे जातो तेव्हा त्याचा आत्मविश्वास काही आगळाच असतो. गेल्या दहा वर्षात कर्नाटकमध्ये देशातला सर्वात मोठा हेलीकॉप्टर तयार करण्याचा कारखाना सुरु करण्यात आला आहे. लष्करासाठी सामग्री वाहतूक करणाऱ्या विमानाची निर्मिती करणारा कारखाना सुरु झाला आहे.तेजस लढाऊ विमानांनी भारताची प्रतिष्ठा नव्या उंचीवर नेली  आहे. उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू मध्ये तयार होणारे संरक्षण कॉरीडॉर, संरक्षण उत्पादनाला अधिक वेग देणार आहेत आणि  मला आनंद आहे की आपल्या नौदलानेही मेक इन इंडियाचा मोठा विस्तार केला आहे. यामध्ये माझगाव गोदीमधल्या आपणा सर्वांची फार मोठी भूमिका आहे. गेल्या दहा वर्षात नौदलामध्ये 33 नौका आणि 7 पाणबुड्यांचा समावेश करण्यात आला आहे.या 40 नौदल जहाजांपैकी 39 भारतीय शिपयार्डमध्ये बनल्या आहेत. आपले भव्य विराट, आयएनएस विक्रांत,विमानवाहू जहाज आणि आयएनएस  अरिहंत आणि आयएनएस अरीघात यासारख्या आण्विक पाणबुड्यांचाही यामध्ये समावेश आहे.  

मेक इन इंडियाला असा वेग दिल्याबद्दल मी देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन करतो.  आज भारताचे संरक्षण उत्पादन 1.25 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.  आपण 100 हून अधिक देशांमध्ये संरक्षण सामुग्री निर्यात करत आहोत.  मला विश्वास आहे की, तुमच्या सहकार्याने आज भारत आपल्या संरक्षण क्षेत्रात झपाट्याने कायापालट करेल.

मित्रांनो,

मेक इन इंडियामुळे, भारतीय लष्कराचे सामर्थ्य वृद्धिंगत होण्याबरोबरच आर्थिक प्रगतीची नवीन कवाडेही उघडत आहेत. जसे एक उदाहरण जहाज बांधणी परिसंस्थेचे आहे.  तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेल…. तज्ञ देखील म्हणतात की जहाजबांधणीमध्ये जितकी गुंतवणूक कराल, त्याच्या दुप्पट सकारात्मक परिणाम  अर्थव्यवस्थेवर होतो.  म्हणजे जर आपण जहाज बांधणीत 1 रुपया गुंतवला तर अर्थव्यवस्थेत 1 रुपया 82 पैशांच्या आसपास व्यवहार होतात. कल्पना करा…सध्या देशात 60 मोठी जहाजे निर्माणाधीन आहेत.  त्यांची किंमत सुमारे दीड लाख कोटी रुपये आहे.  याचा अर्थ एवढा पैसा गुंतवून आपल्या अर्थव्यवस्थेत सुमारे 3 लाख कोटी रुपये खेळतील. आणि रोजगाराच्या बाबतीत तर, त्याच्या 6 पट गुणात्मक परिणाम होतो.  जहाजबांधणीसाठीचा बहुतेक माल आणि बहुतांश सुटे भाग, देशातील सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांकडून  (एमएसएमई) येतात.  म्हणूनच, जर जहाज बांधण्यासाठी 2000 कामगार लागत असतील, तर एमएसएमई पुरवठादार असलेल्या  दुसऱ्या उद्योगात, साधारण 12 हजार रोजगार  निर्माण होतात.

मित्रांनो,

आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.  आपली उत्पादन क्षमता आणि निर्यात क्षमता देखील सतत वाढत आहे.  येत्या काही वर्षांत भारताला शेकडो नवीन जहाजे आणि नवीन कंटेनरची आवश्यकता भासेल.  म्हणूनच, बंदर-केंद्रित विकासाचे हे प्रारुप आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे आहे आणि रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण करणार आहे.

मित्रांनो,

या क्षेत्रात रोजगार कसा वाढत आहे याचे एक उदाहरण म्हणजे खलाशी-(नाविक ) यांची वाढती  संख्या आहे . 2014 मध्ये, भारतात ही संख्या 1.25 लाखांपेक्षा कमी होती.  आज ती दुप्पट होऊन जवळजवळ 3 लाखांपर्यंत पोहोचली आहे.  आज भारत, खलाशींच्या  संख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या पाच देशांमध्ये आला आहे.

मित्रांनो,

आमच्या सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात अनेक मोठ्या निर्णयांनी झाली आहे.आम्ही देशाच्या गरजा लक्षात घेऊन जलद गतीने नवीन धोरणे बनवली आहेत आणि नवीन कामे हाती घेतली आहेत.  देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याचा, क्षेत्राचा विकास व्हावा या ध्येयाने आम्ही वाटचाल करत आहोत; बंदर क्षेत्राचा विस्तार हा देखील याचाच एक भाग आहे.आमच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या प्रमुख निर्णयांपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील वाढवण बंदराला मान्यता देणे.  पंचाहत्तर हजार कोटी रुपये खर्चाच्या या आधुनिक बंदराच्या बांधकामाचे काम सुरू देखील झाले आहे.यामुळे,महाराष्ट्रात देखील रोजगाराच्या हजारो नवीन संधी निर्माण होतील.

मित्रांनो,

बराच काळ, सीमा आणि सागरी किनारपट्टीशी निगडीत दळणवळणाच्या पायाभूत सुविधांकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. गेल्या दहा वर्षांत यासाठी विलक्षण काम करण्यात आले आहे.  दोनच दिवसांपूर्वी, मला जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचे उद्घाटन करण्याची संधी मिळाली.  यामुळे कारगिल, लडाख सारख्या आपल्या सीमावर्ती भागात पोहोचणे खूप सोपे आणि सुलभ होईल. गेल्या वर्षी अरुणाचल प्रदेशात सेला बोगद्याचे उद्घाटन होऊन राष्ट्रार्पण करण्यात आले.  यामुळे आपल्या सैन्याला प्रत्यक्ष नियंत्रण रेषे (एल. ए.सी) पर्यंत पोहोचणे सोपे होत आहे.  आज, शिंकुन ला बोगदा आणि झोजिला बोगदा यासारख्या अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर काम वेगाने सुरू आहे. भारतमाला प्रकल्पा अंतर्गत, सीमावर्ती भागात राष्ट्रीय महामार्गांचे उत्कृष्ट जाळे निर्माण होत आहे.  आज सीमावर्ती गावांच्या विकासात व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम, हा चैतन्याने सळसळती गावे घडवण्याचा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या दशकात, आम्ही आपल्या दुर्गम बेटांवर देखील लक्ष केंद्रीत केले आहे.  ज्या बेटांवर कोणीही राहत नाही अशा निर्जन बेटांवरही नियमितपणे लक्ष ठेवले जात आहे. इतकेच नाही तर त्या बेटांची एक नवीन ओळख निर्माण केली जात आहे आणि त्यांना नवीन नावे दिली जात आहेत. एवढेच नाही तर हिंदी महासागरातील समुद्राच्या तळाशी असलेले सी माऊंट अर्थात समुद्री पर्वत यांची नामकरणे होत आहेत.  गेल्या वर्षी, भारताच्या पुढाकाराने, एका आंतरराष्ट्रीय संस्थेने अशा 5 ठिकाणांचे नामकरण केले आहे. हिंदी महासागरात, अशोक सीमाउंट, हर्षवर्धन सीमाउंट,  राजा चोल सीमाउंट, कल्पतरू सागरी पर्वतरांगा (रिज) आणि चंद्रगुप्त पर्वतरांगा, भारताचा मान वाढवत आहेत.

मित्रांनो,

आपल्या सर्वांना हे माहीत आहे की भविष्यात अनंत अंतराळ आणि खोल समुद्र, या  दोन्हींचे महत्व किती असणार आहे!  म्हणूनच आज भारत, अंतराळ आणि खोल समुद्र या दोन्ही ठिकाणी आपल्या क्षमता वाढवत आहे.  आपला समुद्रयान प्रकल्प शास्त्रज्ञांना समुद्रात 6 हजार मीटर खोल घेऊन जाणार आहे, जिथे फक्त काही देशच पोहोचू शकले आहेत.  याचा अर्थ असा की आमचे सरकार भविष्यातील कुठल्याही शक्यतेवर काम करण्यात कोणतीही कसर सोडत नाही.

मित्रांनो,

21 व्या शतकातील भारताला पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी, आपण गुलामगिरीच्या प्रत्येक खुणा मिटवणे देखील महत्त्वाचे आहे.आणि आपले नौदल, याबाबतीतही आघाडीवर आहे. नौदलाने आपला ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवास्पद परंपरेशी जोडला आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेला अनुसरून नौदलाने अ‍ॅडमिरल श्रेणी (रँक) च्या बिल्ल्यां (अॅपलेट्स) ची पुनर्रचना केली आहे.मेक इन इंडिया ( स्वदेश निर्मिती) मोहीम, भारताची स्वावलंबनाची मोहीम देखील गुलामगिरीच्या मानसिकतेपासून मुक्ततेला प्रोत्साहन देतात. मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण देशाला असेच अभिमानास्पद क्षण देत राहाल….भारताला विकसित करण्यासाठी योगदान देणारे कुठलेही काम आपल्याला सर्वांनी मिळून एकत्रितपणे करायचे आहे.  आपल्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या असू शकतात, पण प्रत्येकाचे ध्येय एकच आहे -विकसित भारत. आज देशाला मिळालेली ही नवीन आघाडीची साधने आपला संकल्प बळकट करतील.

आणि मित्रांनो,

जर थोडे  गंमतीत बोलायचे झाले तर, माझा अनुभव असा आहे की मी उपस्थित राहिलेल्या सर्व लष्करी कार्यक्रमांमध्ये, जर कुठे जेवणाची सर्वोत्तम व्यवस्था असेल तर ती नौदलाची आहे…. वैविध्याने परिपूर्ण.  आता, आज त्यात  सुरतची भर पडली आहे, आणि आपल्या सर्वांना एक म्हण माहित असेल… ती खूप लोकप्रिय म्हण आहे…आणि मी कॅप्टन संदीपना सांगेन की ती काळजीपूर्वक ऐका…ती म्हण आहे- सुरतचे जेवण आणि काशीमधील मरण …म्हणजे सुरतचे जेवणही तितकेच उत्तम असते…सर्वोत्तम असते…आणि आता जेव्हा सुरत युद्धनौकेचे जलावतरण होत आहे, तेव्हा मला खात्री आहे की कॅप्टन संदीप,  सुरती जेवण देखील लोकांना खाऊ घालतील.

मित्रांनो,

हा एक उत्तम प्रसंग आहे, संपूर्ण देश तुम्हाला शुभेच्छा देत आहे, संपूर्ण देश अभिमानाने भारलेला आहे आणि म्हणूनच, एका नवीन आत्मविश्वासाने, नव्या उत्साहाने, नव्या संकल्पासह, आपण विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व शक्तीनिशी झटूया.  आजच्या प्रसंगी, मी तुम्हा सर्वांना  या तीन महत्त्वाच्या पावलांसाठी, या महत्त्वाच्या भेटवस्तूंसाठी  अभिनंदन करून माझे भाषण संपवतो.  तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझ्यासह जोरात बोला-

भारत मातेचा विजय असो.

किमान या कार्यक्रमात तरी हा जयघोष सर्वात जास्त घुमला पाहिजे.

भारत मातेचा विजय असो.

भारत मातेचा विजय असो.

भारत मातेचा विजय असो.

खूप खूप आभार!

S.Kane/N.Chitale/A.Save/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai