Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्ली येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी

नवी दिल्ली येथे आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी


नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2024

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आज आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. तिसऱ्या वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. साहिबजादांच्या अतुलनीय शौर्य आणि बलिदानाच्या स्मृतीनिमित्त आपल्या  सरकारने वीर बाल दिवस सुरू केल्याचे पंतप्रधानांनी  सांगितले. आता हा दिवस कोट्यवधी भारतीयांसाठी राष्ट्रीय प्रेरणेचा सण बनला असल्याचे त्यांनी सांगितले. या दिवसाने अनेक मुलांना आणि युवांना दुर्दम्य साहसाची प्रेरणा दिली आहे.  मोदी यांनी आज शौर्य, नवनिर्मिती, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा आणि कला या क्षेत्रात वीर बाल पुरस्काराने सन्मानित झालेल्या 17 मुलांचे कौतुक केले. आजचे पुरस्कार विजेते विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या भारतीय मुले आणि युवांच्या क्षमतेचे प्रतीक आहेत. पंतप्रधानांनी यावेळी गुरूंना आणि वीर साहिबजादांना आदरांजली अर्पण केली आणि पुरस्कार विजेत्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले. 

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी शूर साहिबजादांच्या बलिदानाचे स्मरण केले आणि आजच्या युवांना ही शौर्यगाथा माहित असणे अत्यंत आवश्यक असून त्या घटनांच्या इतिहासाचे स्मरण महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तीन शतकांपूर्वी याच दिवशी धाडसी साहिबजादांनी कोवळ्या वयात आपल्या प्राणांची आहुती दिली होती. वय कोवळे असूनही साहिब जोरावर सिंह आणि साहिब फतेह सिंह यांच्या धाडसाला सीमा नव्हती. साहिबजादांनी मुघल सल्तनतीची  सर्व प्रलोभने नाकारली, सर्व अत्याचार सहन केले आणि वजीर खानाने दिलेली  फाशीची शिक्षा अत्यंत शौर्याने स्वीकारणे पसंत केले. साहिबजादांनी त्यांना गुरू अर्जन देव, गुरू तेग बहादूर आणि गुरू  गोविंद सिंह  यांच्या शौर्याची आठवण करून दिली. हे शौर्य श्रद्धेचे आध्यात्मिक बळ होते,असे मोदी यांनी सांगितले. साहिबजादांनी आपल्या प्राणांची आहुती देणे निवडले परंतु आपल्या श्रद्धेच्या  मार्गावरून  ते ढळले नाहीत, असे मोदी यांनी सांगितले. परिस्थिती कितीही कठीण आली  तरी राष्ट्र आणि राष्ट्रहितापेक्षा काहीही मोठे नसते, याची शिकवण वीर बाल दिवस आपल्याला देतो, असे प्रतिपादन मोदी यांनी केले. “देशासाठी केलेले प्रत्येक कृत्य ही वीरता आहे आणि देशासाठी जगणारा प्रत्येक बालक व युवा  हा वीर बालक आहे”.असे मोदी म्हणाले. 

“या वर्षीचा वीर बाल दिवस आणखी विशेष आहे कारण आपले संविधान आणि  भारतीय प्रजासत्ताकाच्या स्थापनेचे हे 75 वे वर्ष आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. भारतीय संविधानाच्या या 75व्या वर्षात देशातील प्रत्येक नागरिक देशाची एकता आणि अखंडतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा शूर साहिबजादांकडून घेत असल्याचे मोदी यांनी आवर्जून नमूद केले.  आज भारत ज्या सशक्त लोकशाहीचा अभिमान बाळगतो त्याच्या आधारशीलेमध्ये साहिबजादांचे शौर्य आणि बलिदान असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. 

आपली लोकशाही आपल्याला समाजातील तळागाळातील व्यक्तीची उन्नती करण्याची प्रेरणा देते, असे त्यांनी अधोरेखित केले. “संविधान आपल्याला शिकवते, की देशात कोणतीही व्यक्ती लहान अथवा मोठी नसते”, पंतप्रधान मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, हे तत्त्व आपल्या गुरूंच्या शिकवणीशी सुसंगत आहे, ज्यांनी सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार केला. पंतप्रधान म्हणाले की, साहिबजादांचे जीवन आपल्याला देशाच्या अखंडतेशी आणि आदर्शांशी तडजोड न करण्याची शिकवण देते, त्याचप्रमाणे संविधान भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या तत्वाचा पुरस्कार करते. ते पुढे म्हणाले की आपल्या लोकशाहीच्या विशालतेमध्ये,  गुरूंची शिकवण, साहिबजादांचे बलिदान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र सामावलेला आहे.

“भूतकाळापासून आजपर्यंत तरुणांच्या ऊर्जेने भारताच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे”, पंतप्रधान मोदी म्हणाले. स्वातंत्र्याच्या लढ्यापासून ते 21व्या शतकातील चळवळीपर्यंत प्रत्येक क्रांतीमध्ये भारतीय तरुणांनी योगदान दिले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. युवा शक्तीमुळे जग भारताकडे आशेने आणि अपेक्षेने पाहते यावर पंतप्रधानांनी भर दिला. आज स्टार्ट अप्सपासून ते विज्ञानापर्यंत, क्रीडा क्षेत्रापासून, ते उद्योजकतेपर्यंत, युवाशक्ती नवनवीन क्रांती घडवून आणत आहे, आणि म्हणूनच, तरुणांना सक्षम बनवण्यावर सरकारी धोरणांचा प्रमुख भर आहे, असे त्यांनी नमूद केले. आज स्टार्ट-अप परिसंस्था, अवकाश अर्थव्यवस्थेचे भवितव्य, क्रीडा आणि फिटनेस क्षेत्र, फिनटेक आणि उत्पादन उद्योग अथवा कौशल्य विकास आणि इंटर्नशिप योजना, ही सर्व धोरणे युवाकेंद्रित असून, तरुणांना लाभ मिळवून देणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी पुढे अधोरेखित केले की, देशाच्या विकासाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात तरुणांना नवनवीन संधी मिळत असून, त्यांचे कौशल्य आणि आत्मविश्वासाला सरकारचे पाठबळ मिळत आहे. आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात नवीन गरजा, अपेक्षा आणि भविष्यातील दिशा उदयाला येत आहेत, असे त्यांनी नमूद केले. पारंपरिक सॉफ्टवेअरकडून एआय (कृत्रिम बुद्धीमत्ता) च्या दिशेने वळून, आणि मशीन लर्निंगचा उदय लक्षात घेऊन, आपल्या युवा पिढीला भविष्यवादी बनवण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. देशाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून, फार पूर्वीच ही तयारी सुरू केली होती, ज्याने शिक्षणाचे आधुनिकीकरण केले आणि शिकण्यासाठी मोकळे अवकाश दिले, असे मोदी यांनी अधोरेखित केले. लहान मुलांमधील नवोन्मेषाला चालना देण्यासाठी 10,000 हून अधिक अटल टिंकरिंग लॅब स्थापन करण्यात आल्या आहेत यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, शिक्षणाबरोबरच व्यावहारिक संधी उपलब्ध करून देणे, आणि तरुणांमध्ये समाजाप्रति कर्तव्याची भावना वाढवणे, हे ‘मेरा युवा भारत’ मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

निरोगी राहण्याच्या महत्त्वावर भर देत, एक निरोगी तरुण सक्षम राष्ट्राच्या दिशेने घेऊन जाईल, असे नमूद करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, युवा पिढीमध्ये फिटनेस बद्दल जागरूकता वाढवणे, हे ‘फिट इंडिया’ आणि ‘खेलो इंडिया’ या चळवळींचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधानांनी ‘सुपोषित ग्रामपंचायत अभियान’ सुरु करत असल्याची घोषणा केली, जे कुपोषण दूर करण्यासाठी आणि विकसित भारताचा पाया रचण्यासाठी ग्रामपंचायतींमधील निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देईल.

“वीर बाल दिवस आपल्यामधील प्रेरणा जागवतो, आणि नवीन संकल्प हाती घेण्यासाठी प्रोत्साहन देतो”, पंतप्रधान म्हणाले. आपले निर्धारित मानक आता सर्वोत्कृष्ट असायला हवे, यावर त्यांनी भर दिला, आणि तरुणांना आपापले क्षेत्र सर्वोत्तम बनवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आपण जर पायाभूत सुविधांवर काम केले, तर आपले रस्ते, रेल्वेचे जाळे आणि विमानतळाची पायाभूत सुविधा जगातील सर्वोत्तम असायला हवी. आपण जर उत्पादनावर काम केले तर आपले सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहने जागतिक स्तरावर सर्वोत्तम असायला हवीत. आपण जर पर्यटन क्षेत्रात काम केले, तर आपली पर्यटन स्थळे, प्रवासाच्या सुविधा आणि आदरातिथ्य जगात सर्वोत्तम असायला हवे.

आपण अंतराळसंबंधी क्षेत्रात काम करत असू तर आपले उपग्रह, दिशादर्शक तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्रातील संशोधन सर्वोत्तम असले पाहिजे.” असे उच्च ध्येय बाळगण्याची प्रेरणा साहिबजाद्यांच्या शौर्यापासून मिळते अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. मोठी ध्येये हे आता आपले निश्चय असले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला. भारतीय युवांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असल्याचे सांगून मोदी म्हणाले की युवावर्ग जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांचे नेतृत्व करू शकतो, आधुनिक जगाला मार्गदर्शनासाठी युवांचा नवोन्मेष, प्रत्येक मोठ्या देशात, क्षेत्रात त्यांची योग्यता सिद्ध करण्याची क्षमता आणि नव्या संधी दिल्यास देशासाठी यश प्राप्त करू शकतो. म्हणून विकसित भारताचे ध्येय आणि आत्मनिर्भर भारताचे यश सुनिश्चित आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक युगाने देशातील युवांना आपले भाग्य बदलण्याच्या संधी दिल्या अशी टिप्पणी करून मोदी यांनी ठळकपणे मांडले की स्वातंत्र्यलढ्यात भारतीय युवा पिढीने परकीय सत्तेचा उद्दामपणा मोडून काढून आपले ध्येय गाठले तर आजचा युवावर्ग विकसित भारताचे ध्येय गाठेल. पुढील 25 वर्षांत वेगाने विकास करण्यासाठी आवश्यक पाया आपण या दशकात घातला पाहिजे, हे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी युवांना आग्रहाची विनंती केली की प्रत्येक क्षेत्रात प्रगती करून देशाला पुढे नेण्याकरिता आपला अधिकाधिक वेळ द्या. सक्रीय राजकारणात नसलेल्या कुटुंबांतील एक लाख युवांना राजकारणात आणण्याच्या आपल्या दृष्टिकोनावर त्यांनी भर दिला. हा उपक्रम आगामी 25 वर्षांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे असे सांगून युवांना नव्या पिढीला राजकारणात आणण्यासाठी त्यात सहभागी होण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. मोदी यांनी ‘विकसित भारत युवा नेते संवाद’ येत्या वर्षीच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी  आयोजित करणार असल्याची घोषणा मोदी यांनी केली. देशातील गावे आणि लहानमोठ्या शहरांमधील लक्षावधी युवा त्यामध्ये सहभागी होऊन विकसित भारताची दृष्टी आणि दिशा याविषयी चर्चा करतील, असे ते पुढे म्हणाले.

आगामी दशकात विशेषतः पुढची पाच वर्षे अमृत काळाच्या 25 वर्षांसाठी केलेल्या निश्चयांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. देशातील संपूर्ण युवाशक्ती एकत्रित आणण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. युवांचा पाठिंबा, सहकार्य आणि ऊर्जा भारताला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. गुरू, वीर  साहिबजादे आणि माता गुजरीजी यांना आदरांजली अर्पण करून त्यांनी आपले भाषण संपविले.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पार्श्वभूमी

भारताच्या भविष्याचे आधारस्तंभ म्हणून बालकांचा गौरव करण्यासाठी देशात वीर बाल दिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले आणि त्यांनी ‘सुपोषित ग्राम पंचायत अभियाना’ला सुरुवात केली. पोषणात सुधारणा घडवून आणत संबंधित सेवांच्या काटेकोर अंमलबजावणीवर भर देऊन सक्रीय लोकसहभागाने आरोग्य कल्याण साधण्याचे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.

देशातील युवांमध्ये  या दिवसाबाबत जागरूकतेला प्रोत्साहन देण्यासाठी, धैर्य व समर्पणाची संस्कृती जोपासण्यासाठी देशात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मायजीओव्ही आणि मायभारत पोर्टलमार्फत परस्परसंवादी प्रश्नमंजुषांसह विविध ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. कथाकथन, सर्जनशील लेखन, फलकनिर्मिती यांसह विविध उपक्रमा शाळा, बालकल्याण संस्था आणि अंगणवाडी केंद्रामध्ये घेतले जातील. 

प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) विजेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

* * *

N.Chitale/Sonali/Rajshree/Reshma/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai