नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2024
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 डिसेंबर रोजी मध्यप्रदेशला भेट देणार आहेत. पंतप्रधान दुपारी 12:30 वाजता खजुराहो मधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी करणार आहेत.
यावेळी राष्ट्रीय नदीजोड योजनेअंतर्गत, विविध प्रांतातील नद्यांना जोडणारा देशातील पहिला प्रकल्प केन-बेतवा या नद्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय प्रकल्पाची पंतप्रधान पायाभरणी करतील. या प्रकल्पामुळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील विविध जिल्ह्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असून लाखो शेतकरी कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे.या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणीही उपलब्ध होणार आहे.त्याचप्रमाणे यावरील जलविद्युत प्रकल्पामुळे 100 मेगावॅटपेक्षा जास्त हरित ऊर्जा उपलब्ध होईल. या प्रकल्पामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेचे सबलीकरण होईल.
तसेच यावेळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ पंतप्रधान एक टपाल तिकिट आणि नाणे प्रकाशित करतील.तसेच 1153 अटल ग्राम सुशासन इमारतींची पायाभरणीही ते करतील. या इमारती ग्रामपंचायतींच्या कामकाजाच्या व्यवहारात आणि जबाबदाऱ्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील ज्यामुळे स्थानिक पातळीवर सुशासन निर्माण होईल.
उर्जा आत्मनिर्भरतेसह हरित ऊर्जेला चालना देण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान मध्यप्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर येथे असलेल्या ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाचे उद्घाटन करतील. हा प्रकल्प कार्बन उत्सर्जन कमी करेल आणि 2070 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाच्या सरकारच्या ध्येयाला हातभार लावेल. या प्रकल्पामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जलसंधारणासही मदत होईल.
N.Chitale/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai