पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे पंतप्रधान महामहिम शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबाह यांची भेट घेऊन चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी राजकीय, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान, सांस्कृतिक आणि परस्पर संबंध यासारख्या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठीच्या आराखड्यावर चर्चा केली.
दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर त्यांनी भर दिला. ऊर्जा, संरक्षण, वैद्यकीय उपकरणे, फार्मा, फूड पार्क यासह इतर क्षेत्रातील नवीन संधी समजून घेण्यासाठी पंतप्रधानांनी कुवैती गुंतवणूक प्राधिकरण आणि इतर भागधारकांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाला भारत भेटीसाठी आमंत्रित केले. पारंपारिक औषध आणि कृषी संशोधनातील सहकार्यावरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान, कृषी, सुरक्षा आणि संस्कृती या क्षेत्रात नवीन संयुक्त कार्यगटांची स्थापना करून नुकत्याच झालेल्या सहकार आयोगाबाबतच्या (JCC) स्वाक्षरीचे त्यांनी स्वागत केले. हे आरोग्य, मनुष्यबळ आणि हायड्रोकार्बन्सवरील विद्यमान संयुक्त कार्यगटांव्यतिरिक्त असणार आहे. चर्चेनंतर द्विपक्षीय करार आणि सामंजस्य करारांवर स्वाक्षरी आणि कागदपत्रांची देवाणघेवाण या नेत्यांच्या समक्ष करण्यात आली. यामध्ये संरक्षण सहकार्यावरील सामंजस्य करार, सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम, क्रीडा क्षेत्रातील सहकार्यावरील कार्यकारी कार्यक्रम आणि कुवेत आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होण्यावरील चौकटीच्या कराराचा समावेश आहे. पंतप्रधानांनी कुवेतच्या पंतप्रधानांना भारत भेटीचे निमंत्रण दिले.
***
S.Patil/H.Kulkarni/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com