Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आयसीए जागतिक सहकारी परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

आयसीए जागतिक सहकारी परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


नवी दिल्‍ली, 25 नोव्‍हेंबर 2024

 

भूतानचे पंतप्रधान आणि माझे धाकटे बंधू, फिजीचे उपपंतप्रधान, भारताचे सहकार मंत्री अमित शाह, आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचे अध्यक्ष, संयुक्त राष्ट्राचे सर्व प्रतिनिधी, जगभरातून आलेले सहकार विश्वाशी संबंधित सर्व मित्र, भगिनी आणि सद्गृहस्थ हो!

आज आपल्या सर्वांचे ज्यावेळी मी स्वागत करीत आहे, परंतु हे स्वागत काही मी एकटा करीत नाही आणि असे काम मी एकटे करूही शकत नाही. भारतातील कोट्यवधी शेतकरी बांधव, भारतातील कोट्यवधी पशुपालक, मच्छीमार, भारतातील आठ लाखांपेक्षा जास्त सहकारी संस्था, स्वयंमदत समूहाबरोबर जोडल्या गेलेल्या 10 कोटी महिला आणि सहकारी क्षेत्रातील तंत्रज्ञानाने जोडले जाणारे भारतातील नवयुवक, अशा सर्वांच्या वतीने मी आपले भारतामध्ये स्वागत करतो.

आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या जागतिक परिषदेचे प्रथमच भारतामध्ये आयोजन केले जात आहे. भारतामध्ये सध्याच्या काळात आम्ही सहकारी चळवळीचा नव्याने विस्तार करीत आहोत.

मला पूर्ण विश्वास आहे की, या परिषदेच्या माध्यमातून भारताला  भविष्यामध्ये  सहकारी क्षेत्रातील  प्रवास करण्यासाठी एक नवीन, आगळी अंतर्दृष्टी प्राप्त होईल. आणि त्याचबरोबर भारताच्या अनुभवांमुळे वैश्विक स्तरावरील सहकारी चळवळीलाही 21व्या शतकातील नवीन साधने मिळतील. नवीन चैतन्य मिळेल. वर्ष 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केल्याबद्दलन मी संयुक्त राष्ट्र संघाचेही खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रहो,

जगासाठी  सहकारी संस्था एक मॉडेल आहेत. परंतु भारतासाठी सहकार हा संस्कृतीचा आधार आहे, जीवनशैली आहे. आमच्या वेदांमध्ये सांगितले आहे की, ‘‘सं गच्छध्वं सं दध्वं’’ याचा अर्थ असा आहे की, आपण सर्वांनी एकमेकांच्या सोबतीने मार्गक्रमण करूया, एकसारखे बोलूया. आमच्या उपनिषदांमध्ये म्हटले आहे की – ‘सर्वे संतु सुखिनः‘ याचा अर्थ सर्वांनी सुखी व्हावे. आमच्या प्रार्थनेमध्येही सहअस्तित्व  असल्याचे सांगितले आहे. संघ आणि सह हे भारतीय जीवनाचे मूलतत्व आहे. आमच्याकडे कुटुंबव्यवस्थेचाही हाच आधार आहे. आणि हीच गोष्ट सहकाराचेही मूळ आहे. सहकाराच्या याचे भावनेबरोबर भारतीय सभ्यता, संस्कृती फळफळली आहे.

मित्रहो,

आमच्या  स्वातंत्र्याचे  आंदोलनही  सहकार्याची प्रेरणेने उभे राहिले होते. त्यामुळे आर्थिक सशक्तीकरणामध्येही मदत मिळाली. स्वांतत्र्य सेनानींना एक सामूहिक मंचही मिळाला. महात्मा गांधीजींच्या ग्राम स्वराजने सामुदायिक भागीदारीला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा दिली. त्यांनी खादी आणि ग्रामोद्योग सारख्या क्षेत्रांमध्ये सहकारितेच्या माध्यमातून एक नवीन आंदोलन उभे केले. आणि आज खादी आणि ग्रामोद्योगाला आमच्या सहकाराने मोठ-मोठ्या ब्रॅंडसच्याही खूप पुढे नेले आहे. स्वातंत्र्याच्या त्या कालखंडामध्ये सरदार पटेल यांनी शेतकरी बांधवांना एकजूट केले.  दूधाला सहकाराच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये नवीन दिशा दिली. स्वातंत्र्याच्या क्रांतीतून निर्माण झालेला अमूल संघ आज जगामध्ये अव्वल खाद्यपदार्थ  ब्रॅंडपैकी एक आहे. आम्ही असे म्हणू शकतो की, भारतामध्ये सहकार क्षेत्राने विचारातून आंदोलन, आंदोलनातून क्रांती आणि क्रांतीतून सशक्तीकरणापर्यंतचा प्रवास केला आहे.

मित्रहो,

आज भारतामध्ये आम्ही सरकार आणि सहकाराची शक्ती एकमेकांना जोडून भारताला विकसित बनविण्यासाठी कार्यरत आहोत. आम्ही ‘सहकार से समृद्धी’ असा मंत्रजप करीत पुढे वाटचाल करीत आहोत. भारतामध्ये आज 8 लाख सहकारी समित्या आहेत. याचा अर्थ जगातील एकूण सहकारी संस्थाचा विचार केला तर, त्यापैकी दर चौथी सहकारी समिती आज भारतामध्ये आहे. आणि ही संख्याच मोठी आहे असे नाही, तर त्यांच्या कामाच्या  व्याप्तीमध्येही तितकीच विविधता आहे आणि व्यापकता आहे. ग्रामीण भारताचा जवळपास 98 टक्के भाग सहकार क्षेत्रातील संस्थांनी व्यापलेला आहे. जवळपास 30 कोटी लोक म्हणजे जगातील प्रत्येक पाचपैकी आणि भारतामध्ये प्रत्येक पाचमध्ये एक भारतीय सहकारी क्षेत्राशी जोडला गेला आहे. साखर असेल, खते असतील, मत्स्य व्यवसाय असेल, दूध उत्पादन असेल… अशा अनेक क्षेत्रांमध्ये सहकाराची खूप मोठी भूमिका आहे.

गेल्या दशकांमध्ये भारतात नागरी सहकारी बॅंकींग आणि सहकारी गृह संस्थांचाही खूप विस्तार झाला आहे. आज भारतामध्ये जवळपास दोन लाख  गृहनिर्माण सहकारी संस्था आहेत. गेल्या काही वर्षांत आम्ही सहकारी बॅंकिंग क्षेत्रालाही बळकटी आणली आहे. त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. आज देशभरामध्ये जवळपास 12 लाख कोटी रूपये – 12 ट्रिलियन रूपये सहकारी बॅंकांमध्ये जमा आहेत.

सहकार क्षेत्राला मजबूत करण्यासाठी, त्यांच्यावरचा विश्वास वाढण्यासाठी आमच्या सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत. आधी या बॅंका रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या- आरबीआयच्या कार्यक्षेत्राबाहेर होत्या. त्यांना आम्ही आता आरबीआयच्या कार्यक्षेत्रामध्ये आणले आहे. या बॅंकांमधील ठेवींवरील विम्याचे कवच आम्ही प्रति ठेवीदार पाच लाख रूपयांपर्यंत वाढवले आहे. सहकारी बॅंकामध्ये डिजिटल बॅंकिंगचा विस्तार केला आहे. या प्रयत्नांमुळे भारतातील सहकारी बॅंका आता पूर्वीपेक्षा खूप जास्त मजबूत झाल्या आहेत आणि त्यांचा कारभार पारदर्शकही झाला आहे.

मित्रहो,

भारत आपल्या भविष्यातील वृद्धीमध्ये सहकार क्षेत्राची खूप मोठी भूमिका असली पाहिजे, याकडे लक्ष देत आहे. म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही सहकारी क्षेत्राशी संबंधित सर्व परिसंस्थेचे परिवर्तन करण्याचे काम केले आहे. भारताने अनेक सुधारणा केल्या आहेत. आमचा प्रयत्न आहे की, सहकारी संस्थांना बहुपयोगी संस्था बनवले जावे. हे लक्ष्य समोर ठेवून भारत सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले आहे. सहकारी समित्यांना बहुउपयोगी बनविण्यासाठी नवीन आदर्श उपनियम तयार केले.

आम्ही सहकारी समितींना माहिती तंत्रज्ञानाधिष्ठित बनवून परिसंस्थेशी  जोडले आहे. त्यांना जिल्हा आणि राज्य स्तरावर सहकारी बॅंकांबरोबर जोडले आहे. आज या सहकारी समित्या भारतातील शेतकरी बांधवांना स्थानिक पातळीवर उपाय, पर्याय देणारे केंद्र चालवित आहेत. या सहकारी समित्या पेट्रोल आणि डिझेल किरकोळ  विक्रीचे केंद्र चालवत आहेत. अनेक गावांमध्ये सहकारी संस्थांमार्फत जल व्यवस्थापनाचे कामही केले जात आहे.

तर अनेक गावांमध्ये सहकारी संस्था सौर पॅनल लावण्याचे काम करीत आहेत. कचऱ्यातून ऊर्जा निर्मितीचा मंत्र आज सहकारी संस्था जपत आहेत आणि गोबरधन योजनेमध्येही सहकारी संस्था मदत करीत आहेत. इतकेच नाही तर, सहकारी समित्या आता कॉमन सर्व्हिस सेंटरच्या धर्तीवर गावांमध्ये डिजिटल सेवाही देत आहेत. आमचा प्रयत्न असाच आहे की, या सहकारी संस्था जास्तीत जास्त बळकट बनाव्यात. त्यांच्या सदस्यांचेही उत्पन्न वाढावे.

मित्रहो,

आता आम्ही ज्याठिकाणी एकही स‍हकारी समिती नाही. अशा दोन लाख गावांमध्ये बहुउपयोगी सहकारी समित्यांची स्थापना करणार आहोत.  

उत्पादन क्षेत्रापासून सेवा क्षेत्रापर्यंत आम्ही सहकारी संस्थांचा विस्तार करत आहोत. सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेवर भारत आज काम करत आहे. आमच्या सहकारी संस्थांसुद्धा ही योजना राबवत आहेत. या योजनेअंतर्गत भारतभर अशी गोदामे बांधली जात आहेत, जिथे शेतकरी आपली पिके ठेवू शकतात. याचा सर्वात जास्त फायदा लहान शेतकऱ्यांना होणार आहे.

मित्रहो,

आम्ही आमच्या लहान शेतकऱ्यांना FPO च्या म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटनेच्या माध्यमातून संघटित करत आहोत. लहान शेतकऱ्यांच्या या एफपीओंना सरकार आवश्यक ते आर्थिक सहाय्यसुद्धा देत आहे. अशा सुमारे नऊ हजार संघटना काम करू लागल्या आहेत. कृषी क्षेत्रातील आमच्या ज्या काही सहकारी संघटना आहेत, त्यांच्यासाठी शेतापासून स्वयंपाकघरापर्यंत, शेतापासून बाजारापर्यंत एक मजबूत पुरवठा आणि मूल्य साखळी तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत.

ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स- ONDC सारख्या सार्वजनिक ई-वाणिज्य मंचाच्या माध्यमातून सहकारी संस्थांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी आम्ही एक नवीन माध्यम प्रदान करत आहोत. याद्वारे आमच्या सहकारी संस्था कमीत कमी किमतीत उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. जीईम अर्थात गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस नावाचा डिजिटल मंचसुद्धा सरकारने तयार केला आहे. या मंचाने सुद्धा सहकारी संस्थांना खूप मदत केली आहे.

मित्रहो,

या शतकात जागतिक विकासात महिलांचा सहभाग हा मोठा घटक असणार आहे. एखादा देश आणि समाज महिलांना जितका अधिक सहभाग देईल, तितक्या वेगाने विकास करेल. आज भारतात महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे युग आहे, आम्ही यावर खूप लक्ष केंद्रित करत आहोत आणि सहकार क्षेत्रातही महिलांची भूमिका मोलाची आहे. आज भारताच्या सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. महिलांच्या अनेक सहकारी संस्था आज या क्षेत्राचे बलस्थान ठरल्या आहेत.

मित्रहो,

सहकारी संस्थांच्या व्यवस्थापनात सुद्धा महिलांचा सहभाग वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायद्यात सुधारणा केली आहे. आता अशा बहुराज्य सहकारी संस्थांच्या संचालक मंडळावर महिला संचालक असणे बंधनकारक करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर सहकारी संस्था जास्त समावेशक व्हाव्यात या विचाराने वंचित घटकांसाठी आरक्षणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

मित्रहो,

बचत गटांच्या रूपातील भारतातील एका फार मोठ्या चळवळीबद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल. महिलांच्या सहभागापासून ते महिला सक्षमीकरणापर्यंतची ही एक मोठी चळवळ आहे. आज भारतातील 10 कोटी अर्थात 100 दशलक्ष महिला स्वयं-सहायता गटांच्या सदस्य आहेत. मागच्या दशकभरात सरकारने या बचत गटांना 9 लाख कोटी रुपयांची कर्जे सवलतीच्या दरात दिली आहेत. त्यामुळे या बचत गटांनी गावागावांमध्ये मोठी संपत्ती निर्माण केली आहे. आज जगातील अनेक देशांसाठी हे महिला सक्षमीकरणाचे मोठे मॉडेल बनू शकते.

मित्रहो,

एकविसाव्या शतकात आता आपण सर्वांनी मिळून जागतिक सहकारी चळवळीची दिशा ठरवण्याची वेळ आली आहे. आपल्याला एका अशा सहकार्यात्मक आर्थिक मॉडेलचा विचार करावा लागेल, ज्यामुळे सहकारी संस्थांचा वित्तपुरवठा सुलभ आणि पारदर्शक होईल. लहान आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत सहकारी संस्थांना पुढे नेण्यासाठी आर्थिक स्त्रोतांचे एकत्रीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. असे सामायिक आर्थिक मंच अर्थात शेअर्ड फायनान्शिअल प्लॅटफॉर्म मोठ्या प्रकल्पांना निधी देण्यासाठी आणि सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी एक माध्यम बनू शकतात. आपल्या सहकारी संस्था खरेदी, उत्पादन आणि वितरणामध्ये भागिदारी करून पुरवठा साखळीत सुधारणा करू शकतात.

मित्रहो,

आज आणखी एका विषयावर विचारमंथन करण्याची गरज आहे. जगभरातील सहकारी संस्थांना वित्तपुरवठा करू शकतील अशा मोठ्या वित्तीय संस्था आपण जागतिक स्तरावर निर्माण करू शकतो का? आयसीए आपल्या जागी आपली भूमिका चोख बजावत आहे, मात्र भविष्यात आणखी पुढे जाणे गरजेचे आहे. जगातील सध्याची परिस्थिती सहकार चळवळीसाठी मोठी संधी ठरू शकते. आपण सहकारी संस्थांना जगात सचोटीचे आणि परस्पर आदराचे द्योतक बनवायचे आहे. यासाठी आपल्याला आपल्या धोरणांमध्ये नाविन्य आणावे लागेल आणि ती नव्याने आखावी लागतील. सहकारी संस्था हवामान- सुसंगत व्हाव्यात यासाठी त्यांना चक्राकार अर्थव्यवस्थेशी जोडले गेले पाहिजे. सहकार क्षेत्रातील स्टार्ट अप्सना आपण कशा प्रकारे प्रोत्साहन देऊ शकतो, यावरही चर्चा होणे गरजेचे आहे, असे वाटते.

मित्रहो,

सहकारी संस्थांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर सहकार्याला नवी ऊर्जा मिळू शकते, असा विश्वास भारताला वाटतो. विशेषत: ग्लोबल साउथमधील देशांना आवश्यक असलेली वाढ साध्य करण्याच्या कामी सहकारी संस्था मदत करू शकतात. त्यामुळे आज आपल्याला सहकारी संस्थांच्या आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील आणि नवकल्पनांवर काम करावे लागले. आणि या कामी या परिषदेची भूमिका मोठी असल्याचे मला दिसते आहे.

मित्रहो, 

भारत आज सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. सकल देशांतर्गत उत्पादनात मोठी वाढ साध्य करत या वाढीचा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. जगाने मानवकेंद्री दृष्टिकोनातून विकासाकडे पाहणेही महत्त्वाचे आहे. देशात असो किंवा जागतिक स्तरावर, आपल्या सर्व कामांमध्ये मानवकेंद्रीपणा असावा, हा भारताचा उद्देश आहे. कोविडसारखे मोठे संकट संपूर्ण मानवतेवर आले होते तेव्हासुद्धा आपण हे अनुभवले आहे. तेव्हाही आम्ही जगभरातील लोकांच्या पाठीशी उभे राहिलो, ज्या देशांकडे स्रोत नव्हते, त्या देशांच्या पाठीशी उभे राहिलो. यापैकी बरेच देश ग्लोबल साउथमधील होते, ज्यांना भारताने औषधे आणि लसींचा पुरवठा केला. त्या वेळी, आपण या परिस्थितीचा फायदा घेतला पाहिजे, असे अर्थकारण सांगत होते मात्र माणुसकीची भावना म्हणाली…नाही…तो मार्ग योग्य नाही. सेवा हा एकमेव मार्ग असला पाहिजे. आणि आम्ही फायद्याचा नाही तर मानवतेचा मार्ग निवडला.

मित्रहो,

सहकारी संस्थांचे महत्त्व केवळ रचना, नियम आणि कायद्यांपुरते मर्यादित असते, असे नाही. यातून संस्था निर्माण करता येतात, कायदे, नियम, संरचना, संस्था निर्माण करता येतात, त्यांचा विकास आणि विस्तारसुद्धा करता येतो. मात्र सहकारी संस्थांची सहकाराची भावना ही सर्वात महत्त्वाची आहे.  सहकाराची ही भावनाच या चळवळीची प्राणशक्ती आहे. सहकार्याच्या संस्कृतीतून ही प्राणशक्ती येते. महात्मा गांधी म्हणायचे की सहकारी संस्थांचे यश हे त्यांच्या संख्येवर अवलंबून नसून त्यांच्या सदस्यांच्या नैतिक विकासावर अवलंबून आहे. नैतिकता असेल, तरच मानवतेच्या हितासाठी योग्य निर्णय घेतले जातील. या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात ही भावना दृढ करण्यासाठी आम्ही सातत्याने काम करू, असा विश्वास मला वाटतो.  मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला अनेकानेक शुभेच्छा देतो. पाच दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेत विविध विषयांवर चर्चा होईल. या विचारमंथनातून जे अमृत प्राप्त होईल ते समाजातील प्रत्येक घटकाला आणि जगातील प्रत्येक देशाला सहकार्याच्या भावनेने पुढे जाण्यास बळ देईल आणि समृद्ध करेल. या भावनेसह माझ्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

धन्यवाद!

 

* * *

H.Akude/Suvarna/Madhuri/D.Rane