Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा इंग्रजी अनुवाद


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2024

नमस्कार मित्रांनो,

हे हिवाळी अधिवेशन आहे आणि आता वातावरण देखील थंड असणार आहे. आपण आता 2024 च्या शेवटच्या टप्प्यात आहोत आणि प्रचंड उर्जा आणि मोठ्या उत्साहासह संपूर्ण देश 2025 चे स्वागत करण्यासाठी उत्सुकतेने तयारी करत आहे.

मित्रांनो,

संसदेचे हे अधिवेशन अनेक अर्थांनी खास आहे. आपल्या संविधानाचा 75 व्या वर्षात प्रवेश होत असताना, संविधानाचा गेल्या 75 वर्षांचा प्रवास हा त्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. लोकशाहीसाठी हा अत्यंत संस्मरणीय प्रसंग आहे. उद्या आपण सर्वजण संविधान भवनात आपल्या संविधानाच्या अमृतमहोत्सवी सोहोळ्याची सुरुवात करणार आहोत. संविधानाच्या रचनाकरांनी संविधानाचा मसुदा तयार करताना प्रत्येक मुद्द्यावर तपशीलवार चर्चा केली, परिणामी हा उत्कृष्ट दस्तऐवज निर्माण झाला. आपली संसद आणि त्यातील सदस्य हे या संविधानाचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत.संसदेमध्ये निकोप चर्चा होणे आणि त्यामध्ये अधिकाधिक लोकांनी भाग घेणे अत्यावश्यक आहे. दुर्दैवाने, जनतेने नाकारलेल्या काही व्यक्ती राजकीय लाभासाठी व्यत्यय आणणारे डावपेच वापरून संसदेवर नियंत्रण मिळवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. संसदेचे कामकाज थांबवण्याचे त्यांचे मुख्य उद्दिष्ट क्वचितच यशस्वी ठरते, आणि जनता त्यांच्या या कृतींची नोंद घेत असते आणि वेळ आल्यावर त्यांना शिक्षा देखील करत असते.

मात्र, यातील सर्वात त्रासदायक पैलू असा आहे की, त्यांच्या अशा वागण्यामुळे सर्व पक्षांतून नवनवीन कल्पना आणि उर्जा घेऊन संसदेत आलेल्या नव्या खासदारांच्या अधिकारांवर गदा येते. अनेकदा या नव्या सदस्यांना सदनात बोलण्याची संधी नाकारली जाते. लोकशाही परंपरेत, संसद सदस्यांच्या प्रत्येक पिढीवर आगामी पिढ्यांची तयारी करवून घेण्याची जबाबदारी असते. मात्र, ज्यांना लोकांनी सतत, 80-90 वेळा नाकारले आहे, असे लोक संसदेत चर्चा तर होऊ देतच नाहीत पण त्याचबरोबर लोकशाही तत्वे किंवा जनतेच्या आकांक्षा यांचा देखील आदर करत नाहीत. जनतेच्या प्रती असलेली जबाबदारी अशा लोकांना समजतच नाही. परिणामी, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते सतत अपयशी होत राहतात आणि त्यातून मग निवडणुकीतही जनता त्यांना पुनःपुन्हा नाकारते.

मित्रांनो,

हे सदन म्हणजे लोकशाहीचा पुरावा आहे. वर्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील जनतेला आपापल्या राज्यांमध्ये त्यांचे विचार, दृष्टीकोन तसेच अपेक्षा व्यक्त करण्याच्या संधी मिळाल्या होत्या.राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील निकालांनी पाठींब्याचा पाया विस्तारत आणि लोकशाही प्रक्रीयांवरील विश्वास वाढवत 2024मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालांना आणखी बळकटी दिली आहे. लोकशाहीत आपण जनतेच्या भावनांचा आदर करणे आणि त्यांच्या आशा तसेच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अथकपणे कार्य करणे आवश्यक असते. मी यासंदर्भात विरोधी पक्षांना वारंवार यासाठी आग्रह केला आहे आणि काही विरोधी पक्ष सदस्य अत्यंत जबाबदारीने वागत आहेत. त्यांना देखील सदनाचे कामकाज सुरळीतपणे चालावे असे वाटते. मात्र, जनतेने नाकारलेले लोक त्यांच्या सहकाऱ्यांची देखील गळचेपी करतात, त्यांच्या भावनांचा अपमान करतात आणि लोकशाहीच्या भावनेला सुरुंग लावतात.

सर्व पक्षांतील आमच्या नव्या सदस्यांना संधी मिळेल अशी मला आशा आहे. भारताला पुढे नेण्यासाठी ते नव्या संकल्पना आणि नाविन्यपूर्ण दृष्टीकोन घेऊन येतात. आज जग भारताकडे मोठ्या आशेने पाहते आहे. संसद सदस्य म्हणून आपण सर्वांनी आपला वेळ जागतिक पातळीवर भारताचा आदर आणि आकर्षण आणखी वाढवण्यासाठी वापरला पाहिजे. आजघडीला भारताला ज्या संधी मिळाल्या आहेत तशा मिळणे जागतिक मंचावर दुर्मिळ असते. भारताच्या संसदेतून देण्यात येणारे संदेश मतदारांचे लोकशाहीप्रती समर्पण, त्यांची संविधानाप्रती वचनबद्धता आणि संसदीय प्रक्रियांवर असलेला त्यांचा विश्वास यातून प्रतिबिंबित झाले पाहिजेत. लोकांचे प्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्या भावनांचा मान राखला पाहिजे. आपण आतापर्यंत जो वेळ गमावला त्यावर विचार करण्याची आणि संसद सदनात विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करून त्याची भरपाई करण्याची वेळ आली आहे. भावी पिढ्या या चर्चांचे वाचन करून त्यापासून प्रेरणा घेतील. हे अधिवेशन मोठ्या प्रमाणात परिणामकारक ठरेल, संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची प्रतिष्ठा वाढवेल, भारताचे जगातील स्थान बळकट करेल, नव्या खासदारांना संधी उपलब्ध करून देईल आणि नव्या कल्पनांचे स्वागत करेल अशी मला आशा आहे. याच विचारासह, मी पुन्हा एकदा संसदेच्या सन्माननीय सदस्यांना उत्साह आणि जोम घेऊन या सत्रात येण्यासाठी आमंत्रित करून त्यांचे स्वागत करतो. सर्वांचे खूप खूप आभार.

नमस्कार!

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai