पंतप्रधान नरेंद्र मोदी 15-17 सप्टेंबर 2024 रोजी झारखंड, गुजरात आणि ओडिशा या राज्यांना भेट देणार आहेत.
15 सप्टेंबर रोजी पंतप्रधान झारखंडला जातील आणि सकाळी 10 वाजता ते झारखंडमधील टाटानगर जंक्शन रेल्वे स्थानक येथे टाटानगर-पटना वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. सकाळी 10:30 वाजता ते सुमारे 660 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण करतील. तसेच ते झारखंडमधील टाटानगर येथील प्रधान मंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G) च्या 20 हजार लाभार्थ्यांना आवास मंजुरी पत्रांचे वाटप करतील.
16 सप्टेंबर रोजी, सकाळी 09:45 वाजता, पंतप्रधान गुजरातमधील गांधीनगर येथे प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर सकाळी 10:30 वाजता ते गांधीनगरमधील महात्मा मंदिर येथे आयोजित चौथ्या नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदार शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे (री-इन्व्हेस्ट) उद्घाटन करतील. दुपारी 1:45 वाजता पंतप्रधान अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करतील आणि सेक्शन 1 मेट्रो स्टेशनपासून गिफ्ट सिटी मेट्रो स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास करतील. पंतप्रधान दुपारी 3:30 वाजता, अहमदाबादमध्ये 8,000 कोटी रुपयांहून अधिक ओडिशा किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
17 सप्टेंबर रोजी, पंतप्रधान ओदिशाला जातील आणि सकाळी 11:15 वाजता, ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या – (शहरी) लाभार्थ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ते भुवनेश्वर येथे 3800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रसमर्पण करतील.
पंतप्रधानांचे टाटा नगरमधील कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीमार्फत 660 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रसमर्पण करतील. ते देवघर जिल्ह्यातील मधुपूर बायपास लाइन आणि झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील हजारीबाग टाउन कोचिंग डेपोची पायाभरणी देखील करतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर, मधुपूर बायपास मार्गामुळे हावडा-दिल्ली मेनलाइनवर गाड्यांचा खोळंबा टाळण्यात मदत होईल तसेच गिरिडीह आणि जसिडीह दरम्यानचा प्रवास वेळ कमी करण्यात मदत होईल. यासोबतच, हजारीबाग टाउन कोचिंग डेपो या स्थानकावरील कोचिंग स्टॉकची देखभाल सुलभ करण्यात मदत होईल.
पंतप्रधान कुरकुरा-कनारोन हा दुहेरीकरण झालेला रेल्वे मार्ग देखील राष्ट्राला समर्पित करतील. हा रेल्वे मार्ग बोंडामुंडा-रांची सिंगल लाइन सेक्शनचा भाग आहे आणि सोबतच रांची, मुरी आणि चंद्रपुरा स्थानकामार्गे जाणाऱ्या राउरकेला-गोमोह या रेल्वे मार्गाचा देखील भाग आहे. या प्रकल्पामुळे माल आणि प्रवासी वाहतुकीची गती वाढण्यास मदत होईल. याशिवाय, सामान्य लोकांच्या सुरक्षितता लक्षात घेऊन बांधण्यात आलेले 04 रोड अंडर ब्रिज (RUBs) देखील पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित केले जातील.
पंतप्रधान सहा वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्या पुढील मार्गांवरील संपर्क सुविधा सुधारतील:
1) टाटानगर – पाटणा
2) भागलपूर – दुमका – हावडा
3) ब्रह्मपूर – टाटानगर
4) गया – हावडा
5) देवघर – वाराणसी
6) राउरकेला – हावडा
या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्या सुरू केल्याने नियमित प्रवासी, व्यावसायिक, व्यापारी आणि विद्यार्थी समुदायाला फायदा होईल. या गाड्या देवघर (झारखंड) येथील बैद्यनाथ धाम, वाराणसी (उत्तर प्रदेश) येथील काशी विश्वनाथ मंदिर, कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील कालीघाट, बेलूर मठ इत्यादी तीर्थक्षेत्रांपर्यंत जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देऊन या प्रदेशातील धार्मिक पर्यटनाला चालना देतील. याशिवाय धनबादमधील कोळसा खाणी उद्योग, कोलकात्यातील ज्यूट उद्योग, दुर्गापूरमधील लोह आणि पोलाद उद्योगांनाही यामुळे मोठी चालना मिळणार आहे.
सर्वांसाठी घरे या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान झारखंडमधील 20 हजार प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (PMAY-G) लाभार्थ्यांना घरांच्या मंजुरी पत्रांचे वितरण करतील. ते लाभार्थ्यांना मदतीचा पहिला हप्ता देखील जारी करतील. 46 हजार लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळ्यातही पंतप्रधान सहभागी होणार आहेत.
पंतप्रधानांचे गांधीनगरमधील कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात मधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे री-इन्व्हेस्ट 2024 चे उद्घाटन करतील. हा कार्यक्रम नवीकरणीय ऊर्जा उत्पादन आणि उपयोजनामध्ये भारताच्या प्रभावी प्रगतीवर प्रकाश टाकण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. अडीच दिवस चालणाऱ्या या परिषदेत जगभरातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. उपस्थित प्रतिनिधी विविध सर्वसमावेशक कार्यक्रमात सहभागी होतील ज्यात मुख्यमंत्र्यांची मुख्य बैठक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज परिषद आणि नवोन्मेषी वित्तपुरवठा, हरित हायड्रोजन आणि भविष्यातील ऊर्जा पर्यायांवर विशेष चर्चा यांचा समावेश आहे. या कार्यक्रमात जर्मनी, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि नॉर्वे हे देश भागीदार म्हणून सहभागी होत आहेत. गुजरात राज्य हे यजमान राज्य तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश ही राज्ये भागीदार राज्ये म्हणून सहभागी होणार आहेत.
200 GW पेक्षा जास्त स्थापित गैर-जीवाश्म इंधन क्षमतेच्या भारताच्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्यांचा या परिषदेत सन्मान केला जाणार आहे. यावेळी आयोजित एका प्रदर्शनात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्या, स्टार्ट-अप आणि प्रमुख उद्योग क्षेत्रातील आघाडीचे उद्योग आपल्या अत्याधुनिक नवकल्पना प्रदर्शित करणार आहेत. हे प्रदर्शन शाश्वत भविष्यासाठी भारताची वचनबद्धता अधोरेखित करेल.
पंतप्रधानांचे अहमदाबादमधील कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात मधील अहमदाबाद येथे 8,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
पंतप्रधान काही महत्त्वपूर्ण प्रकल्पांची पायाभरणी देखील करतील. यामध्ये पुढील प्रकल्पांचा समावेश आहे – समखियाली-गांधीधाम आणि गांधीधाम-आदिपूर रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण; अहमदाबादमधील एएमसी भागातील महत्वपूर्ण रस्त्यांचा विकास, तसेच बाकरोल, हाथीजन, रामोल आणि पांजरपोळ जंक्शनवर उड्डाण पूल बांधणे.
पंतप्रधान 30 मेगावॅटच्या सौर यंत्रणेचे उद्घाटन करतील. ते कच्छ लिग्नाइट थर्मल पॉवर स्टेशन येथे 35 मेगावॅट BESS सोलर पीव्ही प्रकल्प आणि मोरबी आणि राजकोट येथे 220 किलोवोल्ट सबस्टेशनचे उद्घाटन देखील करतील.
पंतप्रधान आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाची एकल खिडकी माहिती तंत्रज्ञान प्रणाली (SWITS) लाँच करतील, जी वित्तीय सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी आरेखित करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत 30,000 हून अधिक घरांना पंतप्रधान मंजूर देतील आणि या घरांसाठी पहिला हप्ता देखील जारी करतील, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांच्या बांधकामाचा प्रारंभ करतील. प्रधानमंत्री आवास योजनेच्याच्या शहरी आणि ग्रामीण या दोन्ही विभागांतर्गत पूर्ण झालेली घरे राज्यातील लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते सुपूर्द केली जातील.
याशिवाय, पंतप्रधान भुज ते अहमदाबाद अशी भारतातील पहिली वंदे मेट्रो तसेच नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे, आग्रा कँटोन्मेंट ते बनारस, दुर्ग ते विशाखापट्टणम, पुणे ते हुबळी वंदे भारत रेल्वे गाड्यांसह वाराणसी ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या 20 डबे असणाऱ्या वंदे भारत रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवतील.
पंतप्रधानांचे भुवनेश्वरमधील कार्यक्रम
भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान ओदिशा सरकारची प्रमुख योजना ‘सुभद्रा’ लाँच करतील. ही सर्वात मोठी, एकल महिला-केंद्रित योजना आहे आणि या योजनेत 1 कोटींहून अधिक महिलांचा समावेश अपेक्षित आहे. योजनेअंतर्गत, 21-60 वर्षे वयोगटातील सर्व पात्र लाभार्थींना 2024-25 ते 2028-29 दरम्यान 5 वर्षांच्या कालावधीत 50,000 रुपये दिले जाणार आहेत. दरवर्षी 10,000 रुपये इतकी रक्कम दोन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या आधार-सक्षम आणि डीबीटी-सक्षम बँक खात्यात जमा केली जाणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान 10 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरणाची सुरुवात करणार आहेत.
पंतप्रधान भुवनेश्वरमध्ये 2800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करतील आणि राष्ट्राला समर्पित करतील. हे रेल्वे प्रकल्प ओदिशातील रेल्वे पायाभूत वर्धित करतील आणि या प्रदेशाची वाढ तसेच संपर्क सुविधा सुधारतील. यासोबतच पंतप्रधानांच्या हस्ते 1,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची पायाभरणी देखील केली जाणार आहे.
पंतप्रधान सुमारे 14 राज्यांतील प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत सुमारे 13 लाख लाभार्थ्यांना मदतीचा पहिला हप्ता जारी करतील. या कार्यक्रमादरम्यान देशभरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण आणि शहरी) 26 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान या घराच्या चाव्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण आणि शहरी) लाभार्थ्यांना सुपूर्द करतील. प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण साठी अतिरिक्त घरांच्या सर्वेक्षणासाठी आवास+ 2024 ॲप देखील पंतप्रधानांच्या हस्ते लॉन्च करण्यात येणार आहे. याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजना – शहरी 2.0 ची कार्यान्वयन मार्गदर्शक तत्त्वे पंतप्रधान लाँच करतील.
***
H.Akude/S.Mukhedkar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com