ब्रुनेई दारूसलामचे सुलतान हाजी हसनल बोलकीया मुईज्जादीन वद्दोला इब्नी अल- मरहूम सुलतान हाजी ओमर अली सैफुद्दीन सादूल खैरी वाद्दिन यांच्या निमंत्रणावरून भारत गणराज्यचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 3 ते 4 सप्टेंबर 2024 या काळात ब्रुनेई दारूसलामचा अधिकृत दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रुनेई दारूसलामचा हा पहिला दौरा होता तर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला द्विपक्षीय दौरा होता.
ब्रुनेई दारूसलाम इथे आगमन झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रुनेई दारूसलामचे युवराज आणि पंतप्रधान कार्यालयातले वरिष्ठ मंत्री महामहीम हाजी अल- मुहताद्दी बिल्लाह यांनी स्वागत केले.महामहीम यांनी पंतप्रधानांसमवेत द्विपक्षीय बैठक घेतली आणि इस्ताना नुरुल इमान इथे दुपारचे भोजन आयोजित केले.
उभय देशांमधल्या राजनैतिक संबंधाना 40 वर्षे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही ऐतिहासिक भेट होत असल्याबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले आणि ब्रुनेई दारूसलाम आणि भारत यांच्यातली प्रगाढ मैत्री गेल्या चार दशकात विविध क्षेत्रात भक्कम झाली असल्याची दखल घेतली.
ब्रुनेई दारूसलाम आणि भारत यांच्यात शतकांपासून ऐतिहासिक संबंध असून ते सांस्कृतिक आदान- प्रदान आणि व्यापार यातून अधिक दृढ झाल्याची दखल दोन्ही नेत्यांनी घेतली.1984 मध्ये दोन्ही देशांमधल्या राजनैतिक संबंधाच्या औपचारिकीकरणातून स्थायी भागीदारीचा प्रारंभ झाला.
महामहीम यांनी देशातल्या विविध व्यवसायांमधल्या भारतीय समुदायाने देशाच्या सामाजिक-आर्थिक आणि राष्ट्रीय विकासात दिलेल्या मौल्यवान योगदानाची प्रशंसा केली.
द्विपक्षीय संबंधांमधली गेल्या काही वर्षातली उत्कृष्ट प्रगती अधोरेखित करत परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रात भागीदारी अधिक बळकट, प्रगाढ आणि वृद्धींगत करण्यासाठी दोन्ही नेत्यांनी आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी संरक्षण,कनेक्टीव्हिटी,व्यापार आणि गुंतवणूक,नविकरणीय उर्जेसह उर्जा,अंतराळ,आयसीटी,आरोग्य आणि औषधनिर्मिती,शिक्षण आणि क्षमता उभारणी,संस्कृती,पर्यटन,युवा आणि जनते-जनतेमधले आदान-प्रदान यासह व्यापक विषयांवर त्याचबरोबर प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही सहकार्य वृद्धीसाठी चर्चा केली.
दोन्ही नेत्यांनी सध्याच्या द्विपक्षीय यंत्रणेद्वारे घनिष्ठ संवादाचे महत्व जाणत नियमित बैठका, परराष्ट्र व्यवहार कार्यालय चर्चा आणि संयुक्त कृती गटाच्या बैठका तसेच द्विपक्षीय आणि परस्पर हिताच्या बहुपक्षीय मुद्यांवर संवाद आणि आदान-प्रदान जारी राखण्यावर सहमती व्यक्त केली.
परस्पर हिताचा द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक संबंध आणखी विस्तारण्यासाठी उभय नेत्यांनी सहमती दिली. संयुक्त व्यापार समिती (जेटीसी) तसेच इतर द्विपक्षीय,प्रादेशिक आणि बहुपक्षीय मंच यासारख्या महत्वाच्या मंचाद्वारे नियमित आदान-प्रदान आणि संवादाचे महत्व त्यांनी अधोरेखित केले.
दोन्ही नेत्यांनी तंत्रज्ञान,वित्त,उत्पादन आणि प्रक्रिया यासह विविध क्षेत्रातल्या क्षमतांचा लाभ आणि परस्पर लाभदायक पद्धतीने पूरकतेचा शोध घेण्याचे आवाहन केले.
अन्न सुरक्षेचे महत्व जाणत दोन्ही नेत्यांनी ज्ञान, उत्तम प्रथा आणि अनुभव यांचे आदान-प्रदान करत कृषी आणि अन्न पुरवठा साखळी यासाठीचे सहकार्य वृद्धिंगत करण्याला मान्यता दिली.
भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या सध्याच्या प्रयत्नांमध्ये योगदान देणाऱ्या,भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) टेलीमेट्री ट्रॅकिंग अॅन्ड टेलीकमांड (टीटीसी ) ची यजमानी जारी ठेवल्याबद्दल ब्रुनेई दारूसलामची पंतप्रधानांनी अतिशय प्रशंसा केली. दोन्ही नेत्यांनी उभय सरकारांमध्ये सामंजस्य कराराद्वारे (एमओयु)प्रदीर्घ काळ चालत असलेल्या व्यवस्थेची आणि नूतनीकृत एमओयु संपन्न झाल्याची तसेच याअंतर्गत परस्पर हिताच्या क्षेत्रात सहकार्य वृद्धीची प्रशंसा केली.
दोन्ही नेत्यांनी उभय देशांमध्ये नियमित भेटी,प्रशिक्षण कार्यक्रम,संयुक्त सराव, नौदल आणि तटरक्षक जहाजांच्या भेटी याद्वारे संरक्षण आणि सागरी सहकार्याचे महत्व स्वीकारले.
दोन्ही नेत्यांनी उभय देशांच्या जहाजांद्वारे नियमित पोर्ट – कॉल बाबत समाधान व्यक्त केले.
बंदर सेरी बेगवान आणि चेन्नई दरम्यान नियोजित थेट विमान सेवेचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले ही थेट कनेक्टीव्हिटी उभय देशातल्या जनतेमध्ये संबंध अधिक दृढ होण्याला आणि दोन्ही देशातल्या व्यापार आणि पर्यटन वृद्धीला चालना देईल.
राष्ट्र उभारणीत युवकांची महत्वाची भूमिका जाणत दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधल्या युवकांमध्ये अधिक आदान- प्रदानाला प्रोत्साहन देण्यासाठी मान्यता दिली.
भारतीय तंत्र आणि आर्थिक सहकार्य (आयटीईसी ) आणि ई- आयटीईसी कार्यक्रमांसह भारताने ब्रुनेई नागरिकांसाठी देऊ केलेल्या प्रशिक्षण आणि स्कॉलरशिपची महामहीम यांनी प्रशंसा केली आणि त्यांचे स्वागत जारी ठेवले.
प्रांतामध्ये शांतता, स्थैर्य,सुरक्षा,समृद्धी आणि सुदृढता कायम राखण्याप्र्ती आपल्या दृढ कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि संयुक्त राष्ट्र सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्यामधल्या तत्वांच्या पालनाचे महत्व अधोरेखित केले.
आसियान-भारत संवाद संबंध,पूर्व आशिया शिखर परिषद,आसियान प्रादेशिक मंच, आशिया –युरोप बैठक (एएसईएम) आणि संयुक्त राष्ट्र (युएन) यासह बहुपक्षीय आणि विविध प्रादेशिक मंचावर सहकार्य बळकट करण्याला दोन्ही नेत्यांनी मान्यता दर्शवली.शांतता आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी कायदा आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे पालन अनिवार्य आहे ही बाब दोन्ही नेत्यांनी मान्य केली.
समकालीन वास्तव प्रतिबिंबित करणाऱ्या वर्धित बहुपक्षवादासाठी एकत्र काम करण्याला उभय नेत्यांनी सहमती दाखवली.
आसियान – भारत समावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट करण्याकरिता परस्पर हिताच्या क्षेत्रात एकत्रित काम करण्याच्या कटिबद्धतेचा उभय नेत्यांनी पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी शांतता, स्थैर्य,सागरी सुरक्षा कायम राखण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे विशेष करून संयुक्त राष्ट्र परिषदेचा समुद्रविषयक कायदा (युएनसीएलओएस) 1982 ला अनुसरत नेव्हिगेशन आणि उड्डाण यांच्या स्वातंत्र्याचा आणि अडथळा विरहीत कायदेशीर व्यापार यांचा आदर करण्याच्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला. आंतरराष्ट्रीय कायदे विशेष करून युएनसीएलओएस 1982 ला अनुसरत शांततापूर्ण मार्गाने विवाद सोडवण्याचे या नेत्यांनी सर्व पक्षांना आवाहन केले.
कोणत्याही स्वरूपातील दहशतवादाचा आणि त्याच्या आविष्काराचा या दोन्ही नेत्यांनी निषेध केला आणि सर्व राष्ट्रांनी दहशतवादाला थारा देऊ नये असे आवाहन केले. कोणत्याही देशाने आपल्या अधिपत्याखालील प्रदेशाचा दहशतवादासाठी वापर करू देता कामा नये, कोणत्याही देशाने दहशतवाद्यांनाआश्रय देऊ नये ही बाब अधोरेखित करत दहशतवादी कृत्ये करणाऱ्यांना न्यायाच्या चौकटीत आणण्यासाठी एकत्रित काम करण्याचा निर्धार केला. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्हे यांच्यातले संबंध लक्षात घेत या विषयावर सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय मंचावर एकत्रित काम करण्यावर दोन्ही बाजूनी सहमती दर्शवली.
हवामान बदल आणि या वाढत्या आव्हानाच्या प्रतिकूल परिणामांचे, पॅरिस करारासारख्या आंतरराष्ट्रीय उद्दिष्टानुसार शमन करण्याच्या आणि त्यासाठीचे प्रयत्न वाढवण्याच्या तातडीच्या गरजेवर दोन्ही नेते सहमत झाले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (आयएसए),आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा (सीडीआरआय),जागतिक जैव – इंधन आघाडी (जीबीए) स्थापनेसाठी भारताच्या पुढाकाराची महामहीम यांनी प्रशंसा केली. हवामान बदलासंदर्भात ब्रुनेई दारूसलेम इथे आसियान केंद्रासाठी भारताने दिलेल्या पाठींब्यासाठी महामहीम यांनी प्रशंसा केली.
व्हाईस ऑफ ग्लोबल साउथ समिट (व्हीओजीएसएस)मधल्या ब्रुनेई दारूसलामच्या सातत्यपूर्ण सहभागाचे पंतप्रधानांनी स्वागत केले. ग्लोबल साउथ देशांना एकत्र आणून विविध मुद्यांवर त्यांचा दृष्टीकोन आणि प्राधान्य एका मंचावर सामायिक करणे हे भारताने पुढाकार घेतलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.
या दौऱ्यादरम्यान आपले आणि आपल्या प्रतिनिधीमंडळाचे स्नेहपूर्ण स्वागत आणि आतिथ्याबद्दल पंतप्रधानांनी महामहीम यांची प्रशंसा केली. महामहीम यांना नजीकच्या भविष्यात भारताला भेट देण्यासाठी पंतप्रधानांनी निमंत्रणही दिले.
***
SonalT/NilimaC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai