Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. ‘मेक इन इंडिया’ आणि आत्मनिर्भर भारत या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाची जाणीव करून देत अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस, मेरठ-लखनौ, मदुराई-बेंगळुरू आणि चेन्नई-नागरकोइल या तीन मार्गांवर संपर्क सुविधा सुधारेल. या रेल्वे गाड्यांमुळे उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये संपर्क सुविधा वाढेल.

आज हिरवा झेंडा दाखवून रवाना केलेल्या मदुराई-बेंगळुरू, चेन्नई-नागरकोइल आणि मेरठ-लखनौ या तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांमुळे उत्तर ते दक्षिण भारताच्या विकासाच्या प्रवासात एक नवीन अध्याय लिहिला जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. देशातील वंदे भारत गाड्यांचे आधुनिकीकरण आणि विस्तार करून देश विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आज रवाना केलेल्या तीन नवीन वंदे भारत रेल्वे गाड्यांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की या गाड्यांमुळे देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये तसेच ऐतिहासिक शहरांमध्ये संपर्क सुविधा स्थापित झाली आहे.  “मंदिरांचे शहर मदुराई आता आयटी सिटी बेंगळुरूशी जोडले गेले आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. या गाड्या केवळ सुलभ संपर्क सुविधा उपलब्ध करुन देणार नाहीत तर, विशेषत: शनिवार आणि रविवार किंवा सणाच्या कालावधीतही यात्रेकरूंसाठी देखील खूप फायदेशीर ठरतील, असेही ते म्हणाले. चेन्नई-नागरकोइल मार्गामुळे विद्यार्थी, शेतकरी आणि आयटी व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. वंदे भारत गाड्यांशी जोडल्या गेलेल्या पर्यटनस्थळी पर्यटनात झालेल्या वाढीची नोंद पंतप्रधानांनी घेतली. या प्रदेशातील व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींतही वाढ झाल्याचे दिसून येत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. तीन नवीन वंदे भारत रेल्वे गाड्यांद्दल पंतप्रधानांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दक्षिणेकडील राज्यांचा जलद विकास करणे अत्यावश्यक असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  “दक्षिण भारत ही अफाट प्रतिभा, स्रोत आणि संधींची भूमी आहे”, असे सांगत पंतप्रधान म्हणाले की तामिळनाडूसह संपूर्ण दक्षिण भारताच्या विकासाला सरकार प्राधान्य देत आहे. रेल्वेचा विकास हे सरकारच्या वचनबद्धतेचे उदाहरण असल्याचे ते म्हणाले. या वर्षी रेल्वे अर्थसंकल्पात तामिळनाडूसाठी 6000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद करण्यात आली आहे, जी 2014 च्या तुलनेत 7 पट जास्त आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. आज रवाना झालेल्या नव्या वंदे भारत रेल्वे गाडी नंतर तामिळनाडूमध्ये वंदे भारत गाड्यांची संख्या 8 वर गेली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  त्याचप्रमाणे, यावर्षीच्या अर्थसंकल्पात कर्नाटकसाठी 7000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आली आहे जी 2014 च्या तुलनेत 9 पट जास्त आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले. आज 8 वंदे भारत रेल्वे गाड्या कर्नाटकला जोडत आहेत, असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांनी आताच्या अर्थसंकल्पाची तुलना यापूर्वीच्या अर्थसंकल्पांशी केली. अर्थसंकल्पात झालेल्या अनेक पट वाढीमुळे तमिळनाडू आणि कर्नाटकसह दक्षिण भारतातील राज्यांमधील रेल्वे वाहतूक आणखी मजबूत झाली आहे, असे ते म्हणाले.  रेल्वे मार्गांमध्ये सुधारणा होत आहेत, रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण होत आहे, तसेच रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे लोकांच्या राहणीमानात सुधारणा झाली आहे आणि व्यवसाय सुलभीकरणाचा मार्गही उपलब्ध झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

मेरठ-लखनौ मार्गावर नवीन वंदे भारत ट्रेन सुरू केल्याबद्दल उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागातील लोकांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले. ते म्हणाले की क्रांतीची भूमी असलेल्या उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग आणि मेरठ हा भाग आज विकासाच्या नव्या क्रांतीचा साक्षीदार आहे. आरआरटीएसने मेरठला राजधानी नवी दिल्लीशी जोडण्यास मदत केली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद  केले आणि आता तर वंदे भारत सुरू झाल्याने राज्याची राजधानी लखनौ पर्यंतचे अंतरही कमी झाले आहे, असेही ते म्हणाले.  “राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) हे पंतप्रधान गतिशक्ती योजनेच्या दूरदृष्टीमुळे देशातील पायाभूत सुविधांच्या विकासासह आधुनिक रेल्वेगाड्या, एक्स्प्रेसवेचे जाळे आणि हवाई सेवांचा विस्तारासह कशा प्रकारे वाढत आहे, याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे”, असे उद्गार मोदी यावेळी म्हणाले.

वंदे भारत म्हणजे भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे नवे प्रतिक आहे”, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. प्रत्येक शहरात आणि प्रत्येक मार्गावर वंदे भारताची मागणी होत असल्याचे सांगत, अतिवेगवान रेल्वेगाड्यांच्या आगमनामुळे लोकांमध्ये त्यांचा व्यवसाय, रोजगार आणि स्वप्ने पूर्ण करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, असे त्यांनी सांगितले. “आज देशभरात 102 वंदे भारत रेल्वे सेवा सुरू आहेत आणि आतापर्यंत 3 कोटींपेक्षा जास्त लोकांनी या ट्रेनमधून प्रवास केला आहे”, अशी माहिती त्यांनी दिली. हे आकडे केवळ वंदे भारत ट्रेनच्या यशाचे उदाहरण नसून भारताच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतीक आहेत, असे ते म्हणाले.

आधुनिक रेल्वे पायाभूत सुविधा हा विकसित भारताच्या दूरदृष्टीचा मजबूत आधारस्तंभ असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या क्षेत्रात जलद गतीने होणाऱ्या प्रगतीची रूपरेषा विशद करताना पंतप्रधानांनी रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण, नवीन गाड्या चालवणे आणि नवीन मार्गांचे बांधकाम यांचा उल्लेख केला.  यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.5 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त निधीची तरतूद करण्यात आली असून, सरकारची पूर्वीची प्रतिमा बदलण्यासाठी सरकार भारतीय रेल्वेला उच्च तंत्रज्ञान सेवांशी जोडत असल्याची माहिती त्यांनी दिली. विस्तार योजनांबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की वंदे भारतसोबत अमृत भारत ट्रेनचाही विस्तार केला जात आहे. ते पुढे म्हणाले की वंदे भारतच्या स्लीपर आवृत्तीला लवकरच हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. लोकांच्या सुविधेसाठी नमो भारत ट्रेन चालवल्या जात आहेत आणि शहरांमधील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी लवकरच वंदे मेट्रोजही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

भारतीय शहरांची ओळख नेहमीच त्यांच्या रेल्वे स्थानकांवरून केली जाते, अशी नोंद पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केली. ते पुढे म्हणाले की अमृत भारत स्थानक योजनेमुळे शहरांना नवी ओळख मिळून रेल्वे स्थानकांमध्ये सुधारणा होत आहे. मोदी म्हणाले, “देशातील 1300 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण केले जात आहे आणि काही स्थानके तर विमानतळांसारखी बांधली जात आहेत.”  अगदी लहान स्थानके देखील अत्याधुनिक सुविधांसह विकसित केली जात आहेत, ज्यामुळे प्रवासातील सुलभता आणि आनंद वाढेल, असे ते म्हणाले.

जेव्हा रेल्वे, रस्ते आणि जलमार्ग यांसारख्या दळणवळणाच्या पायाभूत सुविधा मजबूत केल्या जातात, तेव्हा देश सशक्त होतो,” असे पंतप्रधान म्हणाले. यामुळे देशातील सामान्य नागरिकांना, मग तो गरीब असो किंवा मध्यमवर्गीय, त्या सर्वांना फायदा होतो, असे त्यांनी नमूद केले. देशात आधुनिक पायाभूत सुविधांची प्रगती होत असताना गरीब आणि मध्यमवर्गीय सशक्त होत आहेत, असे त्यांनी सांगितले. पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे रोजगाराच्या संधी वाढत आहेत आणि गावांमध्ये नवीन संधी पोहोचत आहेत याचे त्यांनी उदाहरण दिले. पंतप्रधान मोदींनी स्वस्त डेटा आणि डिजिटल पायाभूत सुविधांमुळे गावांमध्ये नवीन संधी निर्माण होत आहेत, असे सांगितले. “जेव्हा रुग्णालये, शौचालये आणि पक्की घरे विक्रमी संख्येने बांधली जातात, तेव्हा अगदी गरीबातला गरीब व्यक्तीही देशाच्या विकासाचा लाभ घेतो. जेव्हा महाविद्यालये, विद्यापीठे आणि उद्योग यांसारख्या पायाभूत सुविधा वाढतात, तेव्हा त्याचबरोबर युवकांची प्रगती होण्याची शक्यताही वाढते,” असे पंतप्रधानांनी सांगितले. ते म्हणाले की गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर येऊ शकले आहेत, आणि यासाठी अनेक प्रयत्नांचे योगदान आहे.

आपले भाषण संपवताना पंतप्रधान म्हणाले की रेल्वेने अनेक वर्षांपासून दशकांपूर्वीच्या प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्यासाठी कष्ट घेतले आहेत. त्यांनी मान्य केले की या दिशेने भारताला अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि भारतीय रेल्वे प्रत्येकासाठी, मग तो गरीब असो किंवा मध्यमवर्गीय, आरामदायी प्रवासाची हमी देईपर्यंत थांबणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. देशातील पायाभूत सुविधांचा विकास, गरिबी संपवण्यात मोठी भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “मी पुन्हा एकदा तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील जनतेचे तीन नवीन वंदे भारत ट्रेनसाठी अभिनंदन करतो,” असे मोदींनी आपले भाषण संपवतांना सांगितले. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांसह इतर मान्यवर या कार्यक्रमाला आभासी प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पार्श्वभूमी:

मेरठ सिटी – लखनऊ वंदे भारत रेल्वे दोन शहरांमधील सध्याच्या सर्वात जलद रेल्वेगाडीच्या तुलनेत प्रवाशांचा एक तास वाचवेल. त्याचप्रमाणे, चेन्नई एग्मोर – नागरकोईल वंदे भारत आणि मदुराई – बेंगळुरू वंदे भारत रेल्वे अनुक्रमे दोन तास आणि सुमारे एक तास 30 मिनिटे वाचवतील. या नवीन वंदे भारत रेल्वेगाड्या या भागातील लोकांना वेग आणि आरामासह जागतिक दर्जाची प्रवासी साधने प्रदान करतील आणि उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांची सेवा करतील. या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्या नियमित प्रवासी, व्यावसायिक, व्यावसायिक समुदाय आणि विद्यार्थ्यांच्या गरजा भागविण्यासाठी नवीन मानदंड प्रस्थापित करतील.

***

M.Pange/S.Mukhedkar/S.Patgaonkar/G.Deoda/P.Kor

O

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com