नवी दिल्ली , 20 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे , ‘लोकशाहीसाठी शिखर परिषदे’ला संबोधित केले. जगभरातल्या लोकशाही राष्ट्रांना आपापल्या अनुभवांचे आदानप्रदान करण्यासाठी आणि परस्परांकडून शिकण्यासाठी, ही शिखर परिषद अतिशय महत्वाचे व्यासपीठ आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारतात खोलवर रुजलेल्या लोकशाहीच्या प्रतिबद्धतेला त्यांनी अधोरेखित केले. “भारतात लोकशाहीची प्राचीन आणि अखंड परंपरा आहे. लोकशाही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे.” असे सांगत, ते पुढे म्हणाले, “एखाद्या विषयावर सर्वसहमती निर्माण करणे, मुक्त संवाद, आणि मुक्त चर्चा, भारताच्या इतिहासात सदैव प्रतिबिंबित झाल्या आहेत. आणि म्हणूनच, आम्ही सगळे नागरिक, भारताला ‘लोकशाहीची जननी’ असे म्हणतो.”
आज भारत केवळ 140 कोटी लोकांच्या आशा आकांक्षाच पूर्ण करत नाही, तर, संपूर्ण जगाला एक आशा ही दाखवत आहे, की लोकशाहीतही कार्यसिद्धी होते, लोकशाही लोकांना सक्षम करते.” त्यांनी जागतिक लोकशाहीत भारताचे योगदान दाखवणारी उदाहरणे आपल्या भाषणात सांगितली. यात, महिला लोकप्रतिनिधीत्व वाढवण्यासाठी केलेल्या कायदेशीर तरतुदी, दारिद्र्य निर्मूलनाचे प्रयत्न आणि कोविड महामारीच्या काळात केलेल्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा उल्लेख त्यांनी केला.
जगभरातील लोकशाही देशांना भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी लोकशाही राष्ट्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले. आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि संस्थांमध्ये सर्वसमावेशकता, निष्पक्षता आणि सहभागात्मक निर्णयप्रक्रिया असावी, यावर त्यांनी भर दिला.
“आजच्या अस्थिर, अशांत आणि संक्रमणाच्या युगात लोकशाहीला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. यासाठी आपण एकत्र काम करणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. “आणि या प्रयत्नात, भारत सर्व सहकारी लोकशाही देशांशी आपल्या अनुभवांची देवघेव करण्यास सदैव तयार आहे” असं पंतप्रधान म्हणाले.
Sharing my remarks at the Summit for Democracy.https://t.co/sM3SWEArT5
— Narendra Modi (@narendramodi) March 20, 2024
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai