नवी दिल्ली, 7 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे विकसित भारत, विकसित जम्मू काश्मीर कार्यक्रमाला संबोधित केले. त्यांनी 5000 कोटी रुपये खर्चाच्या समग्र कृषी विकास कार्यक्रमाचे राष्ट्रार्पण केले आणि स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनांतर्गत पर्यटनाशी संबंधित 1400 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ केला. यामध्ये श्रीनगर येथील हझरतबाल दर्ग्याच्या एकात्मिक विकासाचा देखील समावेश आहे. पंतप्रधानांनी ‘देखो अपना देश पीपल्स चॉईस 2024’ आणि ‘ चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा कॅम्पेन’ चा शुभारंभ केला आणि आव्हानात्मक स्थळांच्या विकासांतर्गत निवडलेल्या पर्यटन स्थळांची घोषणा केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये निवड झालेल्या 1000 नवनियुक्तांना नियुक्ती आदेश वितरित केले आणि कर्तबगार महिला, लखपती दीदी, शेतकरी, उद्योजक इ. सह विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांसोबतही संवाद साधला.
यावेळी पुलवामा येथील नझीम नझीर या मधुमक्षिकापालकाने कशा प्रकारे सरकारी योजनांचा लाभ घेऊन आपण प्रगती केली त्याची माहिती पंतप्रधानांना दिली. 50 टक्के अनुदानाने या मधुमक्षिकापालकाने 25 पेट्या खरेदी केल्या आणि आपल्या व्यवसायाचा विस्तार केला असे सांगितले. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत नझीर यांनी 5 लाख रुपयांचे कर्ज घेऊन मधुमक्षिकापालनासाठी हळूहळू आपल्या व्यवसायाची व्याप्ती 200 पेट्यांपर्यंत वाढवली. त्यांनी आपला स्वतःचा एक ब्रँड निर्माण केला आणि एक वेबसाईट तयार केली. ज्यामुळे त्यांना देशभरातून त्यांच्या मधासाठी सुमारे 5000 किलोच्या हजारो मागण्या आल्या. त्यामुळे त्यांचा व्यवसाय 2000 मधुमक्षिका पेट्यांपर्यंत वाढला आणि त्यांनी या भागातील 100 युवांना देखील रोजगार दिला. 2023 मध्ये एफपीओ मिळाल्याची आणि त्यामुळे व्यवसायाला आणखी जास्त फायदा झाल्याची माहिती देखील त्यांनी पंतप्रधानांना दिली. देशातील फिनटेक परिदृश्याचा कायापालट करणारा डिजिटल इंडिया उपक्रम सुरू केल्याबद्दलही त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. पंतप्रधानांनी नझीम यांनी केलेल्या परिश्रमांची आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये मधुर क्रांतीचे नेतृत्व करत असल्याबद्दल प्रशंसा केली आणि त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले. यावेळी पंतप्रधानांनी त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्रारंभिक पाठबळाविषयी त्यांच्याकडे विचारणा केली. त्यावर नझीम यांनी सांगितले की सुरुवातील जरी त्यांना काही समस्यांना तोंड द्यावे लागले असले तरी कृषी विभागाने पुढाकार घेतला आणि आपल्याला पाठबळ दिले. मधुमक्षिकापालन हे बऱ्यापैकी नवीन क्षेत्र असल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी त्याचे फायदे अधोरेखित केले. मधमाश्या या एका प्रकारे शेतमजुरांप्रमाणे काम करत असतात आणि पिकांना लाभ देत असतात, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी मधमाश्या फायदेशीर असल्याने अनेक जमीनधारक कोणत्याही मोबदल्याविना मधुमक्षिकापालनासाठी जमीन देण्यासाठी तयार असतात, असे नझीम म्हणाले. पंतप्रधानांनी त्यांना हिंदुकुश पर्वतक्षेत्रात मध्य आशियामध्ये उत्पादन होणाऱ्या मधाविषयी संशोधन करण्याची सूचना केली आणि त्यांच्या पेट्यांच्या शेजारी विशिष्ट फुलांची लागवड करून मधाची नवी चव विकसित करण्याचा प्रयत्न करावा, कारण अशा मधाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे, असे सांगितले. त्यांनी अशाच प्रकारच्या उत्तराखंडमधील यशस्वी प्रयत्नांचा देखील यावेळी उल्लेख केला. जगभरातून मोठ्या प्रमाणावर असलेल्या मागणीमुळे अकॅशिया मधाचे दर 400 रुपये/किलो वरून 1000 रुपये/किलोवर पोहोचल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
नझीम यांनी त्यांचा व्यवसाय करताना दाखवलेले धैर्य, त्यांचे विचार आणि दृष्टीकोन यांची प्रशंसा केली आणि त्यांच्या पालकांचे देखील अभिनंदन केले. नझीम हे भारताच्या युवा वर्गाला एक दिशा दाखवत आहेत आणि त्यांच्यासाठी प्रेरणास्थान बनत आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले.
श्रीनगरमध्ये बेकरी उद्योजक असलेल्या एहतेशाम माजीद भट या महिलेने अन्न तंत्रज्ञान कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून बेकरीमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन आणले आहे. त्यांना सरकारच्या महिला कौशल्य विकास तंत्रनिकेतनातील इनक्युबेशन सेंटरकडून पाठबळ मिळाले. सरकारच्या एक खिडकी योजनेची त्यांना आणि त्यांच्या टीमला विविध विभागातून सर्व एनओसी मिळवण्यात मदत मिळाली. गेल्या 10 वर्षात सरकार कोट्यवधी युवांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी संपूर्ण पाठबळ देत असल्याचे पंतप्रधानांनी त्यांना सांगितले. आपल्या उद्यमशीलतेच्या उपक्रमामध्ये विविध जिल्ह्यात राहणाऱ्या आपल्या मैत्रिणींना देखील यामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी एहतेशाम यांची प्रशंसा केली. “ युवा वर्गाच्या संकल्पना आणि स्वप्नांच्या पूर्ततेमध्ये संसाधने आणि अर्थसाहाय्य यांच्या कमतरतेचा अडसर येऊ नये. त्यांनी आत्मविश्वासाने वाटचाल करावी, हाच आमचा प्रयत्न आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
जम्मू कश्मिरच्या या कन्या देशभरातील युवावर्गासाठी नवी प्रेरणादायी उदाहरणे निर्माण करत आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले. वंचित मुलींची काळजी घेत असल्याबद्दल त्यांनी या मुलींची प्रशंसा केली.
गांदरबल इथली हमिदा बानू दुग्ध उत्पादने व्यवसायात आहे. नॅशनल रूरल लाइवलीहूड मिशन अर्थात राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाचा लाभ घेत दूध उत्पादनांच्या निर्मितीचा व्यवसाय सुरू केल्याचे तिने पंतप्रधानांना सांगितले. इतर महिलांना रोजगार देणे शक्य झाल्याचे सांगून उत्पादनाचा दर्जा राखणे, वेष्टन बांधणी आणि जाहिरातीसाठी केलेल्या योजनांचीही तिने यावेळी माहिती दिली. दूध उत्पादनांमध्ये संरक्षके घालत नसल्याचेही तिने स्पष्ट केले. पोषणासाठी योग्य उत्पादनाच्या निर्मितीत उतरल्याबद्दल आणि दर्जा राखून व्यवसाय करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी तिचे कौतुक केले.
पृथ्वीवरील स्वर्गात येण्याचा आनंद शब्दांत वर्णन करता येणार नाही असे सांगून “अद्वितीय असा निसर्ग, हवा, खोरे, पर्यावरण आणि त्याला कश्मिरी बंधुभगिनींच्या प्रेमाची जोड” इथे मिळाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमाला 285 विभागांमधून दूरदृश्य माध्यमातून एक लाखापेक्षा अधिक लोक उपस्थित असल्याची दखल त्यांनी घेतली. दशकानुदशके प्रतीक्षेत राहिलेला, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी ज्यासाठी त्याग केला तो नवा जम्मू-कश्मिर साकारल्याचे पंतप्रधान म्हणाले. इथल्या जनतेच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून 140 कोटी नागरिकांना शांत वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
जम्मू आणि काश्मीरच्या जनतेच्या प्रेमाप्रति कृतज्ञता व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, “या प्रेमाची परतफेड करण्यामध्ये मोदी कोणतीही कसर बाकी ठेवणार नाहीत. तुमची मने जिंकण्यासाठी मी हे परिश्रम करत आहे आणि मी योग्य मार्गावर चालत असल्याची माझी खात्री आहे. तुमची मने जिंकण्याचे प्रयत्न मी सुरूच ठेवेन. ही मोदींची गॅरंटी आहे. आणि तुम्हा सर्वांना माहीतच आहे की मोदींची गॅरंटी म्हणजे आश्वासनांच्या पूर्ततेची हमी.”
आपल्या जम्मू दौऱ्याचा उल्लेख करून पंतप्रधानांनी 32,000 कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा आणि शिक्षणविषयक प्रकल्प सुरू केल्याचे सांगितले. आजचे प्रकल्प पर्यटन विकास, शेतीविषयक प्रकल्पांशी निगडित होते तसेच उमेदवारांना नियुक्ती पत्रे देखील वितरित केल्याचे ते म्हणाले. विकास, पर्यटनाच्या क्षमता, शेतकऱ्यांच्या क्षमता आणि युवांची नेतृत्वक्षमता विकसित जम्मू कश्मिरचा मार्ग सुकर करेल असे पंतप्रधानांनी सांगितले. जम्मू कश्मिर हा देशाचा निव्वळ एक भाग नसून देशाचे हे मस्तक आहे, ते उंचावलेले असणे हे विकास आणि आदराचे चिन्ह आहे, त्यामुळे विकसित जम्मू कश्मिर हा विकसित भारताच्या प्राधान्यक्रमावर आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
देशातील कायदे जम्मू कश्मिरसाठी असलेल्या कायद्यांपेक्षा वेगळे असलेल्या काळाची आठवण करून देत पंतप्रधानांनी त्या काळात वंचितांपर्यंत कल्याणकारी योजना पोहोचत नव्हत्या, असे सांगितले. वर्तमानात मात्र श्रीनगर आणि जम्मू कश्मिरमधून देशातील पर्यटनविकासाच्या योजनांची सुरुवात होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशातील 50 पेक्षा जास्त ठिकाणांहून लोक कार्यक्रमात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. स्वदेश दर्शन योजनेचा भाग म्हणून सहा प्रकल्पांचे लोकार्पण आज झाल्याचे ते म्हणाले. देशातील शहरांसाठी सुमारे 30 प्रकल्पांची सुरुवात झाली असून श्रीनगरसाठी तीन प्रकल्प आहेत आणि प्रसाद योजनेअंतर्गत अन्य 14 प्रकल्पांना सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. पवित्र हजरतबल दर्ग्यात लोकांच्या सोयीसुविधेसाठी हाती घेतलेली विकासकामे पूर्ण झाल्याचे ते म्हणाले. ‘देखो अपना देश पीपल्स चॉईस ’अभियानासाठी सरकारने येत्या दोन वर्षांमध्ये पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्यासाठी 40 ठिकाणांची निवड केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. अभियानांतर्गत जनतेचा कौल लक्षात घेऊन सर्वाधिक पसंतीच्या पर्यटनस्थळांचा विकास करणार असल्याचे ते म्हणाले. परदेशस्थ भारतीय नागरिकांना भारतात येण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता असलेल्या ‘चलो इंडिया’ अभियानाचा त्यांनी उल्लेख केला.
जम्मू कश्मिरमध्ये आज सुरू झालेल्या विकासकामांबद्दल पंतप्रधानांनी तिथल्या जनतेचे अभिनंदन केले. या प्रकल्पांमुळे पर्यटन उद्योगाच्या विकासामार्फत प्रदेशाचा विकास आणि रोजगाराच्या नव्या संधींची निर्मिती शक्य होईल, असे ते म्हणाले.
हेतू महान आणि ध्येयपूर्तीची जिद्द असते तेव्हा ते निकालामध्ये प्रतिबिंबित होते, असे म्हणून पंतप्रधानांनी जी20 शिखर परिषदेचे यजमानपद जम्मू कश्मिरने यशस्वीरित्या सांभाळल्याचा उल्लेख केला.
आमूलाग्र बदल घडवणारी वाढ पर्यटनात झाल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, “एक काळ होता जेव्हा लोकांना प्रश्न पडत असे की जम्मू कश्मिरला पर्यटनासाठी जाणार कोण; आज जम्मू कश्मिरने पर्यटनाचे सर्व विक्रम मोडले आहेत.” पंतप्रधानांनी पुढे सांगितले, “फक्त 2023 या वर्षात जम्मू कश्मिरमध्ये दोन कोटींपेक्षा जास्त, विक्रमी संख्येने पर्यटक आले. गेल्या दहा वर्षांत अमरनाथ यात्रेकरूंची संख्या सर्वोच्च ठरली आहे; तर वैष्णोदेवीला जाणाऱ्यांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.” परदेशी पर्यटकांचे प्रमाणही वाढले असून आंतरराष्ट्रीय पाहुणे, चंदेरी दुनियेतील व्यक्तींसाठीही जम्मू कश्मिर आकर्षण ठरत असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, “ही मंडळी जम्मू कश्मिरला भेट देतात, विडिओ आणि रील्स तयार करतात”.
कृषी क्षेत्राकडे रोख वळवत पंतप्रधान मोदी यांनी जम्मू-काश्मीर मधील केशर, सफरचंदे, सुकवलेली फळे आणि चेरी अशा कृषी उत्पादनांच्या सामर्थ्यावर अधिक भर देऊन या भागाचे महत्त्वाचे कृषी केंद्र म्हणून ब्रँडिंग करण्यावर भर दिला.ते म्हणाले की 5,000 कोटी रुपयांचा कृषी विकास कार्यक्रम येत्या 5 वर्षांच्या काळात जम्मू काश्मीर मधील कृषी क्षेत्राचा, विशेषतः फलोत्पादन आणि पशुधन विकास क्षेत्राचा अभूतपूर्व विकास घडवून आणेल. “हा उपक्रम फलोत्पादन आणि पशुपालन या क्षेत्रांमध्ये हजारो नव्या संधी निर्माण करेल,” असे ते म्हणाले.
याखेरीज, जम्मू आणि काश्मीर मधील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून सुमारे 3,000 कोटी रुपयांचे थेट लाभ हस्तांतरण झाले आहे याचा उल्लेख त्यांनी केला. फळे तसेच भाजीपाला यांची साठवण क्षमता सुधारणे तसेच त्यांचे अधिक काळ जतन होईल याची सुनिश्चिती करणे या उद्देशाने जम्मू आणि काश्मीर मधील साठवण सुविधा वाढवण्यासाठी लक्षणीय प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. ‘जगातील सर्वात मोठ्या गोदामांच्या उभारणी योजने’ची सुरुवात झाल्यावर त्यातून जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक गोदामे बांधण्यात येतील याकडे देखील पंतप्रधानांनी सर्वांचे लक्ष वेधले.
जम्मू आणि काश्मीरमधील विकासाची जलदगती लक्षात घेत पंतप्रधानांनी सांगितले की या भागात 2 एम्स उभारले जात आहेत याचा उल्लेख केला, यापैकी एम्स जम्मूचे उद्घाटन यापूर्वीच झाले असून एम्स काश्मीर या संस्थेच्या उभारणीचे कार्य प्रगतीपथावर आहे अशी माहिती त्यांनी दिली. या भागात सुरु करण्यात आलेली 7 नवी वैद्यकीय महाविद्यालये, 2 कर्करोग रुग्णालये तसेच आयआयटी आणि आयआयएम यांसारख्या संस्थांचा देखील त्यांनी उल्लेख केला.जम्मू आणि काश्मीर मध्ये 2 वंदे भारत गाड्यांची सेवा सुरु झाली असून श्रीनगर ते संगल्दन आणि संगल्दन ते बारामुला या मार्गावर या गाड्या धावत आहेत अशी माहिती त्यांनी दिली. संपर्क सुविधेच्या या विस्ताराने या भागातील आर्थिक व्यवहारांना चालना दिली आहे.जम्मू आणि श्रीनगर या शहरांना स्मार्ट शहरे बनवण्यासाठीच्या नव्या प्रकल्पांचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले, “येत्या काळात, जम्मू आणि काश्मीरची यशोगाथा संपूर्ण देशासाठी एक आदर्श उदाहरण ठरेल.”
मन की बात या कार्यक्रमात या भागातील हस्तकला आणि स्वच्छता यांच्या केलेल्या उल्लेखाचे स्मरण करून पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरचा कमळाशी असलेला संबंध अधोरेखित केला.
प्रत्येक क्षेत्रात जम्मू काश्मीरमधील युवकांचा विकास घडवण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा ठळक उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले कौशल्य विकासापासून क्रीडा क्षेत्रापर्यंत प्रत्येक ठिकाणी नव्या संधी निर्माण करण्यात येत आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उभारण्यात येत असलेल्या आधुनिक क्रीडा सुविधांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. या भागातील 17 जिल्ह्यांमध्ये बहुउद्देशीय इनडोअर क्रीडा सभागृहांचे उदाहरण देत ते म्हणाले की जम्मू काश्मीर मध्ये आता राष्ट्रीय पातळीवरील अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन होते. “आता देशातील हिवाळी क्रीडा स्पर्धांची राजधानी म्हणून जम्मू आणि काश्मीर उदयाला येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया हिवाळी स्पर्धांमध्ये सुमारे एक हजार खेळाडू सहभागी झाले होते,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
370 वे कलम रद्द झाल्यामुळे युवकांच्या प्रतिभेचा आदर होत असून येथील प्रत्येकाला समान हक्क आणि समान संधी प्राप्त होत आहेत याची नोंद घेऊन पंतप्रधान म्हणाले, “जम्मू आणि काश्मीर आज मोकळा श्वास घेत आहे आणि म्हणून नव्या उंचीवर पोहोचत आहे.” पाकिस्तानातून येणारे निर्वासित, वाल्मिकी समुदाय तसेच स्वच्छता कामगार यांना मिळालेला मतदानाचा हक्क, वाल्मिकी समुदायाला अनुसूचित जाती श्रेणीत सामावून घेण्याच्या मागणीची पूर्तता, अनुसूचित जमाती, पद्दारी जमातीमधील उमेदवारांसाठी विधानसभेत राखीव जागा आणि पद्दारी जमात,पहाडी वांशिक गट, गडा ब्राह्मण तसेच कोळी समुदायाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश इत्यादी विषयांवर त्यांनी मते व्यक्त केली. जम्मू आणि काश्मीरमधील घराणेशाहीच्या राजकारणाने इतर मागासवर्गीयांना पंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्यामध्ये सरकारने दिलेल्या आरक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले. “आज प्रत्येक वर्गाला त्याचे हक्क पुन्हा प्रदान केले जात आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.
जम्मू आणि काश्मीर बँकेमध्ये घडून आलेल्या परिवर्तनाबाबत बोलताना पंतप्रधानांना भूतळातील गैरव्यवस्थापनाची आठवण आली. ही बँक घराणेशाहीचे राजकारण आणि भ्रष्टाचार यांचा बळी ठरली असे ते म्हणाले. बँकेचा कारभार पूर्ववत करण्यासाठी हाती घेतलेल्या सुधारणांची यादी सादर करून पंतप्रधानांनी बँकेला 1000 कोटी रुपयांची दिलेली मदत आणि चुकीच्या नियुक्त्यांविरुद्ध केलेली कारवाई यांचा उल्लेख केला. भ्रष्टाचार नियंत्रण विभाग अजूनही अशा हजारो नियुक्त्यांची चौकशी करत आहे असे त्यांनी सांगितले. गेल्या 5 वर्षांच्या काळात बँकेत पारदर्शक पद्धतीने झालेल्या भर्तीबाबत त्यांनी माहिती दिली. परिणामी, जम्मू आणि काश्मीर बँकेचा नफा 1700 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून 5 वर्षांपूर्वी केवळ 1.25 लाख कोटी रुपये असलेला या बँकेचा व्यवसाय आता 2.25 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेतील ठेवी देखील 80,000कोटी रुपयांवरुन 1.25 लाख कोटी रुपये झाल्या आहेत. बँकेचा एनपीए देखील 5 वर्षांपूर्वी 11 टक्क्याहून अधिक होता त्याला 5 टक्क्याखाली आणण्यात यश आले आहे. बँकेच्या समभागाची किंमत देखील 5 वर्षांपूर्वी 12 रुपये होती त्यात 12 पट वाढ होऊन आता ती 140 रुपये झाली आहे. “जेव्हा सत्तेत प्रामाणिक सरकार असते आणि लोकांचे कल्याण हाच या सरकारचा उद्देश असतो, तेव्हा लोकांना प्रत्येक अडचणीतून बाहेर काढता येते,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जम्मू आणि काश्मीर हा भाग घराणेशाहीच्या राजकारणाचा सर्वात मोठा बळी ठरला आहे याकडे निर्देश करत पंतप्रधानांनी लोकांना आश्वस्त केले की जम्मू आणि काश्मीर मधील विकास अभियान कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही आणि येत्या 5 वर्षांत हा भाग आणखी वेगाने विकसित होईल.
संपूर्ण देशाला रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी त्यांचे भाषण संपवले. “रमादानच्या या महिन्याकडून प्रत्येकाला शांतता आणि एकोपा यांचा संदेश मिळो हीच सदिच्छा. उद्या महाशिवरात्रीचा सण आहे, मी प्रत्येकाला या पवित्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो,” असे सांगत त्यांनी भाषणाचा समारोप केला.
यावेळी जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह उपस्थित होते.
पार्श्वभूमी
जम्मू आणि काश्मीरच्या कृषी-अर्थव्यवस्थेला मोठी चालना देणारे एक पाऊल म्हणून पंतप्रधानांनी ‘समग्र कृषी विकास कार्यक्रम’ राष्ट्राला समर्पित केला. ‘समग्र कृषी विकास कार्यक्रम’ हा जम्मू आणि काश्मीरमधील फलोत्पादन, कृषी आणि पशुपालन या कृषी-अर्थव्यवस्थेच्या तीन प्रमुख क्षेत्रांमधील उपक्रमांच्या संपूर्ण श्रेणीचा समावेश असलेला एकात्मिक कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम एका समर्पित ‘दक्ष किसान पोर्टलद्वारे’ सुमारे 2.5 लाख शेतकऱ्यांचा कौशल्य विकास घडवून त्यांना सक्षम बनवेल. या कार्यक्रमांतर्गत, सुमारे 2000 किसान खिदमत घरांची स्थापना केली जाईल आणि शेतकरी समुदायाच्या कल्याणासाठी मजबूत मूल्य साखळी तयार केली जाईल. या कार्यक्रमातून होणाऱ्या रोजगार निर्मितीचा फायदा जम्मू आणि काश्मीरमधील लाखो अल्पभूधारक कुटुंबांना होईल.
पर्यटन स्थळांवर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि सोयी निर्माण करून देशभरातील प्रमुख तीर्थक्षेत्रे तसेच पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटक आणि यात्रेकरूंचा पर्यटनाचा अनुभव सुखद बनवणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ध्येय आहे. या अनुषंगाने, पंतप्रधानांनी स्वदेश दर्शन आणि प्रसाद या 1400 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या योजनांतर्गत अनेक उपक्रमांचा प्रारंभ आणि लोकार्पण केले. पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलेल्या प्रकल्पांमध्ये, जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील ‘हजरतबल दर्ग्याचा एकात्मिक विकास’; मेघालयातील ईशान्य सर्किटमध्ये पर्यटन सुविधांचा विकास; बिहार आणि राजस्थान मध्ये आध्यात्मिक सर्किटचा विकास; बिहारमधील ग्रामीण आणि तीर्थंकर सर्किटचा विकास; तेलंगणाच्या जोगुलांबा गडवाल जिल्ह्यातील जोगुलांबा देवी मंदिराचा विकास आणि मध्य प्रदेशातील अन्नुपूर जिल्ह्यातील अमरकंटक मंदिराचा विकास यांचा समावेश आहे.
हजरतबल दर्ग्याला भेट देणारे यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि सोयी निर्माण करण्यासाठी तसेच त्यांचा सर्वांगीण आध्यात्मिक अनुभव वाढवण्यासाठी, ‘हजरतबल दर्ग्याचा एकात्मिक विकास’ हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या मुख्य विकास घटकांमध्ये दर्ग्याच्या तटबंदीच्या बांधकामासह संपूर्ण क्षेत्राचा विकास; हजरतबल दर्गा परिसरात रोषणाई; दर्ग्याच्या सभोवतालचे घाट आणि देवरी मार्गांची सुधारणा; सुफी निरुपण केंद्राचे बांधकाम; पर्यटन सुविधा केंद्राचे बांधकाम; मार्गदर्शक चिन्हांची स्थापना; बहुमजली कार पार्किंग; सार्वजनिक सुविधा ब्लॉक आणि दर्ग्याच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम यांचा समावेश आहे
पंतप्रधानांनी देशभरातील तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांची विस्तृत श्रेणी विकसित करणाऱ्या सुमारे 43 प्रकल्पांचा देखील शुभारंभ केला. यामध्ये, आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील अन्नावरम मंदिर, तमिळनाडूच्या तंजावर आणि मायिलादुथुराई जिल्ह्यातील तसेच पुद्दुचेरीच्या कराईकल जिल्ह्यातील नवग्रह मंदिरे; कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील श्री चामुंडेश्वरी देवी मंदिर; राजस्थानातील बिकानेर जिल्ह्यातील करणी माता मंदिर; हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील माँ चिंतपूर्णी मंदिर; गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जीझस चर्च, यांच्यासह इतर अनेक महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. याशिवाय या प्रकल्पांमध्ये अरुणाचल प्रदेशातील मेचुका ॲडव्हेंचर पार्क; उत्तराखंड मधील पिथौरागड, गुंजी येथील ग्रामीण पर्यटनाची अनुभती देणाऱ्या क्लस्टरचा विकास; तेलंगणामधील अननाथगिरी येथील अनंतगिरी जंगलात इकोटूरिझम झोनचा विकास; मेघालय मधील सोहरा येथील मेघालय आदिमानवच्या गुहेचा आणि धबधब्याचा अनुभव; आसाममधील जोरहाट येथील सिन्नमारा टी इस्टेटची पुनर्कल्पना; पंजाबमधील कपूरथला येथील कांजली वेटलँड येथे पर्यावरण पर्यटनाचा अनुभव अनुभव; लेहमधील जुली लेह जैवविविधता पार्क, यासारख्या इतर विविध स्थळांचा आणि अनुभव केंद्रांचाही समावेश आहे.
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी आव्हानात्मक स्थळांच्या विकासाच्या योजनेंतर्गत निवडलेल्या 42 पर्यटन स्थळांची घोषणा केली. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये घोषित केलेल्या या नाविन्यपूर्ण योजनेचा उद्देश पर्यटन स्थळांच्या विकासाला चालना देऊन पर्यटन अनुभव प्रदान करणे आणि शाश्वततेला प्रोत्साहन देणे आणि पर्यटन क्षेत्रात स्पर्धात्मकता वाढवणे हे आहे. ही 42 पर्यटन स्थळे चार श्रेणींमध्ये विभाजित केली गेली आहेत. त्य श्रेणी पुढील प्रमाणे आहेत – 16 संस्कृती आणि वारसा पर्यटन स्थळे, 11 अध्यात्मिक पर्यटन स्थळे, 10 पर्यावरण पर्यटन आणि अमृत धरोहर आणि 5 व्हायब्रंट व्हिलेज.
पर्यटन क्षेत्रात देशाची नाडी ओळखण्यासाठी, पंतप्रधानांनी ‘देखो अपना देश पीपल्स चॉईस 2024’ च्या रूपात पहिला देशव्यापी उपक्रम सुरू केला. अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वारसा, निसर्ग आणि वन्यजीव, साहस आणि इतर यासारख्या 5 पर्यटन श्रेणींमध्ये सर्वाधिक पसंतीची पर्यटन स्थळे ओळखण्यासाठी आणि पर्यटकांच्या धारणा समजून घेण्यासाठी नागरिकांशी संवाद साधणे हे या राष्ट्रव्यापी मतदानाचे उद्दिष्ट आहे. चार मुख्य श्रेण्यांव्यतिरिक्त, ‘इतर’ श्रेणी अशी आहे जिथे एखादी व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडींसाठी मतदान करू शकते आणि अप्रत्याशित पर्यटन आकर्षणे आणि व्हायब्रंट बॉर्डर व्हिलेज, तंदुरुस्ती पर्यटन स्थळ, विवाह पर्यटन स्थळ, इत्यादी स्थळांच्या रूपात लपलेले मोहक पर्यटन स्थळ प्रकाशात आणण्यास मदत करू शकते. हे मतदान भारत सरकारचे नागरिक प्रतिबद्धता पोर्टल MyGov प्लॅटफॉर्मवरून केले जाऊ शकते.
अनिवासी भारतीयांना अतुल्य भारताचे राजदूत बनवण्यासाठी आणि भारतातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधानांनी ‘चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा मोहीमेचा’ प्रारंभ केला. ही मोहीम पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार सुरू केली जात आहे. प्रत्येक अनिवासी भारतीयांनी किमान 5 अभारतीय मित्रांना भारतात प्रवास करण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन पंतप्रधानांनी या समुदायाला केले आहे. 3 कोटींहून अधिक अनिवासी भारतीय सांस्कृतिक राजदूत बनून भारतीय पर्यटनासाठी एक शक्तिशाली उत्प्रेरक म्हणून काम करू शकतात.
Elated to be amongst the wonderful people of Srinagar. Numerous projects are being dedicated today which will boost development of Jammu and Kashmir.https://t.co/40hkb6QuFe
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024
विकास की शक्ति…
पर्यटन की संभावनाएं…
किसानों का सामर्थ्य…
और जम्मू-कश्मीर के युवाओं का नेतृत्व…
विकसित जम्मू-कश्मीर के निर्माण का रास्ता यहीं से निकेलगा: PM @narendramodi pic.twitter.com/rZLjfOTqM8
— PMO India (@PMOIndia) March 7, 2024
जम्मू-कश्मीर भारत का मस्तक है: PM @narendramodi pic.twitter.com/2QkRBBzNDx
— PMO India (@PMOIndia) March 7, 2024
जम्मू-कश्मीर अपने आप में ही इतना बड़ा ब्रांड है। pic.twitter.com/0oZmfVhtE4
— PMO India (@PMOIndia) March 7, 2024
आज जम्मू-कश्मीर विकास की नई ऊंचाइयों को छू रहा है, क्योंकि जम्मू-कश्मीर आज खुलकर सांस ले रहा है। pic.twitter.com/BVwiAApRy4
— PMO India (@PMOIndia) March 7, 2024
* * *
S.Kane/Shailesh P/Reshma/Sanjana/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Elated to be amongst the wonderful people of Srinagar. Numerous projects are being dedicated today which will boost development of Jammu and Kashmir.https://t.co/40hkb6QuFe
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024
विकास की शक्ति...
— PMO India (@PMOIndia) March 7, 2024
पर्यटन की संभावनाएं...
किसानों का सामर्थ्य...
और जम्मू-कश्मीर के युवाओं का नेतृत्व...
विकसित जम्मू-कश्मीर के निर्माण का रास्ता यहीं से निकेलगा: PM @narendramodi pic.twitter.com/rZLjfOTqM8
जम्मू-कश्मीर भारत का मस्तक है: PM @narendramodi pic.twitter.com/2QkRBBzNDx
— PMO India (@PMOIndia) March 7, 2024
जम्मू-कश्मीर अपने आप में ही इतना बड़ा ब्रांड है। pic.twitter.com/0oZmfVhtE4
— PMO India (@PMOIndia) March 7, 2024
आज जम्मू-कश्मीर विकास की नई ऊंचाइयों को छू रहा है, क्योंकि जम्मू-कश्मीर आज खुलकर सांस ले रहा है। pic.twitter.com/BVwiAApRy4
— PMO India (@PMOIndia) March 7, 2024
जम्मू-कश्मीर में पुलवामा के नाजिम नजीर जी ने मधुमक्खी पालन के क्षेत्र में जो कमाल किया है, वो हर किसी के लिए एक मिसाल है। pic.twitter.com/Laxq36zGz9
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024
जम्मू-कश्मीर में आए बदलाव यहां के हमारे युवाओं के स्टार्ट-अप को फलने-फूलने में मददगार बन रहे हैं। श्रीनगर की एहतिसाम मसीद भट्टी जी का स्टार्ट-अप इसका एक बड़ा उदाहरण है। pic.twitter.com/DaxpCvUIdP
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024
विकसित जम्मू-कश्मीर, विकसित भारत की प्राथमिकता है। pic.twitter.com/SxY9vtzVMy
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024
आज शुरू हुए दो अभियानों से जम्मू-कश्मीर सहित देशभर के पर्यटन को बहुत बढ़ावा मिलने वाला है। मेरा एक नया मिशन भी है, वेड इन इंडिया- शादी हिंदुस्तान में करो। pic.twitter.com/z1ztikqi9e
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024
जम्मू-कश्मीर के बारे में कभी कहा जाता था कि वहां पर्यटन के लिए कौन जाएगा, लेकिन वहीं आज टूरिज्म के सारे रिकॉर्ड टूट रहे हैं। pic.twitter.com/956hrUwoph
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024
हमारे कृषि विकास कार्यक्रम से कृषि के क्षेत्र में भी जम्मू-कश्मीर की पहचान और मजबूत होगी। इसके साथ ही यहां के हमारे किसान भाई-बहनों का जीवन भी आसान बनेगा। pic.twitter.com/ICMqdF5Ow4
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024
मेडिकल इंफ्रास्ट्रक्चर हो या फिर कनेक्टिविटी, आने वाले समय में हर क्षेत्र में जम्मू-कश्मीर की सक्सेस स्टोरी दुनियाभर के लिए एक मिसाल बनेगी। pic.twitter.com/pjcvqkbsy4
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024
जम्मू-कश्मीर इसलिए विकास की नई ऊंचाइयों को छू रहा है, क्योंकि ये पूरा क्षेत्र आज खुलकर सांस ले रहा है। बन्दिशों से ये आजादी आर्टिकल 370 हटने के बाद आई है। pic.twitter.com/nrhbBqTRzC
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024
जब ईमानदार सरकार होती है, नीयत भलाई की होती है, तो हर मुश्किल से जनता को कैसे निकाला जा सकता है। इसका एक बड़ा उदाहरण… pic.twitter.com/Gpiksl2TBV
— Narendra Modi (@narendramodi) March 7, 2024