Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अयोध्येत श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

अयोध्येत श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


सियावर रामचंद्र की जय।
सियावर रामचंद्र की जय।

श्रद्धेय मंच, संत आणि ऋषिगण, इथे उपस्थित आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या सर्वांसोबत जोडले गेलेले रामभक्त, आपल्या सर्वांना प्रणाम, सर्वांना राम राम.
आज आपले राम आले आहेत, शतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले आहेत, शतकांचे अभूतपूर्व धैर्य, अगणित बलिदाने, त्याग आणि तपस्येनंतर आपले प्रभू राम आले आहेत. या शुभ प्रसंगी, आपल्या सर्वांचे, समस्त देशबांधवांचे  खूप खूप अभिनंदन !
मी आता रामाच्या गाभाऱ्यात, ईश्वरी चेतनेचा साक्षीदार बनून आपल्या समोर उभा आहे. खूप काही बोलायचं  आहे, मात्र माझा कंठ दाटून आला आहे. माझे शरीराला अजूनही ती स्पंदने जाणवत आहेत. चित्त अद्यापही त्याच क्षणात लीन झाले आहे. आपले रामलला आता तंबूत राहणार नाही. आपले रामलला आता या दिव्य मंदिरात राहणार आहेत. मला पूर्ण विश्वास आहे, अपार श्रद्धा आहे की आज जे घडले आहे, त्याची अनुभूती, देशात, जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या, राम भक्तांना ही अनूभूती होत असेल. हा क्षण अलौकिक आहे.हा क्षण पवित्र आहे. हे वातावरण, ही ऊर्जा, ही घटिका.. प्रभू श्रीरामावर आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे. 22 जानेवारी, 2024 चा हा सूर्योदय, एक अद्भुत प्रकाश घेऊन आला आहे. 22 जानेवारी, 2024 ही कॅलेंडर वर लिहिलेली केवळ एक तारीख नाही. हा एक नव्या कालचक्राचा उद्गम आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनानंतरच, दररोज संपूर्ण देशात उत्साह आणि  आनंद वाढतच जात होता. मंदिर उभारणी चे कार्य बघून, देशबांधवांमध्ये एक नवा विश्वास निर्माण होत होता. आज आपल्याला शतकांपासूनच्या ह्या धैर्याचा, संयमाचा वारसा मिळाला आहे, आज आपल्याला श्रीरामाचे मंदिर मिळाले आहे. गुलामीची मानसिकता तोडून, उभा राहत असलेला देश, गुलामीचा प्रत्येक दंश सहन करून, त्यातून पुन्हा नव्या उमेदीने उभा राहणारा देश, असाच नव्या इतिहासाची निर्मिती करत असतो. आजपासून एक हजार वर्षांनीही लोक आजच्या या तारखेची, आजच्या या क्षणाची चर्चा करतील. आणि ही किती मोठी राम कृपा आहे, की आपण आज हा क्षण जगतो आहोत, तो पूर्ण होतांना बघतो आहोत, त्याचे साक्षीदार होत आहोत. आज दिन दिशा,  दिग- दिगंत, सगळे काही दिव्यत्वाने परिपूर्ण आहे. हा काळ सामान्य काळ नाही. हा कालचक्रावर सर्वकालिक शाई ने लिहिलेली अमिट स्मृतिच्या रेषा आहेत.

मित्रांनो,
आपल्याला सर्वांना माहीत आहे की जिथे रामाचे काम असते, तिथे पवनपुत्र हनुमान कायम विराजमान असतात. आणि म्हणूनच, मी रामभक्त हनुमानालाही प्रणाम करतो, मी माता जानकी, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सर्वांना वंदन करतो.
मी पावन अयोध्या धाम आणि पावन शरयूला प्रणाम करतो. मी या क्षणी दैवी अनुभव करतो आहे, की ज्यांच्या आशीर्वादाने हे महान कार्य पूर्ण झाले आहे, त्या दिव्य आत्मा, त्या दिव्य विभूती देखील आज यावेळी आपल्या आसपास उपस्थित आहेत. मी या सर्व दिव्य चेतनांना देखील कृतज्ञतापूर्वक वंदन करतो. मी आज प्रभू श्रीरामांकडे क्षमा याचना देखील करतो आहे. आपले पुरुषार्थ, आपले त्याग, तपस्या यात काहीतरी कमतरता राहिली असेल, म्हणून आपण इतकी शतके हे कार्य पूर्ण करु शकलो नाही. आज ती कमतरता पूर्ण झाली आहे. मला विश्वास आहे, प्रभू राम आज आपल्याला नक्कीच क्षमा करतील.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,
त्रेता युगात रामाच्या आगमनाबद्दल तुलसीदासांनी लिहिले आहे-
प्रभु बिलोकि हरषे पुरबासी। जनित वियोग बिपति सब नासी।
म्हणजेच, प्रभू रामचंद्रांचे आगमन बघूनच, सर्व अयोध्यावासी, समस्त देशवासी आनंदित झाले होते. दीर्घकाळच्या वियोगामुळे जे संकट आले होते, त्याचा अंत झाला होता. त्या काळात तर तो वियोग केवळ 14 वर्षांचा होता, तरीही इतका असह्य होता. ह्या युगात तर अयोध्या आणि देशबांधवांनी शेकडो वर्षांचा वियोग सहन केला आहे. आमच्या कित्येक पिढ्यांनी हा वियोग सहन केला आहे. भारताच्या संविधानात. त्याच्या पहिल्या प्रतीत, प्रभू राम विराजमान आहेत. हे संविधान अस्तित्वात आल्यानंतर देखील, कित्येक दशके, प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वाबाबत, न्यायालयीन लढाई सुरू होती. मी आभास व्यक्त करतो, भारताच्या न्यायपालिकेचे, ज्यांनी न्यायाची बुज राखली. न्यायाचा पर्याय वाची शब्द असलेल्या प्रभू रामांचे मंदिर न्यायबद्ध मार्गानेचे बनले आहे.

मित्रांनो,
आज गावागावात एकाच वेळी कीर्तन- भजन होत आहे. आज मंदिरात उत्सव होत आहे, स्वच्छता अभियान चालवले जात आहे. संपूर्ण देश आज दिवाळी साजरी करत आहे. आज संध्याकाळी, घराघरात राम ज्योत प्रज्वलित करण्याची तयारी सुरू आहे. काल मी श्रीरामाच्या आशीर्वादाने धनुषकोडी इथे रामसेतूचा आरंभ बिंदू, अरिचल मुनाई इथे गेलो होतो. ज्या क्षणी प्रभू राम समुद्र पार करायला निघाले होते, तो एक क्षण होता, ज्याने कालचक्र बदलले, त्या भावनिक क्षणाची स्पंदने जाणवून घेण्याचा, माझा हा विनम्र प्रवास होता. तिथे मी पुष्प वंदना केली. आणि तिथेच माझ्या मनात हा विश्वास निर्माण झाला, की जसे त्या काळी कालचक्र बदलले होते, त्याचप्रमाणे, आता पुन्हा कालचक्र बदलणार आहे, आणि शुभ दिशेने जाणार आहे.
माझ्या 11 दिवसांच्या व्रत-अनुष्ठानाच्या दरम्यान, मी त्या स्थानांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, जिथे प्रभू रामाची पावले पडली होती. मग ते नाशिकमधील पंचवटी धाम असेल, केरळचे पवित्र त्रिप्रायर मंदिर असेल, आंध्र प्रदेशातील लेपाक्षी मंदिर असो,  श्रीरंगम इथले  रंगनाथ स्वामी मंदिर असो, रामेश्वरमचे  श्री रामनाथस्वामी मंदिर असो किंवा मग, धनुष्कोडी…हे माझे सौभाग्य आहे, की याच पवित्र भावनेने मला सागर ते शरयूपर्यंतचा प्रवास करण्याची संधी मिळाली. सागरापासून ते शरयूपर्यंतचा प्रवास, प्रत्येक ठिकाणी, राम नामाचा तोच उत्सवी भाव पसरला आहे.

प्रभू राम तर, भारताच्या आत्म्यच्या कणाकणाशी जोडलेले आहेत. राम, भारत वासीयांच्या अंतर्मनात विराजमान आहेत. आम्ही भारतात कुठेही, कोणाच्याही अंतरात्म्याला स्पर्श केला तर, या एकत्वाची अनुभूती आपल्याला होते आणि हीच भावना आपल्याला सर्वत्र आढळेल. यापेक्षा उत्तम, यापेक्षा अधिक देशाला एकत्र आणणारे सूत्र आणखी काय असू शकेल?

 

माझ्या प्रिय देशवासियांनो,
मला देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या भाषांमधील रामायण ऐकण्याची संधी मिळाली आहे, पण विशेषत: गेल्या 11 दिवसांत मला वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमधून रामायण ऐकण्याचे भाग्य लाभले आहे.  राम म्हणजे काय हे सांगताना  ऋषींनी म्हटले आहे – रमन्ते यास्मिन् इति राम: ॥  म्हणजेच ज्याच्यामध्ये रममाण होता येते तो राम.  

राम लोकांच्या आठवणींमध्ये, सणांपासून परंपरांपर्यंत सर्वत्र सामावलेला आहे. प्रत्येक युगात लोक राम जगले आहेत.  प्रत्येक युगात लोकांनी आपापल्या शब्दात आणि आपापल्या पद्धतीने राम व्यक्त केला आहे.  आणि हा रामरस जीवनाच्या प्रवाहासारखा अखंड वाहत राहतो.  प्राचीन काळापासून भारताच्या कानाकोपऱ्यातील लोक रामरस प्राशन  करत आले आहेत. रामकथा अमर्याद आहे, रामायणही अनंत आहे.  रामाचे आदर्श, रामाचे संस्कार, रामाची शिकवण सर्वत्र सारखेच आहे.

प्रिय देशवासियांनो,
आज या ऐतिहासिक वेळी, देश त्या व्यक्तिमत्त्वांचे स्मरण करत आहे, ज्यांच्या कार्य आणि समर्पणामुळे आज हा शुभ दिवस आपण पाहत आहोत. रामाच्या या कामात अनेकांनी त्याग आणि तपश्चर्येच्या पराकाष्ठेची परमावधी गाठली आहे.  त्या अगणित राम भक्तांचे, त्या अगणित कारसेवकांचे आणि त्या अगणित संत-महात्मांचे आपण सर्व ऋणी आहोत.

मित्रांनो,
आजचा प्रसंग हा उत्सवाचा क्षण तर आहेच सोबत भारतीय समाजाच्या प्रगल्भतेची जाणीव करून देणाराही हा क्षण आहे. आपल्यासाठी ही केवळ विजयाचीच नाही तर नम्र होण्याचीही संधी आहे.  जगाचा इतिहास साक्ष आहे की अनेक राष्ट्रे आपल्या इतिहासात गुरफटतात.  अशा देशांनी जेव्हा-जेव्हा आपापल्या इतिहासाच्या गुंतलेल्या गाठी सोडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना यश मिळवण्यात मोठी अडचण आली.

खरं तर, बर्‍याच वेळा परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिकच गुंतागुंतीची बनली. मात्र ज्या गांभीर्याने आणि भावोत्कटतेने आपल्या देशाने इतिहासाची ही गाठ सोडवली आहे, त्यावरून हे दिसून येते की आपले भविष्य आपल्या भूतकाळापेक्षा खूपच सुंदर असणार आहे.  एक काळ असाही होता जेव्हा काही लोक म्हणायचे की राम मंदिर बांधले तर आगडोंब उसळेल.  अशा लोकांना भारताच्या सामाजिक भावनेचे पावित्र्य समजू शकले नाही.  
रामल्ललाच्या या मंदिराची निर्मिती, भारतीय समाजाच्या शांतता, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहे. ही निर्मिती आगीला जन्म देत नसून ऊर्जेला जन्म देत असल्याचे आपण पाहत आहोत.  समाजातील प्रत्येक घटकाला उज्वल भविष्याच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा घेऊन  हे राममंदीर आले आहे.  मी आज अशा लोकांना आवाहन करेन… या, तुम्ही समजून घ्या, पुनर्विचार करा. राम धग नाही, राम ऊर्जा आहे. राम हा वाद नाही, राम हा उपाय आहे.  राम फक्त आमचे नाहीत, राम सर्वांचे आहेत. राम केवळ वर्तमानकाळ नाहीत, राम अनादी अनंत आहेत.

मित्रांनो,
राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या या कार्यक्रमाशी संपूर्ण जग आज ज्या प्रकारे जोडले गेले आहे, त्यावरून रामाचे सर्वव्यापी दर्शन घडत आहे. भारतात आज जसा उत्सव सुरु आहे तसाच तो अनेक देशांमध्ये सुरु आहे. अयोध्येमधील आजचा हा उत्सवही रामायणातील त्या जागतिक परंपरांचा उत्सव बनला आहे. रामलल्लाची ही प्रतिष्ठापना ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वाचीही प्रतिष्ठापना आहे.

मित्रांनो,
आज अयोध्येत केवळ श्रीरामाच्या मूर्तीचीच प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेले नाही.  श्रीरामाच्या रूपाने प्रकट झालेल्या भारतीय संस्कृतीवरील अविचल श्रद्धेची देखील ही प्राणप्रतिष्ठापना आहे.  हे मानवी मूल्यांचे आणि सर्वोच्च आदर्शांचे मूर्त स्वरूप देखील आहे. आज संपूर्ण जगाला या मूल्यांची, या आदर्शांची गरज आहे.  सर्वे भवन्तु सुखिन:(सर्वांना सुख लाभावे) या संकल्पाची आपण शतकानुशतके पुनरावृत्ती करत आहोत.  आज तोच संकल्प  राममंदिराच्या रूपाने मूर्त स्वरूपात अवतरला आहे.  हे मंदिर केवळ देवाचे मंदिर नाही. भारताच्या दृष्टीकोनाचे, भारताच्या तत्त्वज्ञानाचे, भारताच्या मार्गदर्शकतेचे हे मंदीर आहे.  हे रामाच्या रूपातील राष्ट्रीय चेतनेचे मंदिर आहे.  
राम ही भारताची श्रद्धा आहे, राम हा भारताचा पाया आहे.  राम हे भारताचे भाग्य आहे, राम हा भारताचा सन्मान आहे.  राम हा भारताचा पराक्रम आहे, राम हा भारताचा विचार आहे.  राम ही भारताची प्रतिष्ठा आहे, राम ही भारताची शान आहे.  राम हा प्रवाह आहे, राम प्रभाव आहे. राम अनंत  आहे.  राम नीतीही आहे. राम  सातत्यही आहे. राम शाश्वतही आहे.राम महान आहे, राम विशाल  आहे.  राम हा सर्वव्यापी, विश्वस्वरुप, जगद्व्यापी आत्मा आहे.  आणि म्हणूनच जेव्हा रामाची प्रतिष्ठापना होते तेव्हा त्याचा प्रभाव वर्षानुवर्षे किंवा शतकभरासाठीच नाही, तर त्याचा प्रभाव हजारो वर्षे टिकतो.
महर्षि वाल्मिकींनी म्हटले आहे – राज्यं दशसहस्राणि प्राप्य वर्षानि राघवः ।  म्हणजेच राम दहा हजार वर्षांसाठी राज्यावर प्रस्थापित झाले.  म्हणजे हजारो वर्षे रामराज्य स्थापन झाले.  त्रेतायुगा मध्ये जेव्हा राम आले तेव्हा हजारो वर्षांसाठी रामराज्य स्थापन झाले.  राम हजारो वर्षांपासून जगाला मार्गदर्शन करत आले आहेत.

आणि म्हणूनच माझ्या प्रिय देशवासियांनो,
आज अयोध्येची भूमी आपल्या सर्वांना, प्रत्येक रामभक्ताला, प्रत्येक भारतीयाला काही प्रश्न विचारत आहे.  श्री रामाचे भव्य मंदिर तर झाले… आता पुढे काय?  शतकांची प्रतीक्षा तर संपली… पुढे काय?  आजच्या या प्रसंगी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आणि आपल्याकडे आशेने पाहत असलेल्या देवता आणि दैवी आत्म्यांना काय आपण असाच निरोप द्यायचा का? नाही बिलकुल नाही!

आज मला अगदी पवित्र मनाने जाणवते की, कालचक्र बदलत आहे. हा सुखद  योगायोग आहे की,  आपल्या  पिढीला एका कालजयी मार्गाचे शिल्पकार  या स्वरूपामध्ये निवडले गेले आहे. हजार वर्षांनंतरची पिढी, राष्ट्र निर्मितीच्या आजच्या कार्याचे स्मरण करेल. म्हणूनच मी म्हणतो की, हीच वेळ आहे, हीच  योग्य वेळ आहे. आपल्याला आजपासूनच  या पवित्र वेळेपासून, आगामी एक हजार वर्षाच्या भारताची पायाभरणी करायची आहे. मंदिर निर्मितीपासून आता पुढे जाऊन आपण सर्व देशवासीय, या क्षणाचे समर्थ-सक्षम, भव्य- दिव्य भारताच्या निर्माणाची शपथ घेत आहोत. रामाचा विचार, मनाबरोबरच जनमानसामध्येही तयार झाला पाहिजे, हीच राष्ट्र निर्मितीची शिडी आहे.

मित्रांनो,
आजच्या युगाची मागणी आहे की, आपण आपल्या अंतःकरणाचा विस्तार केला पाहिजे. आपल्या चैतन्याचा विस्तार… देवापासून देशापर्यंत, रामापासून राष्ट्रापर्यंत झाला पाहिजे. हनुमंताची भक्ती, हनुमंताची सेवा, हनुमंताचा समर्पण भाव, असे गुण आहेत की, त्यांचा शोध आपल्याला काही इतरत्र- बाहेर कुठेही घ्यावा लागत नाही. प्रत्येक भारतीयामध्ये भक्ती, सेवा आणि समर्पण  या भावना आहेत. आणि त्या भावनाच समर्थ – सक्षम, भव्य-दिव्य भारताचा आधार बनतील. आणि हाच तर देवापासून देशापर्यंत आणि रामापासून राष्ट्राच्या  चैतन्याचा विस्तार आहे!
दूर -दुर्गम जंगलातल्या झोपडीमध्ये जीवन कंठणा-या माझ्या आदिवासी माता शबरीचा ज्यावेळी विचार केला जातो, त्यावेळी एक विश्वास जागृत होतो. माता शबरी तर कधीपासून जप करीत होती – राम येतील, राम येतील !! प्रत्येक भारतीयामध्‍ये  जन्मलेला हाच विश्वास, समर्थ- सक्षम, भव्य- दिव्य भारताचा आधार बनेल. आणि हाच तर देवापासून देशापर्यंत आणि रामापासून ते राष्ट्राच्या चैतन्याचा विस्तार आहे. आपण सर्वजण जाणून आहे की, राम आणि निषादराजाची मैत्री, सर्व बंधनांना पार करणारी आहे. निषादराजाला रामाविषयी असलेली ओढ, आणि  प्रभू रामाला निषादराजाविषयी असलेली आपुलकी, किती मौल्यवान आहे. सर्वजण आपलेच आहेत, सर्वजण समान आहेत. प्रत्येक भारतीयामध्ये आपुलकी आहे, बंधुत्वाची ही भावना, समर्थ- सक्षम, भव्य- दिव्य भारताचा आधार बनेल. आणि हाच तर आहे देवापासून देशापर्यंत आणि रामापासून ते राष्ट्राच्या चैतन्याचा विस्तार !

मित्रांनो,
आज देशामध्ये निराशेला अगदी कणभरही स्थान नाही. मी तर खूप सामान्य आहे. मी तर खूप लहान आहे, असा विचार जर कोणी करीत असेल, तर त्याने खारोटीच्या योगदानाचे स्मरण केले पाहिजे. खारोटीचे स्मरणच आपल्याला अशा  कमीपणाच्या,  लहान असल्याच्या  भावनेमुळे आलेला भिडस्तपण दूर करेल. आपल्याला एक गोष्ट शिकवेल की, लहान- मोठ्या  प्रत्येक प्रयत्नांमध्येही आपली स्वत:ची ताकद असते. आपले योगदान असते आणि सर्वांच्या प्रयत्नांची ही भावाना, समर्थ-सक्षम, भव्य- दिव्य भारताचा आधार बनेल. आणि हाच तर आहे देवापासून देशापर्यंत आणि रामापासून ते राष्ट्राच्या चैतन्याचा विस्तार !

मित्रांनो,
लंकापती रावण प्रकांड पंडित, ज्ञानी होते. मात्र जटायूची  मूल्यनिष्ठा पहा, जटायूने महाबली रावणाबरोबर दोन हात केले. जटायूला माहिती होतं की, ते रावणाला हरवू शकणार नाहीत. तरीही त्यांनी रावणाला आव्हान दिले. कर्तव्याची ही पराकाष्ठा समर्थ-सक्षम, भव्य- दिव्य भारताचा आधार बनेल. आणि हाच तर आहे देवापासून देशापर्यंत आणि रामापासून ते राष्ट्राच्या चैतन्याचा विस्तार ! चला तर मग, आपण संकल्प करू या, की राष्ट्राच्या निर्मितीसाठी आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण कामी लावू. रामकार्यापासून ते राष्ट्रकार्यापर्यंत, वेळेचा प्रत्येक क्षण न् क्षण, शरीराचा कण न् कण, राम समर्पणाला,  राष्ट्र समर्पणाच्या ध्येयाला जोडला  जाईल.

माझ्या देशवासियांनो,
प्रभू श्रीरामाची आपला पूजा, विशेष झाली पाहिजे. ही पूजा, ‘स्व’ पासून बाजूला  जावून समष्टीसाठी झाली पाहिजे. ही पूजा, ‘अहं’ म्हणजे मी पासून बाजूला जावून ‘वयं‘ म्हणजे आपल्या  सर्वांसाठी झाली पाहिजे. प्रभूला जो नैवेद्य दाखवला जाईल, तो विकसित भारतासाठी आपण करीत असलेल्या परिश्रमाच्या पराकाष्ठेचा प्रसादही असेल. आपल्या नित्य पराक्रम, पुरुषार्थ, समर्पण यांचा नैवेद्य प्रभूरामाला दाखवावा लागेल. यामुळे नित्य प्रभू रामाची पूजा करावी लागेल, त्यावेळी आपल्याला  भारत  वैभवशाली आणि विकसित बनल्याचे पाहता येईल.

माझ्य प्रिय देशवासियांनो,
हा भारताच्या विकासाचा अमृतकाळ आहे. आज भारत युवा शक्तीच्या पूंजीने भरलेला आहे. प्रचंड ऊर्जा, चैतन्याने भरलेला आहे. अशी सकारात्मक परिस्थिती, पुन्हा किती काळानंतर येईल, माहिती नाही. म्हणूनच या काळाचा लाभ उठवण्याची संधी आपण गमावून चालणार नाही. आपल्याला निवांत बसून चालणार नाही. मी आपल्या देशातल्या युवकांना सांगू इच्छितो , तुमच्या समोर हजारो वर्षांच्या परंपरेची प्रेरणा आहे.
तुम्ही भारताच्या अशा पिढीचे प्रतिनिधित्व करीत आहेत की, ही पिढी  चंद्रावर तिरंगा  पडकावत आहे. 15 लाख किलोमीटर दूर प्रवास करून, सूर्याजवळ जावून आदित्य मोहीम यशस्वी बनवत आहे, ही पिढी आकाशामध्ये तेजस, सागरामध्ये विक्रांत, यांचे ध्वज फडकवत आहे. आपल्या वारशाचा अभिमान बाळगून तुम्हाला भारताचा नव- प्रभात लिहायची आहे. परंपरेचे पावित्र्य आणि आधुनिकतेमधील अनंतता, अशा दोन्ही मार्गांवरून वाटचाल केली तर भारत समृद्धीच्या लक्ष्यापर्यंत पोहोचेल.

माझ्या मित्रांनो,
येणारा काळ आता यशाचा आहे. येणारा काळ आता सिद्धी देणारा आहे. हे भव्य राम मंदिर साक्षी बनेल- भारताच्या उत्कर्षाचे, नव-भारताच्या उदयाचे, हे भव्य राम मंदिर साक्षी बनेल- भव्य भारताच्या अभ्युदयाचे, विकसित भारताचे! हे मंदिर शिकवण देते की, जर लक्ष्य, सत्य प्रमाणित असेल, जर लक्ष्य, सामूहिक आणि संघटित शक्तीतून जन्माला आले असेल, तर ते लक्ष्य प्राप्त करणे अशक्य- असंभव नाही.
हा भारताचा काळ आहे आणि भारत आता पुढे जाणार आहे. अनेक शताब्दींच्या प्रतीक्षेनंतर आपण इथे पोहोचलो आहोत. आपण सर्वांनी या युगाची, या कालखंडाची प्रतीक्षा केली आहे. आता आपल्याला थांबायचे नाही. आपण विकासाची विक्रमी उंची गाठून दाखवणार आहोत. याच भावनेने रामलल्लाच्या चरणी वंदन करून, तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व संतांच्या चरणी माझा नमस्कार.

सियावर रामचंद्र की जय ।
सियावर रामचंद्र की जय ।
सियावर रामचंद्र की जय ।

***

HarshalA/RadhikaA/ASave/SuvarnaB/DY
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai