उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे
श्री राम मंदिराविषयी विशेष टपाल तिकीट आणि एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश
18 Jan, 2024
नमस्कार! राम-राम.
आज श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा अभियानशी संबंधित आणखी एका अद्भुत कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मला मिळाले आहे. आज श्रीराम जन्मभूमि मंदिराला समर्पित 6 विशेष स्मारक टपाल तिकिटे जारी करण्यात आली आहेत जगात विविध देशात प्रभु श्रीरामाशी संबंधित जी टपाल तिकीटे यापूर्वी जारी झाली आहेत, आज त्यांचा एक एल्बम देखील प्रकाशित झाला आहे. मी देश-विदेशातील सर्व रामभक्तांना, सर्व देशवासियांना खूप शुभेच्छा देत आहे.
मित्रांनो,
टपाल तिकिटाचा एक उपयोग आपल्या सर्वांना माहीत आहे.
त्यांना लिफाफ्यावर चिकटवणे, त्यांच्या मदतीने आपली पत्रे आणि संदेश किंवा महत्वाची कागदपत्रे पाठवणे. मात्र, टपाल तिकीट आणखी एक महत्वाची भूमिका बजावत असते. टपाल तिकिटे विचार, इतिहास आणि ऐतिहासिक प्रसंंगांची माहिती पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे एक माध्यम देखील असतात. तुम्ही जेव्हा एखादे टपाल तिकीट जारी करता आणि ज्यावेळी ते कोणाला तरी पाठवले जाते तेव्हा ती व्यक्ती केवळ पत्र किंवा वस्तू पाठवत नाही तर तो अगदी सहजतेने इतिहासाचा एक अंश दुसऱ्या कोणापर्यंत पाठवत असते. हा केवळ एक कागदाचा तुकडा नाही आहे, हे तिकीट एखादे आर्ट वर्क नाही आहे. ही तिकिटे इतिहासाची पुस्तके, कलाकृतींची रुपे आणि ऐतिहासिक स्थानांचे लघु रुप देखील असतात. आपण हे म्हणू शकतो की एका प्रकारे मोठ-मोठे ग्रंथ, मोठ-मोठ्या विचारांचे हे लघु स्वरुप आहे. आज ही जी टपाल तिकिटे जारी करण्यात आली आहेत, त्यामुळे आपल्या युवा पिढीला बरेच काही शिकायला, जाणून घ्यायला मिळणार आहे.
मी आताच पाहात होतो, या तिकिटांमध्ये राममंदिराचे भव्य चित्र आहे, कलात्मक अभिव्यक्तीच्या माध्यमातून रामभक्तीची भावना आहे आणि
‘मंगल भवन अमंगल हारी’, या लोकप्रिय चौपाई च्या माध्यमातून देशाची मंगल कामना आहे. यामध्ये सूर्यवंशी रामाचे प्रतीक सूर्याची छबी आहे, जो देशात नव्या प्रकाशाचा संदेश देखील देतो. यामध्ये पुण्य नदी शरयू चे चित्र देखील आहे, जे रामाच्या आशीर्वादाने देशाला सदैव गतिमान राहण्याचे संकेत देते. मंदिराच्या अंतर्गत वास्तूचे सौंदर्य अतिशय बारकाव्यांसह या टपाल तिकिटांवर मुद्रित करण्यात आले आहे. मला सांगण्यात आले आहे की एका प्रकारे आपले पंचतत्वांचे जे तत्वज्ञान आहे त्याचे अतिशय सूक्ष्म रुप प्रभू रामाच्या माध्यमातून दर्शवण्यात आले आहे. या कामात टपाल विभागाला राम जन्मभूमी ट्रस्टबरोबरच संतांचे देखील मार्गदर्शन लाभले आहे. मी या संतांना देखील या योगदानासाठी प्रणाम करत आहे.
मित्रांनो,
प्रभू श्रीराम, माता सीता आणि रामायणातील गोष्टी, काळ, समाज, जात, धर्म आणि क्षेत्रांच्या सीमांच्या पलीकडे, प्रत्येक व्यक्तीसोबत जोडलेल्या आहेत.
सर्वात खडतर कालखंडात देखील त्याग, एकता आणि साहसाचे दर्शन घडवणारे रामायण, अनेक अडचणींमध्ये देखील प्रेमाच्या विजयाची शिकवण देणारे रामायण संपूर्ण मानवतेला स्वतःसोबत जोडते. याच कारणामुळे संपूर्ण जगासाठी रामायण आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. जगातील विविध देशांमध्ये विविध संस्कृतींमध्ये रामायणाविषयी एक उत्साह पाहायला मिळतो. आज ज्या पुस्तकांचे लोकार्पण होत आहे, ती याच भावनांचे प्रतिबिंब आहेत की कशा प्रकारे संपूर्ण जग प्रभू श्रीराम, माता सीता आणि रामायणाकडे अतिशय सन्मानाने पाहात आहे. आजच्या पिढीतील युवा वर्गासाठी ही बाब अतिशय रोचक असेल की कशा प्रकारे विविध देश श्रीरामावर आधारित टपाल तिकिटे जारी करत राहिले आहेत.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, कॅनडा, चेक प्रजासत्ताक, फिजी, इंडोनेशिया, श्रीलंका, न्यूझीलंड, थायलंड, गयाना, सिंगापूर… अशा कितीतरी देशांनी प्रभू श्रीरामाच्या जीवनातील प्रसंगावर अतिशय सन्मानाने, आत्मियतेने टपाल तिकिटे जारी केली आहेत. प्रभू श्रीराम कशा प्रकारे भारताच्या बाहेर देखील तितकेच महान आदर्श आहेत, जगातील तमाम सभ्यतांवर प्रभू रामाचा किती मोठा प्रभाव राहिला आहे, रामायणाचा किती मोठा प्रभाव राहिला आहे आणि आधुनिक काळात देखील राष्ट्रांनी कशा प्रकारे त्यांच्या चरित्राची प्रशंसा केली आहे, या सर्व माहितीसह हा अल्बम प्रभू श्रीराम आणि माता जानकीच्या विविध कथांची संक्षिप्त सफर देखील घडवणार आहे. एका प्रकारे महर्षी वाल्मिकी यांचे ते वचन आज देखील अमर आहे ज्यांनी म्हटले होते
यावत् स्थास्यंति गिरयः,
सरितश्च महीतले।
तावत् रामायणकथा,
लोकेषु प्रचरिष्यति॥
अर्थात्, जोपर्यंत पृथ्वीवर पर्वत आहेत नद्या आहेत तोपर्यंत रामायणाची कथा, श्रीरामाचे व्यक्तिमत्व लोक समूहात प्रसिद्ध होत राहील. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना, सर्व देशवासियांना या विशेष स्मारक टपाल तिकिटांसाठी खूप खूप शुभेच्छा