नवी दिल्ली , 18 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून, विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी या संवादात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते.
यावेळी, पंतप्रधानांनी मुंबईतल्या, एक तृतीयपंथी, कल्पना बाई यांच्याशी संवाद साधला. त्या, साई किन्नर स्वयंसहाय्यता बचत गट चालवतात. केवळ तृतीय पंथियांसाठी असलेला त्यांचा हा महाराष्ट्रातील पहिलाच बचत गट आहे. त्यांच्या आव्हानात्मक जीवनाची कथा सांगतांनाच, कल्पनाताईंनी, पंतप्रधानांना त्यांच्या संवेदनशीलतेबद्दल धन्यवाद दिले. तृतीयपंथी लोकांच्या खडतर आयुष्याबद्दल सांगत, भीक मागणे आणि अनिश्चिततेच्या आयुष्यातून बाहेर पडत, बचत गट सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
कल्पना ताईंनी, सरकारी अनुदानाच्या मदतीने टोपल्या बनवण्याच्या व्यवसायाची सुरुवात केली. त्यांना शहरी उपजीविका अभियान आणि स्वनिधी योजनेचे पाठबळ मिळाले आहे. त्याशिवाय, त्या इडली डोसा आणि फुलांचा व्यवसायही चालवतात. पंतप्रधानांनी त्यांच्याकडे, मुंबईतील पाव-भाजी आणि वडा पाव व्यवसायाविषयी विचारले. त्यांची सेवा, समाजासाठी किती महत्वाची आहे, हे पंतप्रधानांनी त्यांना समजावून सांगितले. त्यांची ही उद्यमशीलता, लोकांना तृतीयपंथीयांच्या वास्तविकतेविषयी, त्यांच्या क्षमतेविषयी जागरूक करत आहे, आणि समाजात तृतीयपंथीयांविषयी असलेली प्रतिमा सुधारत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “किन्नरांकडे जे करण्याची क्षमता आहे ते करून तुम्ही जगाला दाखवून देत आहात”, पंतप्रधानांनी कल्पना ताई यांचे कौतुक केले.
कल्पना ताई यांचा बचत गट, तृतीयपंथीयांना ओळखपत्रे पुरवत आहे तसेच, या समुदायाला पीएम स्वनिधीसारख्या योजनांचा लाभ घेऊन काही व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि भीक मागणे सोडून देण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ‘मोदी की गॅरंटी की गाडी‘ बद्दल किन्नर समुदायात उत्साह असल्याचे त्यांनी सांगितले. ही गाडी जेव्हा त्यांच्या परिसरात आली, तेव्हा त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनेक लाभ मिळाले, असेही त्या म्हणाल्या. पंतप्रधान मोदी यांनी कल्पनाजींच्या अदम्य उमेदीला सलाम केला आणि स्वत: अत्यंत आव्हानात्मक आयुष्य जगूनही, नोकरी देणाऱ्या व्यक्ती बनल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. “वंचितांना प्राधान्य देणे हे आमचे उद्दिष्ट आहे”, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai