येत्या 17-18 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सुरतला आणि उत्तरप्रदेशात वाराणसीला भेट देणार आहेत. 17 डिसेंबरला सकाळी पावणेअकराच्या सुमाराला ते सुरत विमानतळावर नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. तर सव्वाअकराच्या सुमाराला पंतप्रधानांच्या हस्ते सुरत हिरे सराफा बाजाराचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर ते वाराणसीकडे प्रयाण करणार आहेत. दुपारी साडेतीनच्या सुमारास ‘विकसित भारत संकल्प यात्रेत’ पंतप्रधान सहभागी होणार आहेत. संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास नमो घाटावर ते काशी तमिळ संगमम-2023 चे उद्घाटन करणार आहेत.
18 डिसेंबरला सकाळी पावणेअकराच्या सुमाराला पंतप्रधान स्वरवेद महामंदिराला भेट देणार असून पाठोपाठ म्हणजेच साडेअकराच्या सुमारास एका सार्वजनिक समारंभात ते त्याचे उद्घाटनही करणार आहेत. दुपारी एकच्या सुमाराला ते विकसित भारत संकल्पbयात्रेत सहभागी होणार आहेत. त्यानंतर दुपारी सव्वादोनच्या सुमाराला एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान 19,150 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासप्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन आणि करणार आहेत.
पंतप्रधान सुरतमध्ये-
सुरत विमानतळावर पंतप्रधान नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. या इमारतीत सर्वाधिक गर्दीच्या वेळेला 1200 देशांतर्गत प्रवासी आणि 600 आंतरदेशीय प्रवासी वावरू शकतात. त्याखेरीज सर्वाधिक गर्दीच्या वेळची क्षमता 3000 प्रवासीसंख्येपर्यंत आणि वर्षाकाठी प्रवासीसंख्या क्षमता 55 लाखांपर्यंत वाढविण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. विमानतळाची इमारत हे सुरत शहराचे प्रवेशद्वार ठरणार असल्याने स्थानिक संस्कृती आणि वारशाचे प्रतिबिंब दिसून येईल अशी अंतर्गत व बाह्य सजावट करण्यात आली आहे. येथे भेट देणाऱ्या व्यक्तींना शहराचा अंदाज येईल अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली आहे. सुरत शहराच्या रांदेर भागातील जुन्या वास्तूंप्रमाणे पारंपरिक आणि उंची लाकडी कलाकुसर केलेल्या प्रवेशद्वारापासूनच नवी सुधारित विमानतळ वास्तू प्रवाशांना संपन्न अनुभव देण्यासाठी सिद्ध करण्यात आली आहे. ‘गृह-चार (GRIHA IV)’ अटींची पूर्तता करणारी नवी विमानतळ वास्तू विविध शाश्वत संतुलित वैशिष्ट्यांनी युक्त आहे. यामध्ये दुहेरी उष्णतारोधक छत, ऊर्जाबचत मंडप, कमीत कमी उष्णता शोषणारी दुहेरी चकचकीत आवरणाची एकके, पर्जन्यजलसंधारण, पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी शुद्धीकरण संयंत्र, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे संयंत्र आणि सौर ऊर्जा निर्मिती- अशा अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे.
पंतप्रधान सुरत हिरे सराफा बाजाराचेही उद्घाटन करणार आहेत. आंतरराष्ट्रीय हिरे आणि अलंकार व्यवसायासाठीचे ते जगातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक केंद्र ठरेल. कच्च्या आणि पैलू पाडलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या हिऱ्यांच्या तसेच अलंकारांच्या व्यापारासाठी ते जागतिक केंद्र असेल. या सराफा बाजारात अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असे व आयात-निर्यातीसाठी उपयुक्त असे ‘सीमाशुल्क निपटारा भवन’ असेल; अलंकारांच्या किरकोळ विक्रीसाठी मॉल असेल, आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग सुविधा तसेच ऐवज सुरक्षित ठेवणाऱ्या तिजोऱ्याही असतील.
पंतप्रधान वाराणसीमध्ये-
17 डिसेंबरला वाराणसी येथील कटिंग मेमोरियल शाळेच्या पटांगणावर पंतप्रधान विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत. तेथे ते पीएम आवास, पीएम स्वनिधी, पीएम उज्ज्वला अशा विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
पंतप्रधानांनी मांडलेल्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेच्या अनुषंगाने भरवण्यात येणाऱ्या ‘काशी तमिळ संगमम- 2023’ चे उद्घाटन नमो घाटावर त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पंतप्रधान ‘कन्याकुमारी-वाराणसी’ तमिळ संगमम या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
18 तारखेला पंतप्रधान वाराणसीमध्ये उमराहा येथे नवीनच बांधून झालेल्या स्वरवेद महामंदिराचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते महामंदिराच्या भाविकांना उद्देशून भाषणही करणार आहेत.
त्यानंतर पंतप्रधान त्यांच्या मतदारसंघातील सेवापुरी या ग्रामीण भागात विकसित भारत संकल्पयात्रेत सहभागी होणार आहेत. 2023च्या काशी खासदार क्रीडा स्पर्धांमध्ये सुरु असलेल्या काही क्रीडाप्रकारांचाही आनंद घेणार आहेत. त्यानंतर या स्पर्धेच्या विजेत्यांशी ते संवाद साधणार आहेत. तसेच या कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांशीही ते संवाद साधणार आहेत.
गेल्या नऊ वर्षांत वाराणसीचा चेहरामोहरा बदलण्यावर आणि वाराणसीमध्ये व सभोवारच्या भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन अधिकाधिक सुलभ करण्यावर पंतप्रधानांनी भर दिला आहे. त्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून, पंतप्रधान वाराणसीमध्ये 19,150 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासप्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत.
न्यू पंडित दीनदयाल उपाध्याय नगर ते न्यू भाऊपूर समर्पित मालवाहतूक मार्गिका प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. सुमारे 10,900 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. रेल्वेच्या इतर प्रकल्पांचेही उद्घाटन यावेळी होणार असून, त्यांत बलिया – गाझीपूर सिटी रेल्वे दुपदरीकरण, इंदरा- दोहरीघाट रेल्वे गेज रूपांतरण आदींचा समावेश आहे.
वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तर दोहरीघाट-मऊ मेमू गाडी आणि नव्या मालवाहतूक मार्गिकेवरून आणखी दोन मोठ्या मालगाड्यांच्या प्रवासालाही प्रारंभ होणार आहे. बॅनर्स लोकोमोटिव्ह वर्क्स ने घडवलेल्या दहा हजाराव्या इंजिनालाही ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत.
370 कोटी रुपयांहून अधिक खर्चाने बांधलेल्या शिवपूर- फुलवारीया-लहरतारा मार्ग या ग्रीनफिल्ड (शून्यातून उभ्या केलेल्या) प्रकल्पाचे आणि दोन सेतूंचे उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. वाराणसी शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागातील रहदारीचा गुंता सोडवण्यासाठी यामुळे मदत होणार असून ते पर्यटकांनाही सोयीस्कर ठरणार आहे. पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या आणखी काही महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये 20 रस्त्यांचे बळकटीकरण व रुंदीकरण, कैठी गावातील संगमघाट मार्ग, आणि पंडित दीनदयाल उपाध्याय रुग्णालयातील निवासी इमारतींच्या बांधकामाचा समावेश आहे.
त्याखेरीज पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाच्या सोयीसाठी पोलीस लाईन आणि पीएसी भुल्लनपूर भागात 200 आणि 150 खाटांच्या दोन बहुमजली बरॅक पद्धतीच्या इमारती, नऊ ठिकाणी स्मार्ट बसगाड्यांचे तळ, आणि अलाईपुरमध्ये 132 किलोवॅटचे उपकेंद्र- यांचेही उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत, पर्यटकांना सविस्तर माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचा आणि एकीकृत पर्यटक परवाना प्रणालीचा प्रारंभही पंतप्रधान करणार आहेत. या एकीकृत परवान्यामुळे, श्री काशी विश्वनाथ धाम, गंगा क्रूझ, सारनाथ लाईट-साउंड शो, यासाठी एकत्रित असे एकच तिकीट मिळू शकेल आणि त्याबरोबर एकात्मिक क्युआर संकेतांक सेवाही मिळतील.
पंतप्रधानांच्या हस्ते 6500 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचा शिलान्यासही होणार आहे. नूतनीकरणक्षम ऊर्जास्रोतांच्या अधिक उत्पादनासाठी ते चित्रकूट जिल्ह्यात 800 मेगावॅट सौर उद्यानाचा शिलान्यास करणार आहेत. या प्रकल्पासाठी 4000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पेट्रोलियम पुरवठा साखळीला नवी जोड देण्यासाठी ते मिरझापूर येथे 1050 कोटी रुपये खर्चून उभारण्याच्या नवीन पेट्रोलियम ऑइल टर्मिनलचे भूमिपूजन करणार आहेत.
याखेरीज पंतप्रधानांच्या हस्ते आणखी काही प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. 900 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा वाराणसी-भदोही राष्ट्रीय महामार्ग क्र. 731 B (Package-2), जलजीवन अभियानांतर्गत 280 कोटी रुपयांच्या 69 ग्रामीण पेयजल योजना, बीएचयू ट्रॉमा केंद्रात 150 खाटांचे क्रिटिकल केअर युनिट, आठ गंगा घाटांचा पुनर्विकास, तसेच दिव्यांग निवासी माध्यमिक शाळेचे बांधकाम- इत्यादी प्रकल्पांचा यात समावेश आहे.
***
S.Tupe/J.Waishampyan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai