Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

केनियाच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले निवेदन

केनियाच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले निवेदन


नवी दिल्ली, 5 डिसेंबर 2023

महामहीम, राष्ट्रपती विलियम रुटो,

दोन्ही देशांचे मान्यवर प्रतिनिधी,

प्रसारमाध्यमांचे सहकारी,

नमस्कार!

राष्ट्रपती रूटो आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे.

आफ्रिकन संघ, जी-20 मध्ये सामील झाल्यानंतर लगेचच त्यांचा हा दौरा होत आहे याचा मला आनंद आहे.

भारताच्या परराष्ट्र धोरणात आफ्रिकेला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले गेले आहे.

गेल्या काही दशकांमध्ये, आम्ही आफ्रिकेसोबत मोहिम पातळीवर  आमचे सहकार्य वाढवले आहे.

मला विश्वास आहे की राष्ट्रपती रूटो यांच्या भेटीमुळे आपल्या द्विपक्षीय संबंधांना तसेच संपूर्ण आफ्रिकन खंडाशी असलेल्या आपल्या संबंधांना नवीन चालना मिळेल.

मित्रांनो,

यावर्षी आपण भारत आणि केनिया यांच्यातील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा साठवा वर्धापन दिन साजरा करत आहोत, परंतु आपल्या संबंधांना हजारो वर्षांचा इतिहास आहे.

मुंबई आणि मोम्बासाला जोडणारा विशाल हिंद महासागर आपल्या प्राचीन संबंधांचा साक्षीदार राहिला आहे.

या भक्कम पायावर आपण शतकानुशतके एकत्र पुढे जात आहोत. गेल्या शतकात आम्ही एकत्रितपणे वसाहतवादाचा प्रतिकार केला.

भारत आणि केनिया हे समान भूतकाळ आणि सामायिक भविष्य असलेले देश आहेत.

मित्रांनो,

आज आपण सर्व क्षेत्रांमध्ये आपले सहकार्य बळकट करण्याचा, प्रगतीशील भविष्याचा पाया रचण्याचा विचार केला. आणि अनेक नवीन उपक्रमांची ओळखही करुन घेतली.

भारत आणि केनिया यांच्यातील परस्पर व्यापार आणि गुंतवणूक सातत्याने प्रगती करत आहे.

आपल्या आर्थिक सहकार्याच्या पूर्ण क्षमतेची पूर्तता करण्यासाठी आपण नवीन संधी शोधत राहू.

भारत केनियाचा एक विश्वासार्ह आणि वचनबद्ध विकास भागीदार राहिला आहे.

आय. टी. ई. सी. आणि आय. सी. सी. आर. शिष्यवृत्तीद्वारे भारताने केनियाच्या लोकांच्या कौशल्य विकास आणि क्षमता निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

दोन कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणून आम्ही आमचे अनुभव सामायिक करण्यास सहमती दर्शवली.

केनियाच्या कृषी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी आम्ही दोनशे पन्नास दशलक्ष कर्ज (डॉलर्सची क्रेडिट लाइन) प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

आधुनिक काळातील गरजांच्या अनुषंगाने आम्ही तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील आमचे सहकार्य वाढवत आहोत.

डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमधील भारताचे यश केनियासोबत सामायिक करण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.

या महत्त्वाच्या विषयावर आज झालेला करार आमच्या प्रयत्नांना बळकटी देईल.

स्वच्छ ऊर्जा ही दोन्ही देशांची प्रमुख प्राथमिकता आहे.

केनियाने घेतलेला आफ्रिका हवामान शिखर परिषदेचा पुढाकार अतिशय कौतुकास्पद आहे.

सर्व जागतिक आव्हानांचा एकत्रितपणे सामना करण्याची राष्ट्रपती रूटो यांची बांधिलकी देखील यातून दिसून येते.

केनियाने जागतिक जैवइंधन आघाडी आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे याचा मला आनंद आहे.

त्याच वेळी,आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडीमध्ये सामील होण्याच्या केनियाच्या निर्णयामुळे वाघ श्रेणीतील प्रजातींच्या (मोठ्या मार्जार प्रजाती)  संवर्धनासाठीचे जागतिक प्रयत्न बळकट होतील.

संरक्षण क्षेत्रातील आपले वाढते सहकार्य हे आपल्या सखोल परस्पर विश्वासाचे आणि समान हितसंबंधांचे प्रतीक आहे.

आजच्या चर्चेत आम्ही लष्करी सराव, क्षमता बांधणी तसेच दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांना जोडण्यावर भर दिला.

सार्वजनिक कल्याणासाठी अंतराळ तंत्रज्ञानाच्या वापरावरही आम्ही चर्चा केली.

या महत्त्वाच्या क्षेत्रातील भारताचा यशस्वी अनुभव केनियाशी सामायिक करण्यास आम्ही सहमती दर्शवली.

वचनबद्धता आणि मैत्रीच्या या भावनेने आम्ही सर्व क्षेत्रांमध्ये आमचे सहकार्य वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू ठेवू.

मित्रांनो,

आजच्या बैठकीत आम्ही अनेक जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली.

हिंद महासागर क्षेत्रातील देश म्हणून सागरी सुरक्षा, समुद्री चाचेगिरी आणि अंमली पदार्थांची तस्करी हे मुद्दे आमचे सामायिक प्राधान्यक्रम आहेत.

या महत्त्वाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य बळकट करण्यासाठी आम्ही सागरी सहकार्याबाबत संयुक्त दूरदृष्टी निवेदन जारी करत आहोत.

केनिया आणि भारताचे घनिष्ट सहकार्य हिंद-प्रशांत क्षेत्रातील आमच्या सर्व प्रयत्नांना बळ देईल.

दहशतवाद हे मानवतेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे यावर भारत आणि केनियाचे आहे.

या संदर्भात आम्ही दहशतवादविरोधी क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मित्रांनो,

केनियाला आपले दुसरे घर मानणारे भारतीय वंशाचे सुमारे ऐंशी हजार लोक आमच्या संबंधांची सर्वात मोठी ताकद आहेत.

त्यांची काळजी घेण्यासाठी केनियाकडून मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल मी राष्ट्रपती रूटो यांचे वैयक्तिक आभार मानतो.

आज होत असलेल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या करारामुळे आपली परस्पर जवळीक आणखी वाढेल.

केनियाचे लांब पल्ल्याचे आणि मॅरेथॉन धावपटू जगप्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे क्रिकेटही दोन्ही देशांमध्ये लोकप्रिय आहे.

दोन्ही देशांमध्ये क्रीडा क्षेत्रात परस्पर सहकार्य मजबूत करण्यासाठी एका महत्त्वाच्या करारावर सहमती झाली आहे.

बॉलीवूडबरोबरच योग आणि आयुर्वेदाची लोकप्रियता केनियामध्येही वाढत आहे.

दोन्ही देशांमधील लोकांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवू.

महामहीम,

पुन्हा एकदा, तुमचे आणि तुमच्या शिष्टमंडळाचे भारतात मनापासून स्वागत आहे.

खूप खूप धन्यवाद.

 

 

Jaydevi PS/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai