पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 – 31 ऑक्टोबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वाजता ते अंबाजी मंदिरात पूजा करुन दर्शन घेतील. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ते मेहसाणा इथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता ते केवडियाला भेट देतील. इथे ते एकतेचा पुतळा (स्टॅच्यू ऑफ युनिटी) या वास्तुला पुष्पांजली अर्पण करतील, त्यानंतर राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रम साजरा होईल. त्यानंतर ते केवडियातच, अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर, सकाळी सुमारे 11:15 वाजता, ते आरंभ 5.0 च्या समारोप प्रसंगी 98 व्या कॉमन फाउंडेशन कोर्स या अभ्यासक्रमाच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील.
मेहसाण्यात पंतप्रधान
मेहसाणा इथे पंतप्रधान,5 हजार 800 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्राला समर्पण आणि काही प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. हे प्रकल्प रेल्वे, रस्ते, पेयजल आणि सिंचन अशा विविध क्षेत्रांशी निगडित आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि राष्ट्राला समर्पित होणारे प्रकल्प पुढील प्रमाणे आहेत.
वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (WDFC) चा न्यू भांडू-न्यू साणंद(उत्तर) विभाग; विरमगांव – समखियाली रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण; काटोसन रोड- बेचराजी – मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड (MSIL साइडिंग) रेल्वे प्रकल्प; विजापूर तालुक्यातील आणि मेहसाणा तसेच गांधीनगर जिल्ह्यातील मनसा तालुक्यातील विविध गाव तलावांच्या पुनर्भरणाचे प्रकल्प; मेहसाणा जिल्ह्यातील साबरमती नदीवर वलसाणा बांध; पालनपूर, बनासकांठा इथे पेयजलाची तरतूद करण्यासाठी दोन योजना; आणि धरोई धरणावर बेतलेला पालनपूर जीवनरेखा प्रकल्प – हेड वर्क (HW) आणि 80 MLD क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प.
पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी होणार असलेले प्रकल्प पुढील प्रमाणे आहेत.
महिसागर जिल्ह्यातील संतरामपूर तालुक्यात सिंचन सुविधा उपलब्ध करून देणारा प्रकल्प ; साबरकांठा इथल्या नरोडा-देहगांव-हरसोल-धनसूरा रोड, या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण; गांधीनगर जिल्ह्यातील कलोल नगरपालिकेसाठी सांडपाणी आणि सेप्टेज व्यवस्थापन प्रकल्प; आणि सिद्धपूर (पाटण), पालनपूर (बनासकंठा), बयाड (अरवल्ली) आणि वडनगर (मेहसाणा) येथील सांडपाणी प्रक्रियांसाठी प्रकल्प.
केवडियामध्ये पंतप्रधान
देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्याच्या आणि बळकट करण्याच्या भावनेला चालना देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
पंतप्रधान ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमात सहभागी होऊन सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण करतील. पंतप्रधान यावेळी राष्ट्रीय एकता दिवस संचलन कार्यक्रमातही सहभागी होतील, ज्यामध्ये सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि विविध राज्य पोलिसांच्या तुकड्यांचा समावेश असेल. या वेळचे विशेष आकर्षण म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दलातील सर्व महिला बाईकर्सचा डेअरडेव्हिल शो, सीमा सुरक्षा दलातल्या महिला जवानांचा पाईप बँड, गुजरात महिला पोलिसांचा नृत्याचा कार्यक्रम, राष्ट्रीय छात्र सेनेचा (NCC) विशेष कार्यक्रम, विविध शाळांच्या बँड पथकाचे संचलन, भारतीय हवाई दलाचे संचलन आणि हवाई कसरती,व्हायब्रण्ट गावांच्या आर्थिक व्यवहार्यतेचे प्रदर्शन करणारे रथ यासह इतरही विविध कार्यक्रमांचा यात समावेश आहे.
केवडियामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते 160 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. यावेळी ज्या प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे त्यात एकता नगर ते अहमदाबाद या हेरिटेज रेल्वे प्रकल्पाचा समावेश आहे; त्याचबरोबर नर्मदा आरती प्रकल्प; कमलम पार्क; स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरातील एक वॉकवे प्रकल्प; 30 नवीन ई-बस, 210 ई-सायकली आणि विविध गोल्फ कार्ट; एकता नगर येथे सिटी गॅस वितरण नेटवर्क आणि गुजरात राज्य सहकारी बँकेच्या ‘सहकार भवन इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे. याशिवाय, केवडिया येथे ट्रॉमा सेंटर आणि सोलर पॅनेलसह उपजिल्हा रुग्णालयाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
आरंभ 5.0 कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी, पंतप्रधान 98 व्या कॉमन फाउंडेशन कोर्सच्या अधिकारी प्रशिक्षणार्थींना संबोधित करतील. आरंभ या अभ्यासक्रमाची 5वी आवृत्ती, हारनेसिंग द पावर ऑफ डिसरप्शन या संकल्पनेवर आयोजित करण्यात आली आहे. वर्तमान आणि भविष्यावर परिणाम करणारे अडथळे ओळखून सर्वसमावेशक विकासासाठी, प्रशासन कार्यात व्यत्यय आणण्याची शक्ती शोधण्याचा हा प्रयत्न आहे. ‘मै नही हम’ या संकल्पनेसह 98 व्या कॉमन फाउंडेशन कोर्सच्या प्रशिक्षणार्थी मध्ये भारतातील 16 नागरी सेवा आणि भूतानच्या 3 नागरी सेवांमधील 560 अधिकारी प्रशिक्षणार्थी यांचा समावेश आहे.
***
S.Kane/A.Save/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai