Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

दिल्लीत द्वारका इथे आयोजित विजयादशमी सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित

दिल्लीत द्वारका इथे आयोजित विजयादशमी सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित


नवी दिल्‍ली, 24 ऑक्‍टोबर 2023

नवी दिल्लीत द्वारका येथे आयोजित रामलीला सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहिले आणि त्यांनी रावण दहन कार्यक्रमाचा लाभ घेतला.

या सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की विजयादशमी हा सण अन्यायावर न्यायाच्या, अहंकारावर मानवतेच्या, क्रोधावर  संयमाने मिळवलेल्या विजयाचा सण आहे. हा दिवस आपण घेतलेल्या शपथा, आपण केलेले संकल्प यांना नवीन झळाळी देण्याचा सुद्धा आहे असे ते म्हणाले.

चंद्रयान चंद्रावर उतरल्यानंतर ठीक दोन महिन्यांनी आपण यावेळी विजय दशमी साजरी करत आहोत, असे पंतप्रधानांनी नमूद केले.  या दिवशी केल्या जाणाऱ्या शस्त्रपूजन परंपरेचा संदर्भ देत पंतप्रधानांनी जोर देऊन सांगितले की भारतात शस्त्रे केवळ शस्त्रागारात ठेवून देण्यासाठी वापरली जात नाहीत तर संरक्षणासाठी वापरली जातात.ते म्हणाले की, शक्तीपूजा म्हणजे संपूर्ण सृष्टीचे सुख, कल्याण, विजय आणि सर्जन अशा वैभवाची कामना करणे.  त्यांनी आपल्या भाषणात भारतीय तत्त्वज्ञानाच्या शाश्वत आणि आधुनिक पैलूंवर देखील भर दिला.  “आम्हाला रामाने बाळगलेल्या ‘मर्यादा’ (सीमा) माहित आहेत, त्याच प्रमाणे आमच्या सीमांचे रक्षण कसे करायचे हे देखील माहीत आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवर उभारले जाणारे मंदिर हे शतकानुशतकांच्या आम्हा भारतीयांच्या प्रतीक्षेसह बाळगलेल्या संयमाच्या विजयाचे प्रतीक आहे”, असे ते म्हणाले. पुढच्या राम नवमीला अयोध्येच्या श्रीराम मंदिरात होणारी प्रार्थना संपूर्ण जगात आनंद पसरवेल असेही त्यांनी सांगितले. भगवान श्रीराम बस आनेवाले ही  है, प्रभू श्रीरामचंद्रांचे  आगमन हे अपरिहार्य आहे असे ते म्हणाले. प्रभू श्रीरामाच्या, रामराज्याच्या आगमनाचे रामचरितमानसामध्ये दिलेले संकेत नमूद करत पंतप्रधान म्हणाले की भारताची अर्थव्यवस्था जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे मिळत असलेले संकेत, भारताचे चंद्रयान चंद्रावर यशस्वीपणे उतरणे, नवे संसद भवन, नारीशक्ती वंदन अधिनियम, हीसुद्धा रामराज्य येण्याचीच लक्षणे आहेत. 

“भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही तसेच सर्वात विश्वासार्ह लोकशाही म्हणून उदयास येत आहे”, ते म्हणाले. प्रभू राम यांचे आगमन अशा शुभ संकेतांच्यावेळी होत असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले की, “ एका प्रकारे, आता स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर भारताचे भाग्य उजळणार आहे.”

समाजातील एकोपा, जातीयवाद, प्रादेशिकता आणि भारताच्या विकासाऐवजी स्वार्थाचा विचार करणाऱ्या विकृत शक्तींविरुद्ध जागृत राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. “आपण समाजातील दुष्कृत्ये आणि भेदभाव संपवण्याची शपथ घेतली पाहिजे”, ते म्हणाले.

पंतप्रधानांनी, भारतासाठी पुढील 25 वर्षे खूप महत्त्वाची असल्याचा पुनरुच्चार केला. “आपल्याला भगवान रामाच्या विचारांचा भारत घडवायचा आहे. एक विकसित भारत, जो स्वावलंबी आहे, एक विकसित भारत, जो जागतिक शांततेचा संदेश देतो, विकसित भारत, जिथे प्रत्येकाला आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा समान अधिकार आहे, एक विकसित भारत, जिथे लोकांमध्ये समृद्धी आणि समाधानाची भावना आहे. हा रामराज्य ची संकल्पना आहे”,असेही ते म्हणाले.

याच अनुषंगाने, पंतप्रधानांनी प्रत्येकाला पाणी बचत, डिजिटल व्यवहारांना चालना, स्वच्छता, वोकल फॉर लोकल, दर्जेदार उत्पादने बनवणे, परदेशात फिरायला जाण्याचा विचार करण्यापूर्वी संपूर्ण देश पाहणे, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे, भरड धान्याचा वापर आणि त्याला प्रोत्साहन देणे, आरोग्याबाबत जागरूकता, आणि  सर्वात शेवटी “आपण किमान एका गरीब कुटुंबाचा त्यांच्या घरातील सदस्य बनून सामाजिक दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करणे.”असे 10 संकल्प करण्यास सांगितले. जोपर्यंत देशात एकूण एक गरिबाला त्याच्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत, घर नाही, वीज, गॅस, पाणी, उपचार सुविधा नाहीत, तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

* * *

S.Patil/Ashutosh/Vikas/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai