नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्यप्रणाली द्वारे,कौशल दीक्षांत समारंभाला संबोधित केले.
कौशल्य विकासाचा हा उत्सव हीच, एक विशेष संकल्पना असून आजचा कार्यक्रम, म्हणजे सर्व कौशल्य विकास संस्थांचा संयुक्त दीक्षांत समारंभ ही एक स्तुत्य कल्पना आहे.
कौशल्य दीक्षांत समारंभात भारताच्या आजच्या प्राधान्यक्रमांचे प्रतिबिंब आढळते. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या कार्यक्रमाशी जोडले गेलेल्या हजारो युवकांना पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी यावेळी कोणत्याही देशाची ताकद उपयोगात आणण्यात युवाशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. नैसर्गिक, आणि खनिज स्रोत, आपली किनारपट्टी अशा संसाधनाचा वापर करण्यासाठी युवा शक्ती असेल, तर त्या देशाचा विकास होतो आणि या संसाधनांना न्याय ही दिला जातो. आज, अशाच विचारांमुळे देशाची युवाशक्ती सक्षम होत आहे, आणि संपूर्ण व्यवस्थेत त्यामुळे सुधारणा होत आहेत, असे त्यांनी सांगितले. “या सगळ्यात देशाचा दृष्टिकोन द्वीपक्षीय आहे. एकीकडे, भारत आपल्या तरुणांना कौशल्य आणि शिक्षणाद्वारे नवीन संधींचा लाभ घेण्यासाठी तयार करत आहे असे सांगत, त्यांनी सुमारे चार दशकांनंतर, त्यांच्या सरकारने तयार केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर प्रकाश टाकला. सरकार मोठ्या संख्येने नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि आयआयटी, आयआयएम किंवा आयटीआय सारख्या कौशल्य विकास संस्थांची स्थापना करत असल्याचेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षित झालेल्या कोट्यवधी तरुणांचा उल्लेख केला. तर दुसरीकडे, ज्यातून रोजगारनिर्मिती होऊ शकेल, अशी पारंपरिक क्षेत्रे अधिकाधिक बळकट करण्याचा, तसेच रोजगार आणि स्वयंरोजगाराला पाठिंबा देणाऱ्या नव्या क्षेत्रांनाही प्रोत्साहन दिले जात आहे, असे पंतप्रधानांनी संगितले.वस्तू निर्यात करण्यामध्ये तसेच मोबाईल निर्यात , इलेक्ट्रॉनिक निर्यात, सेवा निर्यात, संरक्षण निर्यात आणि उत्पादन क्षेत्रात भारताने नवे विक्रम प्रस्थापित केल्याचा उल्लेखही पंतप्रधानांनी केला आणि त्याच बरोबर अंतराळ क्षेत्र, स्टार्टअप्स, ड्रोन, ॲनिमेश , इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर अशा अनेक क्षेत्रात तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात नवीन संधी निर्माण केल्याचा उल्लेख केला.
“आज संपूर्ण जगाला विश्वास वाटतो की, हे शतक भारताचे शतक असेल”, असे सांगून, पंतप्रधानांनी याचे श्रेय भारतातील तरुणांना दिले. जगातील अनेक देशांमध्ये वृद्धांची संख्या वाढत असताना भारत दिवसेंदिवस तरुण होत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. “ या गोष्टीचा भारताला मोठा फायदा आहे”, असे त्यांनी नमूद करून, ते म्हणाले, कारण जग भारताकडे कुशल तरुणांसाठी पाहत आहे. जागतिक कौशल्य ‘मॅपिंग’बाबत भारताचा प्रस्ताव नुकताच जी-20 शिखर परिषदेत स्वीकारण्यात आला आहे, अशी माहिती देऊन ते म्हणाले, यामुळे आगामी काळात तरुणांसाठी चांगल्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. आणि निर्माण केलेली कोणतीही संधी वाया घालवू नये असे पंतप्रधानांनी सुचवले; त्याचबरोबर आश्वासन दिले की, अशी संधी भारतीय तरुणांना मिळत असेल तर, सरकार त्यासाठी पाठिंबा देण्यास तयार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मागील सरकारच्या काळामध्ये कौशल्य विकासाकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले आणि ते म्हणाले, “आमच्या सरकारने कौशल्याचे महत्त्व ओळखले आणि त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय निर्माण केले आणि स्वतंत्र अर्थसंकल्पाची तरतूद केली.” भारत आपल्या तरुणांच्या कौशल्यांमध्ये पूर्वीपेक्षा अधिक गुंतवणूक करत असल्याचे त्यांनी अधोरेखित करताना, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे उदाहरण दिले ज्यामुळे तळागाळातल्या युवा वर्गाला बळ मिळाले आहे. या योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे 1.5 कोटी तरुणांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. ते पुढे म्हणाले की, औद्योगिक क्लस्टर्सच्या परिसरामध्ये नवीन कौशल्य केंद्रे देखील स्थापन केली जात आहेत ज्यामुळे उद्योगांना त्यांच्या गरजा कौशल्य विकास संस्थांसोबत सामायिक करता येतील, ज्यामुळे तरुणांमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधींसाठी आवश्यक कौशल्य संच विकसित होतील.
कौशल्य, अद्ययावत कौशल्य विकसित करणे आणि गरजेनुसार पुन्हा कौशल्य शिकून घेणे याचे महत्त्व अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी युवकांना सांगितले की, वेगाने बदलणाऱ्या मागण्या आणि नोकऱ्यांचे स्वरूप लक्षात घेतले जावे. तसेच त्यानुसार कौशल्ये अद्ययावत करण्यावर भर दिला जावा. त्यामुळे उद्योग, संशोधन आणि कौशल्य विकास संस्थांनी सध्याच्या काळाशी सुसंगत असणे अत्यंत गरजेचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. कौशल्यांवर असलेला सुधारित भर लक्षात घेऊन पंतप्रधानांनी सांगितले की, गेल्या 9 वर्षांत देशात सुमारे 5 हजार नवीन आयटीआय स्थापन करण्यात आल्या असून त्यात 4 लाखांहून अधिक नवीन आयटीआय जागांची भर पडली आहे. उत्तम पद्धतींसह कार्यक्षम आणि उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थांना मॉडेल आयटीआय म्हणून अद्ययावत केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“कौशल्य विकासाची व्याप्ती भारतात सातत्याने वाढत आहे.आपण केवळ यांत्रिक, अभियंते, तंत्रज्ञान किंवा इतर कोणत्याही सेवेपुरते मर्यादित नाही”,असे सांगत ड्रोन तंत्रज्ञानासाठी महिला बचतगटांना तयार केले जात असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. आपल्या दैनंदिन जीवनात विश्वकर्मांचे महत्त्व अधोरेखित करत मोदी यांनी पीएम विश्वकर्मा योजनेचा उल्लेख केला या माध्यमातून विश्वकर्मांच्या पारंपरिक कौशल्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि साधनांशी जोडले जात आहे, असे ते म्हणाले.
भारताच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असताना तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.भारतातील रोजगार निर्मितीने नवी उंची गाठली आहे आणि नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणानुसार भारतातील बेरोजगारीचा दर 6 वर्षातील नीचांकी पातळीवर आहे, असे त्यांनी सांगितले. भारतातील ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागात बेरोजगारी झपाट्याने कमी होत आहे याकडे लक्ष वेधत, विकासाचे फायदे गावे आणि शहरे दोन्ही पर्यंत बरोबरीने पोहोचत आहेत आणि परिणामी गावे आणि शहरांमध्ये नवीन संधी समान प्रमाणात वाढत आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला.त्यांनी भारतातील कर्मचाऱ्यांमध्ये महिलांच्या सहभागात अभूतपूर्व वाढ झाल्याकडे लक्ष वेधले आणि महिला सक्षमीकरणासंदर्भात गेल्या काही वर्षांत भारतात सुरू केलेल्या योजना आणि मोहिमांच्या प्रभावाला याचे श्रेय दिले.
येत्या काही वर्षांत भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहील, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी सांगितले. भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये घेऊन जाण्याच्या आपल्या संकल्पाचीही त्यांनी आठवण करून दिली आणि पुढील 3-4 वर्षांत भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला देखील आहे, असे ते म्हणाले. यातून देशात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असे त्यांनी अधोरेखित केले.
भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी स्मार्ट आणि कुशल मनुष्यबळ उपाय प्रदान करण्यासाठी भारताला जगातील कुशल मनुष्यबळाचे सर्वात मोठे केंद्र बनवण्यावर भर दिला. “शिकण्याची, शिकवण्याची आणि पुढे जाण्याची प्रक्रिया सुरु राहिली पाहिजे. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर तुम्ही यशस्वी व्हा”, अशी सदिच्छा व्यक्त करत पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.
PM @narendramodi’s remarks at the Kaushal Deekshant Samaroh. https://t.co/3UFW8IpabG
— PMO India (@PMOIndia) October 12, 2023
S.Patil/Radhika/Suvarna/Sonal C/P.Malandkar
PM @narendramodi’s remarks at the Kaushal Deekshant Samaroh. https://t.co/3UFW8IpabG
— PMO India (@PMOIndia) October 12, 2023