Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 19,260 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 19,260 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण


नवी दिल्‍ली, 2 ऑक्‍टोबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे सुमारे 19,260 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले.  या प्रकल्पांमध्ये दिल्ली-वडोदरा द्रुतगती मार्गाचे समर्पण,पंतप्रधान आवास  योजना-ग्रामीण अंतर्गत बांधण्यात आलेल्या 2.2 लाखांहून अधिक घरांचे गृहप्रवेश आणि पंतप्रधान आवास  योजना – शहरी अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांचे लोकार्पण, जल जीवन मिशन प्रकल्पांची पायाभरणी, आयुष्मान भारत आरोग्य विषयक  पायाभूत सुविधा अभियानांतर्गत 9 आरोग्य केंद्रांची पायाभरणी, आयआयटी इंदूरच्या शैक्षणिक इमारतीचे लोकार्पण  आणि संकुलातील  वसतिगृह आणि इतर इमारतींसाठी पायाभरणी आणि इंदूरमध्ये मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी यांचा समावेश आहे.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी ग्वाल्हेरची भूमी शौर्य, स्वाभिमान, अभिमान, संगीत, स्वाद आणि मोहरीचे प्रतीक असल्याचे नमूद केले.  या भूमीने देशासाठी अनेक क्रांतिकारक तसेच सशस्त्र दलात सेवा देणारे सैनिक घडवले आहेत असे त्यांनी अधोरेखित केले.  ग्वाल्हेरच्या भूमीने सत्ताधारी पक्षाची धोरणे आणि नेतृत्वाला आकार दिल्याचे सांगून राजमाता विजया राजे सिंधिया, कुशाभाऊ ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांची उदाहरणे दिली. “ग्वाल्हेरची भूमी ही स्वतःच एक प्रेरणा आहे”, असे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सांगितले की, या भूमीच्या  सुपुत्रांनी देशासाठी बलिदान दिले.

या पिढीतील लोकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्याची संधी जरी  मिळाली नसली तरी भारताला विकसित आणि समृद्ध बनवण्याची जबाबदारी निश्चितच आपल्यावर आहे असे पंतप्रधान म्हणाले. ज्या प्रकल्पांचे आज लोकार्पण करण्यात आले किंवा ज्यासाठी पायाभरणी करण्यात आली त्या प्रकल्पांबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, सरकारने एका दिवसात इतके प्रकल्प आणले आहेत जी अनेक सरकारे एका वर्षात आणू शकली नाहीत.

दसरा, दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या आधी सुमारे 2 लाख कुटुंबे गृहप्रवेश करत आहेत आणि यासोबतच संपर्क सुविधांचे अनेक प्रकल्प सादर केले जात आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. उज्जैनमधील विक्रम उद्योगपुरी आणि मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कमुळे मध्य प्रदेशच्या औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असे ते म्हणाले. त्यांनी भारतीय तंत्रज्ञान संस्था ग्वाल्हेर येथील नवीन प्रकल्पांचा उल्लेख केला. आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अंतर्गत विदिशा, बैतुल, कटनी, बुरहानपूर, नरसिंगपूर, दमोह आणि शाजापूर येथील नवीन आरोग्य केंद्रांबद्दल त्यांनी माहिती दिली.

पंतप्रधानांनी या सर्व विकास प्रकल्पांचे श्रेय दुहेरी इंजिनच्या सरकारच्या प्रयत्नांना दिले. दिल्ली आणि भोपाळ या दोन्ही ठिकाणी जनतेच्या हितासाठी समर्पण हे समान तत्त्वे असलेले सरकार असते तेव्हा विकासाचा वेग वाढतो, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. त्यामुळेच मध्य प्रदेशातील जनतेचा दुहेरी इंजिन सरकारवर विश्वास असल्याचे पंतप्रधान म्हणाले. “ दुहेरी इंजिन म्हणजे मध्य प्रदेशचा दुहेरी विकास”, असे पंतप्रधान म्हणाले.

गेल्या काही वर्षांत, सरकारने मध्य प्रदेशला ‘बिमारू राज्य’ (मागास राज्य) या स्थितीपासून देशातील पहिल्या 10 राज्यांपैकी एक बनवले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. “आणि आता मध्य प्रदेशला येथून भारतातील पहिल्या 3 राज्यांमध्ये स्थान मिळवून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.” असे पंतप्रधानांनी सांगितले. प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक म्हणून मतदान करावे, जेणेकरून मध्य प्रदेश पहिल्या 3 राज्यांच्या यादीत समाविष्ट होईल, असे आवाहन त्यांनी केले.

जग आपले भविष्य भारतात पाहत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारत अवघ्या 9 वर्षांच्या कालावधीत 10 व्या स्थानावरून प्रगती करत 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, यांची त्यांनी आठवण करून दिली. ज्यांचा भारताच्या विजयी क्षणावर विश्वास नाही, त्यांच्यावर पंतप्रधानांनी टीका केली. “मोदी सरकारच्या पुढील कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये सामिल होईल, ही मोदींची हमी आहे.” असे पंतप्रधान म्हणाले.

“मोदी सरकारने गरीब, दलित, मागासलेल्या आणि आदिवासी कुटुंबांना पक्क्या घरांची हमी दिली आहे” हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आतापर्यंत देशातील 4 कोटी कुटुंबांना पक्की घरे देण्यात आली आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत गरीब कुटुंबांना लाखो घरे दिली गेली आहेत आणि आजही अनेक घरांचे उद्घाटन झाले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मागील सरकारच्या कार्य प्रणालीवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी फसव्या योजना आणि गरिबांना देण्यात आलेल्या घरांच्या निकृष्ट दर्जाबद्दल खेद व्यक्त केला. याउलट, सध्याच्या सरकारच्या काळात दिलेली घरे लाभार्थ्यांच्या गरजेनुसार बांधली जात आहेत आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीवर लक्ष ठेवून घर बांधणीसाठी दिले जाणारे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या घरांमध्ये शौचालये, वीज, नळाद्वारे पाणीपुरवठा जोडणी आणि उज्ज्वला गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले. आजच्या जल जीवन मिशन प्रकल्पांवर बोलताना पंतप्रधान म्हणाले की हा प्रकल्प या घरांना पाणी पुरवठा करण्यात मदत करेल. ही घरे घरातील महिलांच्या नावावर असल्याची खात्री करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे कोट्यवधी बहिणी ‘लखपती’ झाल्या आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी या घरांच्या महिला मालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले.

“महिला सक्षमीकरण, हे मत बँकेच्या मुद्द्याऐवजी राष्ट्र पुनर्निर्माण आणि राष्ट्र कल्याणाची मोहीम आहे,” असे पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले. संसदेत नुकत्याच मंजुरी मिळालेल्या ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ चा दाखला देत पंतप्रधान म्हणाले, “मोदींची हमी म्हणजे सर्व हमींच्या पूर्ततेची हमी”. देशाच्या विकासाच्या वाटचालीत मातृशक्तीचा अधिकाधिक सहभाग असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान म्हणाले की, ग्वाल्हेर आणि चंबळ ही दोन्ही शहरे आता, नवनवीन संधीची भूमी बनत चालली आहेत, मागील काळातल्या अराजकता, मागासलेपणा निर्माण करणाऱ्या आणि सामाजिक न्यायाचे खच्चीकरण करणाऱ्या सरकारच्या नंतर आलेल्या सरकारच्या कठोर परिश्रमाचे हे परिणाम आहेत, आता मागे वळून पाहणे आपल्याला परवडणारे नाही.

“आधुनिक पायाभूत सुविधा आणि मजबूत कायदा आणि सुव्यवस्थेचा शेतकरी आणि उद्योग दोघांनाही फायदा होतो”,  असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले, मात्र विकासाचा विरोध करणारे सरकार अस्तित्वात आले तर या दोन्ही यंत्रणा कोलमडतात.” असेही त्यांनी नमूद केले. विकासाचा विरोध करणारे सरकार हे गुन्हेगारी आणि तुष्टीकरणाला देखील जन्म देते, ज्यामुळे गुंड प्रवृत्ती, गुन्हेगार, दंगलखोर आणि भ्रष्ट लोकांना अधिक वाव मिळतो, ज्यामुळे महिला, दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींवरील अत्याचारात वाढ होते. मध्य प्रदेशातील जनतेने अशा विकासविरोधी घटकांपासून सावध राहावे असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

वंचितांना प्राधान्य देण्याच्या सरकारच्या धोरणाचा दाखला देताना पंतप्रधान म्हणाले, “आमचे सरकार प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक क्षेत्रापर्यंत विकास पोहोचण्यासाठी समर्पित आहे. ज्यांची कोणी कधी पर्वा केली नाही, त्यांची काळजी मोदी घेतात, मोदी त्यांची पूजा करतात. यावेळी पंतप्रधानांनी दिव्यांगांसाठीच्या आधुनिक उपकरणांविषयीच्या आणि त्यांच्यासाठीच्या सामान्य सांकेतिक भाषेच्या विकासासारख्या  उपाययोजनांचा उल्लेख केला. आज ग्वाल्हेरमध्ये दिव्यांग खेळाडूंसाठी नवीन क्रीडा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच अनेक दशकांपासून अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात होते, मात्र आता पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून सरकारने आतापर्यंत देशातील प्रत्येक लहान शेतकऱ्याच्या खात्यावर २८ हजार रुपये पाठवले असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या देशात 2.5 कोटी छोटे शेतकरी भरडधान्य पिकवतात. यापूर्वी भरड धान्य पिकवणार्‍या छोट्या शेतकर्‍यांकडे कोणी लक्ष देत नव्हते. आमच्या सरकारनेच भारतीय खाद्यपदार्थांमध्ये भरड धान्यांना  नवीन ओळख मिळवून दिली आणि आता हेच भरड धान्य आम्ही जगभरातील बाजारपेठेत पोचवले आहे,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.

पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजनेबद्दलही माहिती दिली. याचा फायदा कुंभार, लोहार, सुतार, सोनार, माळी, शिंपी, धोबी, चर्मकार आणि नाभिक यांना होईल. समाजातील हा वर्ग मागे राहिला आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. “त्यांना पुढे आणण्यासाठी मोदींनी मोठी मोहीम उघडली आहे” असे ते म्हणाले. त्यांच्या प्रशिक्षणाचा खर्च सरकार उचलणार असून आधुनिक उपकरणांसाठी 15,000 रुपयेही देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांना लाखो रुपयांचे स्वस्त कर्ज दिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.  “मोदींनी विश्वकर्मांच्या कर्जाची हमी घेतली आहे”, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी दुहेरी इंजिन सरकारचा भविष्याभिमुख दृष्टिकोन अधोरेखित केला आणि मध्य प्रदेशला देशातील सर्वोच्च राज्यांमध्ये आणण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, डॉ वीरेंद्र कुमार आणि ज्योतिरादित्य सिंधिया, संसद सदस्य तसेच मध्य प्रदेश सरकारचे मंत्री यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

देशभरातील संपर्क व्यवस्थेला चालना देण्यासाठी आणखी एका उपक्रमा अंतर्गत, दिल्ली-वडोदरा द्रुतगती मार्ग पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केला.  सुमारे 11,895 कोटी रुपये खर्चून तो विकसित करण्यात आला आहे. 1880 कोटी रुपयांच्या पाच वेगवेगळ्या रस्ते प्रकल्पांची पायाभरणीही ते करणार आहेत.

प्रत्येकाचे स्वतःचे हक्काचे घर असावे, हा पंतप्रधानांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.  या अनुषंगाने, पंतप्रधान आवास योजना (PMAY) – ग्रामीण अंतर्गत बांधलेल्या 2.2 लाखांहून अधिक घरांचा गृहप्रवेश पंतप्रधानांच्या हस्ते झाला. PMAY – शहरी अंतर्गत सुमारे 140 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या घरांचेही त्यांनी लोकार्पण केले.

सुरक्षित आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे सरकारच्या मुख्य प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. या उद्दिष्टा अंतर्गत, ग्वाल्हेर आणि श्योपूर जिल्ह्यात 1530 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या जल जीवन मिशन प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. संबंधित प्रकल्पांचा या भागातील 720 गावांना फायदा होणार आहे.

आरोग्य पायाभूत सुविधांना आणखी चालना देण्यासाठी, आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानांतर्गत नऊ आरोग्य केंद्रांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली. 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून ते विकसित केले जातील. 

पंतप्रधानांनी, आयआयटी इंदूरच्या शैक्षणिक इमारतीचे लोकार्पण केले आणि प्रांगणातील  वसतिगृह तसेच इतर इमारतींची पायाभरणी केली. इंदूर येथे बहुआयामी दळणवळण केन्द्राचीही त्यांनी पायाभरणी केली. उज्जैनमधील एकात्मिक औद्योगिक वसाहत, आयओसीएल बॉटलिंग प्रकल्प आणि ग्वाल्हेर येथील अटलबिहारी वाजपेयी दिव्यांग क्रीडा प्रशिक्षण केंद्र, यासह इतर प्रकल्पही त्यांनी राष्ट्राला समर्पित केले.

 

 

* * *

S.Patil/Sushma/Shraddha/Vikas/Vinayak/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai