पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 ऑक्टोबर, 2023 रोजी राजस्थान आणि मध्य प्रदेशला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे 10:45 वाजता, पंतप्रधान राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये सुमारे 7,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.
दुपारी 3:30 वाजता, पंतप्रधान ग्वाल्हेरला पोहोचतील. तिथे ते सुमारे 19,260 कोटी रुपयांच्या अनेक विकास उपक्रमांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.
चित्तोडगडमध्ये पंतप्रधान
गॅस-आधारित अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल म्हणून, मेहसाणा – भटिंडा – गुरुदासपूर गॅस पाइपलाइनचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केले जाईल. सुमारे 4500 कोटी रुपये खर्चून ही पाइपलाइन बांधण्यात आली आहे. पंतप्रधान अबू रोड येथे एचपीसीएलचा एलपीजी प्रकल्पही समर्पित करतील. या प्रकल्पात दरवर्षी 86 लाख सिलिंडर्स भरले जातील आणि वितरित केले जातील. यामुळे दरवर्षी सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकच्या प्रवासात 0.75 दशलक्ष किमी ने घट होईल,त्याचबरोबर दरवर्षी सुमारे 0.5 दशलक्ष टन कार्बन डायॉक्साईड चे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. अजमेर बॉटलिंग प्लांट, आयओसीएल येथे अतिरिक्त साठवणूक सुविधेचेही लोकार्पण करतील.
दरा -झालावाड -तीन धार मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग –12 (नवीन एनएच –52) वरील चौपदरी रस्त्याचे पंतप्रधान लोकार्पण करतील, यासाठी 1480 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च आला आहे. या प्रकल्पामुळे कोटा आणि झालावाड जिल्ह्यांतील खाणींमधील उत्पादनांची वाहतूक सुलभ होईल. तसेच , सवाई माधोपूर येथे रेल्वे ओव्हर ब्रिजच्या दोन पदरी ऐवजी चार पदरी बांधकाम आणि रुंदीकरणाची पायाभरणीही केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येतून दिलासा मिळणार आहे.
पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलेल्या रेल्वे प्रकल्पांमध्ये चित्तौडगड-नीमच रेल्वे मार्ग आणि कोटा- चित्तौडगड विद्युतीकरण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचा समावेश आहे. हे प्रकल्प 650 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पूर्ण करण्यात आले असून त्यामुळे या प्रदेशातील रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत होतील . ते राजस्थानमधील ऐतिहासिक स्थळांच्या पर्यटनालाही चालना देणार आहेत.
स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत नाथद्वारा इथे विकसित केलेल्या पर्यटन सुविधा पंतप्रधान समर्पित करतील. संत वल्लभाचार्यांनी प्रचार केलेल्या पुष्टीमार्गाच्या लाखो अनुयायांसाठी नाथद्वारा हे प्रमुख श्रद्धास्थान आहे. नाथद्वारा इथे एक आधुनिक ‘पर्यटन व्याख्या आणि सांस्कृतिक केंद्र‘ विकसित करण्यात आले आहे. इथे पर्यटकांना श्रीनाथजींच्या जीवनातील विविध पैलूंचा अनुभव घेता येईल. याशिवाय, पंतप्रधान कोटा इथल्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेचे कायमस्वरूपी प्रांगणही राष्ट्राला समर्पित करतील.
पंतप्रधानांची ग्वाल्हेर भेट
पंतप्रधान सुमारे 19,260 कोटी रुपयांच्या अनेक विकास उपक्रमांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील.
आणखी एका उपक्रमाच्या माध्यमातून देशभरात दळणवळणाला चालना देण्यासाठी पंतप्रधान दिल्ली-वडोदरा द्रुतगती मार्ग राष्ट्राला समर्पित करतील. हा मार्ग विकसित करण्यासाठी सुमारे 11,895 कोटी रुपये खर्च आला आहे. पंतप्रधान 1880 कोटी रुपये खर्चाच्या पाच वेगवेगळ्या रस्ते प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत.
प्रत्येकाचे स्वतःचे घर असावे, हा पंतप्रधानांचा कायम प्रयत्न राहिला आहे. या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण अंतर्गत बांधण्यात आलेल्या 2.2 लाखांहून अधिक घरांचा गृहप्रवेश पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना- शहरी अंतर्गत सुमारे 140 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या घरांचे लोकार्पण सुद्धा पंतप्रधान करतील.
सुरक्षित आणि पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे सरकारच्या मुख्य उद्दिष्ट क्षेत्रांपैकी एक आहे. या उद्दिष्टाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान ग्वाल्हेर आणि शेओपूर जिल्ह्यात 1530 कोटी रुपये खर्चाच्या जल जीवन मिशन प्रकल्पांची पायाभरणी करतील. या प्रकल्पांमुळे या भागातील एकूण 720 गावांना लाभ मिळणार आहे.
आरोग्य पायाभूत सुविधांना आणखी चालना देण्यासाठी आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानांतर्गत पंतप्रधान नऊ आरोग्य केंद्रांची पायाभरणी करतील. 150 कोटी रुपयांहून जास्त खर्च करून ही केंद्र विकसित केली जातील.
पंतप्रधान इंदूर इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या शैक्षणिक इमारतीचे लोकार्पण करतील तसेच या प्रांगणातील वसतिगृह आणि इतर इमारतींची पायाभरणी करतील. याशिवाय, पंतप्रधान इंदूर इथे मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्कची पायाभरणी करतील. उज्जैनमध्ये एकात्मिक औद्योगिक शहरसंकुल , IOCL बाटलीबंद प्रकल्प, ग्वाल्हेर इथे अटलबिहारी वाजपेयी दिव्यांग क्रीडा प्रशिक्षण केंद्र, यासह इतर प्रकल्पांचे राष्ट्रार्पण करतील.
***
JPS/S.Kane/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai