Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळ्याला केले संबोधित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळ्याला केले संबोधित


नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  दूरदृश्य प्रणालीमार्फत रोजगार मेळ्यांतर्गत नवनियुक्त उमेदवारांना सुमारे 51,000 नियुक्ती पत्रांचे वितरण केले आणि   उमेदवारांना संबोधितही केले. देशभरातून निवडले गेलेले कर्मचारी टपाल विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध मंत्रालये/विभागांमध्ये सरकारी सेवेत रुजू होणार आहेत. देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळे आयोजित करण्यात आले आहेत.

या प्रसंगी संबोधित करताना, पंतप्रधानांनी आज नियुक्ती पत्रे मिळालेल्यांचे अभिनंदन केले. हे सर्व जण त्यांचे अथक परिश्रम आणि निष्ठेच्या जोरावर येथपर्यंत पोहोचले असून लाखो उमेदवारांमधून ते निवडले गेले आहेत, देशभरात सध्या गणेशोत्सव साजरा केला जात असताना या नवनियुक्तांच्या नवीन आयुष्याचा श्री गणेशा  अशा मंगल समयी होत आहे, असे  पंतप्रधान म्हणाले. श्री गणेश हा सर्व मनोकामना पूर्ण करणारा सिद्धिदाता असून नवनियुक्त उमेदवारांची सेवेप्रती असलेली निष्ठा देशाला आपल्या  उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी सक्षम करेल, असे पंतप्रधानांनी सांगितले.

देश अनेक ऐतिहासिक कामगिरींचा साक्षीदार होत आहे असे सांगून पंतप्रधानांनी  देशातील निम्म्या लोकसंख्येला सक्षम करणाऱ्या नारी शक्ती वंदन विधेयकाचा  उल्लेख केला. गेल्या 30 वर्षांपासून रखडलेले महिला आरक्षण विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विक्रमी मताधिक्याने संमत झाले. नवीन संसद भवनाच्या पहिल्याच सत्रात या निर्णयाला मूर्त स्वरूप प्राप्त झाले म्हणजे एका अर्थी नवीन संसद भवनात संमत झालेले नारी शक्ती विधेयक हा देशासाठी एक नवीन प्रारंभ ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.

नवनियुक्तांमध्ये महिला उमेदवारांच्या  उल्लेखनीय उपस्थितीबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. देशाच्या कन्या प्रत्येक क्षेत्रात नाव कमवत आहेतनारीशक्तीच्या यशाचा मला अपार अभिमान वाटतो आणि सरकारच्या योजना त्यांच्या विकासासाठी नवनवीन दालने खुली करत आहेत, कोणत्याही क्षेत्रात महिलांचा असलेला सहभाग हा त्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणतो  असे पंतप्रधान म्हणाले.

नव भारताच्या वाढत्या आशा आकांक्षांचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, या नवीन भारताची स्वप्ने उदात्त आहेत. 2047 पर्यंत विकसित भारत होण्याचा देशाचा निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले. येत्या काही वर्षात आपला देश जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल आणि आगामी काळात सरकारी कर्मचाऱ्यांना खूप योगदान द्यावे लागेल असे सांगून या कर्मचाऱ्यांनी  नागरिक प्रथम या दृष्टिकोनाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे पंतप्रधानांनी सांगितले. वर्तमानातील नवनियुक्त हे तंत्रज्ञानाच्या युगातच वाढले असून त्यांनी  त्यांच्या कार्यक्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर आणि प्रशासनाची कार्यक्षमता सुधारण्यावर भर द्यावा, असे पंतप्रधान म्हणाले.

प्रशासनातील तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल अधिक सांगताना पंतप्रधानांनी ऑनलाईन रेल्वे आरक्षण, आधार कार्ड मुळे कागदपत्रांच्या जटिलतेतून झालेली मुक्तता, ई के वाय सी, डिजिलॉकर सुविधा, बिल देयके, थेट लाभ हस्तांतरण आणि डिजियात्रा यांचा उल्लेख केला. तंत्रज्ञानामुळे भ्रष्टाचार थांबला, विश्वासार्हता वाढीला लागली, जटिलता कमी झाली आणि सुसह्यता देखील वाढली, असे पंतप्रधान म्हणाले. नवनियुक्तांनी या दिशेने आणखी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

गेल्या 9 वर्षात सरकारची धोरणे नवीन मानसिकता, सातत्यपूर्ण  देखरेख, अभियान स्तर अंमलबजावणी आणि लोकसहभाग, यावर  आधारित असून त्याद्वारे  महत्त्वपूर्ण  उद्दिष्टे पूर्ण करण्याचा मार्ग प्रशस्त झाला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  स्वच्छ भारत आणि जल जीवन अभियानासारख्या मोहिमांची उदाहरणे देताना, पंतप्रधानांनी व्याप्ती किंवा लाभ अधिकधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारच्या अभियान स्तर अंमलबजावणीच्या दृष्टिकोनावर(मिशन मोड इम्प्लिमेंटेशन अँप्रोच) प्रकाश टाकला. देशभरातील प्रकल्पांवर सातत्यपूर्ण देखरेख  ठेवली  जात असल्याची माहितीही त्यांनी दिली आणि प्रगती या मंचाचे  उदाहरण दिले.   पंतप्रधान स्वत: या मंचाद्वारे  प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष ठेवतात . सरकारी कर्मचाऱ्यांवर  सरकारी योजना प्रत्यक्षात राबविण्याची सर्वोच्च जबाबदारी असते, यावर त्यांनी भर दिला.  जेव्हा लाखो तरुण सरकारी सेवेत येतात  तेव्हा धोरण अंमलबजावणीचा वेग आणि व्याप्ती वाढते, ज्यामुळे सरकारी क्षेत्राबाहेरील रोजगाराला चालना मिळते आणि नवीन स्वरूपाचे रोजगार सुरू होतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

जीडीपी वृद्धी आणि उत्पादन व निर्यातीतील वाढ,याबद्दल  बोलताना पंतप्रधानांनी आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये अभूतपूर्व गुंतवणुकीचा उल्लेख केला. नवीकरणीय ऊर्जा, सेंद्रिय शेती, संरक्षण आणि पर्यटन यांसारख्या भरभराटीला येत असलेल्या क्षेत्रांबद्दल त्यांनी सांगितले. भारताचे आत्मनिर्भर अभियान मोबाईल फोनपासून विमानवाहू युद्धनौकांपर्यंत, कोरोना प्रतिबंधक  लसीपासून ते लढाऊ विमानांपर्यंतच्या क्षेत्रात परिणाम दाखवत आहे. आज तरुणांसाठी नवनवीन संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाच्या आणि  नोकरीत समाविष्ट झालेल्या नव्या उमेदवारांच्या जीवनात अमृत काळातील पुढील 25 वर्षांचे महत्त्व पंतप्रधानांनी पुन्हा अधोरेखित केले. पंतप्रधानांनी त्यांना सांघिक कार्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यास सांगितले. जी 20 मधून  आपली  परंपरा, संकल्प आणि आदरातिथ्य उत्तम प्रकारे प्रतीत झाले. हे यश देखील विविध खासगी आणि सार्वजनिक  विभागांचे यश आहे. जी 20 च्या यशासाठी प्रत्येकाने एक संघ म्हणून काम केले. मला आनंद आहे की आज तुम्हीही सरकारी कर्मचाऱ्यांच्या टीम इंडियाचा भाग बनत आहात, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भर्ती झालेल्या व्यक्तींना  थेट सरकारसोबत काम करण्याची संधी आहे हे लक्षात घेऊन त्यांनी आपला  शिकण्याचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी  iGOT कर्मयोगी पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी  केले. भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी नवनियुक्त उमेदवारांचे  आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले आणि पुढील 25 वर्षांत विकसित राष्ट्राचा संकल्प घेण्याचे आवाहन केले.

पार्श्वभूमी

देशभरात 46 ठिकाणी रोजगार मेळा आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला पाठिंबा  देणाऱ्या  केंद्र सरकारच्या विभागांमध्ये आणि राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही भर्ती प्रक्रिया झाली. टपाल  विभाग, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग, अणुऊर्जा विभाग, महसूल विभाग, उच्च शिक्षण विभाग, संरक्षण मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यासह विविध सरकारी मंत्रालये/विभागांमध्ये देशभरातून निवडण्यात आलेले उमेदवार या कार्यक्रमात सहभागी झाले.

रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेची पूर्तता करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. रोजगार मेळा अधिक रोजगार निर्मितीमध्ये उत्प्रेरक म्हणून भूमिका बजावताना तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्याची  अपेक्षा आहे.

नवनियुक्त उमेदवारांना  iGOT कर्मयोगी पोर्टलवरील ऑनलाइन मॉड्यूल कर्मयोगी प्रारंभद्वारे स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी देखील मिळते.  यात  680 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम ‘कुठल्याही कोणत्याही डिव्हाइसवर’  अध्ययन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

 

 

Jaydevi PS/B.Sontakke/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai