पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नऊ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. ह्या वंदे भारत गाड्या म्हणजे, देशभरातील दळणवळण व्यवस्था सुधारणे आणि रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देणे, या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या परिपूर्तीच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. आज ज्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले, त्या खालीलप्रमाणे :
1. उदयपूर – जयपूर वंदे भारत एक्सप्रेस
2. तिरुनेलवेली-मदुराई- चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस
3. हैदराबाद-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस
4. विजयवाडा – चेन्नई (रेणूगुंटा मार्गे) वंदे भारत एक्सप्रेस
5. पाटणा – हावडा वंदे भारत एक्सप्रेस
6. कासारगोड – तिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस
7. राउरकेला – भुवनेश्वर – पुरी वंदे भारत एक्सप्रेस
8. रांची – हावडा वंदे भारत एक्सप्रेस
9. जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस
या नऊ वंदे भारत गाड्यांचा एकाचवेळी शुभारंभ होणे म्हणजे देशातील आधुनिक दळणवळण सुविधा क्षेत्रासाठी अभूतपूर्व प्रसंग आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. “देशातल्या पायाभूत सुविधांच्या विकासाची ही गती आणि व्याप्ती, 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांशी तंतोतंत जुळणारी आहे.” असे पंतप्रधान म्हणाले. आज सुरू झालेल्या गाड्या अधिक आधुनिक आणि आरामदायी आहेत, असे त्यांनी सांगितले. या वंदे भारत गाड्या नव्या भारताच्या नव्या उत्साहाचे प्रतीक आहेत, असे ते म्हणाले. वंदे भारत विषयी लोकांमधील वाढत्या आकर्षणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. वंदे भारत गाड्यांमधून आतापर्यंत एक कोटी अकरा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची माहितीही त्यांनी दिली.
आज 25 वंदे भारत गाड्या, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकांना सेवा देत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यात आज आणखी नऊ वंदे भारत जोडल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले. “वंदे भारत देशातील प्रत्येक भागाला एकमेकांशी जोडेल तो दिवस दूर नाही”, असे ते पुढे म्हणाले. ज्यांना आपला वेळ वाचवण्याची आणि त्याच दिवशी परतीचा प्रवास करण्याची इच्छा आहे, अशा लोकांसाठी वंदे भारत विशेष उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. वंदे भारतने जोडलेल्या ठिकाणी,पर्यटनातही वाढ झाली असून त्यामुळे तिथल्या अर्थकारणाला चालना मिळत असल्याचे, त्यांनी सांगितले.
आज देशात निर्माण झालेले आशा आणि आत्मविश्वासाचे वातावरण आपल्या भाषणातून अधोरेखित करत, प्रत्येक नागरिकाला देशाच्या कामगिरीचा अभिमान वाटत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी चांद्रयान 3 आणि आदित्य L1 च्या ऐतिहासिक यशाचाही उल्लेख केला. तसेच जी 20 च्या यशातून भारतातील लोकशाही, लोकसंख्या आणि विविधता यांच्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडले , असे पंतप्रधान म्हणाले.
नारीशक्ती वंदन कायदा हा महिला संचलित विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून एक निर्णायक क्षण असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. कितीतरी रेल्वे स्थानके महिला कर्मचाऱ्यांकडून चालवली जात आहेत हे सुद्धा त्यांनी या संदर्भात बोलताना नमूद केले.
आत्मविश्वासाने संपन्न भारत, आपल्या वर्तमान आणि भविष्यातल्या गरजांच्या पूर्ततेसाठी एकाच वेळी काम करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. पायाभूत सुविधांच्या विकासात सातत्यपूर्ण समन्वय आणि वाहतूक तसेच निर्यातीशी संबंधित शुल्क कमी करण्यासाठी नवीन लॉजिस्टिक (मालवाहतूक) धोरण, यासाठी पीएम गतिशक्ती महा आराखडा अशा विविध उपक्रमांची जंत्री त्यांनीसादर केली. वाहतुकीचा एक प्रकार दुसऱ्या प्रकाराला पूरक असला पाहिजे असे सांगत त्यांनी वाहतुकीच्या विविध प्रकारांचा समावेश असलेल्या दळणवळण व्यवस्थेबाबत भाष्य केले. सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सुलभ करण्यासाठी हे सर्व प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात रेल्वेचे महत्त्व अधोरेखित करत, पंतप्रधानांनी पूर्वीच्या काळात या महत्त्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. भारतीय रेल्वेच्या कायापालटासाठी सध्याच्या सरकारच्या प्रयत्नांची माहिती देताना, पंतप्रधानांनी वाढीव अर्थसंकल्पाचा उल्लेख केला कारण यंदा रेल्वेसाठीचे बजेट 2014 च्या रेल्वे बजेटच्या 8 पट आहे. त्याचप्रमाणे दुहेरीकरण, विद्युतीकरण आणि नवीन मार्गांचे काम सुरू आहे, असेही ते पुढे म्हणाले.
“विकासाच्या मार्गावर असलेल्या भारताने आता आपल्या रेल्वे स्थानकांचेसुद्धा आधुनिकीकरण करायला पाहिजे” असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. हाच विचार मनात ठेवत पहिल्यांदाच रेल्वे स्थानकांचा विकास आणि आधुनिकीकरणाची मोहीम भारतात सुरु केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी, सध्या विक्रमी संख्येने फुट ओव्हरब्रिजेस(पादचाऱ्यांसाठी, दोन फलाट तसेच रेल्वे स्थानकाला स्थानकाबाहेरील परिसराशी जोडणारे पूल), उद्वाहने आणि सरकते जिने, देशात उभारले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच 500 हून जास्त प्रमुख रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचे काम देशात सुरू झाले. अमृत काळात निर्माण होणारी नवीन रेल्वेस्थानके, अमृत भारत स्थानके म्हणून ओळखली जातील असे पंतप्रधान म्हणाले. “येत्या काळात ही रेल्वे स्थानके नव्या भारताची ओळख बनतील” असेही त्यांनी पुढे सांगितले.
रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकांचा स्थापना दिवस अर्थात रेल्वे स्थानके कधी उभारण्यात आली तो दिवस साजरा करायला सुरुवात केली आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोइंबतूर येथे झालेल्या अशा प्रकारच्या महोत्सवी कार्यक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. कोइंबतूर रेल्वे स्थानकाने 150 वर्षे पूर्ण केली आहेत. “रेल्वे स्थानकांचा वाढदिवस साजरा करण्याची ही नवीन प्रथा यापुढे आणखी जोमाने पाळली जाईल आणि अधिकाधिक लोकांना त्यात सामावून घेतले जाईल” असे ते म्हणाले.
देशाने एक भारत श्रेष्ठ भारत हा ध्यास, संकल्प से सिद्धी अर्थात संकल्पपूर्तीचे माध्यम बनवला आहे असे पंतप्रधान म्हणाले. “2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रत्येक राज्य आणि प्रत्येक राज्यातील लोकांचा विकास आवश्यक आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठामपणे सांगितले. ते पुढे म्हणाले की फक्त रेल्वेमंत्र्याच्याच राज्यात रेल्वे विकासावर भर द्यायच्या स्वार्थी प्रवृत्तीने देशाचे खूप नुकसान केले आहे आणि आता आपल्याला देशातले कुठलेही राज्य अविकसित ठेवणे परवडणारे नाही. “सबका साथ सबका विकास अर्थात सर्वांचे सहकार्य सर्वांचा विकास या ध्यासाने आपण पुढे वाटचाल केली पाहिजे”, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी मेहनती रेल्वे कर्मचाऱ्यांना संबोधित करताना प्रवाशांसाठी प्रत्येक प्रवास संस्मरणीय बनवण्याचे आवाहन त्यांना केले. “रेल्वेच्या प्रत्येक कर्मचार्याने प्रवासाच्या सुलभतेसाठी आणि प्रवाशांना चांगला अनुभव देण्यासाठी कायम संवेदनशील रहावे ”अशी विनंती पंतप्रधानांनी केली.
रेल्वेच्या स्वच्छतेचा नवा दर्जा प्रत्येक नागरिकाच्या लक्षात आला आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता प्रस्तावित स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. 2 ऑक्टोबर ते सरदार पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर या कालावधीत खादी आणि स्वदेशी उत्पादनांच्या खरेदीसाठी स्वतःला समर्पित करण्याचे आणि व्होकल फॉर लोकल अधिक सशक्त करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
“भारतीय रेल्वे आणि समाजात प्रत्येक स्तरावर होत असलेले बदल हे विकसित भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरतील असा मला विश्वास आहे” असे पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाचा समारोप करताना सांगितले.
यावेळी राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री, खासदार आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
या नऊ रेल्वेगाड्यांमुळे राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओदिशा, झारखंड आणि गुजरात या अकरा राज्यांदरम्यान दळणवळण वाढीला लागेल.
या वंदे भारत रेल्वेगाड्या त्यांच्या प्रवासाच्या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वेगाड्या असतील आणि त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचवण्यात सहाय्यभूत ठरतील. सध्या या मार्गांवर धावणाऱ्या सर्वात वेगवान रेल्वेगाड्यांच्या तुलनेत, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस आणि कासारगोड-थिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस सुमारे 3 तासांनी वेगाने धावेल; हैदराबाद-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस 2.5 तासांपेक्षा जास्त वेगाने; तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस 2 तासांपेक्षा जास्त वेगाने; रांची-हावडा वंदे भारत एक्सप्रेस, पाटणा-हावडा वंदे भारत एक्सप्रेस आणि जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस सुमारे 1 तास वेगाने तर उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुमारे अर्धा तास वेगाने धावतील.
देशभरातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांदरम्यान दळणवळण सुधारण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस आणि तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस पुरी आणि मदुराई या महत्त्वाच्या धार्मिक शहरांना जोडतील. तसेच, विजयवाडा – चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस रेणूगुंटा मार्गे धावेल आणि तिरुपती तीर्थक्षेत्राला संपर्क प्रदान करेल.
या वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू केल्याने देशातील रेल्वे सेवेला एक नवा दर्जा प्राप्त होईल. कवच तंत्रज्ञानासह जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेल्या या गाड्या सामान्य जन, व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी समुदाय आणि पर्यटकांना आधुनिक, जलद आणि आरामदायी प्रवासाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतील.
Nine Vande Bharat Express trains being launched today will significantly improve connectivity as well as boost tourism across India. https://t.co/btK05Zm2zC
— Narendra Modi (@narendramodi) September 24, 2023
New Vande Bharat trains will improve connectivity across the country. pic.twitter.com/Buj1AsoY9Q
— PMO India (@PMOIndia) September 24, 2023
वो दिन दूर नहीं, जब वंदेभारत देश के हर हिस्से को कनेक्ट करेगी। pic.twitter.com/39G8ZmkjxW
— PMO India (@PMOIndia) September 24, 2023
***
N.Chitale/R.Aghor/A.Save/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
Nine Vande Bharat Express trains being launched today will significantly improve connectivity as well as boost tourism across India. https://t.co/btK05Zm2zC
— Narendra Modi (@narendramodi) September 24, 2023
New Vande Bharat trains will improve connectivity across the country. pic.twitter.com/Buj1AsoY9Q
— PMO India (@PMOIndia) September 24, 2023
वो दिन दूर नहीं, जब वंदेभारत देश के हर हिस्से को कनेक्ट करेगी। pic.twitter.com/39G8ZmkjxW
— PMO India (@PMOIndia) September 24, 2023