पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिल्लीत भव्य स्वागत करण्यात आले. चांद्रयान – 3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या उतरल्याबद्दल इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमधल्या शास्त्रज्ञांशी संवाद साधल्यानंतर, पंतप्रधानांचे आज बेंगलुरूहून दिल्लीत आगमन झाले. दक्षिण आफ्रिका आणि ग्रीसच्या चार दिवसांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान थेट बेंगलुरू येथे गेले होते. जे पी नड्डा यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले आणि त्यांचा यशस्वी परदेश दौरा व भारतीय शास्त्रज्ञांच्या महत्त्वपूर्ण यशाबद्दल त्यांचा सत्कार केला.
उत्स्फूर्त नागरी स्वागताला उत्तर देताना पंतप्रधानांनी, चांद्रयान-3 च्या यशासंदर्भात लोकांच्या उत्साहाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत साधलेल्या संवादाबद्दल त्यांनी सांगितले. “चांद्रयान-3 चा लँडर ज्या स्थानी उतरला, ते स्थान आता ‘शिव शक्ती’ म्हणून ओळखले जाईल”, अशी माहिती त्यांनी दिली. शिव म्हणजे शुभ आणि शक्ती म्हणजे नारी शक्ती, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवशक्ती म्हणजे हिमालय आणि कन्याकुमारी यांचे नाते. त्याचप्रमाणे 2019 मध्ये ज्या ठिकाणी चांद्रयान 2 ने आपल्या पाऊलखुणा सोडल्या त्या ठिकाणाला आता ‘तिरंगा’ म्हटले जाईल, असे पंतप्रधानांनी सांगितले. त्यावेळीही हा प्रस्ताव आला होता, पण मन तयार होत नव्हते, असे त्यांनी सांगितले. पूर्ण यशस्वी मोहिमेनंतरच चांद्रयान-2 च्या स्थानाला नाव देण्याचा ठराव शांतपणे घेण्यात आला. “तिरंगा प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याचे बळ देतो”, असे पंतप्रधान म्हणाले. 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधानांनी त्यांच्या भेटीदरम्यान जागतिक समुदायाने भारताला दिलेल्या शुभेच्छा आणि अभिनंदनपर संदेश याबाबतही अवगत केले.
भारत आपली कामगिरी आणि यशाच्या बळावर आपला नव्याने प्रभाव पाडत असून जग त्याची दखल घेत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संगितले.
आपल्या ग्रीस भेटीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की 40 वर्षात तिथे जाणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान होते. ग्रीसमधल्या लोकांनी भारताप्रती व्यक्त केलेला स्नेह आणि आदर अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की एका अर्थाने ग्रीस हे भारताचे युरोपमधील महाद्वार ठरेल आणि भारत-युरोपीय महासंघातील संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी ग्रीस एक प्रभावी माध्यम ठरू शकेल.
विज्ञानात युवकांचा अधिकाधिक सहभाग वाढवणे गरजेचे असल्याबद्दल त्यांनी भर दिला, आणि म्हणूनच सुप्रशासन आणि सर्वसामान्य लोकांचे आयुष्य अधिकाधिक सुखकर करण्यासाठी अंतराळ विज्ञानाचा कसा उपयोग करुन घेता येईल, हे बघणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. यासाठी, म्हणजेच, सेवांची अंमलबजावणी, पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी अवकाश विज्ञानाचा कसा उपयोग करुन घेता येईल, हे बघण्यासाठी, सरकारी विभागांची नेमणूक करण्याच्या निर्णयाचा त्यांनी पुनरुच्चार केला. याच संदर्भात, येत्या काही दिवसांत एका हॅकेथॉनचे आयोजन केले जाणार आहे.
एकविसावे शतक हे तंत्रज्ञान-प्रणित शतक आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मार्गावर अधिक दृढतेने पावले टाकावी लागतील, जेणेकरून 2047 सालापर्यंत विकसित भारताचे स्वप्न आपण पूर्ण करु शकू”, असे ते म्हणाले. नवीन पिढीमध्ये वैज्ञानिक वृत्ती रुजविण्यासाठी चांद्रयानाच्या यशामुळे निर्माण झालेला उत्साह, शक्तीमध्ये परिवर्तीत करण्याची गरज आहे. यासाठी 1 सप्टेंबरपासून MyGov वर एक प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली जाईल. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठीही पुरेशा तरतुदी आहेत, असे ते म्हणाले.
आगामी जी-20 शिखर परिषदेसाठी, संपूर्ण देशच यजमान असणार आहे, मात्र जास्त जबाबदारी दिल्लीवर असणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले. “ राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा उंच फडकवत ठेवण्याची संधी दिल्लीला मिळाली आहे, हे आपले सौभाग्य आहे, असे मोदी म्हणाले.
जी-20 परिषद भारताची आतिथ्यशीलता दाखवण्यासाठी अत्यंत महत्वाची संधी आहे, त्यामुळे दिल्लीने ‘अतिथी देवो भव’ या परंपरेचे पालन करायला हवे, असे ते म्हणाले. “5 ते 15 सप्टेंबर दरम्यान इथे अनेक घडामोडी, उपक्रम आयोजित होणार आहेत. त्यामुळे तुम्हा सर्व दिल्लीकरांची गैरसोय होऊ शकेल, त्यासाठी मी अगोदरच तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. एक कुटुंब या नात्याने, येणारे सर्व प्रतिनिधी आपले पाहुणे असतील. आपल्या सर्वांना जी-20 शिखर परिषद एक भव्य यश बनवायचे आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.
आगामी रक्षाबंधनाचा आणि चंद्राला पृथ्वीचा भाऊ मानण्याच्या आपल्या परंपरेचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सर्वांना राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या, आणि या उत्सवात असलेली मजा आणि आनंदाची भावना हीच जगाला आपल्या परंपरांची ओळख करून देत असते. सप्टेंबर महिन्यात जी-20 परिषदा यशस्वी करुन, आपल्या वैज्ञानिकांच्या यशस्वी कामगिरीत आपण आणखी भर घालू , असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला .
Grateful for the warm welcome in Delhi. https://t.co/o9LUiDcojf
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2023
***
M.Pange/S.Kakade/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Grateful for the warm welcome in Delhi. https://t.co/o9LUiDcojf
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2023