गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित जी 20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.
या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधानांनी, भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रातील 2.1 दशलक्ष डॉक्टर, 3.5 दशलक्ष परिचारिका, 1.3 दशलक्ष निमवैद्यकीय कर्मचारी, 1.6 दशलक्ष औषध उत्पादक आणि विक्रेते तसेच इतर लाखो लोकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा उल्लेख करून ,गांधीजींनी आरोग्य हा इतका महत्त्वाचा मुद्दा मानला की त्यांनी या विषयावर ‘की टू हेल्थ‘ (आरोग्याची गुरुकिल्ली) या नावाचे पुस्तक लिहिले, असे पंतप्रधानांनी सांगितले. निरोगी असणे म्हणजे मन आणि शरीर सुसूत्र आणि समतोल स्थितीत असणे म्हणजेच आरोग्य हा जीवनाचा मोठा पाया आहे,असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी संस्कृत ‘श्लोक’ देखील म्हणून दाखवला ज्याचा अर्थ होता: ‘आरोग्य हीच मूलभूत संपत्ती आहे आणि उत्तम आरोग्याने प्रत्येक कार्य पूर्ण करता येते‘.
आपल्या निर्णयांच्या केंद्रस्थानी आरोग्य असायला हवे याचे स्मरण कोविड-19 महामारीने करून दिले आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. औषधे आणि लस वितरण असो किंवा आपल्या लोकांना मायदेशी परत आणणे असो आपल्याला आंतरराष्ट्रीय सहकार्याचे मूल्य देखील काळाने दाखवून दिले आहे. असे त्यांनी सांगितले.
लस मैत्री उपक्रमांतर्गत, भारताने लसींच्या 300 दशलक्ष मात्रा 100 हून अधिक देशांमध्ये वितरित केल्या आहेत , यात ग्लोबल साउथमधील अनेक देशांचा समावेश आहे, असे पंतप्रधानांनी जगाला कोविड-19 लस देण्यासाठी भारत सरकारच्या मानवतावादी पुढाकारावर प्रकाश टाकताना सांगितले.
महामारीच्या काळात लवचिकता हा सर्वात मोठा धडा असल्याचे सांगून ,जागतिक आरोग्य यंत्रणा लवचिक असायला हवी असे पंतप्रधान म्हणाले. आपण आगामी काळातील संभाव्य आरोग्य आणीबाणीच्या प्रतिबंधासाठी, तयारीसाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असले पाहिजे . आजच्या एकमेकांशी जोडलेल्या जगात हे विशेष महत्वाचे आहे. महामारीच्या काळात आपण पाहिले आहे की, जगाच्या एका भागात निर्माण झालेल्या आरोग्य समस्या अत्यंत अल्प काळात जगाच्या इतर सर्व भागांवर परिणाम करू शकतात, असे त्यांनी सांगितले.
“भारतात आम्ही सर्वांगीण आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा अवलंब करत आहोत,” असे पंतप्रधानांनी नमूद केले.आम्ही आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करत असून , पारंपरिक औषध प्रणालींना प्रोत्साहन देत आहोत आणि सर्वांना किफायतशीर आरोग्यसेवा पुरवत आहोत, असे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा जागतिक महोत्सव हा सर्वांगीण आरोग्याच्या सार्वत्रिक इच्छेची साक्ष आहे.यावर्षी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. भारतात ज्याला भरडधान्य किंवा ‘श्री अन्न’ असे ओळखले जाते त्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. सर्वांगीण आरोग्य आणि निरोगीपणा प्रत्येकाची रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यात मदत करू शकतात, असा माझा विश्वास आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गुजरातमधील जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध केंद्राची स्थापना हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आणि, जी 20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीच्या सोबतीने पारंपरिक औषधांवर आधारित जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक परिषद आयोजित केल्याने त्याच्या क्षमतेचा उपयोग करण्यासाठी प्रयत्न आणखी तीव्र होतील. पारंपरिक औषधांचे जागतिक भांडार तयार करण्याचा आमचा संयुक्त प्रयत्न असायला हवा, असेही ते म्हणाले.
आरोग्य आणि पर्यावरण जैविक दृष्ट्या जोडलेले आहेत हे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, स्वच्छ हवा, सुरक्षित पिण्याचे पाणी, पुरेसे पोषण आणि सुरक्षित निवारा हे आरोग्याचे प्रमुख घटक आहेत. हवामान आणि आरोग्यासंबंधी उपक्रमाच्या प्रारंभाच्या दिशेने त्यांनी उचललेल्या पावलांबद्दल पंतप्रधानांनी मान्यवरांचे अभिनंदन केले. अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) च्या धोक्याला तोंड देण्यासाठी उचललेली पावले देखील प्रशंसनीय आहेत, असेही ते म्हणाले.
अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) जागतिक सार्वजनिक आरोग्यासाठी आणि आतापर्यंतच्या औषधनिर्माण क्षेत्राच्या एकंदरीत प्रगतीसाठी एक गंभीर धोका आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. जी 20 आरोग्य कार्यगटाने ”वन हेल्थ” ला प्राधान्य दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. “एक पृथ्वी, एक आरोग्य” ही आमची दृष्टी संपूर्ण परिसंस्थेसाठी म्हणजेच मानव, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणासाठी उत्तम आरोग्याची कल्पना करते. या एकात्मिक दृष्टिकोनातून कोणालाही मागे न ठेवण्याचा गांधीजींचा संदेश प्रतित होतो, असे ते म्हणाले.
आरोग्य उपक्रमांच्या यशामध्ये लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, आपल्या कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेच्या यशाचाही हा एक प्रमुख घटक आहे. क्षयरोग निर्मूलनाचा आपला महत्त्वाकांक्षी उपक्रम देखील लोकसहभागाला प्रोत्साहन देतो, असे त्यांनी सांगितले. आम्ही देशातील लोकांना ‘नि-क्षय मित्र’ किंवा ‘क्षयरोग निर्मूलनासाठी मित्र’ बनण्याचे आवाहन केले असून त्याअंतर्गत नागरिकांनी सुमारे 10 लाख रुग्ण दत्तक घेतले आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
“आता आपण क्षयरोग निर्मूलनाच्या 2030 च्या जागतिक उद्दिष्टाच्या मार्गावर अग्रेसर आहोत,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
सर्वांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी डिजिटल उपाय आणि नवोन्मेषाच्या भूमिकेवर जोर देऊन पंतप्रधान म्हणाले की, आमचे प्रयत्न न्याय्य आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी ते एक उपयुक्त माध्यम आहेत कारण त्याच माध्यमातून दूर-दूरच्या रुग्णांना टेली-मेडिसिनद्वारे दर्जेदार सेवा मिळू शकते. भारताचे राष्ट्रीय व्यासपीठ ई-संजीवनीने आजपर्यंत 140 दशलक्ष टेलि-आरोग्य समुपदेशन केले असल्याची माहिती देऊन पंतप्रधानांनी याबद्दल त्यांचे कौतुक केले.
भारताच्या COWIN व्यासपीठाने मानवी इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पाडली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या व्यासपीठाने 2.2 अब्ज पेक्षा जास्त लस मात्रांचे वितरण आणि जागतिक स्तरावर सत्यापित करण्यायोग्य लसीकरण प्रमाणपत्रांची रिअल-टाइम उपलब्धता व्यवस्थापित केली असल्याचे त्यांनी सांगितले. डिजिटल आरोग्यासंबंधी जागतिक उपक्रमांनी विविध डिजिटल आरोग्य उपक्रमांना एका समान व्यासपीठावर एकत्र आणले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
“आपणही आपल्या नवकल्पना सार्वजनिक हितासाठी खुल्या करुया. निधीचे डुप्लिकेशन टाळूया. तंत्रज्ञानाची समान उपलब्धता सुलभ करूया,” असे आवाहन पंतप्रधानांनी केले. हा उपक्रम ग्लोबल साउथमधील देशांना आरोग्य सेवा वितरणातील तफावत कमी करण्यास मदत करेल तसेच सार्वत्रिक आरोग्य कवच प्रदान साध्य करण्याच्या आमच्या ध्येयाच्या आणखी एक पाऊल जवळ घेऊन जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप संस्कृतमधील मानवतेच्या कल्याणाची कामना करणाऱ्या प्राचीन भारतीय सुभाषिताने केला, ज्याचा भावार्थ, ‘सर्व सुखी होवोत, सर्व आजारमुक्त व्हावेत‘ असा आहे. तुमच्या विचारमंथनात तुम्हाला यश मिळावे अशी माझी इच्छा आहे.” असे पंतप्रधान म्हणाले.
My remarks at the G20 Health Ministers Meeting being held in Gandhinagar. @g20org https://t.co/FI5j9fEu7G
— Narendra Modi (@narendramodi) August 18, 2023
***
S.Patil/S.Chavan.S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai
My remarks at the G20 Health Ministers Meeting being held in Gandhinagar. @g20org https://t.co/FI5j9fEu7G
— Narendra Modi (@narendramodi) August 18, 2023