Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन -2023 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शन -2023 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण


 

मंत्रिमंडळातील माझे सहकारी जी. किशन रेड्डी जी, मीनाक्षी लेखी जी, अर्जुन राम मेघवाल जी, Louvre (लुव्र) संग्रहालयाचे संचालक  मॅन्युअल रबाते जी, जगातील विविध देशांतून आलेले पाहुणे, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज संग्रहालय विश्वातील दिग्गज मंडळी इथे जमली आहेत. आजचा प्रसंगही खास आहे कारण भारत आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा करत आहे.

आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनातही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे  इतिहासाचे वेगवेगळे अध्याय जिवंत होत आहेत. जेव्हा आपण एखाद्या संग्रहालयात जातो तेव्हा आपल्याला असे वाटते की आपल्याला भूतकाळाची, त्या युगाची ओळख होत आहे, आपला संवाद होत आहे. संग्रहालयात दिसते ते वस्तुस्थितीवर आधारित आहे, ते दृश्यमान आहे, ते पुराव्यावर आधारित आहे. संग्रहालयात एकीकडे भूतकाळातून प्रेरणा मिळते आणि दुसरीकडे भविष्याप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याचीही जाणीव होते.

तुमची ही जी संकल्पना आहे – शाश्वतता आणि कल्याण, ही आजच्या जगाच्या प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकते आणि हा कार्यक्रम अधिक प्रासंगिक बनवते. मला खात्री आहे की, तुमच्या प्रयत्नांमुळे तरुण पिढीची संग्रहालयांबद्दलची आवड आणखी वाढेल, त्यांना आपल्या वारशाची ओळख होईल.  या प्रयत्नांसाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

इथे येण्याआधी संग्रहालयात काही क्षण घालवण्याची संधी मिळाली, सरकारी, निमसरकारी अशा अनेक कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळते, पण मी सांगू शकतो की, मनावर प्रभाव निर्माण करणारे संपूर्ण नियोजन, त्याचे शिक्षण आणि सरकारही या दर्जाचे काम करु शकते, जे अभिमानास्पद आहे, अशी व्यवस्था आहे. आणि मला विश्वास आहे की आजचा प्रसंग भारतीय संग्रहालयांच्या जगात एक मोठे परिवर्तानाचे वळण घेईल.  हा माझा ठाम विश्वास आहे.

 

मित्रांनो,

शेकडो वर्षांच्या गुलामगिरीच्या प्रदीर्घ कालखंडात भारताचे असेही नुकसान झाले की आपला बराचसा लिखित आणि अलिखित वारसा नष्ट केला गेला.  गुलामगिरीच्या काळात अनेक हस्तलिखिते, अनेक ग्रंथालये जाळली गेली, नष्ट केली गेली. यात केवळ भारताचेच नुकसान नाही तर संपूर्ण जगाचे, संपूर्ण मानव जातीचे नुकसान झाले आहे. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आपला वारसा जपण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवे होते ते झाले नाहीत.

वारशाविषयी लोकांमध्ये जागरूकता नसल्यामुळे हे नुकसान आणखी वाढले.  आणि म्हणूनच भारताने स्वातंत्र्याच्या अमृतकाळात जाहीर केलेल्या पंच-प्रणांमध्ये मुख्य आहे ते म्हणजे – आपल्या वारशाचा अभिमान! अमृत महोत्सवात भारताचा वारसा जपण्यासोबतच आम्ही नवीन सांस्कृतिक पायाभूत सुविधाही निर्माण करत आहोत.  देशाच्या या प्रयत्नांमध्ये स्वातंत्र्यलढ्याचा इतिहासही आहे, हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसाही आहे.

या कार्यक्रमात तुम्ही स्थानिक आणि ग्रामीण संग्रहालयांना विशेष महत्त्व दिल्याचे मला सांगण्यात आले आहे.  भारत सरकार देखील स्थानिक आणि ग्रामीण संग्रहालये जतन करण्यासाठी विशेष मोहीम राबवत आहे.  आपल्या प्रत्येक राज्याचा, प्रत्येक प्रदेशाचा, प्रत्येक समाजाचा इतिहास जपण्याचा प्रयत्न केला जात आहे.  स्वातंत्र्यलढ्यातील आपल्या आदिवासी समाजाचे योगदान संस्मरणीय करण्यासाठी आम्ही 10 विशेष संग्रहालये देखील बांधत आहोत.

मला वाटते की संपूर्ण जगामध्ये हा असा अनोखा उपक्रम आहे ज्यामध्ये आदिवासी विविधतेची इतकी व्यापक झलक पाहायला मिळणार आहे. मिठाच्या सत्याग्रहावेळी महात्मा गांधीजींनी ज्या मार्गावरून मार्गक्रमण केले होते, तो दांडी मार्गही संरक्षित केला गेला आहे. गांधींजींनी मिठाचा कायदा मोडला त्या ठिकाणी भव्य स्मारक बांधले आहे. आज देशभरातून आणि जगभरातून लोक दांडी कुटीर पाहण्यासाठी गांधीनगरमध्ये येतात.

आपल्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांचे ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झाले, ती जागा गेली अनेक दशके दुर्लक्षित होती.  आमच्या सरकारने दिल्लीतील 5 अलीपूर रोड या जागेचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर केले आहे.  बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडीत पंचतीर्थे, जिथे त्यांचा जन्म झाल ते महू, लंडनमध्ये जिथे ते राहिले, नागपुरात जिथे त्यांनी दीक्षा घेतली, मुंबईत चैत्यभूमी जेथे त्यांची समाधी आहे हे सारे विकसित केले जात आहे. भारतातील 580 हून अधिक संस्थानांना एकत्र करणाऱ्या सरदार साहेबांचा गगनचुंबी पुतळा – स्टॅच्यू ऑफ युनिटी आज देशाचा गौरव आहे.  स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आतही एक संग्रहालय  आहे.

पंजाबमधील जालियनवाला बाग असो, गुजरातमधील गोविंद गुरुजींचे स्मारक असो, उत्तर प्रदेशातील वाराणसीतील मान महल संग्रहालय असो, गोव्यातील ख्रिश्चन कला संग्रहालय असो, अशा अनेक ठिकाणांचे जतन करण्यात आले आहे.  संग्रहालयाशी संबंधित आणखी एक अनोखा प्रयत्न भारतात झाला आहे. आम्ही राजधानी दिल्लीत देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांच्या जीवनप्रवास आणि योगदानाला समर्पित असलेले पीएम-संग्रहालय तयार केले आहे.  स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या विकासाच्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी आज देशभरातून लोक पीएम संग्रहालयात येत आहेत. इथे येणाऱ्या पाहुण्यांना मी विशेष विनंती करेन की, एकदा या संग्रहालयाला भेट द्यावी.

 

मित्रांनो,

जेव्हा एखादा देश आपला वारसा जतन करू लागतो तेव्हा त्याची दुसरी बाजू समोर येते.  हा पैलू आहे इतर देशांबरोबरच्या संबंधांमध्ये जवळीक.  भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर, भारताने त्यांच्या पवित्र अवशेषांचे पिढ्यानपिढ्या जतन केले आहे.  आणि आज ते पवित्र अवशेष केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी  बौद्ध अनुयायांना एकत्र आणत आहेत.

मागच्याच वर्षी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आपण त्यांचे 4 पवित्र अवशेष मंगोलियाला पाठवले होते. हा प्रसंग मंगोलिया देशासाठी आस्थेचे महान पर्व बनला होता.

आपला शेजारी देश श्रीलंकेकडे जे बुद्धांचे पवित्र अवशेष आहेत, बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ते देखील इथे कुशीनगरमध्ये आणण्यात आले होते. याच पद्धतीने गोव्यातील सेंट क्वीन केटेवान यांचे पवित्र अवशेष वारश्याच्या रुपात भारताने जतन करून ठेवले आहेत. जेंव्हा आपण सेंट क्वीन केटेवान यांचे पवित्र अवशेष जॉर्जियाला पाठवले होते तेंव्हा तिथे कसे राष्ट्रीय उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते ते मला अजूनही आठवते. त्या दिवशी जॉर्जियाचे शेकडो नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर जत्रेप्रमाणे  जमले होते. म्हणजेच, आपला वारसा जागतिक  एकतेचा सुत्रधार देखील बनत आहे. आणि म्हणूनच हा वारसा जतन करणाऱ्या आपल्या वस्तू संग्रहालयांची जबाबदारी आणखी वाढली आहे.

 

मित्रांनो,

ज्याप्रमाणे आपण कुटुंबांसाठी आवश्यक असलेल्या वस्तूंची भविष्यासाठी तरतूद करुन ठेवतो, त्याचप्रमाणे आपण संपूर्ण पृथ्वीला एक कुटुंब मानून आपल्या संसाधनांचे जतन केले पाहिजे. या वैश्विक प्रयत्नांमध्ये आपल्या वस्तू संग्रहालयांनी सक्रीय सहभाग घेतला पाहिजे, अशी सूचना मी देऊ इच्छितो. आपल्या धरती मातेने गेल्या काही शतकात अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. त्याच्या आठवणी आणि खूणा आजही अस्तित्वात आहेत. या खुणा, यांच्याशी संबंधित छायाचित्रांची दालने जास्तीत जास्त वस्तू संग्रहालयांमध्ये सुरू करण्याबाबत आपण विचार केला पाहिजे.

आपण वेगवेगळ्या काळात पृथ्वीच्या बदलत्या स्वरूपाचे चित्रण देखील करू शकतो. यामुळे भविष्यात लोकांची पर्यावरणाप्रती जागरूकता देखील वाढेल. या प्रदर्शनात खाद्यपदार्थांशी संबंधित अनुभव घेण्यासाठी दालन भरवण्यात आले असल्याचे मला सांगण्यात आले आहे. इथे लोकांना आयुर्वेदात वर्णित आणि भरड धान्य म्हणजेच श्री अन्न यापासून बनलेल्या अनेक व्यंजनांचा आस्वाद घेता येईल. भारताच्या प्रयत्नांमुळे आयुर्वेद आणि भरडधान्य म्हणजेच श्री अन्न या दोन्हीही सध्याच्या काळात जागतिक चळवळी बनल्या आहेत. आपण श्री अन्न तसेच वेगवेगळ्या वनस्पतींच्या हजारो वर्षांच्या प्रवासावर आधारित एक नवीन संग्रहालय बनवू शकतो. या प्रकारच्या प्रयत्नांमुळे आपण ही ज्ञान प्रणाली भविष्यातील पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकतो तसेच त्यांना अमर बनवू शकतो.

 

मित्रांनो,

या सर्व प्रयत्नांमध्ये आपल्याला तेंव्हाच यश मिळेल जेव्हा आपण ऐतिहासिक वस्तूंचे संरक्षण करणे ही आपल्या देशाची मूळ प्रवृत्ती बनवू. आता असा प्रश्न निर्माण होतो की, आपल्या वारशाचे संरक्षण करणे ही देशाच्या सामान्य नागरिकाची मूळ प्रवृत्ती कशी बनेल ? मी एक छोटेसे उदाहरण देतो. घरातील व्यक्तींच्या संदर्भात आपल्याच कुटुंबीयांकडे असलेली माहिती. यामध्ये घराबाबत, घरातल्या ज्येष्ठांबाबत जुन्या आणि काही खास वस्तू जतन करून ठेवता येऊ शकतात. आज तुम्ही एखाद्या कागदावर काही लिहिता ते तुम्हाला खूप सामान्य वाटते. पण, तुम्ही लिहिलेला तो कागदाचा तुकडा तीन-चार पिढ्या नंतर मात्र भावनिक संपत्ती बनून जातो. याच प्रमाणे आपल्या विद्यालयांनी, आपल्या विविध संस्थांनी आणि संघटनांनी आपापली संग्रहालये अवश्य बनवावीत. लक्षात घ्या, यामुळे भविष्यासाठी कितीतरी मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक ठेव्याची निर्मिती होईल. 

शहर संग्रहालयासारखे प्रकल्प आपल्या देशातील विविध शहरे देखील आधुनिक स्वरूपात राबवू शकतात. या संग्रहालयात त्या शहराशी संबंधित ऐतिहासिक वस्तू जपून ठेवल्या जाऊ शकतात. विविध पंथांमध्ये जी नोंदी ठेवण्याची जूनी परंपरा आपल्याला दिसते, ती परंपरा आपल्याला या दिशेने कार्य करण्यात सहाय्यकारी ठरु शकते.

 

मित्रानो,

आजच्या युवकांसाठी वस्तू संग्रहालय ही केवळ सहलीचा भाग म्हणून भेट देण्याची जागा राहिली नसून एक करिअरचा पर्याय देखील बनली आहे, याचा मला आनंद आहे. पण मला असे वाटते की, आपण आपल्या युवकांना केवळ वस्तू संग्रहालय कर्मचारी या दृष्टीने पाहू नये. इतिहास आणि स्थापत्यशास्त्र यासारख्या विषयांच्या अभ्यासाशी जोडले गेलेले हे युवक जागतिक सांस्कृतिक देवाणघेवाण उपक्रमाचे माध्यम बनू शकतात. हे युवक दुसऱ्या देशात जाऊ शकतात आणि तेथील युवकांकडून जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतीबद्दल माहिती घेऊ शकतात, भारताच्या संस्कृतीबद्दल त्यांना अवगत करू शकतात. या युवकांचा अनुभव आणि भूतकाळाशी जोडली गेलेली नाळ या दोन्ही बाबी आपल्या देशाच्या वारशाचे संरक्षण करण्यासाठी खूपच प्रभावी ठरतील.

 

मित्रांनो,

आज आपण जेंव्हा सामायिक वारशाबद्दल बोलत आहोत तेंव्हा मी एका सामायिक आव्हानाबद्दल चर्चा करू इच्छितो. हे आव्हान म्हणजे कलाकृतींची चोरी आणि गैरवापर. प्राचीन संस्कृती असणारे भारतासारखे अनेक देश शेकडो वर्षापासून या आव्हानाला तोंड देत आहेत. स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात देखील आपल्या देशातून अनेकानेक कलाकृती अवैधरित्या देशाबाहेर नेण्यात आल्या आहेत. या प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून काम करणे आवश्यक आहे.

आज जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढत असतानाच अनेक देश भारताचा अमूल्य ठेवा असलेल्या वस्तू आपल्याला परत करत आहेत. वाराणसी मधून चोरीला गेलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती असो, गुजरातमधून चोरी गेलेली महिषासुरमर्दिनीची प्रतिमा असो, चोल साम्राज्याच्या काळात तयार झालेल्या नटराजाच्या प्रतिमा असो, आजवर सुमारे 240 प्राचीन कलाकृती भारतात परत आणण्यात आल्या आहेत.  यापूर्वी अनेक दशकांपर्यंत ही संख्या 20 पर्यंत देखील पोहोचली नव्हती. या नऊ वर्षात भारतातून सांस्कृतिक कलाकृतींची तस्करी होण्याच्या घटनांची संख्या देखील कमी झाली आहे.

या क्षेत्रात सहयोग करून त्याचा आणखी विकास करण्याचे आवाहन मी जगभरातील कलापारखी तज्ञांना आणि विशेष करून संग्रहालयाशी संबंधित लोकांना करत आहे. कोणत्याही देशातील कोणत्याही संग्रहालयात अशी कोणतीही कलाकृती नसावी जी तेथे अवैधरित्या पोहोचली असेल. आपण सर्व संग्रहालयांसाठी एक समान नैतिक बांधिलकी निर्माण केली पाहिजे.

 

मित्रांनो,

भूतकाळाशी नाळ बांधलेली ठेवून भविष्यासाठी नव्या संकल्पनांवर आपण याच प्रकारे काम करत राहू असा मला विश्वास आहे. आपण वारशाचे जतन करू आणि सोबतच नव्या वारशाची निर्मिती देखील करत राहू. याच कामनेसह तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद!

***

S.Kane/V.Ghode/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai