वणक्कम् सौराष्ट्र! वणक्कम् तमिळनाडु!
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन्द्र भाई पटेल, नागालॅडचे राज्यपाल एल. गणेशन जी, झारखंडचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन जी, केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी पुरुषोत्तम रुपाला जी, एल मुरुगन जी, मीनाक्षी लेखी जी, या कार्यक्रमाशी संबंधित इतर मान्यवर आणि बंधू भगिनींनो,
सौराष्ट्र तमिळ् संगमम्, निगळ्-चियिल्, पंगेर्-क वन्दिरुक्कुम्, तमिळग सोन्दन्गळ् अनैवरैयुम्, वरुग वरुग एन वरवेरकिरेन्। उन्गळ् अनैवरैयुम्, गुजरात मण्णिल्, इंड्रु, संदित्तदिल् पेरु मगिळ्ची।
मित्रहो,
अतिथींचा पाहुणचार करण्यात अवर्णनीय आनंद असतो.
मात्र अनेक वर्षानंतर आपलंच कोणी घरी परतते तेव्हा त्यावेळचा आनंद, उत्साह आणि सुख आगळेच असते. आज त्याच सद्गदित मनाने सौराष्टातला प्रत्येक जण, तामिळनाडूतून आलेल्या आपल्या बंधू-भगिनींच्या स्वागतासाठी आसुसला आहे. याच भावनेने मीही तामिळनाडूमधून आलेल्या आपल्या माणसांमध्ये दुरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित आहे.
2010 मध्ये मी मुख्यमंत्री होतो तेव्हा मदुराईमध्ये मी असाच भव्य सौराष्ट्र संगम कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात सौराष्ट्र मधून 50 हजारहून जास्त बंधू-भगिनी सहभागी झाल्या होत्या. आज सौराष्ट्राच्या भूमीवरही स्नेह आणि आपुलकीची तीच भावना दिसून येत आहे.इतक्या मोठ्या संख्येने आपण तामिळनाडूमधून आपल्या पूर्वजांच्या भूमीवर आला आहात, आपल्या घरी आला आहात.आपल्या चेहऱ्यावरचा आनंदच मला सांगतो आहे की आपण अनेक आठवणी आणि भावस्पर्शी अनुभव घेऊन इथून परतणार आहात. आपण सौराष्ट्रामधल्या पर्यटनाचाही भरपूर आनंद घेतलात.सौराष्ट्र ते तामिळनाडू पर्यंत देशाला जोडणारे सरदार पटेल यांच्या ‘स्टँच्यू ऑफ युनिटी’ लाही आपण भेट दिली.म्हणजेच भूतकाळातल्या मोलाच्या आठवणी,वर्तमानातली आपुलकी आणि अनुभव, भविष्यासाठी संकल्प आणि प्रेरणा यांचा संगम आपल्याला सौराष्ट्र – तमिळ संगमम् मध्ये अनुभवायला मिळतो.या उत्तम आयोजनाबद्दल सौराष्ट्र आणि तामिळनाडूच्या सर्व जनतेचे मी अभिनंदन करतो.
मित्रहो,
आज स्वातंत्र्याच्या अमृतकाळात, सौराष्ट्र-तमिळ संगमम् यासारख्या सांस्कृतिक आयोजनांच्या नव्या परंपरेचे आपण साक्षीदार ठरत आहोत. काही महिन्यांपूर्वीच बनारसमध्ये काशी-तमिळ संगमम् चे आयोजन करण्यात आले होते, देशभरात या कार्यक्रमाची दखल घेतली गेली. त्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या भागात अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी उत्स्फूर्त प्रयत्न सुरु झाले आहेत. सौराष्ट्राच्या भूमीवर आज आपण पुन्हा एकदा दोन प्राचीन परंपरांचा संगम अनुभवत आहोत.
सौराष्ट्र आणि तमिळ संगमम् चे आयोजन म्हणजे केवळ गुजरात आणि तामिळनाडूचा संगम नव्हे. मीनाक्षी देवी आणि पार्वती देवीच्या रूपातला एकात्म शक्तीच्या उपासनेचाही हा उत्सव आहे.प्रभू सोमनाथ आणि प्रभू रामनाथ यांच्या रूपातला एकात्म शिव भावनेचाही हा उत्सव आहे. नागेश्वर आणि सुंदरेश्वर यांच्या धरतीचा हा संगम आहे.श्रीकृष्ण आणि श्री रंगनाथ यांच्या धरतीचा हा संगम आहे. नर्मदा आणि वैगई यांचा हा संगम आहे. दांडिया आणि कोलाट्टम यांचा हा संगम आहे.द्वारका आणि मदुराई यासारख्या पवित्र शहरांच्या परंपरांचा हा संगम आहे. सौराष्ट्र – तमिळ संगमम् हा संगम आहे सरदार पटेल आणि सुब्रमण्यम भारती यांच्या ‘राष्ट्र सर्वप्रथम’ या भावनेने ओथंबलेल्या संकल्पाचा. हा संकल्प घेऊन आपल्याला आगेकूच करायची आहे. हा सांस्कृतिक वारसा घेऊन राष्ट्र निर्माणासाठी आपल्याला वाटचाल करायची आहे.
मित्रहो,
भारत आपली विविधता एक वैशिष्ट्य म्हणून जपतो. आपण विविधता साजरी करणारे लोक आहोत.वेगवेगळ्या भाषा,बोली,वेगवेगळ्या कला, रीती आपण साजऱ्या करतो. आपल्या श्रद्धेपासून ते आध्यात्मापर्यंत प्रत्येक बाबीत वैविध्य आहे.आपण शिवाचे पूजन करतो मात्र द्वादश ज्योतिर्लिंगांमध्ये पूजा पद्धतीत वैविध्य आहे.ब्रह्माला आपण ‘एको अहम् बहु स्याम’ म्हणून त्याची वेगवेगळ्या रुपात उपासना करतो. ‘गंगे च यमुने चैव, गोदावरी सरस्वती’ यासारख्या मंत्रातून देशाच्या विविध नद्यांना नमन करतो. ही विविधता आपल्याला परस्परांपासून वेगळी करत नाही तर आपल्यातला बंध आपल्यातला संबंध अधिक दृढ करते. कारण वेगवेगळे प्रवाह एकत्र येतात तेव्हा संगम होतो हे आपण जाणतो. म्हणूनच नद्यांच्या संगमापासून ते कुंभ सारख्या विचारांच्या संगमापर्यंत या परंपरांची शतकानुशतके आपण जोपासना करत आलो आहोत.
हीच संगम शक्ती आहे. सौराष्ट्र- तमिळ संगमम् आज नव्या रुपात ही शक्ती पुढे नेत आहे.आज या महापर्वांच्या रूपाने देशाची एकता आकार घेत आहे अशा प्रसंगी सरदार साहेब आपल्याला नक्कीच आशीर्वाद देत असतील. आपले बलिदान देत ‘एक भारत- श्रेष्ठ भारत’हे स्वप्न बाळगणाऱ्या,देशाच्या हजारो- लाखो स्वातंत्र्य सेनानींच्या स्वप्नांचीही ही पूर्तता आहे.
मित्रहो,
आज जेव्हा आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केली आहेत, तेव्हा देशाने आपल्या ‘वारशाविषयी अभिमान’ हा पंच प्रण पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. आपल्या वारशाविषयी आपल्याला अधिक अभिमान तेव्हा वाढेल, जेव्हा आपण आपला वारसा समजून घेऊ, जाणून घेऊ. गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त होऊन, आपण स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करु. काशी तामिळ संगमम असो किंवा मग सौराष्ट्र तमिळ संगमम, अशी आयोजने हा वारसा समजून घेण्यासाठीचे एक प्रभावी अभियान ठरत आहे.
आता आपण बघा, गुजरात आणि तामिळनाडू यांच्या दरम्यान असे अनेक बंध आहेत, ज्यांची माहिती जाणून बुजून आपल्याला सांगितली गेली नाही. परदेशी आक्रमणांच्या काळात सौराष्ट्रातून तामिळनाडू इथे झालेल्या पलायनांची थोडीफार चर्चा इतिहासाच्या काही जाणकार लोकांपर्यंत मर्यादित राहिली. मात्र, त्याच्याही फार आधी, या दोन्ही राज्यांमध्ये पौराणिक काळापासून एक अतूट नाते आहे. सौराष्ट्र आणि तामिळनाडू यांचा, पश्चिम आणि दक्षिण यांच्यातला सांस्कृतिक बंध, एक असा प्रवाह आहे, जो हजारो वर्षांपासून गतिमान आहे.
मित्रहो ,
आज आमच्यासमोर, 2047 सालच्या भारताचे लक्ष्य आहे. आपल्या समोर गुलामी आणि त्याच्यानंतरच्या सात दशकांच्या कालखंडातील आव्हाने देखील आहेत. आपल्याला देशाला पुढे घेऊन जायचे आहे. मात्र या मार्गात आपल्याला दुर्बल करणाऱ्या, तोडणाऱ्या शक्ती देखील भेटतील. मार्गावरुन भरकटवणाऱ्या शक्तीही अडथळे आणतील. मात्र, भारत अत्यंत कठीण परिस्थितीतही काही नवीन निर्माण करण्याची ताकद असणारा देश आहे. सौराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यातला हा समान इतिहासही आपल्याला हाच विश्वास देणारा ठरतो आहे.
आपण स्मरण करुन बघा, जेव्हा भारतावर परदेशी आक्रमकांची आक्रमणे सुरु झाली, त्यावेळी सोमनाथच्या रूपाने, देशाची संस्कृती आणि सन्मानावर पहिला इतका मोठा हल्ला झाला. शेकडो वर्षांपूर्वीच्या त्या काळात, आजच्या सारखी संसाधने नव्हती, तो माहीती तंत्रज्ञानाचा काळ नव्हता. येण्याजाण्या साठी आजच्या सारख्या जलद गाड्या आणि विमाने नव्हती. मात्र, आपल्या पूर्वजांना ही गोष्ट माहिती होती की—
– हिमालयात् समारभ्य, यावत् इन्दु सरोवरम्। तं देव-निर्मितं देशं, हिन्दुस्थानं प्रचक्षते॥
म्हणजेच, हिमालयापासून, ते हिंद महासागरापर्यंत, ही संपूर्ण देवभूमी आपला भारत देश आहे. म्हणूनच, त्यांना ही चिंता नव्हती की, इतक्या दूर नवी भाषा, नवे लोक, नवे वातावरण असेल, तर तिथे लोक कसे असतील. मोठ्या संख्येने लोक, आपली श्रद्धा आणि ओळख यांचे संरक्षण करण्यासाठी सौराष्ट्रातून तामिळनाडूला गेले. तमिळनाडूच्या लोकांनी त्यांचे मोकळ्या मनाने कुटुंबभावनेने स्वागत केले. त्यांना आयुष्य नव्याने सुरु करण्यासाठी सगळ्या सुविधा दिल्या. “एक भारत, श्रेष्ठ भारत’ चे आणखी मोठे उदाहरण आणखी काय असू शकेल?
मित्रहो,
महान संत थिरुवल्लवर जी यांनी म्हटले होते-
-अगन् अमर्न्दु, सेय्याळ् उरैयुम् मुगन् अमर्न्दु, नल् विरुन्दु, ओम्बुवान् इल्
म्हणजे, सुख-समृद्धी आणि भाग्य अशा लोकांसोबत असते, जे इतरांचे आनंदाने स्वागत करतात. म्हणूनच, आपल्याला सांस्कृतिक संघर्ष नाही, तर समन्वयावर भर द्यायला हवा. आपल्याला संघर्ष नाही, तर संगम आणि समागम पुढे न्यायचा आहे. आपल्याला परस्परांमधील भेद शोधायचे नाहीत, तर भावनात्मक संबंध वाढवायला हवे आहेत.
तमिलनाडु इथे वसलेल्या मूळच्या सौराष्ट्रातील लोकांनी आणि तामिळगम च्या लोकांनी असे आयुष्य जगून त्याचा दाखला दिला आहे. आपण सर्वांनी तामिळला आपलेसे केले मात्र त्याचवेळी सौराष्ट्राची भाषा, खाद्यसंस्कृती, रीतीभाती, परंपरा देखील जपल्या. हीच तर भारताची अजरामर परंपरा आहे, जी सर्वांना एकत्र घेऊन सर्वसमावेशकतेच्या भावनेने पुढे जाते, सर्वांचा स्वीकार करुन पुढे जाते.
मला अतिशय आनंद आहे की आपण सर्वजण आपल्या पूर्वजांचे योगदान कर्तव्यभावनेने पुढे नेत आहोत. देशाच्या विविध भागांतील लोकांना आपणही अशाच प्रकारे स्थानिक पातळीवर आमंत्रित करावे, त्यांना भारत जाणून घेण्याची आणि जगण्याची संधी द्यावी, अशी माझी आपल्याकडून अपेक्षा आहे. आणि मला खात्री आहे की, सौराष्ट्र तमिळ संगमम हा या दिशेने एक ऐतिहासिक उपक्रम ठरेल.
याच भावनेसह, पुन्हा एकदा तुम्ही सगळे तामिळनाडूतून इतक्या मोठ्या संख्येने आलात. तिथे मी स्वतः येऊन तुमचे स्वागत केले असते तर मला अधिक आनंद झाला असता. पण वेळेअभावी येऊ शकलो नाही. पण आज मला तुम्हा सर्वांचे आभासी दर्शन घेण्याची संधी मिळाली आहे. पण या संपूर्ण संगमात जो आत्मा आपण पाहिला, तो आत्मा आपल्याला पुढे न्यायचा आहे. त्याचे भावनेने आपण जगले पाहिजे आणि त्या भावनेसाठी आपण आपल्या भावी पिढ्यांनाही तयार केले पाहिजे. हीच भावना मनात जागी ठेवत, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो!
वणक्कम्!
***
SushamaK/Nilimac/RadhikaA/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
Glad to see the enthusiasm for Saurashtra-Tamil Sangamam. This initiative will further cultural exchange. https://t.co/4ZQfyiT5hp
— Narendra Modi (@narendramodi) April 26, 2023
आज आजादी के अमृतकाल में हम सौराष्ट्र-तमिल संगमम् जैसे सांस्कृतिक आयोजनों की एक नई परंपरा के गवाह बन रहे हैं। pic.twitter.com/YEybyX7sZb
— PMO India (@PMOIndia) April 26, 2023
भारत विविधता को विशेषता के रूप में जीने वाला देश है। pic.twitter.com/xcU41P34xD
— PMO India (@PMOIndia) April 26, 2023
देश ने अपनी ‘विरासत पर गर्व’ के ‘पंच प्राण’ का आवाहन किया है। pic.twitter.com/fWfJka9Dqu
— PMO India (@PMOIndia) April 26, 2023
भारत कठिन से कठिन हालातों में भी कुछ नया करने की ताकत रखता है। pic.twitter.com/iVHtCgemJ4
— PMO India (@PMOIndia) April 26, 2023
भारत की अमर परंपरा है - सबको साथ लेकर समावेश के साथ आगे बढ़ने की, सबको स्वीकार करके आगे बढ़ने की। pic.twitter.com/LIJzKnlpwL
— PMO India (@PMOIndia) April 26, 2023