पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 एप्रिल 2023 रोजी आसामला भेट देणार आहेत.
पंतप्रधान दुपारी 12 वाजता एम्स गुवाहाटी येथे पोहोचतील आणि नवीन बांधलेल्या परिसराची पाहणी करतील. त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात ते एम्स गुवाहाटी आणि इतर तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे राष्ट्रार्पण करतील. ते आसाम अॅडव्हान्स्ड हेल्थ केअर इनोव्हेशन इन्स्टिट्यूटची (एएएचआयआय- आसाम प्रगत आरोग्य निगा अभिनव संस्था ) पायाभरणी करतील आणि पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना (एबी -पीएमजेएवाय ) कार्ड वितरित करून ‘आपके द्वार आयुष्मान’ मोहिमेचा प्रारंभ करतील.
पंतप्रधान, दुपारी 2:15 च्या सुमारास, श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र, गुवाहाटी येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
गुवाहाटी इथल्या सरूसजाई स्टेडियम येथे संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंतप्रधान भूषवतील. या कार्यक्रमात दहा हजारांहून अधिक कलाकार / नर्तक बिहू कार्यक्रम सादर करतील. कार्यक्रमादरम्यान नामरूप इथल्या 500 टीपीडी मेन्थॉल संयंत्राचा प्रारंभ, पलाशबारी आणि सुआलकुची यांना जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील पुलाची पायाभरणी; शिवसागर इथल्या रंग घर या स्थळाच्या सुशोभिकरणासाठी पायाभरणी आणि पाच रेल्वे प्रकल्पांचे राष्ट्रार्पण, अशा विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण पंतप्रधान करतील.
पंतप्रधानांचा एम्स गुवाहाटी येथील कार्यक्रम
पंतप्रधान येथे 3,400 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील.
आसाम राज्य आणि संपूर्ण ईशान्य प्रदेशासाठी एम्स गुवाहाटी सुरू होणे, ही एक महत्त्वाची घटना असेल. देशभरात आरोग्याच्या पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेचीही ही साक्ष आहे. या रुग्णालयाची पायाभरणीही मे 2017 मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली होती. ,एम्स गुवाहाटी1120 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करून बांधण्यात आले असून 30 आयुष खाटांसह 750 खाटांची क्षमता असलेले अत्याधुनिक रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्ये 100 एमबीबीएस विद्यार्थ्यांची वार्षिक प्रवेश क्षमता असेल. हे रुग्णालय ईशान्येतील नागरिकांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवेल.
नलबारी येथील नलबारी वैद्यकीय महाविद्यालय, नौगांव येथील नौगांव वैद्यकीय महाविद्यालय, आणि कोक्राझार येथील कोक्राझार वैद्यकीय महाविद्यालय,या तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे राष्ट्रार्पण पंतप्रधान करतील. अनुक्रमे सुमारे 615 कोटी रुपये, 600 कोटी रुपये आणि 535 कोटी रुपये खर्चून ही महाविद्यालये बांधण्यात आली आहेत. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न 500 खाटांच्या प्रशिक्षण रुग्णालयासह ओपीडी /आयपीडी सेवा, आपत्कालीन सेवा, आयसीयू सुविधा, शस्त्रक्रिया कक्ष आणि निदान सुविधा इ. सुविधा असतील. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात 100 एमबीबीएस विद्यार्थ्यांची वार्षिक प्रवेश क्षमता असेल.
पंतप्रधानांच्या हस्ते ‘आपके द्वार आयुष्मान’ मोहिमेचा औपचारिक प्रारंभ , कल्याणकारी योजनांची 100 टक्के पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा दृष्टीकोन प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक पाऊल आहे.
पंतप्रधान तीन प्रतिनिधी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) कार्ड वितरित करतील, त्यानंतर आसाममधील सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे 1.1 कोटी आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना कार्डचे वितरण केले जाईल.
आसाम ॲडव्हान्स्ड हेल्थ केअर इनोव्हेशन इन्स्टिट्यूट (AAHII) ची पायाभरणी हे आरोग्याशी संबंधित क्षेत्रांमध्ये पंतप्रधानांचा ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’चा दृष्टीकोन साकार करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे. देशातील आरोग्यसेवेसाठी वापरल्या जाणारे बहुतांश तंत्रज्ञान आयात केलेले असून ते त्या त्या देशाच्या संदर्भात विकसित केलेले असते. असे तंत्रज्ञान भारतीय वातावरणात वापर करण्यासाठी अत्यंत महाग आणि जटिल असते. ‘आपण स्वतःच्या समस्यांवर स्वतःचे उपाय शोधू’ या संदर्भात आसाम ॲडव्हान्स्ड हेल्थ केअर इनोव्हेशन इन्स्टिट्यूटची कल्पना करण्यात आली असून ही संस्था याच दिशेने कार्य करेल. सुमारे 546 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणारे आसाम ॲडव्हान्स्ड हेल्थ केअर इनोव्हेशन इन्स्टिट्यूट, औषध आणि आरोग्य सेवांमध्ये अत्याधुनिक शोध आणि संशोधन तसेच विकास यांची प्रक्रिया सुलभ करेल यासोबतच देशातील आरोग्याशी संबंधित अद्वितीय समस्या ओळखून त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन देईल.
श्रीमंत शंकरदेव कलाक्षेत्र येथील पंतप्रधानांचा कार्यक्रम.
गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सव समारंभाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.
मोबाइल ॲप्लिकेशनचा प्रारंभ करतील. हे ॲप क्राइम अँड क्रिमिनल नेटवर्क ट्रॅकिंग सिस्टीम (CCTNS) आणि वाहन (VAHAN) नॅशनल रजिस्टरच्या माहिती मधून आरोपी आणि वाहन शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देईल.
गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना 1948 मध्ये करण्यात आली होती. हे न्यायालय आसाम, नागालँड, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या सात ईशान्येकडील राज्यांसाठी मार्च, 2013 पर्यंत सामाईक न्यायालय म्हणून कार्यरत होते. त्यानंतर मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांसाठी स्वतंत्र उच्च न्यायालये निर्माण झाली होती. आता आसाम, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश ही राज्ये आता गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात. या न्यायालयाचे मुख्य पीठ गुवाहाटी येथे आहे आणि कोहिमा (नागालँड), ऐझॉल (मिझोरम) आणि इटानगर (अरुणाचल प्रदेश) येथे तीन स्थायी खंडपीठे आहेत.
सरुसजाई स्टेडियमवर पंतप्रधानांचा कार्यक्रम.
पंतप्रधान 10,900 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.
पलाशबारी आणि सुआलकुची यांना जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील पुलाची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत. हा पूल या प्रदेशात अत्यंत आवश्यक असलेली संपर्क सुविधा प्रदान करेल. पंतप्रधान दिब्रुगढमधील नामरूप येथे 500 TPD मिथेनॉल प्रकल्पाचा शुभारंभ देखील करतील. ते या प्रदेशातील विविध विभागांच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणासह पाच रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटनही करतील.
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या रेल्वे प्रकल्पांमध्ये दिगरू – लुमडिंग विभाग; गौरीपूर – अभयपुरी विभाग यांचा समावेश आहे. तर नवीन बोंगाईगाव – धुप धारा विभागाचे दुहेरीकरण; राणीनगर जलपाईगुडी – गुवाहाटी विभागाचे विद्युतीकरण; सेंचोआ – सिलघाट शहर आणि सेंचोआ – मैराबारी विभागाचे विद्युतीकरण यांचाही समावेश आहे.
शिवसागर येथील रंग घराच्या सुशोभिकरणाच्या प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. या उपक्रमामुळे या ठिकाणी पर्यटकांच्या सुविधा वाढतील. रंग घराच्या सुशोभिकरणाच्या प्रकल्पात मोठ्या जलकुंभाच्या आसपास बांधण्यात आलेला कारंजे आणि अहोम राजवंशाचा इतिहास दाखवणारे प्रदर्शन, साहसी बोट राइड्ससाठी जेटी असलेले बोट हाऊस, स्थानिक हस्तकलेच्या प्रचारासाठी कारागीर नगरी, खाद्यपदार्थांचे शौकीन असणाऱ्यांसाठी विविध स्थानिक पाककृती अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. शिवसागर येथे असलेले रंग घर हे अहोम संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवणारी सर्वात प्रतिष्ठित रचना आहे. अहोम राजा स्वर्गदेव प्रमत्ता सिंह यांनी 18 व्या शतकात रंग घर बांधले होते.
आसामी लोकांची सांस्कृतिक ओळख आणि जीवनाचा शुभंकर असलेले आसामचे बिहू नृत्य जागतिक स्तरावर प्रदर्शित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य बिहू नृत्य आयोजनात पंतप्रधान हजेरी लावतील. या कार्यक्रमात एकाच ठिकाणी 10,000 हून अधिक नर्तक /बिहू कलाकार सहभागी होतील आणि एकाच ठिकाणी जगातील सर्वात मोठ्या बिहू नृत्य सादरीकरणाच्या श्रेणीमध्ये नवीन गिनीज जागतिक विक्रम स्थापित करण्याचा प्रयत्न करतील. या आयोजनात राज्यातील 31 जिल्ह्यांतील कलाकार सहभागी होणार आहेत.
***
Jaydevi/Sonali/S. Mukhedkar /CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai