Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली-कर्नाटक संघाच्या ‘बारिसू कन्नड दिम दिमावा’, अमृत महोत्सवाचे उद्घाटन

नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली-कर्नाटक संघाच्या ‘बारिसू कन्नड दिम दिमावा’, अमृत महोत्सवाचे उद्घाटन


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर दिल्ली-कर्नाटक संघाच्या बारिसू कन्नड दिम दिमावाया सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन झालं. यावेळी त्यांनी इथल्या प्रदर्शनालाही भेट दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, कर्नाटकची संस्कृती, परंपरा आणि इतिहास साजरा करणारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दिल्ली कर्नाटक संघ, भारताची वैभवशाली परंपरा पुढे घेऊन जात आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. दिल्ली कर्नाटक संघाचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव योगायोगाने एकाच वेळी आला आहे. जेव्हा आपण देशाच्या 75 वर्षांच्या प्रवासाकडे बघतो, तेव्हा आपल्याला देशाचा अविनाशी आत्मा दिसतो, असे पंतप्रधान यावेळी बोलतांना म्हणाले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच, कर्नाटक संघाची स्थापना होणे, हे भारताला बलवान बनवण्याच्या लोकांच्या निश्चयाचेच भक्कम उदाहरण आहे. आणि आज देशाच्या अमृतकाळातही हे समर्पण आणि ऊर्जा तशीच कायम आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कर्नाटक संघाच्या 75 वर्षांच्या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.

राष्ट्र उभारणीत कर्नाटकच्या योगदानाची दखल घेतल्याशिवाय भारताची ओळख, परंपरा आणि प्रेरणा यांचे वर्णनच करता येणार नाही, असे पंतप्रधान म्हणाले. कर्नाटकला पौराणिक काळातील हनुमानाची उपमा देत, पंतप्रधानांनी या राज्याचे देशासाठीचे योगदान अधोरेखित केले. ते म्हणाले की, एखादे युगप्रवर्तक अभियान अयोध्येत सुरू झाले आणि रामेश्वरपर्यंत पोहोचले तरी या अभियानाला कर्नाटकातून बळ मिळते.

पंतप्रधानांनी मध्ययुगीन काळाचा संदर्भ दिला जेव्हा परकीय आक्रमक देशाला उध्वस्त करत होते आणि सोमनाथ सारखे शिवमंदिर नष्ट करत होते. तेव्हा देवरा दासिमय्या, मदारा चेन्नईय्या, दोहरा कक्कइय्या आणि भगवान बसवेश्वर यांच्यासारख्या संतांनी लोकांना त्यांच्या श्रद्धांशी जोडून ठेवले. त्याच प्रमाणे राणी अब्बाक्का, ओनाके ओबव्वा, राणी चेन्नम्मा, क्रांतिवीर संगोल्ली रायाण्णा यांच्यासारख्या योद्ध्यांनी परकीय शक्तींचा सामना केला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात, कर्नाटकातील महानुभावांनी देशाला प्रेरणा देण्याचे काम सुरु ठेवले, असे पंतप्रधान म्हणाले.

एक भारत श्रेष्ठ भारतहा मंत्र आचरणात आणल्याबद्दल पंतप्रधानांनी कर्नाटकच्या लोकांची प्रशंसा केली. कवी कुवेंपू यांनी लिहिलेल्या नाद गीतायाविषयी देखील ते बोलले आणि या पवित्र गीतात अतिशय सुंदरतेने गुंफलेल्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेची त्यांनी प्रशंसा केली. या गीतात, भारतीय संस्कृती दर्शविण्यात आली आहे आणि कर्नाटकचे महत्त्व आणि भूमिका याविषयी माहिती देण्यात आली आहे. जेव्हा आपण या गीताचा भावार्थ जाणून घेतो, तेव्हा त्यात देखील आपल्याला एक भारत श्रेष्ठ भारतहे तत्त्व आढळते, असे पंतप्रधान म्हणाले.

भारत जी 20 सारख्या जागतिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवत आहे त्यासाठी देखील लोकशाहीच्या जननीच्या तत्वांचे मार्गदर्शन मिळत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की अनुभव मंतपामध्ये भगवान बसवेश्वर यांनी केलेले निरुपण आणि लोकशाहीसाठी केलेला संकल्प हे भारतासाठी प्रकाशाच्या किरणासारखे आहेत. लंडनमध्ये आपल्याला भगवान बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची आणि विविध भाषांमध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या निरूपणाचे प्रकाशन करण्याची संधी मिळाली याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. कर्नाटकची विचारसरणी आणि त्याचा ठसा शाश्वत आहे, याचाच हा पुरावा आहे, पंतप्रधान म्हणाले.

कर्नाटक ही परंपरा आणि तंत्रज्ञानाची भूमी आहे. इथे ऐतिहासिक संस्कृती आहे तसेच आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता देखील आहे, पंतप्रधान मोदी म्हणाले. जर्मनीचे चान्सलर यांच्यासोबत झालेल्या भेटीची आठवण काढत पंतप्रधान म्हणाले, ओलाफ शोल्झ यांनी आनंद व्यक्त केला की त्यांचा पुढील कार्यक्रम उद्या बंगळूरु इथे होणार आहे. त्यांनी सांगितले की, बंगळूरु इथे जी 20 ची एक महत्वाची बैठक होणार आहे. जेव्हा कुठल्याही परदेशी शिष्टमंडळाला ते भेटतात, तेव्हा त्यांना भारताची पुरातन तसेच आधुनिक बाजू दाखवण्यासाठी प्रयत्नशील असतात. परंपरा आणि तंत्रज्ञान हे नव्या भारताची वृत्ती आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला. देश विकास आणि वारसा आणि प्रगती आणि परंपरा दोन्ही घेऊन पुढे जात आहे, पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी या गोष्टीचा विशेष उल्लेख केला, की भारत एकीकडे आपली प्राचीन मंदिरे आणि सांस्कृतिक केंद्रांचे पुनरुज्जीवन करत आहे, तर दुसरीकडे डिजिटल पेमेंटमध्येही जगात आघाडीवर आहे. आजचा भारत परदेशातून शतकांपूर्वीच्या चोरीला गेलेल्या मूर्ती आणि कलाकृती परत आणत आहे, आणि त्याच वेळी विक्रमी एफडीआय (थेट परदेशी गुंतवणूक) देखील आणत आहे. हा नवीन भारताचा विकासाचा मार्ग आहे, जो आपल्याला विकसित देश बनण्याच्या  उद्दिष्टपूर्तीकडे घेऊन जाईल, पंतप्रधान म्हणाले.

आज कर्नाटकचा विकास देशासाठी आणि कर्नाटक सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्य आहे”, यावर पंतप्रधानांनी भर दिला. 2009-2014 दरम्यान केंद्राकडून 11 हजार कोटी रुपये कर्नाटक राज्याला देण्यात आले, तर 2019-2023 या काळात आतापर्यंत 30 हजार कोटी रुपये पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. 2009-2014 दरम्यान कर्नाटकमधील रेल्वे प्रकल्पांसाठी 4 हजार कोटी रुपये मिळाले, तर केवळ या वर्षीच्या अर्थसंकल्पातच 7 हजार कोटींची तरतूद कर्नाटक रेल्वे पायाभूत सुविधांसाठी करण्यात आली आहे. कर्नाटक मधील राष्ट्रीय महामार्गांसाठी त्या 5 वर्षात 6 हजार कोटी रुपये मिळाले, तर गेल्या 9 वर्षात कर्नाटक मधील महामार्गांसाठी दरवर्षी 5 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली. पंतप्रधान म्हणाले की, सध्याचे सरकार भद्र प्रकल्पाची प्रलंबित मागणी पूर्ण करत आहे, आणि या सर्व विकास कामांमुळे कर्नाटक राज्याचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. पंतप्रधान म्हणाले की, दिल्ली कर्नाटक संघाच्या 75 वर्षांमधील प्रगतीने, विकास, यश आणि ज्ञानाच्या अनेक महत्वाच्या क्षणांना उजाळा दिला आहे. पुढील 25 वर्षांचे महत्त्व सांगून पंतप्रधानांनी अमृत काळ आणि दिल्ली कर्नाटक संघाच्या पुढील 25 वर्षाच्या कालखंडात गाठता येतील अशा महत्वाच्या उद्दिष्टांचा उल्लेख केला. ज्ञान आणि कला यावर मुख्य भर हवा, हे अधोरेखित करत, त्यांनी कन्नड भाषेचे सौंदर्य आणि तिच्या समृद्ध साहित्यावर प्रकाश टाकला. कन्नड भाषेच्या वाचकांची संख्या खूप जास्त असून प्रकाशकांना चांगले पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर काही आठवड्यांतच त्याचे पुनर्मुद्रण करावे लागते, अशी माहितीही त्यांनी दिली. कर्नाटक राज्याच्या कला क्षेत्रातील असामान्य कामगिरीकडे लक्ष वेधत, कर्नाटक, कमसाले ते कर्नाटक संगीत शैली आणि भरतनाट्यम ते यक्षगान या शास्त्रीय आणि लोकप्रिय अशा दोन्ही कला प्रकारांमध्ये समृद्ध असल्याचे नमूद केले. या कलाप्रकारांना लोकप्रिय करण्यासाठी कर्नाटक संघाने केलेल्या  प्रयत्नांची प्रशंसा करून, हे प्रयत्न पुढील स्तरावर नेण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला, आणि दिल्ली कन्नडिगा कुटुंबांनी अशा कार्यक्रमांमध्ये बिगर-कन्नडिगा कुटुंबांना आणण्याचा प्रयत्न करावा, असे सांगितले. पंतप्रधान म्हणाले की कन्नड संस्कृतीचे चित्रण करणारे काही चित्रपट कन्नडिगा नसलेल्या प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले आणि त्यांच्यामध्ये कर्नाटकबद्दल अधिक जाणून घेण्याची रुची निर्माण झाली. “या आवडीचा फायदा घेणे आवश्यक आहे”, ते म्हणाले. नवी दिल्ली इथे  भेट देणार्‍या कलाकारांनी आणि विद्वानांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक, प्रधानमंत्री संग्रहालय आणि कर्तव्य पथ इथे भेट द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.

पंतप्रधानांनी जगभरात साजऱ्या होत असलेल्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाचा उल्लेख केला आणि म्हणाले की, कर्नाटक हे भारतीय भरड धान्य, म्हणजेच श्री अन्नाचे प्रमुख केंद्र आहे. येडियुरप्पा यांच्या काळापासून कर्नाटकात श्री धान्याच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा उल्लेख करत ते म्हणाले की, श्री अन्न रागी, हा कर्नाटकच्या संस्कृतीचा आणि सामाजिक अस्मितेचा एक भाग आहे. त्यांनी अधोरेखित केले की संपूर्ण देश कन्नडिगांनी दाखवलेल्या मार्गावर प्रवास करत आहे, आणि भरड धान्यांना श्री अन्नअसे म्हणू लागला आहे. श्री अन्नाचे फायदे संपूर्ण जग ओळखत आहे, असे नमूद करून, ते म्हणाले की, श्री अन्नाच्या मागणीला आगामी काळात चालना मिळणार असून, कर्नाटकातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, 2047 मध्ये जेव्हा भारत एक विकसित देश म्हणून आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करेल, तेव्हा भारताच्या गौरवशाली अमृत काळात दिल्ली कर्नाटक संघाच्या योगदानाचीही चर्चा होईल, कारण तो आपल्या शतक महोत्सवी वर्षात प्रवेश करेल.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, आदिचुंचनगिरी मठाचे स्वामीजी, निर्मलानंदनाथ, महोत्सव समितीचे अध्यक्ष सी टी रवी आणि दिल्ली कर्नाटक संघाचे अध्यक्ष सी एम नागराज आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

पंतप्रधानांच्या एक भारत श्रेष्ठ भारतया संकल्पनेच्या अनुषंगाने कर्नाटकची संस्कृती, परंपरा आणि इतिहास साजरा करण्यासाठी बारिसू कन्नड दिम दिमावासांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा एक भाग म्हणून हा महोत्सव साजरा केला जात आहे, आणि या माध्यमातून शेकडो कलाकारांना, नृत्य, संगीत, नाट्य, काव्य आणि यासारख्या अन्य कला प्रकारांच्या माध्यमातून कर्नाटकचा सांस्कृतिक वारसा प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे.

***

S.Patil/R.Aghor/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai