Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून उत्तराखंड रोजगार मेळाव्याला केले संबोधित

पंतप्रधानांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून उत्तराखंड रोजगार मेळाव्याला केले संबोधित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून  उत्तराखंड रोजगार मेळाव्याला संबोधित केले.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की ज्यांना आज त्यांची नियुक्ती पत्रे मिळाली आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस एक नवीन सुरुवात आहे. ही केवळ आयुष्य बदलून टाकणारी संधी नाही तर सर्वांगीण बदलाचे माध्यम आहे असे ते म्हणाले. 

शैक्षणिक क्षेत्रात देशात होत असलेल्या नवनवीन प्रयोगांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, नियुक्ती पत्रे प्राप्त बहुतेक युवक  शिक्षण क्षेत्रात काम करतील.   “नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारतातील युवकांना  नवीन शतकासाठी तयार करत आहे , हा संकल्प पुढे नेण्याची जबाबदारी उत्तराखंडच्या युवकांवर आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

प्रत्येक युवकाला त्यांच्या आवडीनुसार पुढे जाण्यासाठी योग्य माध्यम आणि  नवीन संधी मिळाव्यात या दृष्टीने  केंद्र आणि उत्तराखंड सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.  सरकारी सेवेतील भर्ती मोहीम हे देखील याच दिशेने टाकलेले पाऊल आहे, असे ते म्हणाले.

गेल्या काही महिन्यांत देशातील लाखो युवकांना केंद्र सरकारकडून नियुक्तीपत्रे मिळाली आहेत असे सांगत उत्तराखंड देखील त्याचा भाग बनल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला . देशभरात भाजपशासित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची भर्ती  मोहिम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. “मला आनंद आहे की आज उत्तराखंड त्याचा एक भाग बनत आहे” असे पंतप्रधान म्हणाले.

डोंगराळ भागातील त्वरीत ओघळून जाणाऱ्या  पाण्याप्रमाणेच  युवकांचा   काही उपयोग नसतो या जुन्या विचारधारेतून  मुक्त होण्यावर पंतप्रधानांनी भर दिला. “उत्तराखंडमधील युवकांनी त्यांच्या गावी परतावे हा केंद्र सरकारचा सतत प्रयत्न आहे”, असे सांगत पंतप्रधानांनी डोंगराळ भागात  निर्माण होत असलेल्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या नवीन संधी अधोरेखित केल्या.  उत्तराखंडमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी होत असलेल्या गुंतवणुकीचा उल्लेख करताना  पंतप्रधान म्हणाले की नवीन रस्ते आणि रेल्वे मार्ग उभारल्यामुळे केवळ कनेक्टिव्हिटीच वाढत नाही तर रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होत आहेत. सगळीकडे रोजगाराच्या संधींना चालना मिळत असल्याचे सांगून पंतप्रधानांनी  बांधकाम मजूर,  अभियंते, कच्चा माल पुरवणारे उद्योग आणि दुकाने यांची उदाहरणे दिली. वाहतूक क्षेत्रातील मागणी वाढल्यामुळे नवीन संधी निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पूर्वी उत्तराखंडच्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगारासाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते , मात्र आज हजारो युवक खेड्यापाड्यात इंटरनेट आणि डिजिटल सेवा पुरवणाऱ्या सामायिक सेवा केंद्रांमध्ये काम करत आहेत याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. “या नोकऱ्या भारतात प्रथमच उत्तराखंडमध्ये निर्माण झाल्या आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.

उत्तराखंडमधील पर्यटन क्षेत्राचा विस्तार होत असून परिणामी दुर्गम भाग रस्ते, रेल्वे आणि इंटरनेटने जोडले जात आहेत आणि पर्यटन नकाशावर नवीन पर्यटन स्थळे येत असल्याचे  पंतप्रधानांनी अधोरेखित केले.   यामुळे उत्तराखंडमधील तरुणांना आता मोठ्या शहरांमध्ये जाण्याऐवजी त्यांच्या घराजवळ तशाच रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. पर्यटन क्षेत्रात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी मुद्रा योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दुकाने, ढाबे, गेस्ट हाऊस आणि होमस्टेची उदाहरणे देत पंतप्रधानांनी नमूद केले की अशा व्यवसायांना कोणत्याही हमीशिवाय 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात आहे. देशभरात आतापर्यंत 38  कोटी मुद्रा कर्ज देण्यात आली आहेत. सुमारे 8 कोटी युवक प्रथमच उद्योजक बनले आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.  अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती /इतर मागास वर्गीय प्रवर्गातील महिला आणि तरुणांची संख्या सर्वाधिक आहे अशी माहिती त्यांनी दिली.

 भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधान म्हणाले की  भारतातील युवकांसाठी हा  विस्मयकारक संधींचा अमृत काळ आहे आणि युवकांनी त्यांच्या सेवांद्वारे भारताच्या विकासाला गती द्यावी असे आवाहन त्यांनी केले.

***

GopalC/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji   PM India /pib_goa  PM India pibgoa[at]gmail[dot]com  PM India/PIBGoa