नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2023
कार्यक्रमाला उपस्थित असलेले गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष सुरेशचंद्र आर्य जी, दिल्ली आर्य प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष धर्मपाल आर्य, विनय आर्य, मंत्रिमंडळातील माझे सहकारी, किशन रेड्डी, मीनाक्षी लेखी, अर्जुन राम मेघवाल, सर्व प्रतिनिधीमंडळी उपस्थित बंधू आणि भगिनी! म्हर्षी दयानंद जी, यांच्या 200 व्या जयंतीचा हा कार्यक्रम ऐतिहासिक आहे आणि भविष्यात इतिहास निर्माण करणारी संधीही आहे. या संपूर्ण विश्वासाठी , मानवतेच्या भविष्याच्या दृष्टीने प्रेरणा देणारा क्षण आहे. स्वामी दयानंद आणि त्यांचे आदर्श होते – ‘‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’’।। याचा अर्थ आहे, आपण संपूर्ण विश्वाला श्रेष्ठ बनवायचे आहे. आपण संपूर्ण विश्वामध्ये श्रेष्ठ विचारांना, मानवीय आदर्शांना स्थापित करायचे आहे. म्हणूनच 21 व्या शतकामध्ये आज ज्यावेळी जग अनेक विवादांमध्ये अडकून पडले आहे, हिंसा आणि अस्थिरता यांनी घेरला गेला आहे, अशावेळी महर्षी दयानंद सरस्वती यांनी दाखवेलेला मार्ग कोट्यवधी लोकांमध्ये आशेचा किरण घेऊन येतो. अशा महत्वपूर्ण काळामध्ये आर्य समाजाच्यावतीने महर्षी दयानंद यांच्या 200 व्या जयंतीचा हा पवित्र कार्यक्रम दोन वर्ष सुरू राहणार आहे. आणि मला आनंद आहे की, भारत सरकारनेही हा महोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. मानवतेच्या कल्याणासाठी जी अविश्रांत साधना केली जात आहे, एक यज्ञ सुरू आहे, त्यामध्ये काही वेळापूर्वीच आहुती देण्याचे सौभाग्य मला आहे. आत्ता आचार्यांबरोबर चर्चा होत होती. या पवित्र भूमीवर महर्षी दयानंद सरस्वती यांनी जन्म घेतला, हे आपले सर्वांचे सौभाग्यच म्हणावे लागेल. कारण याच भूमीमध्ये आपल्याला जन्म घेण्याचे सौभाग्य मिळाले आहे. या मातीने दिलेले संस्कार, या मातीने दिलेली प्रेरणा आज मलाही महर्षी दयानंद सरस्वतींच्या आदर्शांकडे आकर्षित करीत आहे. स्वामी दयानंदजींच्या चरणांवर मी श्रद्धापूर्वक वंदन करतो. आणि आपल्या सर्वांनाही अगदी हृदयापासून अनेक-अनेक शुभेच्छा देतो.
मित्रहो,
ज्यावेळी महर्षी दयानंद जी यांचा जन्म झाला होता, त्यावेळी देश अनेक दशकांपासून गुलामगिरीने दुर्बल झाला होता. देश आपले वलय, आपले तेज, आपला आत्मविश्वास असं जणू सर्व काही गमावण्याच्या मार्गावर होता. प्रत्येक क्षणाला आपल्या संस्कारांचा, आपल्या आदर्शांचा, आपल्या मूल्यांचा चक्काचूर करण्यासाठी लाखों प्रकारे प्रयत्न केला जात होता. ज्यावेळी कोणत्याही समाजामध्ये गुलामीची हीन भावना घर करून बसते, त्यावेळी अध्यात्म आणि आस्था- श्रद्धा यांच्या जागी अवडंबर माजवले जाणे तर स्वाभाविक असते. मनुष्याच्याही जीवनामध्ये पाहिले तर लक्षात येईल की, जी व्यक्ती आत्मविश्वास हीन होते, ती व्यक्ती अवडंबर माजवून त्याच्यावरच भरवसा ठेवून जगण्याचा प्रयत्न करीत असते. अशाच परिस्थितीमध्ये महर्षी दयानंदजी यांनी येवून वेदांचा बोध लक्षात घेऊन, समाज जीवनाला पुनर्जीवित केले. त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. आपल्या तर्कांतून हे सिद्ध केले आणि त्यांनी पुन्हा -पुन्हा सांगितले की, भारतातल्या धर्म आणि परंपरांमध्ये कोणतीही कमी नाही. कमी आहे, ती आपल्याला त्याच्या वास्तविक स्वरूपाचे विस्मरण झाले आहे याची! आणि विकृतींनी आपले विचार बनले आहेत. आपण कल्पना करावी, अशा एके काळी ज्यावेळी आपल्या वेदांवर विदेशी भाष्य केले जात होते, विदेशी विचारधारणेतून वेदांची कथा गुंफण्याचा प्रयत्न केला जात होता. या नकली व्याख्यांच्या आधारे आपल्याला खाली मान घालायला लावणे, आपल्या इतिहासाला, परंपरांना भ्रष्ट करण्याचे अनेक मार्गाने प्रयत्न केले जात होते. त्याचवेळी महर्षी दयानंद जी यांनी केलेल्या प्रयत्नांनी एक खूप चांगली, मोठी संजीवनी मिळाली. एका रामबाण उपायांसारखी जडी-बुटीच्या रूपाने समाजामध्ये एक नवीन प्राण शक्ती बनून महर्षी जी आले. महर्षीजींनी, सामाजिक भेदभाव, श्रीमंत-गरीब, स्पृश्यास्पृश्य अशा समाजामध्ये घर करून बसलेल्या अनेक विकृती, अनेक कुप्रथांच्या विरोधात एक सशक्त मोहीम सुरू केली. तुम्ही मंडळी कल्पना करू शकता, आजही समाजामध्ये कोणत्याही वाईट प्रवृत्तींच्या दिशेने काही बोलायचे असेल, जर मलाही काही सांगायचे असेल तर सर्वांना कर्तव्य पथावरून वाटचाल करावी लागते. अशावेळी लोक मला रागावून म्हणतात की, तुम्ही कर्तव्याविषयी बोलता, मात्र अधिकाराविषयी बोलत नाही. जर 21 व्या शतकामध्ये माझे असे हाल होत असतील तर दीडशे, पावणे दोनशे वर्षांपूर्वी महर्षीजींना समाजाला मार्ग दाखविताना किती अडचणी आल्या असतील. ज्या वाईट गोष्टींचे खापर धर्मावर फोडले जात होते, स्वामीजींनी त्या धर्माच्या प्रकाशापासूनच दूर केले. आणि महात्मा गांधीजी यांनी एक खूप मोठी गोष्ट सांगितली होती, आणि अतिशय अभिमानाने सांगितली होती. महात्मा गांधीजी म्हणाले होते की, – ‘‘आपल्या समाजाला स्वामी दयानंद जी यांनी खूप मोठे देणे दिले आहे. मात्र त्यामध्ये अस्पृश्यतेच्या विरोधात घोषणा सर्वात मोठी देणगी आहे.’’ महिलांविषयीही समाजामध्ये ज्या रूढी, परंपरा होत्या, त्यांच्याविरूद्धही महर्षी दयानंद यांनी तर्कशुद्ध आणि प्रभावी आवाज उठवला. महर्षीजींनी महिलांच्या विरोधात भेदभावाचे खंडन केले. महिला शिक्षणाचे अभियान सुरू केले. आणि ही गोष्ट दीडशे, पावणे दोनशे वर्ष आधीची आहे. आजही असे अनेक समाज आहेत, जिथे मुलींना शिक्षणापासून आणि त्यांना सन्मानापासून नाइलाजाने वंचित रहावे लागते – वंचित ठेवले जाते. ज्यावेळी, पाश्चिमात्य देशांमध्येही महिलांना समान अधिकाराची चर्चा सुद्धा सुरू झाली नव्हती. अशी चर्चा करणे परदेशातही दूरची गोष्ट होती, त्याच काळात स्वामी दयानंद यांनी याविषयी रणशिंग फुंकले होते.
बंधू आणि भगिनींनो!
त्या कालखंडामध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांचं पदार्पण, संपूर्ण युगाच्या आव्हानांना त्यांचे सामोरे जाणे आणि अवघ्या युगाच्या विरोधामध्ये उभे राहणे, यावरून त्यांचं असामान्यत्व दिसून येते. हे पाहता, कोणत्याही स्वरूपामध्ये ते सामान्य नव्हते, हे लक्षात येते. म्हणूनच, राष्ट्राच्या यात्रेमध्ये त्यांच्या जीवंत उपस्थितीची ग्वाही दाखवणाऱ्या आर्य समाजाला दीडशे वर्ष झाली. महर्षींना दोनशे वर्ष झाली आहेत, आणि प्रचंड जनसागर इथे लोटला आहे, केवळ इथेच नाही, तर जगभरातून असंख्य लोक आज या समारंभाशी जोडले गेले आहेत. यापेक्षा जीवनाने गाठलेली सर्वात मोठी उंची कोणती असू शकते? जीवन ज्याप्रकारे धावते आहे, ते पहाता, मृत्यूनंतर दहा वर्षही कोणी लक्षात ठेवणे, स्मरणात ठेवणे आता अशक्य बनत आहे. दोनशे वर्षे झालेली असतानाही आज महर्षीजी आपल्यामध्ये आहेत आणि म्हणूनच आज ज्यावेळी भारत स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करीत आहे, त्यावेळी महर्षी दयानंद जी यांची 200 वी जयंती एक पुण्य प्रेरणा घेवून आली आहे. महर्षीजींनी जे मंत्र त्याकाळी दिले होते, समाजासाठी जी स्वप्ने पाहिली होती, देश आज ते मंत्र जपत, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी विश्वासाने पुढे जात आहे. स्वामीजींनी त्याकाळात आवाहन केले होते – ‘‘वेदांकडे परत चला’’ आज देश अत्यंत स्वाभीमानाने आपल्या वारशावर अभिमान करण्याचे आवाहन करीत आहे. आज देश पूर्ण आत्मविश्वासाने सांगत आहे की, आम्ही देशामध्ये आधुनिकता आणण्याबरोबरच आपल्या परंपराही समृद्ध करू. वारसाही आणि विकासही!! या दोन्ही मार्गांवर देशाला आम्ही नवीन उंचीवर घेवून जाणार आहोत.
मित्रांनो,
सर्वसाधारणपणे जगामध्ये ज्यावेळी धर्माविषयी चर्चा होते, त्यावेळी त्याचा परीघ केवळ पूजा-पाठ,श्रद्धा आणि उपासना, त्याच्या चाली रिती, त्याच्या पद्धती, यांच्यापुरताच मर्यादित मानला जातो. मात्र, भारताच्या संदर्भामध्ये धर्माचा अर्थ आणि निहितार्थ एकदम वेगळे आहेत. वेदांनी धर्माला एक संपूर्ण जीवन पद्धतीच्या रूपामध्ये मानून त्याची व्याख्या केली आहे. आपल्यकडे धर्माचा पहिला अर्थ कर्तव्य समजले जाते. पितृ धर्म, मातृ धर्म, पुत्र धर्म, देश धर्म, काळ धर्म अशा आपल्या कल्पना आहेत. म्हणूनच आपल्या संतांनी आणि ऋषींची भूमिका केवळ पूजा आणि उपासना यांच्यापुरतीच मर्यादित नव्हती. त्यांनी राष्ट्र आणि समाजाच्या प्रत्येक आघाडीची जबाबदारी पेलली. त्यांचा सर्वंकष दृष्टिकोन होता, सर्वसमावेशक विचारधारणा होती, एकात्मतेच्या दृष्टिकोनातून ते सगळ्याबाबतीत पहात होते. आपल्याकडे भाषा आणि व्याकरण या क्षेत्राला पाणिनीसारख्या ऋषींनी समृद्ध केले. योगचे क्षेत्र पतंजली यांच्यासारख्या महर्षीनी विस्तारले. तुम्ही तत्वज्ञानामध्ये, तत्वचिंतनामध्ये गेला तर लक्षात येईल कपिल या आचार्यांनी बौद्धिकतेला नवीन प्रेरणा दिली. नीती आणि राजनीती मध्ये महात्मा विदूर यांच्यापासून भर्तृहरी आणि आचार्य चाणक्य पर्यंत अनेक ऋषींनी भारताच्या विचारांविषयी विशिष्ट व्याख्या केल्या. आपण गणिताविषयी बोलायचे ठरवले भारताचे नेतृत्व आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त आणि भास्कर यांच्यासारख्या महान गणितज्ञांनी केले. त्यांची प्रतिष्ठा जराही कमी नाही. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तर कणाद आणि वराहमिहीरपासून चरक आणि सुश्रुतपर्यंत अनेकांची नावे घेता येतील. ज्यावेळी स्वामी दयानंद यांना आपण पाहतो, त्यावेळी लक्षात येते की, त्या प्राचीन परंपरांना पुनर्जीवित करण्यामध्ये त्यांनी किती मोठी भूमिका बजावली आहे. आणि त्यांच्यामध्ये किती प्रचंड आत्मविश्वास असेल.
बंधू आणि भगिनींनो,
स्वामी दयानंद सरस्वती यांनी आपल्या जीवनामध्ये केवळ एकच मार्ग तयार केला नाही. तर त्यांनी वेगवेगळ्या संस्था, संस्थांतर्गत व्यवस्थांही निर्माण केल्या. आणि मी असे म्हणतो की, ऋषींनी आपल्या जीवनकाळामध्ये क्रांतिकारी विचारांना पुढे नेत वाटचाल केली. लोकांना जीवन जगण्यासाठी प्रेरणा दिली. मात्र त्यांनी प्रत्येक विचार हा व्यवस्थेबरोबर जोडला. त्याला संस्थात्मक रूप दिले. आणि संस्थानांना जन्म दिला. या संस्था दशकांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अनेक मोठ-मोठी सकारात्मक कामे करीत आहेत. परोपकारिणी सभेची स्थापना तर महर्षीजींनी स्वतः केली होती.
ही संस्था आजही प्रकाशन आणि गुरुकुलांच्या माध्यमातून वैदिक परंपरा पुढे नेत आहे. कुरुक्षेत्र गुरुकुल असो, स्वामी श्रद्धानंद विश्वस्त संस्था असो, किंवा मग महर्षी दयानंद सरस्वती विश्वस्त संस्था असो, या संस्थांनी राष्ट्रासाठी समर्पित अशा कित्येक युवकांना घडवले आहे. त्याचप्रमाणे स्वामी दयानंद जी यांच्यापासून प्रेरणा घेऊन, विविध संस्था गरीब मुलांच्या सेवेसाठी, त्यांच्या भविष्यासाठी सेवाभावनेने काम करत आहेत, आणि हे आपले संस्कार आहेत, आपल्या परंपरा आहेत. मला आठवते, जेव्हा आपण टीव्ही वर तुर्की मधल्या भूकंपाची दृश्ये बघतो, तेव्हा आपण अस्वस्थ होतो. आपल्याला तया दृश्यांचा त्रास होतो. मला आठवते, 2001 साली, जेव्हा गुजरात मध्ये भूकंप आला, तेव्हा तो गेल्या शतकातला अत्यंत भयंकर भूकंप होता. त्यावेळी जीवन प्रभात विश्वस्त संस्थेने सामाजिक कार्य आणि मदत-बचाव कार्यातले त्यांचे योगदान तर मी स्वतः पहिले आहे. सर्व महर्षीजीच्या प्रेरणेतून कांम करत असत. जे बीज स्वामीजींनी पेरले होते, त्याचा आज झालेला हा विशाल वटवृक्ष आज सर्व मानवतेला सावली देतो आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आज देश अशा सुधारणांचा साक्षीदार बनतो आहे, ज्यांना स्वामी दयानंद सरस्वती यांनीही कायम प्राधान्य दिले होते. आज आम्ही देशात काहीही भेदभाव न करणाऱ्या समान धोरणांची अंमलबजावणी आणि प्रयत्न करत पुढे वाटचाल करतो आहोत. जे गरीब आहेत, मागास आणि वंचित आहेत, त्यांची सेवा करणे आज देशासमोरचा सर्वात मोठा यज्ञ आहे. वंचितांना प्राधान्य, हा मंत्र घेऊन गरिबांसाठी घरे, त्यांचा सन्मान, प्रत्येक व्यक्तीसाठी उपचार, उत्तम सुविधा, सर्वांसाठी पोषण, सर्वांसाठी समान संधी, “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास” चा हा मंत्र देशासाठी एक संकल्प झाला आहे. गेल्या नऊ वर्षात, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने देश जलद गतीने पावले टाकत पुढे जात आहे. आज देशातील मुली कोणत्याही बंधनांशिवाय, संरक्षण-सुरक्षा क्षेत्रांपासून ते स्टार्टअप्स पर्यंत, प्रत्येक भूमिकेत राष्ट्र उभारणीला गती देत आहेत. आता आपल्या कन्या सियाचिन मध्ये तैनात होत आहेट आणि लढावू विमान राफेलही उडवत आहेत. सैनिकी शाळांमध्ये मुलींच्या प्रवेशाला जी बंदी होती, ती देखील आमच्या सरकारने हटवली आहे. स्वामी दयानंद जी यांनी आधुनिक शिक्षणासोबतच, गुरुकुलांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या साच्यात तयार झालेल्या शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कार केला होता, नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून देशाने आता त्याचा पायाही भक्कम केला आहे.
मित्रांनो,
स्वामी दयानंद सरस्वती यांनी आपल्याला आयुष्य जगण्याचा आणखी एक मंत्र दिला होता. स्वामीजींनी खूप सोप्या सरळ शब्दांत, सांगितले होते की, परिपक्व व्यक्ती कोणाला म्हणावे? कोण परिपक्व असतो? त्यावर स्वामीजीनी अत्यंत मार्मिक उत्तर दिलं होतं. महर्षी जी म्हणाले होते- “जी व्यक्ती सर्वात कमी ग्रहण करते आणि सर्वात अधिक योगदान देते, तीच व्यक्ती परिपक्व असते. आपण कल्पना करु शकतो, किती सोप्या शब्दांत त्यांनी, इतकी गंभीर गोष्ट सांगितली होती. त्यांचा हा जीवनमंत्र, आज आपल्याला कित्येक आव्हानांवर उपाय शोधण्यास मदत करतो. आता आपण पर्यावरणाच्या संदर्भात आपण हे बघू शकतो. त्या शतकात, जेव्हा जागतिक तापमानवाढ, हवामानबदल अशा शब्दांचा जन्मही झालेला नव्हता, या शब्दांविषयी कोणी विचारही करत नसेल, अशा काळात महर्षीच्या मनात, हे ज्ञान कुठून आले असेल? तर त्याचे उत्तर आहे- आपले वेद, आपल्या ऋचा, सर्वात प्राचीन मानल्या जाणाऱ्या वेदांमधील कित्येक सूक्त निसर्ग आणि पर्यावरणाविषयी आहेत. स्वामीजींनी वेदांचे हे ज्ञान, अत्यंत सखोलतेने आत्मसात केले होते. या वेदांतील सार्वभौम संदेश समजून घेत, त्यांनी आपल्या कालखंडात त्याचा विस्तार केला होता. महर्षी जी वेदांचे अभ्यासक होते आणि ज्ञानमार्गावरील संत होते. म्हणूनच त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती, त्यांना झालेला बोध त्यांच्या काळाच्या खूप पुढचा, पलिकडचा होता.
बंधू आणि भगिनींनो,
आज जेव्हा सगळे जग, शाश्वत विकासाची चर्चा करत आहे, तेव्हा, स्वामीजीनी दाखवलेला मार्ग, भारताचे प्राचीन जीवनदर्शन जगापुढे मांडत आहे. समस्यांवरील उपाय सांगत आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात भारत आज जगासाठी एक मार्गदर्शक भूमिका निभावत आहे. आपण निसर्गाशी समन्वयाच्या या दृष्टीकोनाच्या आधारावर ‘ ग्लोबल मिशन लाईफ’ LiFE आणि त्याचा अर्थ आहे, पर्यावरणस्नेही जीवनशैली. ही पर्यावरणस्नेही जीवनशैली एका लाईफ मिशनची सुरवात देखील आहे. आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, की या महत्वाच्या काळात जगातल्या देशांनी जी 20 ची अध्यक्षता करण्याची जबाबदारी भारतावर सोपवली आहे. आपण पर्यावरणाला जी 20 चा विशेष कार्यक्रम म्हणून पुढे नेत आहोत. देशाच्या या महत्वाच्या मोहिमांमध्ये आर्य समाज एक महतवाची भूमिका निभावू शकतो. तुम्ही आपल्या प्राचीन तर्कशास्त्रासोबतच, आधुनिक संदर्भ आणि कर्तव्यांशी सर्वसामान्य लोकांना जोडण्याची जबाबदारी सहजपणे घेऊ शकता. आजच्या काळात देश आणि जसं अचार्याजींनी वर्णन केलं, आचार्यजी तर यासाठी अतिशय समर्पित आहेत. नैसर्गिक शेतीशी संबंधित व्यापक मोहीम आपल्याला गावा गावात न्यायची आहे. नैसर्गिक शेती, गो – आधारित शेती, आपल्याला हे पुन्हा गावा गावात घेऊन जायचे आहे. माझी इच्छा आहे की, आर्य समाजाच्या यज्ञांत एक आहुती या संकल्पाची पण टाकली जावी. असंच आणखी एक जागतिक आवाहन भारतानं भरड धन्य, बाजरी, ज्वारी वगैरे, जे आपल्याला माहीत आहे आणि भरड धान्याला आता आपण जागतिक ओळख देण्यासाठी आणि आता संपूर्ण देशाच्या प्रत्येक भरड धान्याची ओळख बनविण्यासाठी आता त्यांचं नवीन नाव ठेवलं आहे. आम्ही भरड धान्याचं नामकरण केलं आहे श्रीअन्न. या वर्षी संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय भरड धन्य वर्ष साजरं करत आहे. आणि आपल्याला तर माहीतच आहे, आपण तर यज्ञ संस्कृतीचे लोक आहोत आणि आपण यज्ञात जी आहुती देतो ती सर्वश्रेष्ठ वस्तूंचीच देतो. आपल्याकडे यज्ञांत जवसा सारखे भरड धान्य किंवा श्रीअन्न याची महत्वाची भूमिका असते. कारण, आपण यज्ञांत त्याच वस्तू वापरतो, ज्या आपल्यासाठी सर्वश्रेष्ठ असतात. म्हणूनच, यज्ञाच्या सोबतच सर्व भरड धान्ये – श्रीअन्न, देशवासीयांच्या जीवन आणि आहाराला जास्तीत जास्त जोडले जावे, आपल्या रोजच्या आहाराचा ते भाग बनावे, यासाठी आपल्याला नव्या पिढीला देखील जागरूक करावे लागेल आणि आपण हे काम सहजतेने करू शकता.
बंधू आणि भगिनींनो,
स्वामी दयानंदजी यांच्या आयुष्यातून आपण खूप काही शिकू शकतो. त्यांनी कितीतरी स्वातंत्र्य सैनिकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवली होती. असं म्हणतात की, इंग्रज अधिकारी त्यांना भेटायला आला होता आणि त्यांना म्हणाला की, भारतात इंग्रजांचं राज्य कायमचं राहो, यासाठी प्रार्थना करा. स्वामीजींनी निर्भीड उत्तर दिलं, डोळ्यात डोळे घालून इंग्रज अधिकाऱ्याला सांगून टाकलं – “स्वातंत्र्य माझ्या आत्म्याचा आणि भारताचा आवाज आहे, हेच मला प्रिय आहे. मी परदेशी साम्राज्यासाठी कधीच प्रार्थना करू शकत नाही.” अगणित महापुरुष, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, लाल लजपतराय, लाला हरदयाळ, श्यामजी कृष्ण वर्मा, चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल या सारख्या लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी आणि क्रांतिकारीकांनी महर्षीजीं कडून प्रेरणा घेतली होती. दयानंदजी, दयानंद अॅंग्लो वैदिक विद्यालय सुरु करणारे महात्मा हंसराजजी असो, गुरुकुल कांगडी स्थापन करणारे स्वामी श्रद्धानंदजी असो, भाई परमानंदजी असो, स्वामी सहजानंद सरस्वती असो, असे कितीतरी देवतुल्य व्यक्तिमत्वांनी स्वामी दयानंद सरस्वतीजींकडूनच प्रेरणा घेतली आहे. आर्य समजाकडे महर्षी दयानंदजींच्या या सगळ्या प्रेरणांचा वारसा आहे, आपल्याला तो वारसा मिळाला आहे. आणि म्हणूनच देशाच्या देखील आपणा सर्वांकडून खूप अपेक्षा आहेत. आर्य समाजाची एक एक आर्यवीराकडून अपेक्षा आहे. मला खात्री आहे, आर्य समाज राष्ट्र आणि समाजासाठी हे कर्तव्य यज्ञ करत राहील, यज्ञाचा प्रकाश मानवतेसाठी पसरवत राहील. पुढच्या वर्षी आर्य समाजाच्या स्थापनेचं 150 वं वर्ष सुरु होणार आहे. हे दोन्ही प्रसंग अतिशय महत्वाचे आहेत. आणि आता आचार्यजींनी स्वामी श्रद्धानंदजींच्या शंभराव्या पुण्यतिथीचा उल्लेख केला, म्हणजे एक प्रकारे त्रिवेणी संगम झाला आहे. महर्षी दयानंदजी स्वतः ज्ञान ज्योत होते, आपण सर्व देखील या ज्ञानाची ज्योत बनावे. ज्या आदर्श आणि मूल्यांसाठी ते जगले, ज्या आदर्श आणि मूल्यांसाठी त्यांनी आयुष्य झिजवले आणि विष पिऊन आपल्यासाठी अमृत देऊन गेले, येणाऱ्या अमृत काळात ते अमृत आपल्याला भारतमातेच्या कोटी कोटी देशवासीयांचे कल्याण करण्याची कायम प्रेरणा देवो, शकतो देवो, सामर्थ्य देवो, मी आज आर्य प्रतिनिधी सभेच्या सर्व महानुभावांचे देखील अभिनंदन करतो. ज्या प्रकारे आजच्या कार्यक्रमाचे नियीजन केले गेले आहे, मला येऊन हे जे काही 10 – 15 मिनिट या सर्व गोष्टी बघण्याची संधी मिळाली, मला असं वाटतं की नियोजन, व्यवस्थापन, शिक्षण प्रत्येक प्रकारे उत्तम आयोजनासाठी आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात.
खूप खूप शुभेच्छा.
खूप खूप धन्यवाद!
SRT/SB/Suvarna/Radhika/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
We bow to Maharishi Dayanand Saraswati Ji on his 200th Jayanti. He was a beacon of knowledge and spirituality. https://t.co/hcgxL0Ahz4
— Narendra Modi (@narendramodi) February 12, 2023
महर्षि दयानंद सरस्वती जी का दिखाया मार्ग करोड़ों लोगों में आशा का संचार करता है। pic.twitter.com/BpLHb0A2Ik
— PMO India (@PMOIndia) February 12, 2023
महर्षि दयानन्द जी ने आगे आकर वेदों के बोध को समाज में पुनर्जीवित किया। pic.twitter.com/rFuMEzois3
— PMO India (@PMOIndia) February 12, 2023
महिलाओं को लेकर भी समाज में जो रूढ़ियाँ पनप गईं थीं, महर्षि दयानन्द जी उनके खिलाफ भी एक तार्किक और प्रभावी आवाज़ बनकर उभरे। pic.twitter.com/gKKBYcnCAj
— PMO India (@PMOIndia) February 12, 2023
आज देश पूरे गर्व के साथ ‘अपनी विरासत पर गर्व’ का आवाहन कर रहा है। pic.twitter.com/BdKXqYdST0
— PMO India (@PMOIndia) February 12, 2023
जो गरीब है, जो पिछड़ा और वंचित है, उसकी सेवा आज देश के लिए सबसे पहला यज्ञ है। pic.twitter.com/AWEHh1EuQP
— PMO India (@PMOIndia) February 12, 2023