Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

जयपूर येथे ‘खेल महाकुंभ’ कार्यक्रमामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

जयपूर येथे ‘खेल महाकुंभ’ कार्यक्रमामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आमचे सहकारी बंधू राज्यवर्धन सिंह राठोड, सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि माझ्या युवा मित्रमंडळींनो!

सर्वप्रथम या जयपूर ‘महाखेल’मध्ये पदक जिंकलेल्या आणि सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूचं, प्रशिक्षकांचं आणि  त्यांच्या कुटुंबि‍यांचं खूप खूप अभिनंदन!  तुम्ही सर्वजण जयपूरच्या मैदानात फक्त खेळण्यासाठी उतरला नाहीत, तर  तुम्ही जिंकण्यासाठी उतरलात, काही तरी शिकण्यासाठी उतरलात.  आणि जिथे शिकायची उमेद असते  तिथे एकप्रकारे विजय निश्चित मिळतोच मिळतो.  कोणताही खेळाडू मैदानातून रिकाम्या हातानं परतत नाही, प्रत्येकाला हे मैदान काही ना काही तरी देतच असतं

 

मित्र हो, 

आताच आपण सर्वांनी कबड्डीपटूंचा अप्रतिम खेळ देखील पाहिला. मी पाहतोय, आजच्या समारोप समारंभात, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला नावलौकिक मिळवून देणारे अनेक चेहरे दिसताहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेता राम सिंह दिसत आहेत, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते दिव्यांग क्रीडापटू बंधू देवेंद्र झांझरिया दिसत आहेत, अर्जुन पुरस्कार विजेती साक्षी कुमारी आणि इतर वरिष्ठ खेळाडूही  आहेत.  जयपूर ग्रामीणच्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी इथे आलेल्या या क्रीडा तारे तारकांना पाहून मला खूप आनंद झाला.

 

मित्रांनो,

आज देशात एका मागोमाग एक सुरू झालेल्या   क्रीडा स्पर्धा आणि होत असलेल्या  क्रीडा महाकुंभ मेळाव्यांची मालिका म्हणजे,  होऊ घातलेल्या एका मोठ्या बदलाचं प्रतिबिंब आहे.  राजस्थानची भूमी तर आपल्या  युवावर्गाचा जोम, जोश आणि सामर्थ्यासाठी ओळखली जाते.  इतिहास साक्ष आहे, या वीरभूमीच्या मुलांनी आपल्या शौर्यानं, पराक्रमी कामगिरीनं रणांगणालाही क्रीडांगण बनवलं आहे.  त्यामुळेच गतकाळापासून अगदी आजपर्यंत, जेव्हा जेव्हा देशाच्या संरक्षणाचा प्रश्न उभा राहतो, राजस्थानचे तरुण कुणापेक्षा मागे राहत नाहीत.  येथील तरुणांच्या या शारी‍रिक आणि मानसिक सामर्थ्याच्या जडणघडणीत, राजस्थानी क्रीडा परंपरांचा मोठा वाटा आहे. शेकडो वर्षांपासून, मकर संक्रांतीच्या वेळी आयोजित केले जाणारे  ‘दडा’सारखे खेळ असोत, किंवा ‘तोलिया, रुमाल झपट्टा’  यासारखे बालपणीच्या आठवणींशी निगडीत पारंपरिक खेळ असोत, हे राजस्थानाच्या नसानसांत भिनले आहेत.  म्हणूनच, या राज्यानं देशाला अनेक प्रतिभावान क्रीडापटू दिले आहेत, कितीतरी पदकं मिळवून  देऊन तिरंग्याची प्रतिष्‍ठा वाढवली आहे आणि तुम्ही जयपूरकरांनी तर आपला खासदार म्हणून ऑलिम्पिक पदक विजेत्यालाच निवडून दिलं आहे.  मला खूप बरं वाटतंय की,  राज्यवर्धन सिंह राठोड यांना देशानं जे काही  दिलं, त्याची परतफेड ते आता देशाच्या  नवीन पिढीला ‘खासदार क्रीडा स्पर्धे’ च्या माध्यमातून करत आहेत.  आपल्याला हे प्रयत्न आणखी वाढवायचे आहेत, जेणेकरून त्यांचा प्रभाव अधिक व्यापक होईल.  ‘जयपूर महाखेल’चं यशस्वी आयोजन हे आपल्या अशाच प्रयत्नांच्या साखळीतील पुढची कडी आहे. या स्पर्धेत यावर्षी 600 हून अधिक संघ आणि 6 हजार 500 युवक-युवतींनी घेतलेला सहभाग,  हे या स्पर्धेच्या यशाचं प्रतिबिंब आहे.  या स्पर्धेत मुलींचे देखील 125 हून जास्त संघ  सहभागी झाले आहेत, अशी माहिती  मला दिली आहे. क्रीडा स्पर्धांमध्‍ये   मुलींचा हा वाढता सहभाग एक सुखद संदेश देत आहे.

 

मित्रहो,

स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात देश नवनवीन परिभाषा- व्याख्‍या तयार करत आहे, व्यवस्थेची नव्यानं मांडणी करत आहे.  आज देशात प्रथमच खेळाकडे  सरकारच्या चष्म्यातून नव्हे, तर खेळाडूंच्या दृष्टिकोनातून पाहिला जात आहे.  मला माहीत आहे, तरुण भारताच्या युवा पिढीसाठी अशक्य असं काहीच नाही.  जेव्हा तरुणांना सामर्थ्य, स्वाभिमान, स्वावलंबन, सुविधा आणि साधनसंपत्तीचं बळ मिळतं, तेव्हा प्रत्येक ध्येय सोपं होऊन जातं.  देशाच्या या दृष्टिकोनाची झलक यावेळच्या अर्थसंकल्पातही दिसते.  यावेळी देशाच्या अर्थसंकल्पात क्रीडा विभागाला सुमारे 2 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद लाभली आहे. तर, 2014 च्या आधी क्रीडा विभागासाठी  आठशे, साडेआठशे कोटी रुपयांचीच तरतूद असायची.  म्हणजेच 2014 पूर्वीच्या तुलनेत देशाच्या क्रीडा विभागासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत जवळपास तिपटीनं वाढ झाली आहे.  यावेळी तर एकट्या ‘खेलो इंडिया’ मोहिमेसाठीच 1 हजार  कोटी रुपयांहून जास्त रकमेची तरतूद करण्यात आली आहे.  हा पैसा, खेळाशी संबंधित प्रत्येक क्षेत्रात साधनसामुग्री, पायाभूत सुविधा आणि इतर  सुविधा निर्माण करण्यासाठी वापरला जाईल.

 

मित्रांनो,

पूर्वीही देशातील युवावर्गात खेळाची आवड असायची, वेड असायचं आणि क्रीडा गुणवत्ता सुद्धा असायची, मात्र अनेकदा साधनसामग्री आणि सरकारी मदतीचा अभाव प्रत्येक वेळी आडवा यायचा.  आता आपल्या खेळाडूंना येणाऱ्या या  अडचणींवर सुद्धा मात केली जात आहे.  मी तुम्हाला या जयपूर महाक्रीडा स्पर्धेचच उदाहरण देईन.  जयपूरमध्ये गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या महाखेलचं आयोजन  सुरू आहे. अशाच प्रकारे देशाच्या कानाकोपऱ्यात भारतीय जनता पार्टीचे खासदार आपापल्या भागात खेल महाकुंभांचं आयोजन करत आहेत.  या अशा शेकडो क्रीडा स्पर्धांमधून हजारो युवक-युवती, हजारो प्रतिभावान खेळाडू वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी होत आहेत.  खासदार महाक्रीडा स्पर्धांमुळे(खेळ महाकुंभामुळे), देशभरातून हजारो प्रतिभावंत खेळाडू उदयाला येत आहेत.

 

 मित्रहो,

केंद्र सरकार आता जिल्हा आणि स्थानिक स्तरापर्यंत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देत असल्यामुळेच हे सर्व शक्य झालं आहे.

आतापर्यंत देशातील शेकडो जिल्ह्यांमध्ये लाखो युवकांसाठी क्रीडा विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या  आहेत. राजस्थानमध्येही केंद्र सरकार अनेक शहरांमध्ये क्रीडा विषयक पायाभूत सुविधा उभारत आहे. आज देशात क्रीडा विद्यापीठेही स्थापन होत आहेत आणि खेल महाकुंभसारखे मोठे कार्यक्रमही व्यावसायिक पद्धतीने आयोजित केले जात आहेत.

यावर्षी राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठासाठीही अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आली आहे.  क्रीडा व्यवस्थापन आणि क्रीडा तंत्रज्ञानाशी संबंधित प्रत्येक विषय शिकण्यासाठी वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळेल. 

 

मित्रांनो ,

पैशांअभावी एकही युवक-युवती  मागे राहू नये, याकडेही आमचे सरकार लक्ष देत आहे.  सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना केंद्र सरकार आता वार्षिक 5  लाख रुपयांपर्यंत मदत करते. प्रमुख क्रीडा पुरस्कारांच्या रकमेतही तीन पटीने वाढ करण्यात आली आहे. ऑलिम्पिकसारख्या मोठ्या जागतिक स्पर्धांमध्येही आता सरकार आपल्या खेळाडूंच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहत आहे. टॉप्स – ‘टीओपीएस’सारख्या योजनांच्या माध्यमातून खेळाडू गेली काही वर्षे ऑलिम्पिकची तयारी करत आहेत.

 

मित्रांनो,

कोणत्याही क्रीडा प्रकारात खेळाडूला पुढे जाण्यासाठी आपली तंदुरुस्ती कायम राखणे हे सर्वात महत्वाचे असते.   तुम्ही फिट असाल, तरच तुम्ही सुपरहिट व्हाल. आणि, तंदुरुस्त राहणे हे क्रीडा क्षेत्रासाठी जितके आवश्यक आहे, तितकेच  आयुष्यातही आवश्यक आहे. म्हणूनच आज खेलो इंडिया बरोबरच  फिट इंडिया हे देखील देशासाठी एक मोठे अभियान आहे. आपल्या तंदुरुस्तीमध्ये आपला आहार आणि पोषण यांची देखील मोठी भूमिका असते.

म्हणूनच , मला तुमच्या सर्वांशी अशाच एका अभियानाबद्दल चर्चा करायची आहे, जे भारताने सुरू केले होते , परंतु आता ती जागतिक चळवळ  बनली आहे. तुम्ही ऐकले असेलच की, भारताने मांडलेल्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्र  2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करत आहे. आणि राजस्थानमध्ये तर भरड धान्याची  अतिशय समृद्ध परंपरा आहे. आणि आता त्याची देशव्यापी ओळख निर्माण करण्यासाठी हे भरड धान्य श्री अन्न म्हणून  ओळखले जाणे अत्यंत आवश्यक आहे. यावर्षीच्या  अर्थसंकल्पातही या गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे.

हे सुपर फूड आहे, हे श्री अन्न आहे. आणि म्हणूनच राजस्थानचे श्री अन्न -बाजरी, श्री अन्न -ज्वारी, सारखी  अनेक भरड धान्ये आता श्री अन्न  नावाशी जोडली गेली आहेत.  ही त्याची ओळख बनली आहे. आणि जो राजस्थानला ओळखतो , त्याला हे  माहीत नाही असे होणारच नाही.  आपल्या राजस्थानची बाजरीची खिचडी आणि चुरमा कोणी विसरू शकेल का? मी  तुम्हा सर्व युवकांना विशेष आवाहन करतो  की, तुम्ही सर्वांनी आपल्या आहारात श्री अन्न म्हणजेच भरड धान्याचा  समावेश करा. एवढेच नाही तर शाळा , महाविद्यालये, युवकांमध्ये त्याचे राजदूत बना . 

 

मित्रांनो ,

आजच्या युवकांनी  केवळ एका क्षेत्रापुरते मर्यादित राहू नये. तो बहु-प्रतिभावानही आहे, आणि बहुआयामी देखील आहे. त्यामुळेच देश युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. एकीकडे युवकांसाठी आधुनिक क्रीडा विषयक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, तर लहान मुले आणि कुमारांसाठी राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयही या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे.

राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालयाच्या माध्यमातून विज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, संस्कृत या भाषांसह प्रत्येक विषयावरील पुस्तके शहरापासून गावापर्यंत प्रत्येक स्तरावर डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. यामुळे तुमच्या शिकण्याच्या अनुभवाला एक नवी उंची मिळेल, सर्व संसाधने तुमच्या संगणकावर आणि मोबाईलवर उपलब्ध करून दिली जातील.

 

मित्रांनो ,

खेळ हा केवळ विद्येचा प्रकार  नाही तर खेळ हा एक मोठा उद्योगही आहे. खेळाशी निगडीत गोष्टी आणि खेळासाठी लागणा-या विविध प्रकारच्या उपकरणांमुळे, साधनांमुळे  मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगारही मिळतो. ही कामे बहुतांशी आपल्या देशातले  लघु उद्योग (एमएसएमई)  करतात.  यावेळी, अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्राशी संबंधित एमएसएमईंना बळकट करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणाही करण्यात आल्या आहेत. मला तुम्हाला आणखी एका योजनेबद्दल सांगायचे आहे. ही योजना आहे – ‘पीएम विश्वकर्मा कौशल सम्मान‘ म्हणजेच  पीएम विकास योजना. जे लोक आपल्या हाताच्या कौशल्याने, हाताने चालवण्यात येणाऱ्या साधनांद्वारे स्वयंरोजगार करतात,  निर्मिती करतात अशा लोकांना ही योजना खूप मदत करेल. त्यांना आर्थिक मदतीपासून ते नवीन बाजारपेठ निर्माण करण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे केली जाईल. यामुळे आपल्या तरुणांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील.

 

मित्रांनो ,

जेव्हा मनापासून  प्रयत्न केले जातात, तेथे चांगले परिणामही हमखास मिळतात. देशाने प्रयत्न केले, टोकियो ऑलिम्पिक, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपण  त्याचे परिणाम पाहिले. जयपूर महाखेलमधील तुम्हा सर्वांचे प्रयत्न भविष्यात असेच चांगले परिणाम देतील. देशाला  आगामी काळात  सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवून तुमच्यामधूनच देणारे उदयाला येणार आहेत. तुम्ही निर्धार केलात तर ऑलिम्पिकमध्येही तिरंग्याची शान वाढवाल .  तुम्ही ज्या क्षेत्रात  जाल, देशाचा गौरव वाढवाल. मला  विश्वास आहे ,  आपले युवक  देशाचा नावलौकिक वाढवतील. याच  भावनेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. सर्वांना खूप-खूप धन्यवाद.

खूप- खूप शुभेच्छा.

***

 

 सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे आणि सुषमा काणे/सी.यादव

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai