Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजस्थानच्या भिलवाडा येथे भगवान श्री देवनारायण जी यांच्या 1111 व्या ‘अवतरण महोत्सवा’च्या स्मरणार्थ झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

राजस्थानच्या भिलवाडा येथे भगवान श्री देवनारायण जी यांच्या 1111 व्या ‘अवतरण महोत्सवा’च्या स्मरणार्थ झालेल्या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानच्या भिलवाडा इथे, भगवान श्री देवनारायण जी यांच्या 1111 व्या ‘अवतरण महोत्सवा’च्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात संबोधित केले. यावेळी, पंतप्रधानांनी मंदिराचे दर्शन घेतले, परिक्रमा केली आणि त्या परिसरात कडुलिंबाच्या रोपट्याचे रोपणही केले. तिथल्या यज्ञशाळेत सुरू असलेल्या विष्णू महायज्ञात पंतप्रधानांनी पूर्णाहुतीही अर्पण केली.  राजस्थानमधील लोक भगवान श्री देवनारायण जी यांची पूजा करतात आणि त्यांचे अनुयायी देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत.सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या महान कार्यासाठी त्यांचे स्मरण केले जाते.

यावेळी बोलतांना, पंतप्रधानांनी या पवित्र प्रसंगी येण्याची संधी मिळाली याबद्दल आनंद व्यक्त केला. आज आपण इथे पंतप्रधान म्हणून आलेलो नाही, तर एक भाविक म्हणून आलो आहोत, ज्यांना भगवान श्री देवनारायण जी, यांचे आशीर्वाद हवे आहेत. इथे यज्ञशाळेत सुरू असलेल्या महायज्ञात पूर्णाहुती देण्याची संधी मिळाली त्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “मला देवनारायण जी आणि ‘जनता जनार्दन’ अशा दोन्हीचे दर्शन मिळाले हे माझे सदभाग्य समजतो.” असे पंतप्रधान म्हणाले.  “इथे असलेल्या या सर्व भविकांप्रमाणेच मीही भगवान श्री देवनारायण जी यांच्याकडे देशाचा सातत्यपूर्ण विकास आणि गरिबांचे कल्याण होत राहो, यासाठी आशीर्वाद मागितले.” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

भगवान श्री देवनारायण यांच्या 1111 व्या अवतरण दिनाच्या भव्य सोहळ्याबद्दल बोलताना   पंतप्रधानांनी गेल्या आठवडाभरात येथे होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आणि गुर्जर समाजाच्या सक्रिय सहभागाची नोंद घेतली. या समुदायातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रयत्नांची आणि एकूण समुदायाच्या योगदानाची प्रशंसा करत पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.

भारतीय चेतनेच्या निरंतर प्राचीन प्रवाहाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, भारत हा केवळ एक भूभाग नाही तर आपली  नागरी संस्कृती, सौहार्द आणि अमर्याद संधी यांची हा देश अभिव्यक्ती आहे. जगातील इतर अनेक प्राचीन संस्कृती काळाच्या ओघात नष्ट झाल्या, मात्र, भारतीय संस्कृतीत असलेल्या लवचिकतेमुळे आणि आपल्या चिवट स्वभावामुळे भारतीय संस्कृती टिकून राहिली, असे पंतप्रधान म्हणाले. भारताला भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्या तोडण्याचे अनेक प्रयत्न होत असले तरी कोणतीही शक्ती भारताला संपवू शकली नाही, असे मोदी म्हणाले.

“आजचा भारत आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचतो आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.  भारतीय समाजाची शक्ती आणि प्रेरणा यांनीच या विशाल राष्ट्राची चिरंतनता जपली आहे, असेही ते पुढे म्हणाले. भारताच्या हजारो वर्षांच्या प्रवासात, समाजाच्या सामर्थ्याच्या योगदानावर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात समाजातून निर्माण होणारी आणि प्रत्येकासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून काम करणारी ऊर्जा महत्वाची होती, असे नमूद केले.

भगवान श्री देवनारायणन यांनी सेवा आणि लोककल्याण यालाच प्राधान्य दिले, असे मोदी म्हणाले. लोककल्याणासाठी श्री देवनारायणन जी यांची समर्पित वृत्ती आणि मानवतेची सेवा करण्याचा त्यांनी निवडलेला मार्ग, याचे पंतप्रधानांनी स्मरण केले. “भगवान देवनारायण यांनी दाखवलेला मार्ग ‘सबका साथ’च्या माध्यमातून ‘सबका विकासा’चा आहे आणि आज देश त्याच मार्गावरून चालतो आहे.” असे पंतप्रधान म्हणाले.  गेल्या 8-9 वर्षांपासून वंचित आणि दुर्लक्षित राहिलेल्या प्रत्येक समाजघटकाला सक्षम करण्याचा देश प्रयत्न करत आहे. ‘वंचितांना प्राधान्य’ हा मंत्र घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.

देशात कधीकाळी असाही काळ होता, जेव्हा गरिबांसाठी अन्नधान्याची उपलब्धता आणि गुणवत्ता याबाबत प्रचंड अनिश्चितता असे, याचे स्मरण करत, आज प्रत्येक लाभार्थ्याला पूर्ण अन्नधान्य मोफत मिळत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले.

आयुष्मान भारत योजनेमुळे गरिबांची वैद्यकीय उपचारांची चिंता दूर झाली आहे, असे सांगत ते म्हणाले, “आम्ही घर, शौचालय, गॅस जोडणी आणि वीज या गरीब वर्गाच्या चिंतांकडे लक्ष देत आहोत”, ते म्हणाले. अलिकडच्या वर्षांत झालेल्या आर्थिक समावेशाविषयी बोलतांना आज बँकांचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

पाण्याचे मूल्य राजस्थानइतके कुणालाच समजू शकत नाही, असे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही केवळ 3 कोटी कुटुंबांना त्यांच्या घरात नळ जोडण्या मिळाल्या असून 16 कोटींहून अधिक कुटुंबांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या गेल्या साडेतीन वर्षांमधील प्रयत्नांमुळे आतापर्यंत अकरा कोटी पेक्षा जास्त कुटुंबांना पाण्याची नळ जोडणी मिळाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. शेतजमिनीला पाणीपुरवठा करण्यासाठी देशात सुरू असलेल्या सर्वांगीण कामाचाही त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, राजस्थानमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 15000 कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले आहेत, याची माहिती देऊन पंतप्रधान म्हणाले की, “पारंपरिक पद्धतींचा विस्तार असो, किंवा सिंचनासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब असो, शेतकऱ्यांना प्रत्येक पावलावर आधार दिला जात आहे”. 

‘गो-सेवा’ हे समाजसेवेचे आणि सामाजिक सक्षमीकरणाचे माध्यम बनवण्याच्या भगवान देवनारायण यांच्या उपक्रमाचा संदर्भ देत, देशातील गो-सेवेच्या वाढत्या भावनेकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. पाय आणि मौखिक आजारासाठीची देशव्यापी लसीकरण मोहीम, राष्ट्रीय कामधेनू आयोग आणि राष्ट्रीय गोकुळ मिशनची स्थापना यांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. “‘पशुधन’ (गुरे) हे, श्रद्धा आणि परंपरेबरोबरच आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक आहेत. म्हणूनच, किसान क्रेडिट कार्डचा विस्तार पशुपालन विभाग आणि पशुपालकांसाठी प्रथमच करण्यात आला आहे”, असा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. त्याचप्रमाणे, गोबरधन योजना ही कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करणारी ठरली आहे, पंतप्रधान म्हणाले.

गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामधील, आपण केलेल्या ‘पंच प्रतिज्ञांचे’ स्मरण करून, आपल्या वारशाचा अभिमान बाळगणे, गुलामगिरीची मानसिकता मोडून काढणे, देशाप्रति असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या लक्षात ठेवणे, स्वातंत्र्यसैनिकांच्या हौतात्म्याचे स्मरण करणे आणि आपल्या पूर्वजांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे, या उद्दिष्टांचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, राजस्थान ही वारशाची भूमी आहे, जिथे आपल्याला निर्मिती आणि उत्सवाचा उत्साह दिसतो, जिथे श्रमामध्ये सामाजिक सेवा दिसते, जिथे शौर्य ही कौटुंबिक परंपरा आहे आणि इथल्या भूमीमध्ये रंग आणि रागांचा संगम आहे.

तेजाजी ते पाबूजी, गोगाजी ते रामदेवजी, बाप्पा रावल ते महाराणा प्रताप यांसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या अतुलनीय योगदानाचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, या भूमीतील महान व्यक्ती, नेते आणि स्थानिक श्रद्धास्थानांनी देशाला नेहमीच मार्गदर्शन केले आहे. पंतप्रधानांनी विशेषत: गुर्जर समाजाच्या योगदानाची नोंद घेतली, जे नेहमीच शौर्य आणि देशभक्तीचे प्रतीक समजले जातात. “देशाचे रक्षण असो, की संस्कृतीचे रक्षण असो, गुर्जर समाजाने प्रत्येक काळात रक्षकाची भूमिका बजावली आहे”, असे पंतप्रधान म्हणाले आणि त्यांनी प्रेरणादायी बिजोलिया किसान चळवळीचे नेतृत्व करणारे क्रांतीवीर भूपसिंग गुर्जर यांचे उदाहरण दिले, ज्यांना विजय सिंह पथिक या नावानेही ओळखले जाते. कोतवाल धन सिंह जी आणि जोगराज सिंह जी यांच्या योगदानाचेही पंतप्रधान मोदी यांनी स्मरण केले. गुर्जर महिलांचे शौर्य आणि योगदान अधोरेखित करत पंतप्रधानांनी रामप्यारी गुर्जर आणि पन्ना धाय (दाई) यांना आदरांजली वाहिली. “ही परंपरा आजही जोपासली जात आहे. अशा असंख्य लढवय्यांना आपल्या इतिहासात योग्य ते स्थान मिळू शकले नाही, हे देशाचे दुर्दैव आहे. पण नवा भारत गेल्या दशकांमधील या चुका सुधारत आहे,” असे ते म्हणाले.

भगवान देवनारायण जी यांचा संदेश आणि त्यांची शिकवण पुढे नेण्यात गुज्जर समाजाच्या नवीन पिढीच्या महत्त्वावर पंतप्रधानांनी भर दिला. ते गुज्जर समाजाचेही सक्षमीकरण करतील आणि देशाला पुढे जायला देखील मदत करतील असे त्यांनी नमूद केले. राजस्थानच्या विकासासाठी 21 व्या शतकाचा काळ महत्त्वपूर्ण असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधानांनी देशाच्या विकासासाठी संघटित होऊन काम करण्याची गरज व्यक्त केली. “आज संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे”, पंतप्रधान म्हणाले. ते पुढे म्हणाले की, भारताने संपूर्ण जगात सिद्ध केलेल्या आपल्या सामर्थ्यामुळे, योद्ध्यांच्या या भूमीचा अभिमानही वाढला आहे. “भारत आज इतर देशांवरील आपले अवलंबित्व कमी करत, जगातील प्रत्येक मोठ्या व्यासपीठावर अखंड आत्मविश्वासाने बोलत आहे. आपण आपले संकल्प पूर्ण करून जगाच्या अपेक्षांच्या कसोटीवर उतरायला हवे”, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान देवनारायण जी यांचा आशीर्वाद आणि सबका प्रयास (प्रत्येकाचे प्रयत्न) याच्या मदतीने आपण नक्की यशस्वी ठरू, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी हा योगायोग निदर्शनास आणला की, कमळावर प्रकट झालेल्या भगवान देवनारायणजी यांच्या 1111 व्या अवतार महोत्सवाच्या वर्षी भारत जी-20 चे अध्यक्षपद भूषवित आहे, ज्याचा लोगोदेखील पृथ्वी वाहून नेणारे कमळ हेच आहे. या समारंभामधील सामाजिक ऊर्जा आणि भक्तीमय वातावरणाला वंदन करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, मालसेरी दुगरीचे मुख्य पुजारी हेमराज जी गुर्जर आणि खासदार सुभाष चंद्र बहेरिया आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

***

S.Kakade/R.Aghor/R.Agashe/P.Kor