नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 7 लोककल्याण मार्ग इथल्या त्यांच्या निवासस्थानी, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी सर्व पुरस्कार विजेत्यांना स्मृतीचिन्हे प्रदान केली आणि प्रत्येक विजेत्याशी त्याच्या कामगिरीवर वैयक्तिकपणे चर्चा केली, त्यानंतर त्यांनी संपूर्ण गटाशी संवाद साधला. अनौपचारिक वातावरणात त्यांनी मोकळा संवाद साधला. मुलांनी त्यांना आपल्या समोरच्या आव्हानांबद्दल विविध प्रश्न विचारले आणि विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन घेतले.
पंतप्रधानांनी पुरस्कार विजेत्यांना सुचविले की, त्यांनी छोट्या समस्या सोडवण्यापासून सुरुवात करून हळूहळू आपली क्षमता वाढवावी, आणि जीवनात पुढे जाताना मोठ्या समस्या सोडवण्याचा आत्मविश्वास वाढवावा. मानसिक आरोग्य आणि मुलांना भेडसावणार्या समस्यांवर चर्चा करताना, त्यांनी एखाद्या समस्येशी संबंधित कलंक दूर करणे, आणि अशा समस्या सोडवण्यात कुटुंबाची असलेली महत्वाची भूमिका, यावर आपले विचार मांडले. बुद्धिबळ खेळण्याचे फायदे, कला आणि संस्कृती करिअर म्हणून स्वीकारणे, संशोधन आणि नवोन्मेष, अध्यात्म, या आणि इतर अनेक मुद्द्यांवर या संवादा दरम्यान पंतप्रधानांनी चर्चा केली.
नवोन्मेष, सामाजिक सेवा, शिक्षण, क्रीडा, कला आणि संस्कृती आणि शौर्य या सहा श्रेणींमधील असाधारण कामगिरीबद्दल भारत सरकारच्या प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने मुलांना सन्मानित करण्यात येते. सन्मान चिन्ह, 1 लाख रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वर्षी बालशक्ती पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये देशभरातील 11 मुलांची प्रधान मंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2023 साठी निवड करण्यात आली आहे.
11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पुरस्कार विजेत्यांमध्ये 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे. त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: आदित्य सुरेश, एम. गौरवी रेड्डी, श्रेया भट्टाचार्यजी , संभब मिश्रा, रोहन रामचंद्र बहिर, आदित्य प्रताप सिंह चौहान, ऋषी शिव प्रसन्ना, अनुष्का जॉली, हनाया निसार, कोलागतला अलाना मीनाक्षी आणि शौर्यजित रणजितकुमार खैरे.
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
Had an excellent interaction with those who have been conferred the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar. https://t.co/4i8RXHcBYG pic.twitter.com/QC5ELeWJhR
— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2023