Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट 2023 च्या उद्घाटन सत्रातील पंतप्रधानांचे संबोधन

व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट 2023 च्या उद्घाटन सत्रातील पंतप्रधानांचे संबोधन


नवी दिल्‍ली, 12 जानेवारी 2023

 

सन्माननीय मान्यवर,

जगातील दक्षिणेकडील देशांचे नेते, नमस्कार! या शिखर परिषदेत तुमचे स्वागत करताना मला आनंद होत आहे. जगाच्या विविध भागातून आमच्या सोबत जोडले गेल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. नवीन वर्षाच्या पहाटेच्या रुपात आपण भेटत आहोत, ती नवीन आशा आणि नवीन ऊर्जा घेऊन येत आहे.  2023 हे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या देशांना आनंदाचे तसेच परिपूर्णतेचे जावो अशा शुभेच्छा मी 1.3 अब्ज भारतीयांच्या वतीने देतो.

आपण काळाच्या प्रवासात आणखी एक कठीण वर्षाचे पान उलटले आहे, यात आपण पाहिले: युद्ध, संघर्ष, दहशतवाद आणि भू-राजकीय तणाव: अन्न, खते आणि इंधनाच्या वाढत्या किमती; हवामान-बदलामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि कोविड महामारीचा दीर्घकालीन आर्थिक प्रभाव. हे स्पष्ट आहे की जग संकटात आहे. ही अस्थिरता किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे.

सन्माननीय मान्यवर,

जगातील दक्षिणेकडील भागात, अर्थात आपल्यावर भविष्याच्या नजरा टिकून आहेत. तीन चतुर्थांश मानवी लोकसंख्या आपल्या देशात राहते. आपलाही आवाज बरोबरीचा असायला हवा. म्हणूनच, जागतिक प्रशासनाचे आठ दशके जुने प्रारुप हळूहळू बदलत असताना, आपण नव्याने विकसित व्यवस्थेला आकार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

सन्माननीय मान्यवर,

बहुतेक जागतिक आव्हाने जगातील दक्षिणेकडील भागामुळे निर्माण झालेली नाहीत. पण त्याचा परिणाम मात्र आपल्यावर जास्त होतो. कोविड महामारी, हवामान बदल, दहशतवाद आणि अगदी युक्रेन संघर्षाच्या प्रभावांमध्ये आपण हे पाहिले आहे. यावरील उपाय शोधण्यात देखील आपली भूमिका किंवा आपले म्हणणे याचे फार महत्व नाही.

सन्माननीय मान्यवर,

भारताने नेहमीच आपला विकासाचा अनुभव जगातील दक्षिणेकडील आपल्या बांधवांशी सामायिक केला आहे. आमची विकास भागीदारी सर्व भौगोलिक आणि विविध क्षेत्रांना सामावून घेते. महामारीच्या काळात आम्ही 100 हून अधिक देशांना औषधे आणि लसींचा पुरवठा केला. आपले समान भविष्य ठरवण्यासाठी भारताने नेहमीच विकसनशील देशांच्या पाठीशी ठामपणे उभी राहाण्याची भूमिका बजावली आहे.

सन्माननीय मान्यवर,

भारताच्या जी20 अध्यक्षपद कार्यकाळाला या वर्षी सुरुवात होत असल्यामुळे, जगातील दक्षिणेकडील देशांच्या आवाजाला महत्व देणे हे आमचे उद्दिष्ट स्वाभाविक आहे. आमच्या जी-20 अध्यक्षपदासाठी, आम्ही – “एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य” ही संकल्पना निवडली आहे. हे आमच्या सभ्यतेच्या आचारसंहितेशी सुसंगत आहे. ‘एकता’ साकारण्याचा मार्ग मानव-केंद्रित विकासाद्वारेच आहे यावर आमचा विश्वास आहे. जगातील दक्षिणेकडील लोकांना यापुढे विकासाच्या फळांपासून वगळले जाऊ नये. आपण एकत्रितपणे जागतिक राजकीय आणि आर्थिक प्रशासनाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे असमानता दूर करू शकते, संधी वाढवू शकते, वाढीस पाठब देऊ शकते तसेच प्रगती आणि समृद्धी पसरवू शकते.

सन्माननीय मान्यवर,

जगात पुन्हा उत्साह भरण्यासाठी, आपण एकत्रितपणे ‘प्रतिसाद, मान्यता, आदर आणि सुधारणा’ या जागतिक जाहिरनाम्याची मागणी केली पाहिजे: एक समावेशक आणि संतुलित आंतरराष्ट्रीय जाहिरनामा तयार करून जगातील दक्षिणेकडील देशांच्या प्राधान्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. ‘सामान्य पण भिन्न जबाबदाऱ्या’ हे तत्त्व सर्व जागतिक आव्हानांना लागू होते हे मान्य करायला हवे. सर्व राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आदर, कायद्याचे राज्य आणि मतभेद आणि विवादांचे शांततापूर्ण निराकरण; तसेच संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करणे, त्यांना अधिक प्रासंगिक बनवणे यावर लक्ष दिले पहिजे.

सन्माननीय मान्यवर,

विकसनशील देश आव्हानांचा सामना करत असतानाही, येणारा काळ आपलाच आहे याबद्दल मी सकारात्मक आहे. आपला समाज आणि अर्थव्यवस्थेत क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणणाऱ्या सोप्या, व्यापक आणि शाश्वत उपयांचा शोध घेणे ही काळाची गरज आहे. असा दृष्टीकोन ठेवला तर गरीबी असो, जागतिक आरोग्य किंवा मानवी क्षमता बांधणी असो आपण कितीही कठीण आव्हानांवर मात करु शकतो. गेल्या शतकात परकीय सत्तेविरुद्धच्या आपल्या लढ्यात आपण परस्परांना पाठिंबा दिला होता. आपल्या नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करेल अशी नवी जागतिक व्यवस्था उभारण्यासाठी आपण या शतकातही हे पुन्हा करु शकतो.  

भारताच्या भूमिकेबद्दल सांगायचेच तर तुमचा आवाज हा भारताचा आवाज आहे. तुमची प्राथमिकता ही भारताची प्राथमिकता आहे. व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ समिटमधे येत्या दोन दिवसात प्राधान्याच्या आठ क्षेत्रांवर चर्चा होणार आहे. एकत्र मिळून जगातील दक्षिणेकडील देश नवीन आणि सृजनात्मक संकल्पना पुढे आणतील असा मला आत्मविश्वास आहे. या संकल्पना, जी -20 आणि इतर मंचावर आपल्या आवाजाचा आधार बनू शकतील. 

भारतात आम्ही प्रार्थना करतो- आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः. अर्थात, ब्रह्मांडातून सर्व दिशांनी उदात्त विचार आमच्यात येऊ देत. व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट म्हणजे आपल्या सामूहिक भविष्यासाठी उदात्त विचार प्राप्त करण्याचा सामूहिक प्रयत्न आहे.

सन्माननीय मान्यवर,

तुमच्या कल्पना आणि विचार ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे. सहभागी झाल्याबद्दल तुमचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.

धन्यवाद.

 

* * *

S.Patil/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai