Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

कर्नाटकमध्ये हुबळी येथे 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

कर्नाटकमध्ये हुबळी येथे 26व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण


नवी दिल्‍ली, 12 जानेवारी 2023

 

कार्यक्रमाला उपस्थित कर्नाटकचे राज्यपाल श्री थावरचंद गहलोत जी, मुख्यमंत्री श्री बसवराज बोम्मई जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारीगण, राज्य सरकारचे मंत्रीगण, खासदार, आमदार आणि कर्नाटकमधील आणि देशातील माझ्या युवा  मित्रहो !

मूरु साविरा मठा, सिध्दारूढा मठा, इन्तहा अनेक मठागला क्षेत्रकके नन्ना नमस्कारगलू! रानी चेन्नम्मा ना नाडु, संगोल्ली रायण्णा ना बीडू, ई पुन्य भूमि-गे नन्ना नमस्कारगलू!

कर्नाटकचे हे क्षेत्र आपली परंपरा, संस्कृती आणि ज्ञान यासाठी प्रसिद्ध आहे. येथील अनेक विभूतींना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या भागाने देशाला एकापेक्षा एक महान संगीतकार दिले आहेत. पंडित कुमार गंधर्व, पंडित बसवराज राजगुरु, पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि पंडिता गंगुबाई हनगल जींना मी आज हुबळीच्या भूमीवर येऊन नमन करत आपली श्रद्धांजली अर्पण करतो.

मित्रहो,

2023 या वर्षात ‘राष्ट्रीय युवा दिवस’चा हा दिवस खूपच जास्त खास आहे. एकीकडे हा ऊर्जा महोत्सव, आणि दुसरीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव! “उठा, जागे व्हा आणि लक्ष्य साध्य होण्यापूर्वी थांबू नका”! एली! एद्धेली!! गुरी मुट्टुवा तनका निल्लदिरी। विवेकानंद जींचा हा उद्घोष, भारताच्या युवा वर्गाच्या जीवनाचा मंत्र आहे. आज अमृतकाळात आपल्याला आपल्या कर्तव्यांवर भर देत, आपली  कर्तव्यं लक्षात घेऊन, देशाला पुढे घेऊन जायचे आहे. आणि यामध्ये भारताच्या युवा वर्गासमोर स्वामी विवेकानंद जींची मोठी प्रेरणा आहे. मी या प्रसंगी स्वामी विवेकानंद जींच्या चरणी नमन करतो. अगदी काही दिवसांपूर्वीच, कर्नाटकच्या भूमीवरील आणखी एक महान संत श्री सिद्धेश्वर स्वामी जींचे देहावसान झाले.

मी श्री सिद्धेश्वर स्वामी जींना देखील आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो.

मित्रहो

स्वामी विवेकानंद यांचे कर्नाटक सोबत अद्भुत नाते होते. त्यांनी आपल्या जीवनात कर्नाटक आणि या भागाला अनेक वेळा भेट दिली होती. बंगळूरुला जाताना ते हुबळी-धारवाड़ ला देखील आले होते. त्यांच्या या प्रवासांनी त्यांच्या जीवनाला एक नवी दिशा दिली होती. मैसुरूचे महाराज देखील त्या लोकांपैकी एक होते ज्यांनी स्वामी विवेकानंद यांना शिकागोला जाण्यासाठी मदत केली होती. स्वामीजींचे भारत भ्रमण या गोष्टीचा देखील दाखला आहे की कित्येक शतकांपासून आपली चेतना एक होती. एक राष्ट्र म्हणून आपला आत्मा एक होता. हे ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’च्या भावनेचे एक अमर उदाहरण आहे. याच भावनेला अमृतकाळात देश नव्या संकल्पांसोबत पुढे नेत आहे.

मित्रहो

स्वामी विवेकानंद जी सांगायचे की जेव्हा युवा ऊर्जा असेल, जेव्हा युवा शक्ति असेल तर भविष्याची निर्मिती करणे, राष्ट्राची निर्मिती करणे तितकेच सोपे असते. कर्नाटकच्या या भूमीने स्वतःच अशा कित्येक महान विभूती निर्माण केल्या आहेत, ज्यांनी आपल्या कर्तव्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले, अतिशय कमी वयात असामान्य कार्य केले. कित्तूरच्या राणी चेनम्मा देशाच्या अग्रणी महिला स्वातंत्र्य सेनानींपैकी एक होत्या. त्यांनी सर्वात अवघड कालखंडात देखील स्वातंत्र्याच्या लढाईला नेतृत्व दिले. राणी चेनम्मा यांच्या सैन्यात त्यांचे सहकारी संगोल्ली रायण्णा यांच्या सारखे वीर योद्धे देखील होते. ज्यांच्या शौर्याने ब्रिटिश सैन्याचे मनोधैर्य भंग केले होते. याच धरतीवरील नारायण महादेव डोनी तर केवळ 14 वर्षांच्या वयात देशासाठी बलिदान देणारे हुतात्मा बनले होते.

युवा वर्गाची सचेतन अवस्था काय असते, त्यांचा निर्धार कशा प्रकारे मृत्युला देखील मात देऊ शकतो, हे कर्नाटकचे सुपुत्र लान्स नायक हनुमंथप्पा खोप्पड़ यांनी सियाचिनच्या पहाड़ांवर दाखवून दिले होते. उणे 55 अंश सेल्शियस तापमानात देखील त्यांनी 6 दिवस मृत्युशी झुंज दिली आणि जिवंत बाहेर पडले. हे सामर्थ्य केवळ शौर्यापुरतेच मर्यादित नाही. तुम्ही पहा, श्री विश्वेश्वरैय्या यांनी इंजीनियरिंग मध्ये आपले कर्तृत्व गाजवून हे सिद्ध केले की युवा प्रतिभा कोणत्याही एका चौकटीत बांधलेली नसते. याच प्रकारे, देशाच्या वेगवेगळ्या भागात आपल्या युवा वर्गाची प्रतिभा आणि क्षमतेने एकापेक्षा एक कल्पनातीत, अविश्वसनीय उदाहरणांची एक रास निर्माण झाली आहे. आज देखील, गणितापासून विज्ञानापर्यंत, जेव्हा जागतिक पातळीवर स्पर्धा होतात तेव्हा भारतीय युवा वर्गाची क्षमता संपूर्ण जगाला चकित करते.

मित्रहो,

वेगवेगळ्या कालखंडात कोणत्याही राष्ट्राचे प्राधान्यक्रम बदल असतात, त्यांची लक्ष्ये बदलत असतात.आज 21व्या शतकाच्या ज्या टप्प्यावर आपण भारतीय पोहोचलो आहोत,आपला भारत पोहोचला आहे, असा उपयुक्त काळ अनेक शतकांनंतर आला आहे. आणि याचे सर्वात मोठे कारण आहे भारताच्या युवा वर्गाचे सामर्थ्य, ही युवा शक्ती. आज भारत एक युवा देश आहे. जगातील मोठी युवा लोकसंख्या आपल्या देशात आहे, भारतात आहे.

युवा शक्ती हे भारताच्या प्रवासाला गती देणारे बळ आहे. राष्ट्रउभारणीसाठी पुढील 25 वर्षे महत्त्वाची आहेत. युवा शक्तीची स्वप्ने भारताची दिशा निश्चित करतात. युवा शक्तीच्या आकांक्षा भारताचे गंतव्य स्थान निर्धारित करतात. युवा शक्तीचा ध्यास भारताचा मार्ग ठरवतो. या युवा शक्तीचा सुयोग्य वापर करण्यासाठी आपल्या विचारांसोबत, आपल्या प्रयत्नांसोबत आपण तरुण झाले पाहिजे. तरुण होणे म्हणजे आपल्या प्रयत्नांमध्ये गतीशील असणे. तरुण असणे म्हणजे आपल्या दृष्टीकोनाला व्यापक बनवणे, तरुण असणे म्हणजे व्यावहारिक असणे.

मित्रहो,

जर आपल्याकडे संपूर्ण जग तोडगे काढण्यासाठी पाहत असेल तर त्याचे कारण आहे आपल्या अमृत पिढीची समर्पित वृत्ती. आज ज्यावेळी संपूर्ण जग भारताकडे इतक्या अपेक्षांनी पाहत आहे तर यामागे तुम्ही सर्व माझे युवा सहकारी आहात.

आज आपण जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत.  पहिल्या तीन क्रमांकाच्या अर्थव्यवस्थांमध्ये देशाला घेऊन जाण्याचे आमचे लक्ष्य आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची ही वाढ आपल्या युवा वर्गासाठी रोजगाराच्या अमाप संधी घेऊन येईल. आज आपण कृषी क्षेत्रात जगातील अग्रणी ताकद आहोत. कृषि क्षेत्रात तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाने एक नवी क्रांती येणार आहे. यामध्ये युवा वर्गासाठी नव्या संधी निर्माण होतील, नव्या उंचीवर जाण्याचे नवे मार्ग खुले होतील. क्रीडा क्षेत्रातही आज भारत जगातील मोठी ताकद बनण्याच्या दिशेने आगेकूच करत आहे. भारताच्या युवा वर्गाच्या सामर्थ्यामुळेच हे शक्य होत आहे. आज गाव असो, शहर असो किंवा पाडा असो! प्रत्येक ठिकाणी युवा वर्गाचा  उत्साह ओसंडून वाहत आहे. आज तुम्ही सर्व या बदलांचे साक्षीदार ठरत आहात. उद्या या सामर्थ्यामुळे तुम्ही भावी नेते बनाल.

मित्रांनो,

इतिहासातील हा विशेष कालखंड आहे. तुमची पिढी एक विशेष पिढी आहे. तुमच्या समोर एक विशेष मिशन आहे. जागतिक पातळीवर भारताचा ठसा निर्माण करण्याचे हे मिशन आहे. प्रत्येक मिशनसाठी पाया आवश्यक असतो.

अर्थव्यवस्था असो किंवा शिक्षण क्षेत्र, क्रीडा क्षेत्र किंवा स्टार्ट अप उद्योग, कौशल्य विकास असो किंवा डिजिटलीकरण, यापैकी प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्या आठ-नऊ वर्षांच्या काळात सशक्त पायाभरणी करण्यात आली आहे. तुमच्या भरारीसाठी धावपट्टी तयार आहे! आज घडीला, भारत आणि भारतातील युवक यांच्याबद्दल जगामध्ये मोठ्या प्रमाणावर आशावाद निर्माण झालेला आहे. ही आशा तुम्हा सर्वांविषयी आहे. हा आशावाद तुमच्यामुळे निर्माण होऊ शकला आहे. त्याचबरोबर ही आशा तुमच्यासाठी देखील आहे.

आज, जगातील कितीतरी जाणकार असे म्हणत आहेत की सध्याचे शतक हे भारताचे शतक आहे. हे तुमचे शतक आहे, भारतातील युवावर्गाचे शतक! जागतिक पातळीवरील अनेक सर्वेक्षणांचे अहवाल असे सांगतात की जगातील मोठ्या गुंतवणूकदारांपैकी बहुतांश गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. हे गुंतवणूकदार, तुमच्यात म्हणजे भारतातील युवकांमध्ये गुंतवणूक करू इच्छितात. भारतातील स्टार्ट अप उद्योगांमध्ये विक्रमी प्रमाणात गुंतवणूक होताना दिसते आहे. जागतिक पातळीवरील अनेक कंपन्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत निर्मितीविषयक कारखाने उभारत आहेत. खेळण्यांपासून ते पर्यटनापर्यंत, संरक्षण क्षेत्रापासून डिजिटल उपक्रमांपर्यंत सर्वच बाबतीत भारत जगभरात उल्लेखनीय कार्य करत आहे. म्हणूनच, आशावाद आणि संधी यांच्या एकत्रीकरणाचा हा फारच ऐतिहासिक काळ आहे.

मित्रांनो,

आपल्या देशाने सदैव स्त्रीशक्तीला जागृत ठेवण्याचे आणि स्त्रीशक्तीने राष्ट्रशक्तीला जागृत ठेवण्याचे, राष्ट्रशक्तीला वाढवण्याचे कार्य केले आहे. आता, स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात, स्त्रिया तसेच आपल्या सुकन्या अनेकानेक नवनवे पराक्रम करून दाखवत आहेत. भारतातील स्त्रिया आज लढाऊ विमानांचे उड्डाण करत आहेत, सैन्यात लढवय्या सैनिकाची जबाबदारी पार पाडत आहेत. विज्ञान-तंत्रज्ञान, अवकाश संशोधन, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या सुकन्या नवी उंची गाठत आहेत. भारत आता संपूर्ण शक्तीनिशी स्वतःच्या लक्ष्याकडे वाटचाल करत आहे असा उद्घोष सर्वत्र दुमदुमत आहे.

मित्रांनो,

आपल्याला 21 वे शतक हे भारताचे शतक म्हणून घडवायचे आहे. आणि म्हणून, आपल्याला वर्तमानकाळाच्या दहा पावले पुढचा विचार करणे गरजेचे आहे. आपली मनोधारणा भविष्यवादी असायला हवी, आपला दृष्टीकोन भविष्यवादी असायला हवा! युवा वर्गाच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी आपण पॉझिटिव्ह disruptions केले पाहिजेत. जगातील आधुनिक देशांच्या देखील पुढे राहिले पाहिजे. आपण आठवू लागलो, तर आजपासून दहा-वीस वषांपूर्वी ज्या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या त्या आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. अशाच पद्धतीने येत्या काही वर्षांत, शक्यतो, हे दशक संपण्याच्या आधीच, आपले जग एकदम बदलून जाणार आहे. कृत्रिम बुद्धीमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स तसेच एआर-व्हीआर सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानांमध्ये देखील उत्क्रांती घडून त्यांना नवे स्वरूप मिळालेले तुम्हाला दिसेल. डेटा सायन्स तसेच सायबर सुरक्षा यांच्यासारखे शब्द आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये अधिक खोलवर समाविष्ट झालेले असतील. 

आपल्या शिक्षण क्षेत्रापासून, देशाच्या संरक्षणापर्यंत, आरोग्य सुविधांपासून दळणवळणाच्या सोयींपर्यंत प्रत्येक गोष्ट आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक नवे रुप घेताना आपल्याला दिसेल. आज ज्या कामांचे कुठे अस्तित्व दिसत नाही अशी कामे येत्या काळात युवावर्गासाठी मुख्य प्रवाहातील व्यवसाय झालेले असतील. आणि म्हणूनच, आपल्या युवकांनी भविष्यातील कौशल्यांसाठी स्वतःला सज्ज करणे आवश्यक आहे. जगात जे जे नव्याने घडत आहे त्याच्याशी आपण स्वतःला जोडून घेतले पाहिजे. जी कामे कोणीही करत नाही अशी कामे देखील आपल्याला करावी लागतील. नव्या पिढीची अशा प्रकारची मानसिकता घडविण्यासाठी देशाने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून व्यवहार्य आणि भविष्यवादी शैक्षणिक प्रणाली उभारण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. शालेय शिक्षणाच्या पातळीपासूनच नवोन्मेषी आणि कौशल्याधारित शिक्षण देण्यावर आज अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. स्वतःच्या आवडीनुसार शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य आजच्या युवकांकडे उपलब्ध आहे. अशा मजबूत पायावर, भविष्यातील भारताची उभारणी करणाऱ्या आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या युवकांची फळी निर्माण होईल.

मित्रांनो,

वेगाने बदलत राहणाऱ्या आजच्या या जगात, स्वामी विवेकानंद यांनी दिलेले दोन संदेश देशातील प्रत्येक तरुणाच्या जीवनामध्ये समाविष्ट झाले पाहिजेत. हे दोन संदेश आहेत- संस्था आणि नवोन्मेष! जेव्हा आपण आपल्या विचारांची कक्षा विस्तारित करतो, संघभावनेने कार्य करतो तेव्हा संस्था निर्माण होते. आजच्या प्रत्येक युवकाने स्वतःच्या व्यक्तिगत यशाचा  संघात्मक यशाच्या रुपात विस्तार करणे आवश्यक आहे. हीच संघभावना ‘टीम इंडिया’ च्या रुपात विकसित भारताला प्रगतीपथावर घेऊन जाईल.

माझ्या तरुण मित्रांनो,

तुम्हांला स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेली आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.नवोन्मेष म्हणजेच अभिनव संशोधन करण्याच्या बाबतीत स्वामी विवेकानंद म्हणत असत की, – प्रत्येक कार्याला तीन टप्पे पार करून पुढे जावे लागते- उपहास, विरोध आणि स्वीकृती. नवोन्मेष ही संकल्पना एका वाक्यात सांगायची झाली तर ती अशीच सांगता येईल. उदाहरण घ्यायचे झाले तर, काही वर्षांपूर्वी देशात डिजिटल पद्धतीने आर्थिक व्यवहारांची सुरुवात झाली तेव्हा काही लोकांनी या कल्पनेची खूप चेष्टा केली होती. स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली तेव्हा देखील हे लोक म्हणाले होते की अशा प्रकारचे अभियान भारतात फार काळ सुरु राहू शकत नाही. देशातील गरीब नागरिकांसाठी बँकांमध्ये जनधन खाती उघडण्याची मोहीम सुरु झाली, सरकारने ही योजना आणली तेव्हा देखील अनेकांनी या योजनेची खिल्ली उडवली. कोविड आजाराच्या काळात आपल्या संशोधकांनी स्वदेशी लस तयार केली तेव्हाही त्यावर, अशी लस परिणामकारक ठरेल का? असा प्रश्न उपस्थित करून उपहासात्मक टीका करण्यात आली. 

पण आता बघा, डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत भारत आज जगातील आघाडीचा देश झाला आहे. जनधन बँक खाती आज आपल्या अर्थव्यवस्थेची मोठी शक्ती झाली आहेत. लस उत्पादन क्षेत्रात भारताच्या संशोधनाची संपूर्ण जगात चर्चा सुरु आहे. म्हणूनच, तुम्हां तरुणांकडे जर एखादी नवी संकल्पना असेल, तर हे लक्षात असू द्या की तुमची चेष्टा होऊ शकेल, तुमच्या कल्पनेला विरोध होईल. पण, जर तुम्हांला तुमच्या संकल्पनेवर पूर्ण विश्वास असेल तर तुम्ही त्या कल्पनेवर काम सुरु ठेवा. स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. खिल्ली उडवणाऱ्यांच्या विचारांपेक्षा तुमचे यश अधिक मोठे आहे हेच सिध्द होईल.

मित्रांनो,

तरुणांना सोबत घेऊन आज देशात अनेक नवे उपक्रम आणि नवे प्रयोग राबवण्यात येत आहेत. याच मालिकेत, राष्ट्रीय युवक महोत्सवाच्या माध्यमातून देखील देशाच्या विविध राज्यांतील तरुण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी हिरीरीने पुढे येत आहेत. हे म्हणजे काही प्रमाणात स्पर्धात्मक आणि सहकारात्मक संघवादाप्रमाणे आहे. विविध राज्यांतील तरुण निकोप स्पर्धेच्या भावनेने या महोत्सवात आपापल्या कौशल्यांचे सादरीकरण करण्यासाठी आले आहेत. या स्पर्धेत कोण जिंकले, हे फारसे महत्त्वाचे नाही कारण, काहीही झाले तरी शेवटी भारताचाच विजय होणार आहे, कारण या युवा महोत्सवामध्ये आपल्या देशातील तरुणांची प्रतिभा झळाळत्या स्वरुपात सर्वांसमोर सिद्ध होईल.

तुम्ही या महोत्सवात एकमेकांशी स्पर्धा करण्यासोबतच, एकमेकांना सहकार्य देखील करणार आहात. म्हणूनच असे म्हटले जाते की, जेव्हा स्पर्धेत भाग घेणारे सर्वजण या स्पर्धेच्या नियमांचे पालन करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करतात तेव्हाच खऱ्या अर्थाने स्पर्धा होऊ शकते. आपल्याला स्पर्धा आणि सहकार्य या दोन्हींच्या एकत्रित भावनेला प्रोत्साहन द्यायचे आहे. आपले प्रत्येक उद्दिष्ट साध्य करताना आपल्याला हा विचार करायचा आहे की या यशामुळे आपला देश किती प्रगती करेल. आज आपल्या देशाचे लक्ष्य आहे – विकसित भारत, सशक्त भारत! विकसित भारताचे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला थांबता येणार नाही. देशातील प्रत्येक तरुण या स्वप्नाला स्वतःचे स्वप्न समजून पूर्ण करेल, देशाची ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यांवर घेईल याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. 

याच विश्वासासह, तुम्हां सर्वांचे खूप खूप आभार !!

 

* * *

N.Chitale/S.Patil/Shailesh/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai