Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

108 व्या भारतीय विज्ञान परिषदेला पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले संबोधित

108 व्या भारतीय विज्ञान परिषदेला पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले संबोधित


नवी दिल्‍ली, 3 जानेवारी 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 108 व्या भारतीय विज्ञान परिषदेला  (आयएससी ) दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. या वर्षीची भारतीय विज्ञान परिषद “महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान” या संकल्पनेवर केंद्रित असून यामध्ये शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि हे साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका या विषयांवर चर्चा होईल.

या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी, आगामी 25 वर्षांच्या भारताच्या विकासगाथेमध्ये  भारताच्या वैज्ञानिक सामर्थ्याची भूमिका अधोरेखित केली. “जेव्हा विज्ञानात तळमळीसोबतच   देशसेवेची भावना रुजवली जाते, तेव्हा त्याचे फलित  अभूतपूर्व असते, मला खात्री आहे की, भारताचा वैज्ञानिक समुदाय आपल्या देशासाठी कायमच  पात्र असलेले एक सुयोग्य  स्थान निश्चित करेल  ”, असे ते म्हणाले.

निरीक्षण हे विज्ञानाचे मूळ आहे, आणि  अशा निरीक्षणामुळेच शास्त्रज्ञ नमुन्यांचा अभ्यास करतात  आणि आवश्यक परिणामांवर पोहोचतात, असे सांगत पंतप्रधानांनी माहिती संकलित करणे  आणि परिणामांचे  विश्लेषण करण्याचे महत्त्व नमूद केले. 21व्या शतकातील भारतात माहिती  आणि तंत्रज्ञानाची मुबलक उपलब्धता अधोरेखित करत त्यात  भारतीय विज्ञानाला नवीन उंचीवर नेण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती विश्लेषणाचे क्षेत्र वेगाने वाटचाल करत असून हे क्षेत्र  माहितीचा  सूक्ष्म दृष्टीकोन आणि विश्लेषणाचे कृतीयोग्य ज्ञानात रूपांतर करण्यास खूप सहाय्य्यकारी आहे, अशी माहिती त्यांती दिली. “पारंपरिक ज्ञान असो किंवा आधुनिक तंत्रज्ञान असो, वैज्ञानिक शोधात प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची असते”, पंतप्रधानांनी सांगितले. संशोधनावर आधारित विकसित विविध तंत्रांचा वापर करून वैज्ञानिक प्रक्रियांना बळकटी देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

जागतिक नवोन्मेष निर्देशांकामध्ये भारताने 2015 मधील 81 व्या स्थानावरून 40 व्या स्थानावर झेप घेतल्याने जगातील सर्वोच्च देशांमध्ये भारताची गणना केली जात आहे, असे पंतप्रधानांनी वैज्ञानिक दृष्टीकोनातून भारताच्या प्रयत्नांच्या परिणामाबद्दल बोलताना सांगितले. पीएचडी आणि स्टार्टअप व्यवस्थेच्या संख्येच्या बाबतीत भारत जगातील पहिल्या तीन देशांमध्ये आहे, असे त्यांनी सांगितले.

महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासाची सांगड घालणाऱ्या विज्ञान परिषदेच्या  यंदाच्या संकल्पनेबद्दल  आनंद व्यक्त करताना पंतप्रधानांनी  दोन्ही क्षेत्रांमधील परस्पर पूरकतेवर भर दिला. विज्ञानाच्या माध्यमातून महिलांना केवळ सक्षम करणेच नाही तर महिलांच्या योगदानाने विज्ञानाचे सशक्तीकरण देखील करणे हा आपला  विचार आहे”, यावरही  त्यांनी भर दिला.

जी -20 चे अध्यक्षपद भूषवण्याची संधी भारताला प्राप्त झाली आहे असे सांगत या अध्यक्षपदाच्या काळात महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, हा हाती घेण्यात आलेल्या  सर्वोच्च प्राधान्य विषयांपैकी एक आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.  गेल्या 8 वर्षात भारताने सरकारपासून  समाजापर्यंत ते  अर्थव्यवस्थेपर्यंतची अभूतपूर्व  कार्ये हाती घेतली  असून त्याची  आज जगभरात चर्चा होत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. लघुउद्योग आणि व्यवसायातील भागीदारी असो किंवा स्टार्ट-अप जगतातील नेतृत्व असो, आपले सामर्थ्य जगासमोर दाखवणाऱ्या महिलांना अधोरेखित करत, पंतप्रधानांनी भारतातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या मुद्रा योजनेचे उदाहरण दिले. बाह्य संशोधन आणि विकास क्षेत्रात महिलांचा सहभाग दुप्पट करण्यासंदर्भात त्यांनी लक्ष  वेधले. महिला आणि विज्ञान हे दोन्ही घटक  देशात प्रगती करत आहेत हा महिलांच्या वाढत्या सहभागाचे प्रमाण  आहे, असे मोदी म्हणाले.

“विज्ञानाचे प्रयत्न जेव्हा प्रयोगशाळेतून बाहेर पडून लोकांपर्यंत  पोहोचतात आणि त्यांचा प्रभाव जागतिक स्तरापासून तळागाळापर्यंत पोहोचतो, जेव्हा त्याची व्याप्ती नियतकालिकापासून  दैनंदिन जीवनापर्यंत  असते आणि जेव्हा संशोधनातून वास्तविक जीवनात बदल दिसून येतो तेव्हाच ते मोठ्या यशात बदलू शकतात”, असे पंतप्रधानांनी  ज्ञानाचे कृतीशील  आणि उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर करण्याच्या वैज्ञानिकांच्या आव्हानाबद्दल बोलताना सांगितले. जेव्हा विज्ञानाची कामगिरी  प्रयोग आणि लोकांच्या अनुभवांमधील अंतर मिटवते तेव्हा ती एक महत्त्वाचा संदेश देते आणि ज्यांना विज्ञानाची भूमिका पटते त्या तरुण पिढीला प्रभावित करते, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी, अशा तरुणांना मदत करण्यासाठी संस्थात्मक चौकटीच्या गरजेवर भर दिला. अशी सक्षम संस्थात्मक चौकट विकसित करण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. वैज्ञानिक वृत्ती असलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी उपयुक्त अशा ‘टॅलेंट हंट’  आणि हॅकेथॉनची उदाहरणे त्यांनी दिली. पंतप्रधानांनी क्रीडा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा उल्लेख करत, या यशाचे श्रेय उदयोन्मुख संस्थात्मक यंत्रणा आणि गुरू-शिष्य परंपरेला दिले. ही परंपरा विज्ञान क्षेत्रातील यशाचा मंत्र ठरू शकते, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला.

देशामध्ये विज्ञानाच्या विकासाचा मार्ग खुला करणार्‍या मुद्द्यांकडे लक्ष वेधत, भारताच्या गरजा पूर्ण करणे हे संपूर्ण वैज्ञानिक समुदायाच्या सर्व प्रेरणेचे मूळ असायला हवे, असे पंतप्रधान म्हणाले. “भारतातील विज्ञानाने देशाला आत्मनिर्भर बनवायला हवे”, कारण 17-18 टक्के मानवी लोकसंख्या भारतात राहते आणि अशा वैज्ञानिक विकासाचा संपूर्ण लोकसंख्येला फायदा झाला पाहिजे असे त्यांनी नमूद केले. संपूर्ण मानवतेसाठी महत्त्वाच्या असलेल्या विषयांवर काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशाच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, भारत राष्ट्रीय हायड्रोजन मिशनवर काम करत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. ती यशस्वी करण्यासाठी भारतात इलेक्ट्रोलायझर्ससारख्या महत्त्वपूर्ण उपकरणांची निर्मितीच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

नवनव्या आजारांवरील उपचाराचे मार्ग विकसित करण्यात वैज्ञानिक समुदायाची  भूमिका आणि नवीन लसी विकसित करण्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन देणे याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला.  रोगांचे वेळीच निदान व्हावे यासाठी एकात्मिक रोग निगराणीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी सर्व मंत्रालयांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. त्याचप्रमाणे, ‘लाईफ’  म्हणजेच पर्यावरणस्नेही जीवनशैली चळवळीची शास्त्रज्ञांना खूप मदत होऊ शकते असे ते म्हणाले.

भारताच्या आवाहनानुसार संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. ही प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. भारतातील भरड धान्य आणि त्याचा वापर वाढवण्यासाठी कार्य केले जाऊ शकते तर जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी वैज्ञानिक समुदायाद्वारे प्रभावी पावले उचलली जाऊ शकतात हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

महानगरपालिकांतील घनकचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, जैव-वैद्यकीय कचरा आणि कृषी कचरा यांची व्याप्ती वाढत असल्याने आणि सरकार चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देत असल्याने कचरा व्यवस्थापनातील विज्ञानाची भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

महानगरपालिकांतील घनकचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, जैव-वैद्यकीय कचरा आणि कृषी कचरा यांची व्याप्ती वाढत असल्याने आणि सरकार चक्राकार अर्थव्यवस्थेला चालना देत असल्याने कचरा व्यवस्थापनातील विज्ञानाची भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली.

भारत अवकाश क्षेत्रामध्‍ये  सध्या जोमात कार्यरत आहे. येथे कमी किमतीच्या उपग्रह प्रक्षेपण वाहनांची भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली. यामुळे जग आपल्या सेवा घेण्यासाठी पुढे येईल असेही नमूद केले.  पंतप्रधानांनी संशोधन आणि विकास प्रयोगशाळा तसेच शैक्षणिक संस्थांशी जोडले गेल्यास खाजगी कंपन्या आणि स्टार्टअप्सच्या संधींवर प्रकाश टाकला.  ‘क्वांटम कम्प्युटिंग’ आणि ‘ क्वांटम फ्रंटियर’  म्हणून भारत जगामध्ये आपला ठसा उमटवत आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  “भारत, क्वांटम कम्प्युटिंग, रसायनशास्त्र, संप्रेषण, सेन्सर्स, क्रिप्टोग्राफी आणि नवीन सामग्रींच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. तरुण संशोधक आणि शास्त्रज्ञांनी क्वांटम क्षेत्रात प्राविण्य मिळवून नेतृत्व करावे असे  आवाहन त्यांनी केले.

भविष्यवेधी संकल्पना आणि कोठेही काम होत नसलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर मोदी यांनी भर दिला.  त्यांनी एआय, एआर आणि व्हीआरला प्राधान्य देण्यास सांगितले.  वैज्ञानिक समुदायाने सेमीकंडक्टर चिप्समध्ये नवनवीन संशोधन करण्याचे आवाहन करत सेमीकंडक्टर क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी आतापासून तयारी करण्याचा विचार करण्यास सांगितले.  “जर देशाने या क्षेत्रांमध्ये पुढाकार घेतला तर आपण उद्योग 4.0 चे नेतृत्व करण्याच्या स्थितीत असू”, असे ते म्हणाले.

भारतीय विज्ञान काँग्रेसच्या या अधिवेशनात विविध रचनात्मक मुद्यांवर भविष्यासाठी एक स्पष्ट पथदर्शी आराखडा तयार केला जाईल, असा विश्वास भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी व्यक्त केला.  “अमृतकाळात, आपल्याला भारताला आधुनिक विज्ञानाची सर्वात प्रगत प्रयोगशाळा बनवायची आहे”, अशा शब्दात त्यांनी समारोप केला.

 

पार्श्वभूमी

“महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान” ही या वर्षीच्या भारतीय विज्ञान कॉंग्रेसची (आयएससी) संकल्पना आहे. यात शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि हे साध्य करण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाची भूमिका या विषयांवर चर्चा होईल. सहभागी महिलांना एसटीईएम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) शिक्षण, संशोधनात समान संधी आणि आर्थिक सहभाग मिळवून देण्याचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच शिक्षण, संशोधन आणि उद्योगाच्या उच्च श्रेणींमध्ये महिलांची संख्या वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा आणि विचारविनिमय केला जाईल.  विज्ञान आणि तंत्रज्ञानातील महिलांचे योगदान दर्शविण्यासाठी एक विशेष कार्यक्रम देखील आयोजित केला जाईल, यात ख्यातनाम महिला शास्त्रज्ञांची व्याख्याने देखील होतील.

यावेळी आयएससी सोबतच इतरही अनेक कार्यक्रम आयोजित केले जातील.  मुलांमध्ये वैज्ञानिक रुची आणि जिज्ञासा वाढवण्यासाठी बाल विज्ञान काँग्रेसचेही आयोजन केले जात आहे . जैव-अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी शेतकरी विज्ञान काँग्रेस एक व्यासपीठ प्रदान करेल.  आदिवासी विज्ञान काँग्रेस देखील आयोजित केली जाणार आहे, यामाध्यमातून आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच स्थानिक प्राचीन ज्ञान प्रणाली आणि पद्धतींचे वैज्ञानिक दर्शन घडवण्यासाठी ते एक व्यासपीठ असेल.

भारतीय विज्ञान काँग्रेसचे पहिले सत्र 1914 मध्ये आयोजित करण्यात आले होते. आयएससीचे हे 108 वे वार्षिक अधिवेशन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात होत आहे. हे विद्यापीठ यंदा शताब्दी साजरी करत आहे.

 

 

 

 

 

 

 

* * *

JPS/S.Bedekar/Sonal C/Vinayak/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai