नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर 2022
नमस्कार!
आव्हानात्मक जागतिक वातावरणात G-20 ला उत्तम नेतृत्वाचा लाभ करुन दिल्याबदद्ल मी राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांचे मनापासून अभिनंदन करतो. हवामानबदल, कोविड महामारी, युक्रेनमधील घडामोडी, आणि या सगळ्याशी संबधित जागतिक स्तरावरील अडचणी. या सगळ्यामुळे जगात एकप्रकारे गोंधळ माजला होता. जागतिक पुरवठा साखळ्या विस्कळीत झाल्या आहेत. जगभरात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा दिसून येत आहे. प्रत्येक देशातील गरीबांची परिस्थिती अजून बिकट झालेली आहे. नेहमीचं जीवनच त्यांच्यासाठी आव्हान असतं. अशा प्रकारच्या दुहेरी संकटांना तोंड देण्यासाठी लागणारं आर्थिक पाठबळ त्यांच्याकडे नसतं. दुहेरी संकटामुळे ते हाताळण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक क्षमता ते गमावत जातात. संयुक्त राष्ट्रांसारख्या बहुआयामी संस्थासुद्धा या बाबतीत अयशस्वी ठरल्या हे ठामपणे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्य़ांच्यांमध्ये गरजेनुसार आवश्यक त्या सुधारणा करण्यात आपण सर्वजण कमी पडलो हे मान्य करायला हवं. म्हणूनच आज G-20 कडून जगाच्या खूप अपेक्षा आहेत आणि अशा वेळीच या गटाची समर्पकता अधिक मोलाची ठरते.
मान्यवरहो,
आपल्याला युक्रेनमधील संघर्ष विराम आणि मुत्सद्देगिरीने समस्या सोडवण्याचा मार्ग शोधायला हवा, याचा मी पुनरुच्चार करतो. गेल्या शतकात दुसऱ्या महायुद्धाने जगात हाहाकार माजवला. त्यानंतर त्या काळातील नेत्यांनी शांततेचा मार्ग निवडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आता आपली वेळ आहे. कोविडपश्चात काळातील नवीन जगाची घडी बसवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. जगाला शांतता, सामंजस्य आणि सुरक्षितता यांची खात्री देता यावी यासाठी ठोस व एकत्रितपणे निश्चयी वृत्ती दाखवणे ही काळाची गरज आहे. पुढील वर्षी जेव्हा बुद्ध आणि गांधी यांच्या पावन भूमीवर G20 चे सदस्य भेटतील तेव्हा जगाला शांततेचा संदेश देण्यावर आपणा सर्वांमध्ये एकमत होईल याची मला खात्री आहे.
मान्यवरहो,
महामारीमध्ये भारताने आपल्या 1.3 अब्ज नागरिकांना अन्नसुरक्षा प्रदान केली आहे. त्याच वेळी अनेक गरजू देशांनाही धान्याचा पुरवठा केला. अन्नसुरक्षेच्या दृष्टीने बघता आताचा खतांचा तुटवडा हे सुद्धा एक मोठे संकट आहे. आजचा खतांचा तुटवडा म्हणजे उद्याचे अन्नसंकट. आणि यावर कोणताही उपाय जगाकडे नाही. खते आणि धान्ये यांची पुरवठासाखळी हमखास अखंड राखण्यासाठी आपल्याला परस्परांमध्ये सहमतीचा करार राबवायला हवा. भारतामध्ये शाश्वत अन्नसुरक्षेसाठी आम्ही नैसर्गिक शेती आणि भरडधान्यांसारखी पारंपरिक पोषक धान्ये पुन्हा लोकप्रिय करत आहोत. कुपोषण आणि भूक यांचा अगदी जागतिक पातळीवरील प्रश्न सोडवण्यासाठी भरड धान्यांचा उपयोग करणे शक्य आहे. पुढील वर्ष हे आपण सर्वांनी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून मोठ्या उत्साहाने साजरे करायला हवे.
मान्यवरहो,
भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्यामुळे जागतिक स्तरावरील विकासासाठी भारताची उर्जासुरक्षासुद्धा महत्वाची आहे. उर्जा पुरवठ्यावरील कोणत्याही बंधनांना आपण उत्तेजन देता कामा नये तसेच उर्जाविपणनातील स्थिरतेचीही खात्री द्यायला हवी. स्वच्छ उर्जा आणि पर्यावरण यासाठी भारत कटीबद्ध आहे. सन 2030 पर्यंत आमच्या उर्जावापरातील निम्मी उर्जा ही नवीकरणीय उर्जा स्रोतांपासून मिळवलेली असेल. सर्वसमावेशक उर्जा संक्रमणासाठी विकसनशील देशांना कालमर्यादित आणि किफायतशीर अर्थपुरवठा तसेच तंत्रज्ञानाचा शाश्वत पुरवठा होणे महत्वाचे आहे.
मान्यवरहो
G-20 मधील भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात आपण या सर्व मुद्यांवर जागतिक सहमती होण्यासाठी काम करुया
धन्यवाद
सूचनाः पंतप्रधानांच्या भाषणाचा साधारण अनुवाद आहे. मूळ भाषण हिंदीत दिले गेले होते.
* * *
S.Patil/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com
/PIBMumbai
/pibmumbai
At the @g20org Summit this morning, spoke at the session on Food and Energy Security. Highlighted India’s efforts to further food security for our citizens. Also spoke about the need to ensure adequate supply chains as far as food and fertilisers are concerned. pic.twitter.com/KmXkeVltQo
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2022
In India, in order to further sustainable food security, we are emphasising on natural farming and making millets, along with other traditional food grains, more popular. Also talked about India’s strides in renewable energy.
— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2022