Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी नवी दिल्ली येथे दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित

पंतप्रधानांनी नवी दिल्ली येथे दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमाला केले संबोधित


नवी दिल्‍ली, 3 नोव्‍हेंबर 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे केंद्रीय दक्षता आयोगाच्या (सीव्हीसी) दक्षता जागरुकता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. सीव्हीसीच्या नवीन तक्रार व्यवस्थापन प्रणाली पोर्टलचा शुभारंभही केला.

सरदार पटेल यांच्या जयंतीपासून दक्षता जनजागृती सप्ताहाची सुरुवात झाली. “सरदार पटेल यांचे संपूर्ण जीवन प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि या मूल्यांवर आधारित सार्वजनिक सेवा प्रणालीच्या उभारणीसाठी समर्पित होते”, असे ते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. जागरूकता आणि सतर्कतेभोवतीची ही मोहीम या तत्त्वांवर आधारित आहे. भ्रष्टाचारमुक्त भारताची स्वप्ने आणि आकांक्षा साकार करण्यासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाची मोहीम राबवली जात आहे. प्रत्येक नागरिकाच्या जीवनात त्याचे महत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

विकसित भारतासाठी विश्वास आणि विश्वासार्हता महत्त्वाची आहे. लोकांचा सरकारवरील विश्वास त्यांचा आत्मविश्वास वाढवतो असे पंतप्रधान म्हणाले. पूर्वीच्या सरकारांनी लोकांचा विश्वासच गमावला नाही तर लोकांवर विश्वास ठेवण्यातही ते अपयशी ठरल्याबद्दल पंतप्रधानांनी खेद व्यक्त केला. गुलामगिरीच्या प्रदीर्घ काळातील भ्रष्टाचार, शोषण आणि साधनसंपत्तीवर नियंत्रण या वारशाला दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर अधिक बळ मिळाले. यामुळे या देशाच्या किमान चार पिढ्यांचे प्रचंड नुकसान झाले, असे ते म्हणाले. “स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये आपल्याला हा अनेक दशकांचा मार्ग पूर्णपणे बदलायचा आहे”, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायक लढ्यासाठी लाल किल्ल्यावरून केलेल्या आवाहनाचा संदर्भ देत, भ्रष्टाचाराची आणि लोकांच्या प्रगतीत अडथळा आणणारी दोन प्रमुख कारणे, म्हणजेच सुविधांचा अभाव आणि सरकारचा अनावश्यक दबाव आहेत याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. प्रदीर्घ काळापासून, सुविधा आणि संधींचा हा अभाव जाणूनबुजून कायम ठेवला गेला आणि दरी वाढवू दिली. यामुळे असमान स्पर्धा झाली. या शर्यतीने भ्रष्टाचाराच्या परिसंस्थेला पोसले. या टंचाईमुळे निर्माण झालेल्या भ्रष्टाचाराचा सर्वाधिक फटका गरीब आणि मध्यमवर्गीयांना बसतो. “गरीब आणि मध्यमवर्गीयांनी मूलभूत सुविधा मिळवण्यासाठीच आपली शक्ती खर्च केली तर देशाची प्रगती कशी होईल?” असा सवाल पंतप्रधानांनी केला. “म्हणूनच, अभाव आणि दबावाची ही व्यवस्था बदलण्याचा आम्ही गेली 8 वर्षे प्रयत्न करत आहोत. मागणी आणि पुरवठा यातील तफावत भरून काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. हे साध्य करण्यासाठी अवलंबलेले तीन मार्ग म्हणजे, तंत्रज्ञानातील प्रगती, मूलभूत सेवा संपृक्ततेच्या पातळीवर नेणे आणि अंतिमतः आत्मनिर्भरतेकडे जाणे होय असे पंतप्रधान म्हणाले.

सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस)ला तंत्रज्ञानाशी जोडण्याचा आणि कोट्यवधी बनावट लाभार्थ्यांना काढून टाकण्याचा तसेच थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) स्वीकारून चुकीच्या हातात जाण्यापासून 2 लाख कोटींहून अधिक रुपयांची बचत केल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात केला. त्याचप्रमाणे पारदर्शक डिजिटल व्यवहारांचा अवलंब आणि गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (जीईएम) द्वारे पारदर्शक सरकारी खरेदी यामुळे खूप फरक पडत आहे, असं ते म्हणाले.

मूलभूत सुविधांना संपृक्ततेच्या पातळीवर नेण्याविषयी बोलताना पंतप्रधानांनी निदर्शनास आणले की कोणत्याही सरकारी योजनेच्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचणे आणि त्यांच्या पूर्ततेची उद्दिष्टे साध्य केल्याने भ्रष्टाचार दूर करून समाजातील भेदभाव संपुष्टात येतो. प्रत्येक योजनेच्या वितरणासाठी सरकारकडून स्वीकारल्या जाणाऱ्या तत्त्वांवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी पाण्याची जोडणी, पक्की घरे, वीज कनेक्शन आणि गॅस कनेक्शनची उदाहरणे दिली.

परदेशी वस्तूंवर जास्त अवलंबून राहणे हे भ्रष्टाचारामागचे मोठे कारण आहे, असे पंतप्रधान म्हणाले. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेकडे जाण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले. रायफलपासून लढाऊ विमाने ते वाहतूक विमानापर्यंत भारत स्वतःची संरक्षण उपकरणे तयार करत आहे, त्यामुळे घोटाळ्यांची शक्यता संपुष्टात येत आहे, असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय दक्षता आयोग(सीव्हीसी) ही पारदर्शकता आणण्यासाठी प्रत्येकाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणारी संस्था असल्याचे सांगून, पंतप्रधानांनी ‘प्रतिबंधात्मक दक्षते’ साठी मागच्या वेळी केलेल्या विनंतीची आठवण करून दिली. त्या दिशेने सीव्हीसी करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. त्यांनी दक्षता आयोगाला त्यांचे लेखापरीक्षण आणि तपासणी आधुनिक करण्याबाबत विचार करण्यास सांगितले. सरकार भ्रष्टाचाराविरोधात दाखवत असलेली इच्छाशक्ती सर्व विभागांमध्ये दिसणे आवश्यक आहे. विकसित भारतासाठी  आपल्याला अशी प्रशासकीय परिसंस्था विकसित करावी लागेल, ज्यामध्ये भ्रष्टाचार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, त्याबाबत शून्य सहनशीलता असेल, असे ते म्हणाले.

भ्रष्टाचाराशी संबंधित शिस्तभंगाची कार्यवाही कालबद्ध मिशन मोडमध्ये पूर्ण होईल अशा व्यवस्थेवर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी गुन्हेगारी प्रकरणांवर सतत देखरेख ठेवण्याची सूचना केली आणि प्रलंबित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या आधारे विभागांची क्रमवारी लावण्याची आणि संबंधित अहवाल मासिक किंवा त्रैमासिक आधारावर प्रकाशित करण्यास सांगितले. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मंजुरीची प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासही पंतप्रधानांनी सांगितले. जनतेच्या तक्रारींच्या माहितीचे ऑडिट करण्याची गरज आहे, त्यामुळे संबंधित विभागातील भ्रष्टाचाराच्या मुळाशी आपण जाऊ शकू, असेही पंतप्रधान म्हणाले.

भ्रष्टाचारावर लक्ष ठेवण्याच्या कामात सामान्य नागरिकांना सामील करून घेण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला. भ्रष्टाचारी कितीही शक्तिशाली असले तरी त्यांना कोणत्याही परिस्थितीत वाचवायचे नाही, ही जबाबदारी तुमच्यासारख्या संस्थांची आहे, असे ते पुढे म्हणाले. कोणत्याही भ्रष्ट व्यक्तीला राजकीय-सामाजिक पाठबळ मिळू नये, प्रत्येक भ्रष्टाचाऱ्याला समाजाने जाब विचारला पाहिजे, असे वातावरण निर्माण करणेही गरजेचे आहे, असेही त्यांनी सूचित केले. अनेक वेळा भ्रष्टाचार सिद्ध झाल्यानंतर तुरुंगात जाऊनही भ्रष्टाचाऱ्यांचा गौरव केला जातो, हे आपण पाहिले आहे. ही परिस्थिती भारतीय समाजासाठी चांगली नाही. आजही काही लोक दोषी ठरलेल्या भ्रष्टाचाऱ्यांच्या बाजूने युक्तिवाद करतात. अशा लोकांना, अशा शक्तींना समाजाने त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये तुमच्या विभागाच्या ठोस कारवाईचाही मोठा वाटा आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

भ्रष्ट आणि भ्रष्टाचाराविरोधात काम करणाऱ्या, सीव्हीसी सारख्या संस्थांना बचावात्मक राहण्याची अजिबात आवश्यकता नाही, यावर पंतप्रधानांनी भर दिला. कुठल्याही राजकीय उद्दिष्टाने काम करण्याची गरज नसून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन आणखी सोपे करण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “ज्यांचे हितसंबंध आहेत ते कारवाईत अडथळा आणण्याचा आणि अशा संस्थांशी संबंधित व्यक्तींची बदनामी करण्याचा प्रयत्न करतील”, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “पण जनता जनार्दन हे परमेश्वराचं रूप असतं,  त्यांना सत्य माहीत असतं आणि त्याची ते खात्री करून घेतात, ते सत्याच्याच बाजूने उभे राहतात”. आपले कर्तव्य समर्पक भावनेने बजावण्यासाठी सर्वांनी सत्याच्या मार्गावर चालावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आणि म्हणाले, “जेव्हा तुम्ही विश्वासाने एखादी कृती करता, तेव्हा संपूर्ण देश तुमच्या बरोबर असतो.”

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की जबाबदारी खूप मोठी आहे आणि आव्हानेही बदलत राहतात. “अमृत काळामध्ये तुम्ही पारदर्शक आणि स्पर्धात्मक परिसंस्था उभारण्यात महत्वाची भूमिका बजावत राहाल, याची मला खात्री आहे”, पंतप्रधान म्हणाले. या आव्हानाचा सामना करण्याच्या कार्यपद्धतीत गतीमानता असायला हवी, यावर त्यांनी भर दिला. निबंध स्पर्धेतल्या विजेत्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आणि भविष्यात वक्तृत्व स्पर्धा सुरु करावी, अशी सूचना केली. भ्रष्टाचाराविरोधातील लढा, या विषयावरील निबंध स्पर्धेच्या 5 विजेत्यांपैकी 4 मुली आहेत, हे लक्षात घेऊन, या प्रवासात मुलांनीही एकत्र यावे, असे पंतप्रधानांनी आवाहन केले. “स्वच्छतेचं महत्व तेव्हाच समजतं, जेव्हा कचरा हटवला जातो.” ते पुढे म्हणाले. “कायद्याच्या कक्षे बाहेर काम करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी, तंत्रज्ञान कोणत्या ना कोणत्या स्वरुपात पुरावे मागे सोडत आहे,” असे पंतप्रधानांनी निरीक्षण नोंदवले आणि भ्रष्टाचाराविरोधातल्या या लढ्यात तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त अवलंब करायला हवा, यावर भर देत त्यांनी भाषणाचा समारोप केला. 

प्रधान सचिव, डॉ. पी. के. मिश्रा, कार्मिक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री, डॉ. जितेंद्र सिंह,  कॅबिनेट सचिव, केंद्रीय दक्षता आयुक्त सुरेश एन. पटेल आणि दक्षता आयुक्त पी के श्रीवास्तव आणि अरविंद कुमार या कार्यक्रमाला उपस्थित होते.       

 

पार्श्वभूमी

हे पोर्टल सुरु करण्यामागे, नागरिकांना त्यांनी केलेल्या तक्रारींच्या सद्यःस्थितीची ताजी माहिती नियमितपणे पुरवणे, हा उद्देश आहे. या पोर्टलवर “नैतिकता आणि चांगले आचरण” या विषयावर सचित्र पुस्तकांची मालिका; “प्रतिबंधात्मक दक्षता” याबाबतच्या सर्वोत्तम पद्धतींचे संकलन आणि सार्वजनिक खरेदी या विषयावरील “(VIGEYE-VANI)”या विशेष अंकाचे प्रकाशन केले जाईल.

जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये एकात्मतेच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी सर्व भागधारकांना एकत्र आणण्यासाठी सीव्हीसी दरवर्षी दक्षता जागरूकता सप्ताह साजरा करते. यंदा, 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या काळात “विकसित देशासाठी भ्रष्टाचार मुक्त भारत” या संकल्पनेसह तो साजरा होत आहे. दक्षता जागरुकता सप्ताहाच्या वरील संकल्पनेवर सीव्हीसी द्वारे घेण्यात आलेल्या  देशव्यापी निबंध स्पर्धेत सर्वोत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात पंतप्रधानांनी बक्षीस देऊन सन्मानित केले.

 

* * *

S.Patil/Vinayak/Parjna/Rajshree/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India

@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai