पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिलासपूर येथील एम्सला भेट दिली.
पंतप्रधानांचे रुग्णालयाच्या इमारतीच्या सी-ब्लॉकमध्ये आगमन झाले.त्यानंतर, त्यांनी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (AIIMS), बिलासपूर कॅम्पसचे थ्री डी मॉडेल पाहिले आणि ते फीत कापून होणाऱ्या संस्थेच्या उदघाटन समारंभाकडे निघाले.पंतप्रधानांनी रुग्णालयातील सीटी स्कॅन केंद्र आणि आपत्कालीन आणि तात्काळ उपचार या विभागातून फेरी मारली.
बिलासपूर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला राष्ट्रासाठी समर्पण करण्यात, देशभरात आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांनी दाखवलेली दूरदृष्टी आणि वचनबद्धता यांचे पुनश्च दर्शन होत आहे.या रुग्णालयाची ऑक्टोबर 2017मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणीही करण्यात आली होती आणि हे रुग्णालय, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना, केंद्रीय क्षेत्र योजने अंतर्गत स्थापन केले जात आहे.
एम्स बिलासपूर, 1470 कोटींहून अधिक रुपये खर्च करून बांधलेले, 18 आधुनिक (स्पेशालिटी) आणि 17अत्याधुनिक (सुपर स्पेशालिटी) विभाग,18 मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर आणि 64 अती दक्षता (ICU) रुग्णशय्यांसह 750 रुग्णशय्या असलेले एक अत्याधुनिक वैशिष्ट्यपूर्ण सेवा देणारे रुग्णालय आहे. 247 एकरांवर पसरलेल्या या रुग्णालयात, 24 तास आपत्कालीन आणि डायलिसिस सुविधा, अल्ट्रासोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय इत्यादी सारखी आधुनिक निदान करणारी मशीन्स, अमृत फार्मसी आणि जन औषधी केंद्र आणि 30 रुग्णशय्यांचा आयुष विभाग यासह सुसज्ज असे रुग्णालय आहे.
हिमाचल प्रदेशातील आदिवासी आणि दुर्गम आदिवासी भागात आरोग्य सेवा देण्यासाठी या रुग्णालयात डिजिटल आरोग्य केंद्राची सुविधा आहे.तसेच, काझा, सलुनी आणि केलॉन्ग यांसारख्या हिमाचल प्रदेशातील दुर्गम आदिवासी आणि उंच डोंगराळ भागात आरोग्य शिबिरांद्वारे रुग्णालयातील तज्ञ आरोग्य सेवा प्रदान करतील. रुग्णालयात दरवर्षी एमबीबीएस अभ्यासक्रमांसाठी 100 विद्यार्थ्यांना आणि नर्सिंग अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
याप्रसंगी पंतप्रधानांसोबत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार जगत प्रकाश नड्डा हे मान्यवर उपस्थित होते.
***
S.Patil/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai@gmail.com /PIBMumbai /pibmumbai