Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन


नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2022 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले आणि कालूपूर ते दूरदर्शन केंद्र या स्थानकांदरम्यान मेट्रो गाडीतून प्रवास केला.

पंतप्रधानांनी आपल्या गुजरात दौऱ्याच्या दुसर्‍या दिवशी अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवून त्याचे उद्घान केले. गांधीनगर स्थानकातून वंदे भारत एक्स्प्रेस 2.0 या नव्या कोऱ्या गाडीतून प्रवास करून पंतप्रधान कालूपूर स्थानकामध्ये आले. या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मेट्रो रेल प्रदर्शनाला देखील पंतप्रधानांनी भेट दिली.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी पंतप्रधानांच्या बरोबर होते.

पंतप्रधानांनी विद्यार्थी, खेळाडू  आणि सर्वसामान्य प्रवाशांबरोबर मेट्रो मधून प्रवास केला. त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्यापैकी अनेक जणांनी पंतप्रधानांची स्वाक्षरी घेतली.

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे मल्टीमोडल पायाभूत सुविधा संपर्क यंत्रणेला खूप मोठी चालना मिळणार आहे. अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात (फेज- I), अ‍ॅपेरल पार्क ते थलतेजपर्यंतचा सुमारे 32 किमी पूर्व-पश्चिम कॉरिडॉर (विभाग) आणि मोटेरा ते ग्यासपूर दरम्यानच्या उत्तर-दक्षिण कॉरिडॉरचा समावेश आहे. पूर्व-पश्चिम कॉरिडॉरमधील थलतेज-वस्त्राल मार्गावर 17 स्थानके आहेत. या कॉरिडॉरमध्ये चार स्थानकांसह 6.6 किमीचा भूमिगत भाग आहे. ग्यासपूर आणि मोटेरा स्टेडियमला जोडणाऱ्या 19 किमी उत्तर-दक्षिण कॉरिडॉरमध्ये 15 स्थानके आहेत. पहिल्या टप्प्याचा संपूर्ण  प्रकल्प 12,900 कोटींहून अधिक खर्च करून बांधला गेला आहे.

अहमदाबाद मेट्रो हा एक अत्याधुनिक पायाभूत प्रकल्प असून यामध्ये भूमिगत बोगदे, मार्ग आणि पूल, उन्नत आणि भूमिगत स्थानकांच्या इमारती, बॅलेस्टलेस रेल्वे मार्ग चालकाशिवाय गाडी चालवण्यासाठी योग्य रोलिंग स्टॉक, याचा समावेश आहे. मेट्रो गाड्यांचा ताफा ऊर्जा-कार्यक्षम प्रोपल्शन  प्रणालीसह सुसज्ज आहे, ज्यामुळे सुमारे 30-35% उर्जेची बचत होऊ शकते. मेट्रो गाडीमध्ये अत्याधुनिक सस्पेन्शन सिस्टीम आहे, जी प्रवाशांना सुरळीत प्रवासाचा अनुभव देते.  

* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai