Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण


नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2022

महामहिम,

या वर्षीच्या आव्हानात्मक जागतिक आणि प्रादेशिक वातावरणात शांघाय सहकार्य संघटनेचे प्रभावी नेतृत्व केल्याबद्दल मी अध्यक्ष मिर्झीयोयेव यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

आज, जेव्हा संपूर्ण जग महामारीनंतर ,आर्थिकदृष्ट्या पूर्वपदावर येण्यासाठीच्या आव्हानांना तोंड देत असताना ,शांघाय सहकार्य संघटनेची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. ,शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देश जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनात सुमारे 30 टक्के योगदान देतात आणि जगातील 40 टक्के लोकसंख्या शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांमध्ये राहते. भारत शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांमधील अधिक सहकार्य आणि परस्पर विश्वासाचे समर्थन करतो. महामारी आणि युक्रेनमधील संकटामुळे जागतिक पुरवठा साखळीमध्ये  अनेक अडथळे आले. त्यामुळे संपूर्ण जगाला अभूतपूर्व ऊर्जा आणि अन्न संकटाचा सामना करावा लागत आहे.शांघाय सहकार्य संघटनेने आमच्या प्रदेशात विश्वासार्ह, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी उत्तम संपर्क सुविधा आवश्यक आहेत , त्याचप्रमाणे आपण सर्वांनी एकमेकांना माल वाहतुकीसंदर्भातील पूर्ण अधिकार देणेही महत्त्वाचे आहे.

महामहिम,

भारताला उत्पादनाचे  केंद्र  बनवण्यासाठी आम्ही प्रगती करत आहोत. भारतातील तरुण आणि प्रतिभावान मनुष्यबळ आम्हाला स्वाभाविकपणे  स्पर्धात्मक बनवते.या वर्षी भारताच्या  अर्थव्यवस्थेत 7.5 टक्के वाढ अपेक्षित आहे., ही वाढ  जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमधील सर्वाधिक असेल.आमच्या  लोककेंद्रित विकास मॉडेलमध्ये तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यावरही मोठ्या प्रमाणात  भर दिला जात आहे. आम्ही प्रत्येक क्षेत्रात नवोन्मेषाला पाठबळ देत आहोत. आज भारतात 70,000 हून अधिक स्टार्ट-अप्स  आहेत, त्यापैकी 100 हून अधिक युनिकॉर्न आहेत.आमचा हा अनुभव शांघाय सहकार्य संघटनेतील अन्य सदस्य देशांनाही  उपयोगी पडू शकतो. या उद्देशाने , आम्ही स्टार्टअप्स आणि नवोन्मेषासंदर्भात  नवीन विशेष कार्य गट स्थापन करून शांघाय सहकार्य संघटनेतील  सदस्य देशांसोबत आमचा अनुभव सामायिक  करण्यास तयार आहोत.

महामहिम,

आज जगासमोर आणखी एक मोठे आव्हान आहे – आणि ते म्हणजे आपल्या नागरिकांची अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे. या समस्येवर एक संभाव्य उपाय म्हणजे भरड धान्यांची लागवड आणि या धान्यांच्या वापराला  प्रोत्साहन देणे.भरड धान्य  हे एक असे पौष्टिक खाद्य आहे  जे हजारो वर्षांपासून केवळ शांघाय सहकार्य संघटनेतील  देशांमध्येच नाही तर जगाच्या अनेक भागांमध्ये पिकवले जाते आणि अन्न संकटाचा सामना करण्यासाठी पारंपरिक, पौष्टिक आणि कमी खर्चाचा हा पर्याय आहे.2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्र  आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जाईल. शांघाय सहकार्य संघटने अंतर्गत भरड धान्य खाद्य महोत्सव आयोजित करण्याचा विचार केला पाहिजे.

आज भारत हे वैद्यकीय आणि निरामय  पर्यटनासाठी जगातील सर्वात किफायतशीर  ठिकाणांपैकी एक आहे.एप्रिल 2022 मध्ये गुजरातमध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध केंद्राचे  उद्घाटन करण्यात आले.पारंपरिक औषधांसाठीचे हे जागतिक आरोग्य संघटनेचे पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र आहे. आपण  पारंपरिक औषधांसंदर्भात शांघाय सहकार्य संघटनेतील सदस्य देशांमध्ये  सहकार्य वाढवले पाहिजे. यासाठी भारत एका नवीन शांघाय सहकार्य संघटनेच्या पारंपरिक औषधांवरील कार्य  गटासाठी  पुढाकार घेईल.

मी आपले भाषण संपवण्यापूर्वी आजच्या बैठकीचे उत्कृष्ट संचालन आणि स्नेहशील आदरातिथ्याबद्दल मी पुन्हा एकदा अध्यक्ष मिर्झीयोयेव यांचे आभार मानू इच्छितो.

खूप खूप  धन्यवाद!

 

 

 

 

S.Patil /S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai