Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

पंतप्रधानांनी ‘कर्तव्य पथ’ चे उद्‌घाटन आणि इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे केले अनावरण

पंतप्रधानांनी ‘कर्तव्य पथ’ चे  उद्‌घाटन आणि इंडिया गेट येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे केले अनावरण


नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्तव्य पथचे उद्‌घाटन केले. शक्तीचे  प्रतीक म्हणून ओळखला जाणारा राजपथ आता लोकांचे स्वामित्व आणि सक्षमीकरणाचे उदाहरण म्हणून कर्तव्यपथ होणे हे बदलाचे प्रतीक आहे. पंतप्रधानांनी यावेळी इंडिया गेट येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरणही केले.

पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांना संबोधित केले.  स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवाच्या काळात आज देशाला एक नवी प्रेरणा आणि ऊर्जा जाणवत आहे,असे ते म्हणाले.  आज आपण भूतकाळ मागे टाकून नवे रंग  भविष्याच्या चित्रात   भरत आहोत. आज ही  नवा आभा सर्वत्र दिसत आहे, ती  नवभारताच्या  आत्मविश्वासाची आभा  आहे,”असे त्यांनी  सांगितले . पंतप्रधान  म्हणाले, किंग्सवे म्हणजेच गुलामगिरीचे प्रतीक असलेला राजपथ आजपासून इतिहासाचा भाग झाला  आहे  आणि त्याचे अस्तित्व कायमचे  पुसले  गेले  आहे. आज ‘कर्तव्यपथ’च्या रूपाने नवा इतिहास रचला गेला  आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात गुलामगिरीच्या आणखी एका ओळखीतून मुक्त झाल्याबद्दल मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो.

इंडिया गेटजवळ आज  आपले राष्ट्रनायक  नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भव्य  पुतळा  स्थापित करण्यात आला आहे,असे पंतप्रधानांनी सांगितले.  गुलामगिरीच्या काळात येते  ब्रिटीश राजवटीच्या प्रतिनिधीचा पुतळा होता. आज त्याच ठिकाणी नेताजींच्या पुतळ्याची स्थापना करून देशाने आधुनिक, सशक्त भारताची प्राणप्रतिष्ठा  केली  आहे. असे ते म्हणाले.  नेताजींच्या महानतेचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले, सुभाषचंद्र बोस हे एक महान व्यक्ती होते,   संपूर्ण जग त्यांना नेता मानत होते. त्यांच्यात  धैर्य आणि स्वाभिमान होता. त्यांच्याकडे विचारधन होते, त्यांच्याकडे दूरदर्शित्व  होते. त्याच्याकडे नेतृत्व क्षमता आणि धोरणे होती.

कोणत्याही देशाने आपला गौरवशाली भूतकाळ विसरू नये,असे पंतप्रधान म्हणाले.  भारताचा गौरवशाली इतिहास प्रत्येक भारतीयाच्या रक्तात आणि परंपरेत आहे. नेताजींना  भारताच्या वारशाचा अभिमान होताच.   त्याचसोबत  त्यांना भारताला आधुनिक करायचे होते,असे त्यांनी सांगितले.  स्वातंत्र्यानंतर भारताने सुभाषबाबूंचा मार्ग अवलंबला असता तर आज देश वेगळ्या  उंचीवर असता! पण दुर्दैवाने आपल्या या महान नायकाचे  स्वातंत्र्यानंतर विस्मरण झाले. त्यांच्या कल्पना, त्यांच्याशी निगडित प्रतीकांकडेही दुर्लक्ष करण्यात आले, अशी खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली.  नेताजींच्या125 व्या जयंतीनिमित्त कोलकाता येथील नेताजींच्या निवासस्थानी दिलेल्या भेटीची  आठवण त्यांनी सांगितली  आणि त्यावेळी मिळालेल्या ऊर्जेच्या अनुभूतीला त्यांनी उजाळा दिला.  नेताजींची ऊर्जा आज देशाला मार्गदर्शक ठरावी, असा आमचा प्रयत्न आहे. ‘कर्तव्यपथ’वरील नेताजींचा पुतळा त्यासाठी एक माध्यम बनेल,’ असे ते म्हणाले.  गेल्या आठ वर्षांत, आम्ही एकापाठोपाठ एक असे अनेक निर्णय  घेतले आहेत, ज्यावर  नेताजींच्या आदर्श आणि स्वप्नांचा ठसा आहे. नेताजी सुभाष हे अखंड भारताचे पहिले प्रमुख होते, ज्यांनी 1947 पूर्वी अंदमान स्वतंत्र  आणि तिरंगा फडकवला. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतानाच्या अनुभूतीची कल्पना त्यांनी त्यावेळी केली होती. आझाद हिंद सरकारला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवण्याचे सौभाग्य मिळाले तेव्हा मी स्वतः ही अनुभूती घेतली आहे.असे  पंतप्रधानांनी सांगितले.

“पंच प्रण”प्रति राष्ट्राच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत पंतप्रधान म्हणाले, आज भारताचे आदर्श आणि आयाम त्याचे स्वतःचे आहेत. आज भारताचा  संकल्प त्याचा स्वतःचा आहे आणि त्याची ध्येय देखील त्याची  स्वतःची आहेत . आज आपले मार्ग आपले आहेत, आपली प्रतीके देखील  आपली आहेत. असे ते  म्हणाले, आज जेव्हा राजपथचे  अस्तित्व संपुष्टात आले आहे आणि तो एक कर्तव्य मार्ग बनला आहे. आज जॉर्ज पंचम  यांच्या पुतळ्याची जागा नेताजींच्या पुतळ्याने घेतली असून गुलामगिरीची मानसिकता त्यागण्याचे  हे पहिले उदाहरण नाही. ही सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. मनाच्या  स्वातंत्र्याचे ध्येय साध्य होईपर्यंतचा  हा दृढ निर्धाराचा अव्याहत  प्रवास आहे. पंतप्रधान निवासस्थानाचे रेसकोर्स रोडच्या जागी  लोककल्याण मार्ग, स्वातंत्र्य दिन सोहळ्यात आणि बीटिंग द रिट्रीट समारंभात  भारतीय वाद्ये  यासारख्या महत्त्वपूर्ण बदलांचाही त्यांनी उल्लेख केला.  भारतीय नौदलाने वसाहतवादी राजवटीचे चिन्ह बदलून  त्याजागी छत्रपती शिवाज महाराजांपासून प्रेरणा घेत आणलेल्या  झेंड्याचा समावेश केल्याचाही त्यांनी उल्लेख केला. “त्याचप्रमाणे, राष्ट्रीय युद्ध स्मारक देखील देशाच्या वैभवाचे प्रतिनिधित्व करत आहे ” असे  ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, हे बदल केवळ प्रतीकांपुरतेच मर्यादित नाहीत तर देशाच्या धोरणांमध्येही त्याचा प्रभाव जाणवत आहे. आज देशाने ब्रिटिश काळापासून चालत आलेले शेकडो कायदे बदलले आहेत. गेली अनेक दशके ब्रिटीश संसदेच्या वेळा पाळणाऱ्या भारतीय अर्थसंकल्पाची वेळ आणि तारीखही बदलण्यात आली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून आता देशातील युवकांना परदेशी भाषेच्या सक्तीपासून मुक्त केले जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याचाच अर्थ हा की  देशवासीयांची विचारसरणी आणि वर्तन गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त झाले आहे , असे ते म्हणाले.

कर्तव्य पथ हा केवळ विटा आणि दगडांचा रस्ता नसून भारताच्या लोकशाही भूतकाळाचे आणि सार्वकालीन  आदर्शांचे जिवंत उदाहरण आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. जेव्हा देशभरातील  लोक येथे येतील तेव्हा नेताजींचा पुतळा आणि राष्ट्रीय युद्ध स्मारक त्यांना  खूप प्रेरणा देईल  आणि ते कर्तव्य भावनेने भारावून जातील याचा त्यांनी पुनरुच्चार  केला. याउलट राजपथ ब्रिटिश राजवटीसाठी  होता, जे भारतातील जनतेला गुलाम मानत होते. राजपथाची भावना आणि संरचना हे दोन्ही गुलामगिरीचे प्रतीक होते, मात्र  आज वास्तुरचनेतील  बदलामुळे त्याचा आत्माही  बदलला आहे, यावर त्यांनी भर दिला. राष्ट्रीय युद्ध स्मारक ते राष्ट्रपती भवन पर्यंतचा हा कर्तव्य पथ  कर्तव्य भावनेने ऊर्जाशील बनेल असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी श्रमिक आणि मजुरांचे देखील आभार मानले, ज्यांनी कर्तव्यपथच्या  पुनर्विकासात केवळ भौतिक योगदान दिले नाही  तर अथक परिश्रम देखील केलेजे राष्ट्राप्रति कर्तव्याचे जिवंत आणि उत्कट उदाहरण आहे. श्रमजीवींसोबतच्या भेटीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी त्यांच्या हृदयातील  राष्ट्राच्या गौरवशाली  स्वप्नाची प्रशंसा केली. सेंट्रल व्हिस्टाचे श्रमजीवी आणि त्यांचे कुटुंबीय पुढील प्रजासत्ताक दिनाच्या  संचलन  सोहळयासाठी  पंतप्रधानांचे विशेष पाहुणे असतील.

आज देशात श्रम (मेहनत ) आणि श्रमजीवी (कामगार) यांचा आदर करण्याची परंपरा आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. धोरणांमध्ये संवेदनशीलता असल्यामुळे निर्णयांमध्येही संवेदनशीलता आहे आणि ‘श्रमेव जयते’ हा राष्ट्राचा मंत्र बनत आहे असे ते म्हणाले. काशी विश्वनाथ धाम, विक्रांत आणि प्रयागराज कुंभ इथे  कामगारांशी साधलेल्या  संवादाची त्यांनी आठवण सांगितली. नवीन संसद भवनाचे  काम करणाऱ्या कामगारांना एका गॅलरीमध्ये  मानाचे  स्थान मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.

आजचा भारत भौतिक,डिजिटल आणि वाहतूक विषयक पायाभूत सुविधांबरोबरच सांस्कृतिक पायाभूत सुविधांवरही काम करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.सामाजिक पायाभूत सुविधांसंदर्भात त्यांनी नवी एम्स आणि वैद्यकीय महाविद्यालये,आयआयटी, नळ जोडण्या आणि अमृत सरोवरे यांचे उदाहरण दिले. ग्रामीण भागातले रस्ते आणि विक्रमी संख्येचे आधुनिक द्रुतगती मार्ग,रेल्वे आणि मेट्रोचे जाळे आणि नवे विमानतळ यामुळे वाहतूक विषयक पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व गतीने विस्तार होत आहे. पंचायतीसाठी ऑप्टीकल फायबर आणि विक्रमी डीजीटल पेमेंट यामुळे भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधा जगभरात प्रशंसेला पात्र ठरल्या आहेत. सांस्कृतिक ढाचा  म्हणजे केवळ श्रद्धास्थानांशी निगडीत ढाचा  नव्हे तर यामध्ये आपला इतिहास, आपले राष्ट्रीय नायक आणि आपल्या राष्ट्रीय संस्कृती विषयक स्थानांचा समावेश असल्याचे पंतप्रधान म्हणाले. अशा स्थानांचा विकासही तितक्याच तातडीने करण्यात येत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा असो,आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांना समर्पित संग्रहालय असो राष्ट्रीय युध्द स्मारक असो  किंवा राष्ट्रीय पोलीस स्मारक ही सर्व  सांस्कृतिक पायाभूत  ढाच्याची उदाहरणे आहेत. ती, एक राष्ट्र म्हणून आपली संस्कृतीआपली मुल्ये काय आहेत आणि आपण त्यांची जोपासना कशी करतो हे परीभाषित करतात असे पंतप्रधान म्हणाले. सामाजिक पायाभूत सुविधा,वाहतूक विषयक पायाभूत सुविधा, डिजिटल पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक पायाभूत सुविधा अशा संपूर्ण ढाच्याला वेग दिल्यानेच आकांक्षी भारत वेगाने प्रगती करू शकतो यावर पंतप्रधानांनी भर दिला. आज कर्तव्य पथाच्या रूपाने देशाला सांस्कृतिक ढाच्याचे आणखी एक मोठे उदाहरण मिळाले आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी देशाच्या प्रत्येक नागरिकाला उद्देशून असे खुले आवाहन केले, की त्यांनी यावे आणि या नव्याने बांधण्यात आलेल्या कर्तव्य पथाचे वैभवशाली दर्शन घ्यावे. त्याच्या विकासात तुम्हाला भविष्यातील भारत दिसेल. इथली ऊर्जा तुम्हाला आपल्या विशाल देशाकरता नवा दृष्टीकोन देईल. एक नवा विश्वास, पंतप्रधान म्हणाले. पुढील तीन दिवस चालणार्‍या नेताजी सुभाष यांच्या जीवनावर आधारित ड्रोन शोचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी नागरिकांना आवाहन केले की त्यांनी या ठिकाणी भेट देऊन आपली छायाचित्र घ्यावीत आणि #KartavyaPath या  हॅश टॅगसह  समाज माध्यमांवर प्रदर्शित करावीत. मला माहीत आहे की हा संपूर्ण परिसर दिल्लीच्या जनतेच्या हृदयाचा ठोका आहे, लोक मोठ्या संख्येने येथे आपल्या कुटुंबियांबरोबर संध्याकाळचा वेळ व्यतीत करायला येतात. ही गोष्ट लक्षात घेऊनच कर्तव्य पथाचे नियोजन, आराखडा आणि प्रकाश योजना करण्यात आली आहेअसे  ते म्हणाले. या कर्तव्य पथाची प्रेरणा देशात कर्तव्याचा प्रवाह निर्माण करील आणि हा प्रवाह आपल्याला नवीन आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्याकडे घेऊन जाईल, अशा शब्दांत पंतप्रधानांनी समारोप केला. 

केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी, केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, भारताचे केंद्रीय सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि मिनाक्षी लेखी आणि केंद्रीय गृह निर्माण आणि नगर विकास राज्य मंत्री कौशल किशोर या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

पार्श्वभूमी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘कर्तव्य पथाचे’ उद्‌घाटन  केले. शक्तीचे प्रतीक असलेल्या पूर्वीच्या राज पथाकडून, सार्वजनिक मालकी आणि सक्षमीकरणाचे उदाहरण असलेल्या कर्तव्य पथाकडे मार्गक्रमण करणे हे यामधून सूचित होते. पंतप्रधानांनी यावेळी इंडिया गेट येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे देखील अनावरण केले. अमृत काळातील नव्या भारतासाठी: ‘वसाहतवादाच्या मानसिकतेच्या खुणा पुसून काढा’ या पंतप्रधानांच्या नव्या भारताच्या दुसऱ्या ‘पंच प्रण’ अर्थात निश्चयाशी  ही पावले सुसंगत आहेत. 

गेल्या अनेक वर्षांमध्ये राजपथ आणि सेन्ट्रल विस्टा अव्हेन्यू परिसराला भेट देणाऱ्यांच्या वाढत्या रहदारीमुळे इथल्या पायाभूत सुविधांवर ताण पडत होता. या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, रस्त्याकडेच्या  सोयुसुविधा  आणि पार्किंगसाठी पुरेशी जागा या मूलभूत सुविधांची उणीव होती. तसेच या ठिकाणी  अपुरी चिन्हे, कारंजी आणि इतर जलाशय यांची    निकृष्ट दर्जाची देखरेख आणि अव्यवस्थित पार्किंग होते. त्याबरोबरच सार्वजनिक हालचालींवर कमीत कमी निर्बंध आणून कमी व्यत्ययासह प्रजासत्ताक दिनाची परेड आणि अन्य राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज भासू लागली. या गोष्टी लक्षात घेऊन पुनर्विकास करण्यात आला असून त्याच्या स्थापत्त्य वैशिष्ट्यांची एकात्मता आणि अखंडत्व सुनिश्चित करण्यात आले आहे.

कर्तव्य पथ हा सुशोभित लँडस्केप, पायवाटांसह हिरवळ, अतिरिक्त हिरवळीची जागा, नूतनीकरण केलेले कालवे, नवीन सुविधा ब्लॉक्स, सुधारित चिन्हे आणि वेंडिंग किऑस्क अशा बाबींनी सज्ज आहे . याशिवाय, नवीन पादचारी अंडरपास, सुधारित पार्किंगच्या  जागा, नवीन प्रदर्शन फलक आणि रात्रीची सुधारित प्रकाश व्यवस्था ही काही इतर वैशिष्ट्ये आहेत जी नागरिकांना चांगला अनुभव देतील. यामध्ये घनकचरा व्यवस्थापन, पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर, पावसाच्या पाण्याची साठवण, जलसंवर्धन आणि ऊर्जा-कार्यक्षम प्रकाश व्यवस्था यासारख्या अनेक शाश्वततेच्या (टिकाऊ) वैशिष्ट्यांचा देखील समावेश आहे. 

पंतप्रधानांनी यंदाच्या वर्षी जानेवारी 23 रोजी पराक्रम दिनी ज्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले होते, त्याच जागी पंतप्रधानांनी आज अनावरण केलेला नेताजींचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. ग्रॅनाईटचा हा पुतळा आपल्या स्वातंत्र्य लढ्यातील नेताजींच्या अतुलनीय योगदानाला समर्पक अशी आदरांजली आहे आणि ते देशावरच्या त्यांच्या ऋणांचे प्रतीक असेल. प्रमुख शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवलेला, 28 फूट उंचीचा हा पुतळा मोनोलिथिक ग्रॅनाइट दगडातून कोरला गेला आहे आणि त्याचे वजन 65 मेट्रिक टन इतके आहे.

 

 

JPS/Nilima/Sonali/Sushama/Rajashri/

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai